दुवा छोटा; मात्र तपास मोठा

रहस्यकथा, पोलिस तपासकथा या वाचकांना नेहमीच आकर्षित करतात. अशा प्रकारच्या साहित्यप्रकाराला वाचनीयताही मोठी असते.
Book Only One Clue
Book Only One ClueSakal

रहस्यकथा, पोलिस तपासकथा या वाचकांना नेहमीच आकर्षित करतात. अशा प्रकारच्या साहित्यप्रकाराला वाचनीयताही मोठी असते, त्यामुळेच पोलिस तपासावर आधारित ‘सीआयडी’ सारखी मालिका गेली अनेक वर्षे दूरचित्रवाणीवर सुरू आहे. पोलिस तपास, हे एक शास्त्र असले, तो निश्चित ठोकताळा नाही. मात्र, ते एक विशिष्ठ असे कौशल्य आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. त्या - त्यावेळी परिस्थितीनुरूप संवाद, चिंतन आणि प्रयत्न, आजपर्यंतचा अनुभव यातून संबंधित अधिकारी त्या कृत्याचा मागोवा घेतो आणि गुन्हा उघडकीस येतो. याची प्रचिती निवृत्त सहायक पोलिस आयुक्त राजेंद्र भामरे यांचे ‘ओन्ली वन क्लू’ हे पुस्तक वाचताना येते.

अनेकदा टीव्ही, चित्रपटांतून काल्पनिक तपास कथाही दाखविल्या जातात. परंतु, या पुस्तकात खऱ्याखुऱ्या २९ तपास कथा आहेत. त्याचे संदर्भ समाजात सहज उपलब्ध आहेत. त्यामुळे या कथांची विश्वासार्हता उंचावते. पोलिसांचा तपास, त्यांची भाषा हा सर्वसामान्यांसाठी तसा रूक्ष विषय. परंतु, या तपास कथा वाचनीय झाल्या आहेत, त्याचे मुख्य कारण कथेचा वाचकांशी होणारा कनेक्ट. घटना उलगडून दाखविताना, वाचकाच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांची उत्तरे थोडा विचार केल्यावर पुढच्या ओळींमध्ये मिळत जातात. त्यामुळे म्हटले तर सलग एक - दोन बैठकांत पुस्तक वाचून पूर्ण होऊ शकते. पण त्यातल्या आशयामुळे ते मनात रेंगाळत राहते. हिच भआमरे यांच्या लेखनाची ताकद आहे.

भामरे यांनी पुणे, नवी मुंबई, नाशिक, सोलापूर आदी अनेक जिल्ह्यांत ३६ वर्षांच्या सेवेत विविध पदांवर काम केले. गुन्हे शाखेचा त्यांचा अनुभवही दांडगा आहे. तपास करताना माणसं वाचण्याची ज्या अधिकाऱ्याला सवय लागते, तो यशस्वी होतो, असे म्हटले जाते. भामरे यांना त्याची सवय नव्हे तर, छंदच जडला होता.

कोणत्याही नव्या भागात गेल्यावर तेथील लोकांना भेटणे, त्या भागाताली सामाजिक, राजकीय संस्कृती माहिती करून घेणे, हे त्यांना मनापासून आवडते. त्यामुळे त्या - त्या भागात ते तत्काळ रूजले आणि त्यांचा प्रवास सोपा झाला. पोलिस तपास कसे करतात त्यावेळी पोलिसांची मनःस्थिती काय असते, कुठल्या तांत्रिक बाबींचा अंतर्भाव त्यांच्या तपासात होतो, इलेक्ट्रॉनिक्स फुटप्रिंट्स म्हणजे काय असते, चित्रपट, पोलीस तपास कथा यामध्ये डोकावणारे खबरे म्हणजे नक्की काय? ते कसे तयार करावेत, ते कोण असतात आदींची सखोल माहिती यात आहे.

गेल्या काही वर्षांत समाज कसा बदलत आहे, त्यामुळे गुन्ह्यांचे स्वरूप कसे बदलत आहेत, गुन्हेगारांची बदललेली मानसिकता याकडे पुस्तकात लक्ष वेधण्यात आले आहे. प्रत्येकामध्येच असलेला ‘सिक्स सेन्स’ पोलिस कसा वापरतात, याचाही संदर्भ उल्लेखनीय आहे. महाविद्यालयीन जीवनात झालेल्या प्रेम आणि नंतर ब्रेकअप झाल्यानंतर तिचर युवती किती व कशी क्रूर होऊ शकते, याबद्दलची कथा यात आहे.

‘लाल तांदूळ’ या कथेत एखादा छोटासा दुवा मिळाला तर पोलिस गुन्हेगारांपर्यंत नेमके कसे जातात आणि आरोपीला कसा गाठतात याचा प्रत्यय येतो. खंडणी व अपहरण, वेश्या व्यवसायाचे जाळे आणि त्यातून सुटका, निघृण खून आदी गंभीर गुन्ह्यांच्या तपास कथा वाचनीय तर आहेच पण, मनुष्य कसा आणि कोणकोणत्या पद्धतीने विचार करू शकतो, हे यातल्या विविध कथांमधून दिसून येते. एकीकडे तपासाबद्दल माहिती देताना कायदा - सुव्यवस्था कशी नियंत्रणात ठेवायची, त्यात लोकप्रतिनिधींचा सहभाग हेही समजते तर, पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव कसा असतो, याचीही कल्पना यातून येते.

आजच्या काळात सायबर सुरक्षा हा जीवनातील महत्त्वाचा घटक बनला आहे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून गुन्हे वाढत आहेत. ते टाळण्यासाठी काय करावे काय करू नये हे याचे मार्गदर्शन देखील आपल्याला या पुस्तकात वाचायला मिळेल.सायबर सुरक्षितता किती महत्त्वाची आहे, सायबर साक्षर असणे हे अत्यंत आवश्यक का बनले आहे हे देखील कळते.

अपराध्याला शोधून काढणं हे जसं तपास अधिकाऱ्याचं कार्य आहे तसेच निरपराध्याचे रक्षण करणे हे देखील त्याचेच काम होय. नोकरी करत असताना अधिकाऱ्यांनी सकारात्मकपणे कसे वागावे याबद्दल या पुस्तकात वाचावयास मिळते. हे पुस्तक सामान्य वाचकांना तसेच नवीन पोलीस अधिकाऱ्यांना देखील उपयोगी व मार्गदर्शन करणारे आहे. गिरीश चरवड यांनी काढलेली रेखाचित्रे ते प्रसंगाला जिवंतपणा आणतात.

या पुस्तकाला प्रस्तावना माजी पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची असून त्यांनी या कथांबद्दल तसेच एकंदरीत पोलीस खात्याबद्दल सुबोध माहिती दिलेली आहे. पुस्तकातील कथांबद्दल संत साहित्यिक, ज्येष्ठ संशोधक डॉ. सदानंद मोरे यांचे मतही वाचनीय आहे. पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील व सीआयडी या गाजलेल्या मालिकेतील एसीपी,''प्रद्युम्न'' शिवाजी साटम यांच्याही प्रतिक्रिया पुस्तकाबद्दल बरंच काही सांगून जातात. एकंदरीतच आपल्या जवळपास घडलेल्या व घडू शकणाऱ्या घटनांच्या तपास कथांच्या पुस्तकाचे वाचन हे आपले अनुभवविश्व समृद्ध करणारे ठरू शकते.

पुस्तकाचं नाव : ओन्ली वन क्लू

लेखक : राजेंद्र भामरे

प्रकाशक : उत्कर्ष प्रकाशन, पुणे

(०२०- २५५३७९५८, ८६२३९८९७७१)

पृष्ठं : १७८ मूल्य : २९९ रुपये.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com