
- महेंद्र सुके
पुरुषप्रधान व्यवस्थेत कनिष्ठ समजली गेलेली स्त्री खरेच दुबळी आहे का? मंगला आठलेकर यांनी ‘पुन्हा एकदा स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्री ही सामर्थ्यशाली कशी आहे, हे वेगवेगळे दाखले देऊन अधोरेखित केले आहे.
जगभरात वेगवेगळ्या पातळीवरचा वर्गभेद वर्षानुवर्षांपासून पोसला गेला आहे. त्यात जातीवाद, धर्मवाद, वर्णवाद, प्रांतवाद, लिंगभेद अशा अनेक वादांनी एकूणच समाजजीवनाला छळले आहे. यातील बहुतांश वादात वर्चस्वासाठीची लढाई आहे.
श्रेष्ठ-कनिष्ठ ठरण्याची चढाओढ आहे. माणूस म्हणून प्रत्येकात काही बलस्थाने आहेत, तशाच काही उणिवाही असतात. याचा सद्सदविवेकबुद्धीने विचारच झाला नसल्याने जे कनिष्ठ ठरवले गेले, ते नेहमीच व्यवस्थेत दबून राहिले, जे श्रेष्ठ समजतात ते आपले स्थान टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या क्लृप्त्या करत आले आहेत.
अशाच पुरुषप्रधान व्यवस्थेत कनिष्ठ समजली गेलेली स्त्री. ती खरेच कनिष्ठ आहे का, कमकुवत आहे का, दुबळी आहे का, तिचा इतिहास, आजचे वास्तव आणि उद्याची स्त्री यावर वेगवेगळे दाखले देऊन मंगला आठलेकर यांनी ‘पुन्हा एकदा स्त्री-पुरुष तुलना’ या पुस्तकाच्या माध्यमातून स्त्री ही सामर्थ्यशाली कशी आहे, हे अधोरेखित केले आहे.
मंगला आठलेकर यांना काय म्हणायचे आहे, त्याविषयीचा संक्षिप्त मजकूर पुस्तकाच्या मुखपृष्ठावर आहे. ‘‘मला इथं स्त्रीच्या दुबळेपणाबद्दल बोलायचं नाहीय. पुरुषाच्या दुर्गुणांची यादीही वाचायची नाहीय.
मला लिहायचंय ते स्त्रीच्या अंगभूत गुणवत्तेविषयी आणि प्रतिकूलतेवर मात करणाऱ्या तिच्या कणखरपणाविषयी!’’ कुठलेही चित्र न वापरता लेखिकेची भूमिका हेच या पुस्तकाचे आगळेवेगळे मुखपृष्ठ आहे. मुखपृष्ठावर अधोरेखित झालेली ही भूमिका महत्त्वाची आहे.
पुस्तकाच्या प्रस्तावनेत आठलेकर लिहितात, ‘‘त्या निबंधात स्त्रीशक्ती हा ताराबाईंनी केंद्रबिंदू न ठेवताही त्यांनी स्त्रीची बलस्थानंही फार नेमकेपणाने दाखवलेली आहेत, याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. ताराबाईंनी सोडलेल्या या रिकाम्या जागा भरण्याची आवश्यकता आहे...
ताराबाईंनी स्त्रीच्या गुणांकडे, बलस्थानाकडे निर्देश केला आहे, त्या गुणांचं आज शंभर-दीडशे वर्षे उलटून गेल्यावर काय चीज झालं आहे, हे पाहणं ताराबाईंनी पुरुषप्रधान संस्कृतीला विचारलेल्या प्रश्नाचा उत्तरार्ध ठरेल.’’ हे अगदी स्वच्छपणे सांगताना त्यांनी पुस्तकात बाईपणाचे बलस्थान अधोरेखित केले आहे.
आदिम काळातील स्त्रिया सर्व आघाड्या उत्तमरीत्या सांभाळणाऱ्या कणखर, कर्तृत्ववान आणि कलागुणांची आवड असलेल्या होत्या. अश्मयुगात तिच्याभोवती कसले कोट नव्हते, संस्कृतीचे पहारे नव्हते, याची प्रचीती पुस्तकाच्या पहिल्या भागातील इतिहासात आहे.
स्त्री ही अगदी आईच्या उदरात असल्यापासून, जन्मापासून पुरुषापेक्षा अधिक जिवट, समर्थ असते, हे जीवशास्त्र सिद्ध करते. सुपरमॅन, बॅटमॅन, स्पायडरमॅन यांची चित्रे सतत डोळ्यांसमोर ठेवून स्त्रीला संकटातून वाचवणारा हा फक्त बलवान असा पुरुषच असतो,
हे लोककथांद्वारे आणि आज माध्यमांद्वारे ‘स्त्री ही दुबळी जात’ हे ओरडून सांगितले जाते. तरीही स्त्री ही जगण्याला चिवटपणे धरून राहणारी आहे, हे जीवविज्ञानाने मान्य केलेले सत्य आहे, हे अधोरेखित केले आहे. त्यासाठी अनेक संशोधनाच्या दाखल्यांची नोंद केली आहे.
अश्मयुगात कणखर असलेली स्त्री वैदिक काळात पुराकथेत स्वतंत्र बाण्याची होती, त्यासाठी अनेक स्त्री व्यक्तिचित्रांची उदाहरणे वाचकांना चकित करतात. पुस्तकातील या दाखल्यांद्वारे विचार करायला भाग पाडतात.
स्त्रीचे पुराकथा आणि लोककथा यातील रूपात जमीन-अस्मानाचे अंतर होते, हे सांगताना स्त्रीच्या मर्यादा स्पष्ट करणाऱ्या लोककथांचा प्रभावच समाजमनावर कसा बिंबविला गेला, हे वेगवेगळ्या लोककथा सांगून त्याचे विश्लेषण केले आहे.
रामानुजनांनी अनुवादित केलेल्या कथा उदाहरणादाखल नोंदवल्या आहेत. त्या कथा स्त्रियांना कुठल्या ठिकाणी ठेवू पाहतात, याचे लेखिकेने काढलेल्या निष्कर्षातून समजून घेणे आपली समज समृद्ध करणारे आहे.
‘‘जगभरात प्रत्येक समाजाच्या त्याच्या त्याच्या म्हणून लोककथा आहेत. लोककथा हा सांस्कृतिक ठेवा म्हणून ओळखला जातो; पण एका जुन्या काळाच्या खुणा म्हणून, ठेवा म्हणूनच तो राहायला हवा. समाजाच्या कुठल्याही घटकाचे जीवन त्यामुळे बंदिस्त होता कामा नये.’’ हा लेखिकेचा अन्वयार्थ लोककथेत वाचक म्हणून आनंद घेतानाच, त्या कथेच्या हेतूबद्दल पुनर्विचार करायला भाग पाडतो.
पुस्तकाच्या दुसऱ्या भागात बाईच्या वर्तमानाचे दाखले मंगला आठलेकर यांनी नमूद केले आहेत. स्त्री पुरुषांइतकीच, कधी कधी त्यांच्याहूनही अधिक सक्षम आहे, त्याला जीवशास्त्राचा पुरावा आहे.
शिवाय प्राचीन काळातील स्त्रीचे जगणेही यावर झणझणीत प्रकाश टाकणारे आहे. तरीही आपल्या कानावर सतत स्त्रीच्या दुबळेपणाची, तिच्या दुय्यम स्थानाची चर्चा का येते, असा प्रश्न करत आठलेकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
त्या म्हणतात, ‘स्त्रीच्या दुबळेपणाची चर्चा सतत करत राहणं हा ज्यांच्या हातून सत्ता निसटली आहे, अशा प्रतिगामी पुरुषवर्गाचा डाव आहे.’ याच अनुषंगाने आजच्या पिढीतील मुलींनी निवडलेल्या बिनधास्तपणाची अनेक उदाहरणे देऊन, स्त्री आता बदलत असल्याचे दाखले दिले आहेत.
स्त्री आणि लैंगिक स्वातंत्र्य या संदर्भात पुस्तकात सविस्तर चर्चा आहे. त्यासाठी र. धों. कर्वे यांच्या विचारांची अवतरणे अधोरेखित केली आहेत. आजची शहरातली आणि खेड्यातली स्त्री, त्यांच्या वाट्याला आलेले जगणे आणि सारे अडथळे पार करून आता पुढे जाणाऱ्या स्त्रिया-मुलीची उदाहरणे ‘बाई’पणात अडकून पडलेली स्त्री रूढी-परंपरेची चौकट मोडून सामर्थ्यशाली बनत असल्याचा विश्वास जागवणारे आहे.
राजकारणाील स्त्रिया, क्रीडा, कला क्षेत्रातल्या स्त्रियांची गोष्ट सांगत हे पुस्तक बिंदू क्षमा नावाच्या तरुणीने स्वीकारलेल्या सोलोगॅमीवरही भाष्य करते. पुस्तकाचा समारोप करताना, ‘‘प्रत्येक बाईकडे ‘आतला आवाज’ असतो. हा आतला आवाज म्हणजे फारशी चर्चिली न गेलेली तिची मोठी शक्ती म्हणजेच तिच्याकडे असलेलं अंतर्ज्ञान.
प्रत्येक आईकडून मुलीला मिळालेल्या या ‘आतल्या आवाजा’चा वापर साऱ्याच स्त्रियांना करता येतो असे नाही.’’ हे सांगताना लेखिकेने ‘द डॉल इन हर पॅकेट’ या कथेतील वासालिसाची गोष्ट सांगून ‘आजच्या स्त्रीला स्वत:ची ओळख पटलेली आहे’ हे अधोरेखित करून १२० व्या पानावर पुस्तकाचा समारोप केला आहे.
त्यानंतरचा तिसरा भाग आहे, ताराबाई शिंदे यांच्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या मूळ संहितेचा. सलग पुस्तक वाचत जाताना शेवटी हा एक सुखद धक्का लाखमोलाचा आहे! तो मूळ निबंध वाचून पुस्तक संपते; पण बाई कणखर आहे, कर्तबगार आहे, ती ‘बाई’ नाही, व्यक्ती आहे. व्यक्ती म्हणून तिलाही पुरुषांप्रमाणेच स्वातंत्र्य असलेच पाहिजे, या मतप्रवाहाकडे ‘पुन्हा एकदा स्त्री-पुरुष तुलना’ पुस्तक वाचकाला घेऊन जाते.
पुस्तकाची वर्गवारी तीन भागांत केली गेली आहे. पहिल्या भागात इतिहास, दुसऱ्या भागात वर्तमान आणि तिसरा भाग हा एक अनपेक्षित धक्का आहे. या पुस्तकाला १४० वर्षांपूर्वी ताराबाई शिंदे यांनी लिहिलेल्या ‘स्त्री-पुरुष तुलना’ या निबंधाची पार्श्वभूमी असल्याने या पुस्तकाचे शीर्षक त्या निबंधाच्या शीर्षकाआधी ‘पुन्हा एकदा’ जोडून ‘स्त्री-पुरुष तुलना’ असे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.