मराठीची समृद्ध परंपरा आणि अस्मिता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi

समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे.

मराठीची समृद्ध परंपरा आणि अस्मिता

समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? मराठी भाषेचे काय होणार, याविषयी काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना तिची गोडी कशी लागेल, याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे.

मराठी भाषेविषयी दोन विभिन्न मतप्रवाह अनुभवायला मिळतात. पहिला प्रवाह मराठीच्या भवितव्याविषयी शंका व्यक्त करणारा, तर दुसरा मतप्रवाह बोलण्यातून, वागण्यातून, आविष्कारातून मराठी भाषेची आणि संस्कृतीची पाळेमुळे भक्कम करणारा आणि मराठीच्या भवितव्याविषयी साशंकता न बाळगणारा आहे. मराठी भाषेची प्राचीनता, व्युत्पत्ती, तिचे विविधांगी प्रवाह, परंपरा, व्यापकत्व, वाड्‌मयनिर्मिती, तिच्या बोलीभाषा अशा विविध अंगाने भाषेचा विचार होताना भाषेचे सौंदर्य, सौष्ठव, माधुर्य, रसाळता आणि त्या भूमिकेतून लोकमानसात स्थिरावलेली तिची रूपे यांचा विचार होणे महत्त्वाचे ठरते. एका अर्थाने भाषा हीच संस्कृतीची वाहक असते. ज्ञानगंगेचा प्रवाह अखंड चालू ठेवण्याची आणि समाजजीवनाला प्रगत करण्याची कामगिरी भाषेलाच करावी लागते. वैज्ञानिक दृष्टीने पाहिल्यास भाषा हे केवळ समाजव्यवहाराचे नाही, तर विचारांचेही साधन आहे. बोलीभाषांसारखे अनेक प्रवाह, इतर विविध भाषांमधील शब्द, संकल्पना मूळ भाषेला येऊन मिळतात आणि भाषा समृद्ध होते. त्या भूमिकेतून मराठी भाषा समृद्ध आहे.

तिची प्राचीनता दोन हजार वर्षांपेक्षाही अधिक आहे. या संदर्भात नाणेघाटात सापडलेला शिलालेख हा बावीसशे वर्षांपेक्षा जुना आहे. तिच्यातील वाङ्‌मय निर्मितीलाही हजारो वर्षांची परंपरा आहे आणि वाङ्‌मयनिर्मितीही व्यापक आहे. 

बोलीभाषा सत्त्व पोसते
मराठीला खूप बोलीभाषा लाभल्या आहेत. प्रसिद्ध भाषा संशोधक डॉ. गणेश देवी यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार भारतामध्ये १९६१ मध्ये ११०० बोलीभाषा होत्या. गेल्या पाच-सहा दशकांत त्यातील ३०० बोलीभाषा संपुष्टात आल्या. महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर बोलीभाषा मरण पावण्याचे प्रमाण कमी आहे. महाराष्ट्रात आजही ५३ बोलीभाषा आहेत. डॉ. देवी यांच्या या विधानाला पुष्टी देणारा संत नामदेवांचा एक अभंग आहे. त्यात त्यांनी ‘ज्ञानेश्‍वरी’ची महती सांगताना म्हटले आहे,
ज्ञानराज माझी योग्यांची माउली।
जेणे निगमवल्ली प्रगट केली।
छपन्न भाषेचा केलासे गोरव
भवार्णवी नाव उभारिली।।

ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्‍वरी’सारख्या ग्रांथिक प्रबंधरचनेत ५६ भाषांना स्थान दिले. त्यातील बहुतेक भाषा मराठीच्या बोलीभाषाच होत्या यात शंका नाही. आजही मराठीच्या कोकणी, मालवणी, अहिराणी, आगरी, बाणकोटी, मराठवाडी, तावडी, पावरी, वऱ्हाडी, कोयाबोली, गौंडी, डांगी, भिलोरी, गोरमाटी, कादोडी, पुवारी, झाडीबोली यांसारख्या अनेक बोलीभाषा आहेत. मौखिक परंपरेचा मूळ स्रोत मुख्यत्वे या बोलीभाषांतून आला आहे. बोलीभाषा हीच त्या त्या लोकसंस्कृती टिकवून ठेवते. बोलीभाषेने मूळ भाषेला किंवा प्रमाणभाषेला अजिबात कमीपणा येत नाही, उलट अशी बोलीभाषा ही मायभाषेचे सत्व पोसते आणि योग्य अन्वर्थक शब्दांची मायभाषेला उणीव भासते, त्या वेळी ती धावून येते. कितीतरी म्हणी, वाक्‌प्रचार लोकोक्ती हे बोलीभाषेतून प्रमाण भाषेत आले आहेत. 

समृद्ध ग्रामजीवन हा भाषेचा पाया
मराठीच्या बोलीभाषेने आणि मौखिक परंपरेने एक मोठी लोकसंस्कृती उभी केली आणि सांस्कृतिक अंगाने मराठी भाषा टिकविली. महाराष्ट्राची संस्कृती ही लोकसंस्कृतीवर आधारलेली आहे आणि ही लोकसंस्कृती हजारो खेड्यांत नांदणाऱ्या लोकजीवनाची सांगाती आहे. म्हणूनच लोकसंस्कृती उभे करणारे समृद्ध ग्रामजीवन हादेखील मराठी भाषेच्या भक्कमतेचा पाया असू शकतो.

मराठी भाषेचे रूप, स्वरूप आणि सौंदर्य उभे करताना सर्वांत पुढे डोळ्यांसमोर उभे राहातात ते संत ज्ञानदेव, संत तुकाराम. ज्ञानदेवांच्या अगोदर मराठीमध्ये वाङ्‌मयनिर्मिती झाली नाही असे नाही. ज्ञानदेवांनी ‘ज्ञानेश्‍वरी’च्या माध्यमातून प्रबंधरचना केली, तर अभंग, ओवी, गौळण, विरहिणी, भारुडे या वाङ्‌मयप्रकारांची आद्य रचना करून सारस्वताचाही पाया घातला. तर वास्तव दर्शनालाही भावदर्शनाची जोड देत तुकोबाराय मराठी सारस्वतांचा कळस ठरले. मराठीत आख्यानपर काव्यलेखनाची परंपरा नाथांनी सुरू केली. विशालता, तत्त्वचिंतन त्याचबरोबर लोकभूमिकांच्या बोली आविष्कारातून नाथांच्या वाङ्‌मयात पांडित्य आणि लोकभावना यांचा संगम झाला.

संत साहित्याबरोबर लोकसाहित्य आणि लोकपरंपरेतून आलेली मौखिकतेची स्वाभाविक रसाळता तर अभंग, ओवीबरोबरच लावणी, फटका, पोवाडा, म्हणी, वाक्‌प्रचार, लोककथा, पुराणकथा, हरिकथा, बोधकथा, सांगीवांगीच्या गोष्टी, तर वासुदेव, गोंधळी, भराडी, पांगुळा यासारख्या लोकभूमिकेच्या माध्यमातून प्रकटलेली मौखिक वाणी हे मायबोलीचे स्वाभाविक आणि रांगडे सौंदर्य ठरले. त्याने मराठी भावविश्‍व फुलविले. एकीकडे पंडिती वळणाची पंचांची मराठी, तर दुसरीकडे जांभेकर, लोकहितवादी, रानडे, आगरकर, महात्मा फुले यांसारख्या सुधारकांच्या विचारतत्त्वाने बुद्धीप्रामाण्यवादाची कणखर समाजमूल्ये देणारी मराठी लाभली. त्यानंतर विरग्ध मराठी साहित्याची परंपरा आधुनिक मराठी साहित्यिकांनी कथा, कादंबरी, कविता, नाटक, गद्यकाव्य, लघुनिबंध यासारख्या वाङ्‌मय प्रकारांतून समृद्ध बनविली आहे. संपूर्ण जगभरात सहा हजारांच्या आसपास भाषा आहेत. त्यात मराठीचा क्रमांक सतरावा आहे आणि जगातली साडेचौदा कोटी लोक मराठी बोलतात, ही आनंदाची गोष्ट आहे.

भवितव्याची चिंता नको
थोडक्‍यात सांगायचे, तर समृद्ध मराठीची परंपरा आणि मराठीच्या भवितव्याची चिंता करणे खरेच योग्य आहे काय? असाही एकीकडे प्रश्‍न पडतो. तर वास्तव वेगळेच पाहायला मिळते. इंग्रजी भाषा ही ज्ञानभाषा, विज्ञानभाषा आणि व्यवहार म्हणजे वाणिज्यभाषा म्हणून जगातल्या सर्वच भाषांना आव्हान देत उभी राहिली. मराठी ही ज्ञानभाषा कधी नव्हती आणि नाही? विज्ञानभाषा ही सृष्टीतील विविध घटकांशी मानवाचे नाते जोडते, तर वाणिज्यभाषा लौकिक अर्थाने परस्पर व्यवहार आणि उद्योग व्यवसायाला आधारभूत असते. त्यापुढे ती माध्यमाची भाषा म्हणून लोकप्रिय आणि रूढ होते. मराठीचे उच्चाटन होऊन शिक्षण आणि उद्योग व्यवसायामध्ये माध्यमाची भाषा म्हणून इंग्रजी मिरवली जाते आहे. खरेतर शिक्षणासाठी माध्यमाइतकीच अभिव्यक्ती महत्त्वाची असते.

शिक्षणाचे माध्यम इंग्रजी असले, तरी अभिव्यक्तीचे माध्यम मात्र मराठीच आहे. भाषेचा मुक्तपणा हा माध्यमात नाही, तर अभिव्यक्तीत आहे आणि ही अभिव्यक्ती कुटुंब, समाज, लोकजीवन आणि संस्कृती यांच्याशी जोडली गेली आहे. म्हणून मराठीचे काय होणार, याविषयीची काळजी करण्यापेक्षा नव्या पिढीला आणि लहान मुलांना घराघरांतून मराठीची गोडी कशी लागेल याची जाणीव होण्याची आता वेळ आली आहे. ते प्रत्येकाच्या हातात आहे. अजून वेळ गेलेली नाही. ‘खरे तर नव्या युगाची आव्हाने पेलण्याचे सामर्थ्य मराठीच्या हाती आहे. पण तिच्या सामर्थ्यांविषयी साशंक असणारी आम्ही तिची अपत्ये मात्र दुबळी आहोत’, हे १९८९ च्या जागतिक मराठी परिषदेतील कुसुमाग्रजांचे वाक्‍य आज ठळकपणे आठवते. म्हणून मराठीचा ऱ्हास होतो आहे, असे नुसते म्हणण्यापेक्षा ‘जाणीव आणि कृती’ या दोन्ही पातळीवर मराठीच्या वैभवात, अस्तित्वात आणि लौकिकात मी काय भर घालू शकतो, याचा आता अंतर्मुख होऊन विचार करावा लागेल.