esakal | ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’
sakal

बोलून बातमी शोधा

Dhamaal Movie

‘तिकडून आणलेल्या गोष्टी’

sakal_logo
By
मंदार कुलकर्णी k007mandar@gmail.com

एका डॉनचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आहे. काही जण ती गाडी थांबवण्याचा प्रयत्न करतात; पण गाडीचा अपघात होतो आणि मरण्यापूर्वी हा डॉन एका ‘बिग डब्ल्यू’च्या खाली आपले सगळे पैसे ठेवल्याचं सांगतो. यानंतर सुरू होतो तो खजिन्याचा शोध. हे सगळे ‘अर्क’ एकमेकांत भांडत, वेगवेगळे प्रवास करत करत त्या ‘डब्ल्यू’पर्यंत पोचतात.

...तुम्हाला ही गोष्ट माहीत आहे. ‘धमाल’ चित्रपटामध्ये तुम्ही ही कथा बघितली आहे आणि पोट धरून हसलाही आहात... पण मंडळी मी सांगतोय ती गोष्ट ‘धमाल’ची नाही. ती गोष्ट आहे ‘इट्स अ मॅड मॅड मॅड मॅड वर्ल्ड’ नावाच्या चित्रपटाची. आता ‘धमाल’ची कथा या चित्रपटावरून घेतली आहे म्हणा, किंवा ‘प्रेरित’ आहे म्हणा; पण ही कथा ‘तिकडून’ आणलेली आहे हे मात्र खरं. यात आणखी एक मजा आहे बरंका. ‘धमाल’ थेट ‘मॅड’वरूनही प्रेरित नाही. ‘मॅड’वरून ‘रॅट रेस’ प्रेरित आहे आणि ही ‘रॅट रेस’ अखेर ‘धमाल’पर्यंत पोचली आहे.

खरं तर अनेक गोष्टींचं मूळ विचारू नये म्हणतात. कारण त्यातून भलत्याच काही गोष्टी हाताशी लागण्याची शक्यता असते. मात्र, बॉलिवूडमध्ये असे माग काढत गेलो, तर अनेक ‘तिकडून आणलेल्या गोष्टी’ सापडतात. कथांपासून गाण्यांपर्यंत आणि अगदी पोस्टरपासून पार्श्वसंगीताच्या तुकड्यांपर्यंत किती तरी. फक्त कॉमेडी चित्रपटांबद्दल बोलायचं, तर किती तरी असे चित्रपट सापडतील- जे हॉलिवूड किंवा इतर देशांमधल्या चित्रपटांवरून ‘प्रेरित’ आहेतच; पण प्रादेशिक चित्रपटांवरूनही त्यांनी उचल घेतली आहे.

अगदी साधं उदाहरण ‘गोलमाल रिटर्न्स’चं. नायकाच्या आयुष्यात काही गोष्टी घडल्यानं त्याला रात्रभर बाहेर राहावं लागतं. सकाळी घरी आल्यावर तो पत्नीच्या माऱ्याला तोंड देण्यासाठी काही विचित्र थापा मारतो. पत्नी त्या तपासते आणि काही गोष्टी खऱ्या निघतात, अशी कथा असलेला हा चित्रपट ‘फेकाफेकी’ या धमाल चित्रपटावरून आधारित आहे. रोहित शेट्टीचे आभार मानायला पाहिजेत, की त्यानं इतरांसारखी ‘फेकाफेकी’ केलेली नाही. त्यानं ‘बोलबच्चन’साठीही हृषिकेश मुखर्जी यांच्या मूळ ‘गोलमाल’ला क्रेडिट दिलं आहेच. मात्र, असे काही अपवाद वगळले, अनेक चित्रपटांत सगळंच गोलमाल असतं. आता पुढची गंमत बघा. ‘गोलमाल ३’ हा ‘खट्टामिठा’ या चित्रपटावरून प्रेरित असला, तरी त्यातही ‘पुन्हा युवर्स माइन अँड अवर्स’ नावाच्या चित्रपटाची प्रेरणा आहे. म्हणजे अभ्यासकांनी माग काढायचा तरी कुठपर्यंत?

गेल्या काही काळात प्रचंड गाजलेले आणि प्रेक्षकांना पोट धरून हसायला लावणारे ‘आवारा पागल दिवाना’, ‘जुडवा’, ‘फिर हेराफेरी’, ‘चाची ४२०’, ‘मस्ती’ असे किती तरी चित्रपट ‘प्रेरित’ आहेत. आता ही प्रेरणा किती ‘टक्के’ आहे याचा अभ्यास जाणकार करू शकतील; पण ‘अस्सल’ विनोदाला दाद देताना कुणी विनोदाची ‘नक्कल’ केली आहे हेही बघायला पाहिजेच की.

बॉलिवूडमध्ये काही दिग्दर्शकांना ‘डीव्हीडी दिग्दर्शक’ असंच नाव पाडण्यात आलं आहे म्हणे. इकडच्या तिकडच्या चित्रपटांच्या डीव्हीडींवरून प्रेरणा मिळवायची आणि आपल्या चित्रपटाचा पसारा मांडायचा असं त्यांचं काम. पूर्वी फक्त इंग्लिश चित्रपट असायचे; पण जग खुलं व्हायला लागलं, तसं इराणी चित्रपटांपासून कोरियन चित्रपटांपर्यंत अनेक चित्रपट ‘सेवे’साठी सज्ज झाले. ही प्रेरणा घ्यावी का न घ्यावी हा पुन्हा ज्याचा त्याचा प्रश्न. त्यावर भाष्य करणारे आपण कोण? पण तुम्ही ज्या विनोदावर हसताय तो विनोद ‘अस्सल’ नाही एवढं कळलं तरी खूप झालं, नाही का?

अर्थात कशावर तरी आधारित असण्याला नावं ठेवायचं कारण नाही. उलट काही प्रतिभावंत मूळ गोष्टीमध्ये ज्या प्रकारे स्वतःचं काही तरी देऊन वेगळी काही तरी कलाकृती तयार करतात त्यांना दाद द्यावी वाटते. अगदी रसरशीत उदाहरण ‘अंगूर’चं. विल्यम शेक्सपिअर यांच्या ‘कॉमेडी ऑफ एरर्स’ची प्रेरणा घेतल्यानंतर गुलजार यांनी वेगळं वातावरण उभं करून, कलाकारांकडून धमाल अभिनय करून घेऊन संपूर्ण चित्रपटाला जे प्रसन्न, हास्यकारक रूप दिलं आहे ते लव्हेबल आहे. ‘मिसेस डाऊटफायर’वरून तयार झालेल्या ‘अव्वाई शन्मुघी’ नावाच्या चित्रपटात ‘क्रेझी मोहन’ या लेखकानं जी भारतीय गुंतागुंत तयार केली, ती आपण नंतर त्यावर थेट आधारित असलेल्या ‘चाची ४२०’मध्ये पाहिलीच. म्हणजे कॉपी करताना त्यात समजा स्वतःचं काही घालून वेगळी कलाकृती तयार झाली तर ती मजा आहे.

गेल्या काही काळात ‘नेटफ्लिक्स’ आणि ‘अॅमेझॉन प्राइम’नं पारंपरिक फॅक्टरीवाल्या लेखक-दिग्दर्शकांच्या पोटावर पाय आणला आहे. कारण अनेकदा त्यांना ज्या चित्रपटावरून, मालिकेवरून प्रेरणा घ्यावीशी वाटते, तो नेमका नेटिझननी आधीच बघितलेला असतो. त्यामुळे त्यांची चलाखी उघडी पडतेच; पण मूळ कलाकृती आधीच बघितलेल्या प्रेक्षकाला त्यात रस नसू शकतो. बाकी, ओटीटी प्लॅटफॉर्ममुळेच अनेकांनी नंतर डोकेदुखी नको म्हणून मूळ चित्रपटाचे अधिकृत हक्कही विकत घ्यायला सुरवात केली आहे ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब.

बाय द वे, प्रेरणांची चर्चा चाललीच आहे, तर रणवीरसिंह हा अभिनेता लवकरच ‘सर्कस’ या चित्रपटात दुहेरी भूमिकेत दिसणार आहे आणि हा चित्रपटही ‘प्रेरित’ असणार आहे. ती प्रेरणा तुम्हाला समजा कळली नाहीच, तर ‘अंगूर खट्टे है’ असं म्हणायला काहीच हरकत नाही एवढा क्लू दिला तरी पुरे!

loading image