विनोदाच्या धबधब्याची ‘आटलेली’ कथा

ही कहाणी आहे गोविंदाची. भारताचा एकेकाळचा कॉमेडी सुपरस्टार. बॉलिवूडमध्ये विनोदनिर्मितीच्या बळावर चित्रपट सुपरहिट करून दाखवण्याची क्षमता असलेल्या दुर्मीळ नायकांपैकी एक.
Govinda
GovindaSakal

तो एके काळी धमाल होता. पिवळ्या पँट घालण्याची फॅशनच काय करेल, ‘मै तो भेलपुरी खा रहा था’ असं किरकोळ गाणं केवळ डान्स स्टेपनं हिट करून दाखवेल, ‘खुबसुरती से बढकर कपडा होता है और कपडेसे बढकर नखरा होता है’सारख्या किरकोळ संवादांसाठी केवळ टायमिंगच्या बळावर टाळ्या मिळवेल, ‘बडे मियां छोटे मियां’मध्ये तो आपल्याबरोबर असावा यासाठी खुद्द अमिताभनं त्याला गळ घालावी इतकं ‘स्टारडम’ मिळवेल... काही सांगता येत नव्हतं. एका बैठकीमध्ये ३९ वगैरे चित्रपट त्यानं साइन केल्याच्या किती तरी दंतकथा त्याच्या नावावर तयार झाल्या ते उगीच नाही; पण विनोदनिर्मिती करण्याची जबरदस्त क्षमता असलेल्या या अभिनेत्याची कहाणी पुढंमागं कधी तरी स्वतःच विनोदाचा विषय होईल याची त्याला कल्पनाही नव्हती. मात्र, ती झालीय ही गोष्ट खरीच.

ही कहाणी आहे गोविंदाची. भारताचा एकेकाळचा कॉमेडी सुपरस्टार. बॉलिवूडमध्ये विनोदनिर्मितीच्या बळावर चित्रपट सुपरहिट करून दाखवण्याची क्षमता असलेल्या दुर्मीळ नायकांपैकी एक. नव्वदीच्या दशकात एकीकडे राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टार्सचं करिअर उतरणीला लागलं असताना जो व्हॅक्युम तयार झाला होता, तो अनेकांनी भरून काढला त्यातला गोविंदा एक. नव्वदीच्या दशकात शाहरुख खान, सलमान खान, आमीर खान यांच्याबरोबर गोविंदाही नवं काही घडवू बघत होता. मात्र, त्याचं वैशिष्ट्य म्हणजे त्यानं आपल्या या समकालीन कलाकारांपेक्षा अतिशय वेगळा स्टान्स घेतला. स्वित्झर्लंडमधल्या पिवळ्या फुलांच्या बागेत रोमान्स करण्यापेक्षा पिवळा ड्रेस घालून विनोदनिर्मिती करायचा ट्रॅक त्यानं पकडला. ट्रॅक विचित्र होता खरा; पण अख्ख्या देशानं त्याला डोक्यावर घेतलं.

‘ऑंखे’मध्ये त्याला स्वतःचा वेगळा सूर सापडला आणि पुढे ‘कूली नंबर वन’,‘हिरो नंबर वन’, ‘हसीना मान जायेगी’ अशा चित्रपटांची फटाक्यांसारखी लडच लावून दिली त्यानं. चित्रपटाची गोष्ट कितीही सुमार असू दे, गोविंदा आपल्या व्यक्तिरेखेत असे काही रंग भरायचा आणि पडद्यावर धमाल करायचा, की पैसा वसूल मनोरंजनाची खात्रीच.

कधी कादर खानबरोबर, कधी शक्ती कपूरबरोबर, कधी चंकी पांडेबरोबर गट्टी करून त्यानं स्वतःचा असा एक चाहतावर्ग तयार केला, चित्रपटांचा साचा तयार केला, ज्याची कॉपी करणं कुणालाही शक्य झालं नाही.

गोविंदाचे चित्रपट नीट बघितले तर लक्षात येईल, की अगदी सर्वसामान्यांचे विषय त्यानं घेतले. हमाल, स्वयंपाकी, टॅक्सी ड्रायव्हर अशा व्यक्तिरेखा साकारल्या. एकीकडे जागतिकीकरणाचे वारे मध्यमवर्गाच्या स्वप्नांना आणखी उंच उंच नेत होते, त्याच काळात गोविंदा कनिष्ठ मध्यमवर्ग आणि गरीब वर्गाला चार घटका हसवत होता. त्याचे संवाद, त्याचे विषय, त्याचं अपील हे थेट पिटातल्या प्रेक्षकांसाठी होतं. हे फार मोठं धाडस होतं; पण गोविंदानं विलक्षण ‘कन्व्हिक्शन’नं ते करून दाखवलं. खरं तर त्याची ही कहाणी एक दंतकथा बनू शकली असती; पण काय झालं कुणास ठाऊक. या फुग्याला कशाची तरी टोचणी लागली आणि हवा गेलीच पार.

कधी गोविंदानं राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला आणि नंतर त्यातून संन्यासही घेतला, कधी त्यानं विनोदी चित्रपटच करणार नाही असं ठरवलं आणि नंतर पुन्हा तो निर्णयही फिरवला. कधी सेटवर उशिरा येण्याचा ट्रेंड तयार केला, कधी डेव्हिड धवन नावाच्या अवलिया दिग्दर्शकाबरोबरची केमिस्ट्री बिघडवून टाकली, कधी चांगले चित्रपट नाकारले... कारणं काहीही असोत; पण बॉलिवूडचा हा हास्यसम्राट त्याचं राज्य गमावूनच बसला. विनोद, टायमिंग, कमाल अभिनय, कोणत्याही व्यक्तिरेखेत घुसण्याची क्षमता, कितीही टुकार गाणं स्वतःच्या स्टाइलचं बनवण्याची कुवत असलेला हा ‘विरार का छोकरा’ आज पूर्णपणे बाहेर फेकला गेला आहे. गोविंदाच्या विनोदनिर्मितीच्या क्षमतेची माहिती नसणाऱ्यांनी ‘हसिना मान जायेगी’सारख्या चित्रपटात साकारलेला चाचाजी आणि मोनू या व्यक्तिरेखा नुसत्या बघितल्या तरी कल्पना येईल. मणिरत्नमच्या ‘रावण’मध्ये त्यानं साकारलेली व्यक्तिरेखाही उत्तम होती आणि गोविंदानं ती साकारण्याचा निर्णयही चौकटीच्या बाहेरचा होता.

गोविंदा हा ‘खुद्दार’ही आहेच. बॉलिवूड हे प्रॉडक्शन हाऊसेसच्या गटबाजीवर चालतं ही गोष्ट अगदीच खरी असताना गोविंदानं आपला ‘एकल’संगीताचा सूर पकडला आहे. कारणं कितीही सांगा; पण गोविंदा आज ‘ऑफ-ट्रॅक’ झाला आहे. आजही तो पडद्यावर आला, तर केवळ एखाद्या विनोदी संवादानं हास्याचा दणदणाट निर्माण करू शकतो; पण त्यानं स्वतः विणलेल्या किंवा इतरांनी तयार केलेल्या कोशातून त्याला बाहेर कोण काढणार हाच खरा प्रश्न आहे. त्याच्या आई निर्मलादेवी यांनी गायलेलं आणि अतिशय गाजलेलं ‘मी एकटीच माझी असते कधी कधी’ हे गाणं त्याचंही अतिशय आवडतं आहे. मात्र, ते कधी काळी आपल्यालाही लागू होईल याची कल्पना त्याला तरी असेल का?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com