
गोष्ट एका हास्यनगरीची
घरातले सगळे जेवणंबिवणं करून टीव्ही लावून बसले आहेत. ‘झोपी गेलेला जागा झाला’ ही मालिका आता लागणार आहे. दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या धमाल भूमिका असलेली ही मालिका. गरीब, निरागस दिनूचे रंगढंगच बदलून गेलेत आणि आता पुढं काय धमाल घडणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. घरोघरी दिसायचं हे चित्र.
घरातले सगळे जेवणंबिवणं करून टीव्ही लावून बसले आहेत. ‘झोपी गेलेला जागा झाला’ ही मालिका आता लागणार आहे. दिलीप प्रभावळकर आणि अशोक सराफ यांच्या धमाल भूमिका असलेली ही मालिका. गरीब, निरागस दिनूचे रंगढंगच बदलून गेलेत आणि आता पुढं काय धमाल घडणार याची सगळ्यांना उत्सुकता आहे. घरोघरी दिसायचं हे चित्र. तुम्हाला आठवतेय ही मालिका? किंवा ‘ये जो है जिंदगी’मधल्या एव्हरग्रीन स्वरूप संपत? ‘नसती आफत’मध्ये लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केलेली धमाल? ‘श्रीमान श्रीमती’मधले अतरंगी शेजारी? खरंच धमाल होती. अजूनही या मालिकांच्या आठवणी ऐकल्या, की मोरपिसासारखं वाटतं ना? पण मंडळी, खरं सांगा, गेल्या काही दिवसांत एखादी मालिका बघून (कॉमेडी शो नव्हे हं. मालिका!) खूप हसायला झालंय किंवा पुढच्या भागाबद्दल प्रचंड उत्सुकता आहे, असं एखादं उदाहरण सांगू शकाल? सवय म्हणून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ बघणं वेगळं आणि ती बघून सतत हसू येणं हे वेगळंच. तर, या मालिकांमुळे हास्याची पखरण होतेय का?
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
खरं तर एके काळी निरागस, कौटुंबिक विनोद हे छोट्या पडद्याचं बलस्थान होतं. घरातल्या सगळ्यांनी एकत्र बघण्याचे ते खास विरंगुळ्याचे क्षण होते. दूरदर्शनवरच्या मराठी मालिकांची सुरवातच ‘चिमणराव-गुंड्याभाऊ’च्या धमालीनं झाली हा योगायोग नव्हेच. ती गरजच होती. ‘गजरा’पासून तत्कालीन स्टार वनच्या ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’पर्यंत अनेक विनोदी मालिकांनी घरांना एका धाग्यात बांधून ठेवलं. मात्र, आज घरातले सगळे एकत्र आस्वाद घेऊ शकतील अशा मालिका गेल्यात कुठं? विनोदांतला उत्स्फूर्तपणा कमी झलाय, की घरातल्या प्रत्येकाच्या विनोदाच्या गरजेमध्ये जमीन-अस्मानाचं अंतर निर्माण झालंय? की ‘विनोदी मालिका- टीआरपी- जास्त मागणी- बुंदी पाडणं- यांत्रिकता’ असं दुष्टचक्र मालिकांच्या विश्वात निर्माण झालंय?
सप्तरंगचे आणखी लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा
अनेक विनोदी मालिकांनी छोटा पडदा गाजवला. ‘श्रीमान-श्रीमती’, ‘ये जो है जिंदगी’, ‘देख भाई देख’,‘चाळ नावाची वाचाळ वस्ती’, ‘असे पाहुणे येती’ अशी किती नावं सांगावीत? या मालिकांमध्ये असलेला निरागसपणा तेव्हाच्या समाजामध्येही होता. त्यामुळे या निरागसपणातून घडणाऱ्या गंमतीजमती हा सगळ्यांमधलाच समान धागा होता.
मात्र, सॅटेलाइट टीव्ही आला आणि मनोरंजनाचा पटच बदलून गेला. तीन-चार तासांचं प्रसारण चोवीस तासांपर्यंत गेलं. मनोरंजनाला अफाट मागणी वाढली. दुसरीकडे मालिका हळूहळू प्रायोजित झाल्या आणि ‘कंटेंट’ ‘आऊटसोर्स’ व्हायला लागला. त्याचाही परिणाम झालाच. आता तर मनोरंजन मोबाईलच्या माध्यमातून थेट हातात आलंय.
प्रचंड मागणी, व्यावसायिक गणितं या गोष्टी मालिकांमध्ये सुरू झाल्या, त्याच वेळी समाजही बदलत होता. जागतिकीकरणानंतर म्हणजे नव्वदीनंतर तो बदलला, तितकाच सोशल मीडियाच्या, मोबाईलच्या, तंत्रज्ञानाच्या अफाटीकरणानंतर गेल्या काही वर्षांत अंतर्बाह्य बदलला. आत्ताचा प्रेक्षकच पंचवीस-तीस वर्षांसारखा राहला नाही, तर विनोद निरागस राहून कसा चालेल? पण आत्ताच्या प्रेक्षकांचं प्रतिनिधीत्व विनोदी मालिकांमध्ये दिसतंय का? अगदी साधं उदाहरण, आपण सगळेच फेसबुक, व्हॉट्सअॅप यांच्यावर पडीक असतो; पण कुठल्या विनोदी मालिकेत हे विषय येतात तरी का? प्रेक्षक स्मार्ट झालाय, तसा मालिकांमधला विनोद स्मार्ट झालाय का? तो तसा नसल्यानंच कदाचित तरुण पिढी ओटीटी प्लॅटफॉर्म्सकडे वळली असावी. त्यांना हसायचंय, नक्कीच हसायचंय; पण यांत्रिक, चौकटबद्ध विनोदी मालिकांमधून ती संधीच मिळत नाहीये.
एक असंही आहे, की पूर्वी आठवड्यात एकदा असणारी विनोदी मालिका आता रोज असते. त्यामुळे ती लिहिणाऱ्यांना, सादर करणाऱ्यांना निरीक्षण करायला, नव्या गोष्टी सुचायला वेळच मिळत नाहीये. सगळ्याच मालिकांचे साचे झालेत, तसे ते विनोदी मालिकांचेही झालेत. त्यातल्या यांत्रिकतेनं त्यांच्यातल्या उत्स्फूर्तपणाला सुरूंग लावून टाकलाय आणि त्यामुळेच त्यातून विनोदनिर्मिती होत नाहीये.
‘भाभीजी घर पे है’, ‘एफआयआर’, ‘यम किसीसे कम नही’ अशी काही धमाल मालिकांची उदाहरणं आहेत; पण एकूण प्रमाण कमीच. ‘साराभाई’ ‘ऑफिस ऑफिस’ अशा मालिकांनी बदलत्या समाजाचं प्रतिबिंब आणलं खरं; पण अजूनही मालिकांमधल्या विनोदाचे विषय ठरीवच आहेत हेही खरं. चॅनेल्सची गणितं, ‘ईपी’ मंडळींचा हस्तक्षेप, उत्तम दर्जाच्या लेखकांची वानवा, त्यांच्या मर्यादा, मालिका-दिग्दर्शनाचं ‘आऊटसोर्सिंग’ उत्तम कलाकारांची व्यग्रता किंवा जास्त ‘पर डे’ या गोष्टी तर आणखी पुढच्या. किती तरी विनोदी मालिका सुरू होतात आणि खूप कमी टिकतात, त्याचं कारण शोधायला हवंच. त्यामुळे प्रेक्षकांना हवा असूनही मालिकांमधला विनोदाचा ‘टक्का’ कमी होत चाललाय. अर्थात, नवीन प्रयोगांना प्रेक्षक प्रतिसाद देतात का, हा प्रश्नही ‘हसून’ सोडून देता येणार नाही हे जितकं खरं, तितकंच विनोदी मालिकांच्या ‘बुंदी’पेक्षा व्हॉट्सॲपवरचे अस्सल ‘शंकरपाळे’ सध्या जास्त भूल घालत आहेत हेही तितकंच खरं!
Edited By - Prashant Patil