बिनपैशाचा तमाशा (संजय कळमकर)

बिनपैशाचा तमाशा (संजय कळमकर)

बालपणी रविवारपेक्षा आम्ही शुक्रवारचीच जास्त उत्सुकतेनं वाट पाहायचो. कारण, त्या दिवशी आमच्या गावचा आठवडेबाजार असायचा. आजूबाजूच्या गावांतले लोक बाजारासाठी बैलगाडीनं, सायकलनं नाहीतर पायी यायचे. त्यामुळे गाव कसं गर्दीनं फुलून जायचं. त्या काळी सिगारेटपेक्षा विडी प्रसिद्ध होती. ती स्वस्त मिळायची म्हणून शेतकऱ्यांना परवडायची. हे व्यसन वाईट असलं तरी त्यानं शीणभाग जातो असं ओढणारे सांगायचे. नवीन कंपनीची विडी निघाली की चहूबाजूंनी विड्यांचं चित्र असलेली जुनाट रिक्षा गावात यायची. भोंगा लावून, प्रचार करत गावभर फिरायची.

चुलते मला सांगायचे ः "बिड्यांची गाडी आली, पळ...' आम्ही काही मित्र विड्यांच्या रिक्षामागं पळायचो. आतून विड्यांचे कट्टल (विड्या एकत्र बांधलेला जुडगा) बाहेर उधळले जायचे. ते हस्तगत करायला एकच गर्दी उसळायची. दोन-तीन कट्टल गोळा करून चुलत्यांना नेऊन दिल्यावर गोळ्या खायला पाच पैसे मिळायचे! शुक्रवारी आमचे भरगच्च कार्यक्रम ठरलेले असायचे. बाजारात फिरणं हा त्यातला मुख्य कार्यक्रम. शेतकरी ताजा भाजीपाला घेऊन दुतर्फा रांग करून विकायला बसत असत.

बाजारकरूंच्या पिशव्यांमधून कांद्याची पात, मुळा-गाजराचे हिरवे शेंडे, ताज्या भाज्या बाहेर डोकावताना दिसायच्या. काही हावरट बाजारकरू, शेतकऱ्यांनी तराजू धरून माप करेपर्यंत उभ्या जागी एक- दोन काकड्या, टोमॅटो गट्टम करायचे; पण एवढे कष्ट करून पिकवलेला तो शेतातला माल कुणाला कधी माणुसकीपेक्षा महाग वाटला नाही. एखादी शेतकरीण म्हातारी "अजून खा की बाबा' म्हणत खेड्यातली अस्सल माणुसकी दाखवून द्यायची. माणुसकीची ही हिरवाई फक्त माणसांमध्येच नाही तर हिरव्यागच्च पालेभाज्यांतसुद्धा होती. मातीतली सेंद्रिय माया पालेभाज्यांच्या पानापानात भरलेली असायची. पालेभाज्या विकणाऱ्यांची रांग संपल्यावर, काही जर्मनच्या भांड्यांची उघडी दुकानं, पुढं माठ, गाडगी, मडकी विकणारा कुंभकार, विमानाच्या टायरचा तळ लावलेल्या भक्कम चपला आठवडाभर बेतून, त्या विकायला बसलेला चर्मकार, वेतानं विणलेले काऊबॉयच्या टोपीच्या आकाराचे झाप घेऊन बाजारच्या दूर खालच्या अंगाला एखादा कैकाडी उभा असायचा.

कोंबड्या, त्यांची इवलीशी पिलं किंवा शेळ्यांची करडं डालण्यासाठी असे झाप वापरले जायचे. प्लास्टिकच्या वस्तू ठेवलेल्या पालासमोर स्त्रिया गर्दी करत. खालच्या अंगाला शेळ्यांचा बाजार भरायचा. त्यांच्या मेमाटानं बाजारच्या गलबल्यात भर पडायची. मला आठवतंय, आमच्या आळीतल्या रामभाऊंनी एकदा लाल-पिवळी बुंदी विकायला बाजारात आणली. ती दाणेदार बुंदी पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटलं. गावात दुसऱ्या दिवशी एका मुलीचा साखरपुडा होता. तिच्या वडिलांनी साखरपुड्यासाठी ती सगळीच्या सगळी बुंदी विकत घेतली. खरं म्हणजे, आदल्या दिवशी रामभाऊंच्या वडिलांचा दहावा (दशक्रिया) होता; परंतु दहाव्यात जेवलं तर मृत माणसाचा आत्मा उरावर येऊन बसतो, या (गैर)समजुतीनं अनेक लोक दहाव्याचं जेवण जेवले नव्हते. तेच लोक मात्र दुसऱ्या दिवशी साखरपुड्यात दणकून बुंदी खाताना दिसले. याची आम्हाला भलतीच गंमत वाटली आणि आपण माणूस नावाच्या एका लबाड संवर्गात जन्माला आलो आहोत हे लहानपणीच समजलं. असो.

पुढं पालातली मिठाईची दुकानं सुरू झाल्यावर तोंडाला पाणी सुटायचं. लाल-पिवळ्या तिखट शेवेचे आकर्षक ढीग, डाळीचे पिवळेधम्मक लाडू, खुरमा आणि लालजर्द कांड्यांची गोडीशेव...असे कितीतरी पदार्थ. गरम जिलेबीचा घाणा सदोदित सुरू असायचा. पालाच्या मागं टाकलेल्या तळवटावर बसून आई-बाप, पोरं गरम जिलेबी, तिखट शेव खाण्याचा आनंद लुटायचे. शनिवारी शाळेत बहुतेक मुलांच्या डब्यात शेव, मुरमुरे आणि गोडीशेव हमखास दिसायची. ठराविक मुलांच्या डब्यात हा सारा खाऊ एकत्र कालवलेला असायचा. समज येऊ लागल्यावर कळलं की अत्यंत गरिबांची ही मुलं बाजार संपून मिठाईची दुकानं उठली की खाली पडलेला खाऊ गोळा करून दुसऱ्या दिवशी डब्यात आणायची. जातपात, गरिबी-श्रीमंती अशी कसलीही जाणीव नसलेल्या त्या वयात हा खाऊही चविष्ट लागायचा. मोठं होत गेल्यावर भेदाभेदाच्या कडवट चवीनं मात्र जगण्यातली मजा घालवली. त्यात दुसरी बाजू म्हणजे तरुण होत गेलो तसे बाजाराचे संदर्भही बदलले. परकर, पोलकं आणि वेणीचे दोन गोंडे पाठीवर रुळणाऱ्या ग्रामीण तरुणी तुरळकपणे बाजारात दिसायच्या. मग गावातले तरुण अंतर राखून त्यांच्या मागं मागं फिरायचे. फक्त पालकांचंच नव्हे तर सगळ्या गावाचंच दडपण मनावर असल्यानं तरुण मुलं-मुली मर्यादा ओलांडत नसत. प्रकट व्हायला मोबाईल नावाचं साधन तेव्हा हाताशी नव्हतं. गावातल्या काही तरुण मुली तर आठवड्यातून एकदा फक्त बाजारातच दिसायच्या. चोरनजरेनं परस्परांकडं पाहणं यापलीकडं जाण्याची कुणाची हिंमत नसायची. पण कुणी याही पलीकडं गेलाच तर "प्रेमात पडला' याऐवजी "मार खाऊन अंथरुणात पडला' हे वाक्‍य जास्त ऐकू यायचं. 
*** 
हायस्कूलमध्ये गेलो तरी बाजारच्या दिवसाचं आकर्षण काही कमी झालं नाही. याचं कारण, बाजारच्या दिवशी गावात येणारा तमाशा अर्थात लोकनाट्य. गावाच्या बाहेर सपाट माळरानावर तमाशा उतरायचा. भला मोठा तंबू रोवून बाजूनं कनात लावली जायची. लावण्या, गवळणी, लोकगीतं झाल्यावर वग सुरू व्हायचा. त्यातली विनोदी पात्रं खूपच हसवायची. साडी नेसलेला पुरुष मावशी होऊन यायचा आणि मोठी धमाल उडवून द्यायचा. रात्री नऊ वाजता सुरू झालेला तमाशा पहाटे पाचपर्यंत चालायचा. तरणी मंडळी तमाशात असल्यानं गावात चोर शिरून चोरीचा स्वतंत्र तमाशा उरकून घ्यायचे. तिकिटाला पैसे नसल्यानं आमची मित्रांची टोळी गनिमी काव्यानं आत कसं शिरता येईल याचं प्लॅनिंग करायची. कुणी पाहत नाही याचा अंदाज घेऊन आम्ही कापडाची कनात वर करून आतल्या गर्दीत उड्या टाकून मिसळून जायचो. कधी कधी कनात राखणारे काठ्या घेऊन आम्हाला गर्दीत शोधायचे. आमचं लपणं, त्यांचं शोधणं असा बिनपैशाचा तमाशा बराच वेळ चालायचा. खरा तमाशा सुरू झाल्यावर आमचा जीव भांड्यात पडायचा. 
000----------------000 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com