

New Marathi Book
esakal
शब्दांशी जोडले नाते
कल्पना बंब यांच्या ‘शब्दांशी जोडले नाते’ या पुस्तकात सामाजिक, वैचारिक आणि अध्यात्मिक स्वरूपाचे लेख एकत्रित करण्यात आले आहेत. नाती, कुटुंबव्यवस्था, स्त्रीचे महत्त्व, मानवी मूल्ये, संवाद, दैनंदिन जीवनातील प्रसंग, सण-उत्सव, शिक्षण आणि सकारात्मक विचार या विषयांवर लेखन केलेले आहे. पुस्तकातील प्रत्येक लेख स्वतंत्र असून, जीवनातील वेगवेगळ्या अनुभवांच्या संदर्भातून विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे. काही ठिकाणी संतवाङ्मय आणि प्रेरणादायी विचारांचा संदर्भही दिला आहे. साधी भाषा, लहान लेख आणि विविध विषयांचा समावेश ही या लेखसंग्रहाची वैशिष्ट्ये आहेत. n प्रकाशक : प्रणाली प्रकाशन, पुणे
पृष्ठे : ८४,
मूल्य : २००
चला हसू येऊ द्या
हास्य, विनोद यांना आपल्या जीवनात फार महत्त्व आहे. कोणाताही माणूस आनंदी, प्रसन्न असेल, तर अवघड कामेही सहजपणे करू शकतो. एखाद्या मोठ्या समस्येवरही हसत-खेळत उपाय शोधला जाऊ शकतो. या पार्श्वभूमीवर प्रसन्नपणे हसवणारे लेखक विजय तरवडे यांचे विनोदी लेख असलेले ‘चला हसू येऊ द्या’ हे पुस्तक आवर्जून वाचायला हवे. तरवडे यांचे हे ५० वे पुस्तक आहे. पुस्तकात विनोदी लेखनाच्या माध्यमातून समाजातील विसंगतीवरही बोट ठेवण्यात आले आहे. धकाधकीच्या जीवनातील काही क्षण आपले वैयक्तिक दुःख, आजूबाजूची प्रतिकूलता यांचा विसर पडण्यासाठी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
प्रकाशक : इग्नाईटेड क्रिएशन्स, पुणे
पृष्ठे : १२६,
मूल्य : ३२० रु.