पातळीचं भान

masti-Movie
masti-Movie

व्हॉट्सॲपवर वैयक्तिकरित्या किंवा काही ठरावीक समूहांमध्ये फॉरवर्ड होणाऱ्या विनोदांमध्ये ताज्या विषयावरच्या धमाल विनोदाचं, मीम्सचं असतं, त्याचबरोबर चावट आणि चाबरट विनोदांचंही असतं. त्यात गैर काहीच नाही. असे विनोद वैयक्तिक आणि छोट्या वर्तुळापर्यंत राहतात तोपर्यंत त्यात गंमत नक्कीच असते. मात्र, माध्यमांमध्ये म्हणजे नाटक, मालिका, चित्रपट अशा सामूहिकरित्या आस्वाद घेण्याच्या माध्यमांमध्ये ते येतात तेव्हा मात्र त्यांचे आयाम बदलून जातात. तिथं हे विनोद एका विशिष्ट पातळीपर्यंत असतात, तोपर्यंतही धमाल असतेच. मात्र, पातळी सुटल्यावर खरा प्रॉब्लेम होतो.

‘बेटा’सारखा भावनेला हात घालणारा आणि ‘दिल’सारखा रोमँटिक चित्रपट देणाऱ्या इंद्रकुमार यांनी ‘मस्ती’ हा चित्रपट आणला. या चित्रपटात एक चावटपणा आणि वात्रटपणा होता. त्यातली गंमत प्रेक्षकांना आवडली आणि चित्रपट हिट झाला. मालिकांमध्ये वेगळे प्रयोग करणाऱ्या बालाजी टेलिफिल्म्सनं ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ची सुरवात केल्यानंतर ‘मस्ती’च्याच पुढच्या वर्षी ‘क्या कूल है हम’ हा चित्रपट आणला, तेव्हा अनेकांचे डोळे उंचावले होते. कारण हा चित्रपट तेव्हाच्या इतर चित्रपटांच्या तुलनेत अगदीच धाडसी होता. त्यामुळे या चित्रपटाबद्दल नकारात्मक समीक्षणं आली, अनेकांनी नावं मुरडली; पण गंमत म्हणजे हा चित्रपट हिट ठरला. ‘मस्ती’पेक्षाही ‘क्या कूल है हम’ला तेव्हाच्या शहरी तरुण प्रेक्षकांनी उचलून धरलं. हे चित्रपट आले, तो काळ होता २००४-५चा. मल्टिप्लेक्सचा जोर वाढत होता. एकपडदा चित्रपटगृहांपेक्षा जरा वेगळा वर्ग येऊ लागला होता. आयटी आणि कॉल सेंटरच्या बूममुळे तरुणाईच्या खिशात पैसा खुळखुळत होता. या वर्गाला अशी गंमत हवीच होती. त्यामुळे ‘मस्ती’, ‘क्या कूल है हम’ना प्रतिसाद मिळाला. फक्त एवढंच नाही तर तशा प्रकारच्या चित्रपटांची लाटच आल्यासारखं झालं.

आपल्या ‘मस्ती’पूर्ण चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद बघून ‘बालाजी मोशन पिक्चर्स’ आणि इंद्रकुमार दोघांचाही उत्साह वाढला. ‘क्या सुपर कूल है हम’ आला, आणि ‘ग्रँड मस्ती’ही आला. या दोन्ही चित्रपटांनी आधीच वातावरणनिर्मिती केली होती, त्यामुळे त्यांनाही आणखी प्रतिसाद मिळाला. मात्र, प्रतिसाद जितका मिळत होता, तितकी पातळी आणखी खाली जात होती. 

खरं तर एक वेगळ्या प्रकारचा विनोद रुढ करण्याची संधी या दोघांकडे होती. मात्र, अशा प्रकारचा विनोद विकला जातोय, हे लक्षात आल्यावर सूचकता आणि बीभत्सपणा यांच्यातल्या सीमारेषेचं भान विसरलं गेलं. दोन्ही चित्रपटांचे नंतर तिसरे भाग आले. ते इतके भयाण होते आणि पातळी इतकी खाली होती, की दोन्ही चित्रपट आपटले. इंद्रकुमार तर इतके अपसेट झाले, की त्यांनी ‘मस्ती’ फ्रँचायझी बंद करून टाकण्याचा निर्णय घेतला. चूक त्यांचीच होती. त्यांनी स्वतःच्याच पायांवर कुऱ्हाड मारून घेतली होती. ‘बालाजी’ही आता ‘कूल’चा पुढचा भाग काढायची सुतराम शक्यता नाही. 

आमीर खाननंही निर्माता म्हणून ‘डेली बेली’सारखा प्रयोग केला होता. काही गंमती निश्चित होत्या; पण आमीर खान नंतर असा प्रयोग करायला धजावू शकला नाही. दीपक तिजोरीनं ‘उप्स’ नावाचा असाच प्रयोग केला होता; पण तिथंही गंमत आणि वाह्यातपणा यातली रेषा पुसली गेली आणि दीपक तिजोरी पुन्हा असा प्रयोग करायला गेला नाही. खुद्द अमिताभ बच्चन यांनीही ‘बूम’ नावाच्या वाह्यात चित्रपटात अभिनय केला होता; पण तिथंही बीभत्सपणामुळे त्यांच्यावर इतकी टीका झाली, की ते पुन्हा असल्या प्रयोगाच्या वाटेला गेले नाहीत. 

सूचक विनोदांमध्ये गंमत असते; पण त्यात उघडपणा आला, की तिथे प्रॉब्लेम होतो. नाटकांमध्येही मध्ये मध्ये बोल्ड नाटकांची लाट येते. ‘अप्पाजींची सेक्रेटरी’, ‘शू कुठं बोलायचं नाही’ अशी किंचित वात्रट नाटकं बघताना मजा येते; पण होतं काय, की बोल्डपणाच्या नावाखाली विनोदाची पातळी घसरवून टाकणारी नाटकं मध्ये मध्ये येतात आणि पातळी इतकी  घसरायला लागते, की मग प्रेक्षक ते दरवाजे बंद करून टाकतात. काही वेब सिरीजमध्ये विनोदाच्या नावाखाली अशी पातळी हळूहळू खाली जायला लागली आहे आणि त्यामुळे त्यांना फटका बसणं सुरू झालं आहेच.   

थोडी गंमत पाहिजेच हो. विनोद आहे त्यामुळे थोडा पाचकळपणा, वात्रपटणाही हवाच की. आता ‘नो एंट्री’, ‘गरम मसाला’, ‘प्यार का पंचनामा’ किंवा अगदी ‘हंटर’सारखे धमाल सिनेमे वात्रट असूनही लोक स्वीकारतातच की. मात्र, अनेकदा  पातळीचं भान राहत नाही आणि मग गणित बिनसतं. अर्थात ‘सेक्स कॉमेडी’, ‘ॲडल्ट कॉमेडी’ना मिळणारा प्रतिसाद आणि त्यामुळे त्यांचं प्रमाण कमी होत असताना, त्याच वेळी अतिशय धाडसी विषय घेऊनही पातळी न सोडता खुसखुशीत मांडणी असलेले ‘व्हिकी डोनर’, ‘शुभमंगल सावधान’, ‘बधाई हो’ असे चित्रपट मात्र प्रेक्षकांची पसंती कशी मिळवतात हे आपण बघितलंच आहे. सामर्थ्य आहे विनोदाचे...परंतु तेथे पातळीचे अधिष्ठान पाहिजे एवढंच सांगितलं तरी पुरे!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com