राष्ट्रवादीच्या हेडक्वार्टरमध्ये अस्वस्थता आणि खदखद !

मंगेश कोळपकर 
Sunday, 29 September 2019

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा हा कायमच बालेकिल्ला राहिलेला आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे सतत पुण्यात वास्तव्य असते. त्यामुळे पक्षाचे हेडक्वार्टर हे पुणेच आहे. साहेब, दादा आणि ताई यांना मानणारे येथे अनेक कार्यकर्ते आहेत लोकप्रतिनिधी आहेत. शहरातही 'ते साहेबांचे', 'हे दादांचे' तर 'ते ताईंचे,' अशी कार्यकर्त्यांमध्ये विभागणी देखील झालेली आहे.

अजित पवारांच्या अनपेक्षित राजीनाम्यामुळे बसलेला आश्चर्याचा धक्का...त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेले संभ्रमाचे वातावरण....शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर कार्यकर्त्यांत निर्माण झालेली अस्वस्थता....आणि दादांच्या खुलाशानंतर पुन्हा एकदा सस्पेन्सचे वातावरण शहर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झाले आहे. 'व्हॉट नेक्स्ट' असे कार्यकर्ते परस्परांना विचारत आहेत. 

दादांनी दिलेला राजीनामा, साहेबांची पत्रकार परिषद आणि दादांचा आजचा खुलासा या सगळ्या घटनाक्रमामुळे कार्यकर्त्यांत परस्परांबद्दल संशय निर्माण झाला आहे तर प्रमुख कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता ! दादांच्या खुलशानंतर सगळे आलबेल होईल, असे नेत्यांना वाटत होते, प्रत्यक्षात पक्षाची पुढील वाटचाल कशी असेल, या बद्दल कार्यकर्त्यांमध्ये कुतूहल निर्माण झाले आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचा पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्हा हा कायमच बालेकिल्ला राहिलेला आहे. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांचे सतत पुण्यात वास्तव्य असते. त्यामुळे पक्षाचे हेडक्वार्टर हे पुणेच आहे. साहेब, दादा आणि ताई यांना मानणारे येथे अनेक कार्यकर्ते आहेत लोकप्रतिनिधी आहेत. शहरातही 'ते साहेबांचे', 'हे दादांचे' तर 'ते ताईंचे,' अशी कार्यकर्त्यांमध्ये विभागणी देखील झालेली आहे. सत्तेची पदे आणि कोणत्याही निवडणुकीची उमेदवारी मिळवताना अनेकदा ही गटबाजी उफाळून येते.शहरात तर 'दादा ग्रूप' जाहीररीत्या अस्तित्वात आहे. मात्र साहेब आले की पक्ष अभंग दिसतो. 

सत्तेची अनेक पदे किंवा निवडणुकीची उमेदवारी देताना दादांनी कार्यकर्त्यांना शब्द दिला पण पक्ष किंवा नेतृत्वाने निर्णय वेगळाच घेतला, यांची अनेक उदाहरणे आहेत. त्या वेळी दादांची पंचाईत होत. त्यातूनच दादांमधील अस्वस्थता अनेकदा दिसून आली अन अलीकडच्या काळात ती वाढत गेली. पार्थच्या लोकसभा निवडणुकीतील प्रचार यंत्रणेचा आढावा घेताना हे दिसून आले होते. दादांना मानणारा गट, दादांच्या खुलशानंतर अजूनच अस्वस्थ झाला आहे. साहेबांची आणि दादांची रात्री भेट झालेली दिसते, अशी बोलकी प्रतिक्रिया ते कार्यकर्ते व्यक्त करतात. मनात अजून बरंच काही बाकी आहे, असेही ते सांगतात. पक्षाने संधी दिली नाही तर कार्यकर्ते बंडखोरी करू शकतात, परंतु दादा तसं काही करू शकत नाहीत, त्यामुळे त्यांची पक्षांतर्गत घुसमट अलीकडे काळापासून वाढलेली आहे, असे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. 

साहेबांना मानणारे आणि त्यांच्याशी एकनिष्ठ असणारे कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. साहेबांनी वातावरण फिरवलं आणि दादांनी ते बदलले. किमान  काल तरी दादांनी असे करायला नको होते, असे त्यांचे म्हणणे आहे. दादाचा साहेबांवर विश्वास संपला आहे का, असे ते विचारतात. तर दादांनी खुलासा केला तरी, झालेले 'डॅमेज' भरून निघणार का, असाही प्रश्न ते उपस्थित करतात.  

ताईंचा गट शहरात अस्तित्वात आहे. गेल्या 24 तासांत घडलेल्या घडामोडींमुळे ते देखील अस्वस्थ आहेत. मात्र सध्या या कार्यकर्त्यांनी 'वेट अँड वॉच' ची भूमिका घेतली आहे. 

या सगळ्या प्रकारात मोठ्या नेत्यांशी थेट संपर्कात नसणारे कार्यकर्ते मात्र 'काय सुरू आहे' असे म्हणत एकमेकांच्या तोंडाकडे पहात आहेत...तर सध्या तरी शांत झालेले दादा पुढे कशी पावले टाकणार आणि साहेबांचे आता लक्ष कसे असणार, या कडे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mangesh Kolapkar writes about NCP and Pune