Premium|Mao Zedong Political Philosophy : क्रांतीचे कडबोळे...

Mao’s Political Philosophy and Food Revolution : माओ यांच्या राजकीय विचारांची खिल्ली उडवत खाद्यसंस्कृती, खाण्यापिण्याच्या सवयी आणि क्रांती यांची मिश्किल सांगड घालणारा हा उपरोधिक लेख जगन जमदग्नी यांच्या काल्पनिक तत्त्वज्ञानाची ओळख करून देतो.
Mao Zedong Political Philosophy

Mao Zedong Political Philosophy

esakal

Updated on: 

प्रवीण टोकेकर- saptrang@esakal.com

वरील वाक्याचा अर्थ उघड आणि सोपा आहे. तो वाचकांना कळलाच असेल! तथापि, जेन झी पिढीला तो माहीत नसेल. उपरोक्त वाक्यात काही लोकांना चिनी हाका नूडल्ससारखे काही दिसेल. ते खरेही आहे. कां की हे वाक्य चिनीच आहे. विख्यात साम्यवादी क्रांतीचे प्रणेते माओ त्से तुंग अथवा माओ झेडाँग अथवा च्येरमन माओ यांनी ६ नव्हेंबर १९३८ रोजी चिनी कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत उच्चारले होते, असे इतिहासात नमूद आहे. माओ हे चिनीच होते. आणि बहुधा नूडल खातानाच त्यांनी उपरोक्त भाष्य केले असणार.

काही अज्ञानी नॉनबापट संप्रदायी जनलोकांसाठी आम्ही या वाक्याचा अर्थ थोडक्यात सांगू. चिनी भाषेत याचा अर्थ ‘राजकीय सत्ता ऊर्फ क्रांती ही बंदुकीच्या नळीतून उगवते’ असा आहे. हे आम्हाला मानचाव सूप भुरकताना नुकतेच कळले. माओवाद हा आमचा खास आवडीचा विषय नाही. आम्ही खाओवादाचे पुरस्कर्ते! ‘‘क्रांतीचा मार्ग बोलाईच्या नळीतून जातो, बंदुकीच्या नव्हे!’’ हे खाओ त्से तुडुंब ऊर्फ जगन जमदग्नी (विख्यात खाद्यक्रांतीचे आद्य प्रणेते) यांचे हे वाक्य आमच्या मुखी तिन्ही त्रिकाळ असते. दुर्दैव असे की माओच्या बंदुकीच्या नळीचे अगम्य चिनी वाक्य शतकभर गाजले, पण खाओ यांच्या अजरामर सुविचाराची दखल कुणाला घ्यावीशी वाटली नाही.

गुरुवर्य जगन जमदग्नी या क्रांतिकारकाचे नाव तुम्हाला ठाऊक आहे का? नसावे! (तुम्हीही तसलेच..!) क्रांती जंतर मंतरवर बर्गर खाऊन होत नसते. विद्यार्थ्यांचे मेळावे घेऊन देशभर ‘छात्रों की गूंज’सारखे कार्यक्रम करुन होत नसते, व्होटचोरीचे आरोप करुनही क्रांतिबिंती करता येणार नाही. क्रांतीचा मार्ग पोटातून जातो आणि तो बव्हंशी मटणाच्या नळीतून उगवतो. ( खुलासा : शाकाहाऱ्यांनी मटणाच्या नळीच्या जागी शेवग्याच्या शेंगांचा उपयोग करावा. बिचारे!!) हे जगन जमदग्नी यांचे लाडके तत्त्व आहे. खाओ तुडुंब या टोपणनामानिशी त्यांनी आपले विचार अनेक व्यासपीठांवर मांडले. ही व्यासपीठे प्राय: मिसळ, बटाटावडा, थालीपीठ, खानावळी, मद्यगृहे अशीच होती, हा भाग निराळा! त्यांच्या निकट सहवासाचा (आणि वासाचाही) लाभ आमच्यासारख्या मोजक्या शिष्यांना झाला. खाओ तुडुंब यांचे तत्वचिंतन जगभर प्रसारित करण्याचा आणि जीवनात त्याचा प्रयोग करण्याचा आदेश प्राप्त झाल्यामुळेच सदरील लेखनप्रपंच वेळात वेळ काढून मांडिला आहे. सध्या घरोघरी फराळाचे जिन्नस तयार होत आहेत. आम्हालाही आज करंज्या तळून काढण्याचे कार्य पार पाडावयाचे असूनही घटकाभर झारा खाली ठेवून आम्ही झरणी (खुलासा : पेन) उचलली आहे, याची मायबाप वाचकांनी नोंद घ्यावी.

* * *

Loading content, please wait...