

Journalism Beyond Political Drama
esakal
प्रणव सखदेव - sakhadeopranav@gmail.com
टीव्हीवरच्या बातम्या पाहत होतो. एकीकडे मोबाइलवर मेसेजेस आल्याचे रिंगटोन्स वाजत होते.
बातम्यांमध्ये पक्षांतराच्या, इकडून तिकडे आमदार-खासदार कसे गेले, त्यासाठी आधी या राज्यातून त्या राज्यात कसे गेले, अमुक ऑपरेशन कसं पार पडलं याबद्दलची माहिती अतिरंजक पद्धतीने, भरपूर चीझ घातलेलं एखादं स्ट्रीट फूड जसं सर्व्ह केलं जातं तशा ‘वाढल्या’ जात होत्या. शांतपणे, शक्य तितक्या निःपक्षपातीपणे बातम्या सांगितल्या पाहिजेत असं मी पत्रकारितेच्या कोर्समध्ये असताना शिकवलं गेलं होतं, ते आठवलं. निराशा दाटून आली आणि त्यानंतर कडवट हसू.
टीव्ही म्यूट करून मोबाइल पाहिला. मैत्रिणीने एक व्हिडिओ पाठवला होता. ती पूर्वी एका मोठ्या चॅनेलमध्ये पत्रकार म्हणून काम करायची. पण नंतर तिथल्या परिस्थितीला कंटाळून तिने स्वतःचं यूट्यूब चॅनेल सुरू केलं होतं. त्याला बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळत होता. तिने पाठवलेला व्हिडिओ रिपोर्ताज खऱ्या विदारक स्थितीचं नुसतं एक टोक होतं. दुष्काळी ग्रामीण भाग, तिथली कोसळलेली शेती-व्यवस्था, तिथल्या लोकांचे प्रश्न, समस्या, रोजगाराच्या संधींची कमतरता असं बरंच तिने कव्हर केलं होतं. तो व्हिडिओ पाहून निराशेत भरच पडली. कुठे जातो आहोत आपण? काही कळेनासं झालं.