आपण फक्त 'पुष्पक' विमानेच उडवायची? 

India March for Science
India March for Science

शास्त्रीय संशोधनावरील खर्चाच्या अपुऱ्या तरतुदी, अशास्त्रीय गोष्टींचा प्रचार अशा विषयांकडे सरकार आणि समाजाचे लक्ष वेधण्यासाठी परवा शास्त्रज्ञांनी काढलेला मोर्चा ही तशीही पहिल्या पानाची बातमी नव्हती. आपली ऐतिहासिक-पौराणिक 'पुष्पक' विमाने आपल्या सर्वांना अतिशय वेगाने मध्ययुगीन मानसिकतेत घेऊन चाललेली असताना अशा मोर्चांची दखल कोण घेणार आणि कशासाठी?...अस्मितेचे प्रश्‍न ही आपल्या समाजासाठी सर्वांत महत्त्वाची गोष्ट. त्यामुळे माध्यमांसाठीही त्याच गोष्टी महत्त्वाच्या. राजकारण महत्त्वाचे. माध्यमे त्यावरच लक्ष देणार. समाजही त्याच गोष्टींचे चिंतन करणार. त्यात शिक्षणाचे वाटोळे झाले तरी चालते आणि संशोधनाची माती झाली तरी फरक पडत नाही.

आपल्यासाठी महापुरुषांचे पुतळे, त्यांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या हे सारे महत्त्वाचे. आपले स्वातंत्र्य सत्तरीत आले. पण, जग ज्याच्याकडे पाहून आश्‍चर्य व्यक्त करेल, असे एकही संशोधन आधुनिक काळात या भूमीत झालेले नाही. शून्याचा शोध लावणाऱ्यांचा देश आता संशोधनात जवळजवळ 'शून्य' झाला आहे. गेल्या शतकभरात नाव घेण्यासारखा एकही तत्त्ववेत्ता निर्माण झाला नाही. विचारवंतांच्या नावावर कॉपीबहाद्दरांची संख्या अफाट आणि जातीय किंवा धार्मिक विद्वेष निर्माण करणाऱ्यांचे पेव फुटलेले. जातीनिहाय, धर्मनिहाय 'विचारवंत' आहेत आपल्या देशात...डावे-उजवे, हिरवे-निळे-भगवे इत्यादी. तरीही देशाला महासत्ता करण्याच्या गप्पा. त्यात विश्‍वगुरुत्वाच्या बाता. पाकिस्तान, बांगलादेशचे सोडा. आफ्रिकेतले मागासलेले देश आणि आखातातील इस्लामी अतिरेकाच्या सावटाखालील राष्ट्रांशी तुलना करू नका. आपली तुलनाच व्हायची असेल तर प्रगत देशांशी झाली पाहिजे. आपण पाकिस्तानपेक्षा किंवा सोमालिया-सुदानपेक्षा बरे आहोत, याचे समाधान वाटत असेल तर युरोपच्या तुलनेत आपण खूप मागे आहोत, याचे असमाधान फारच मोठे असले पाहिजे. तसे असमाधान नाही म्हणून हा देश मागे आहे.

नेपाळ-भूतान किंवा कंबोडियाला आपण शिकवू शकतो. पण, विकसित राष्ट्रांनी आपल्याकडून शिकावे, असे किमान आज तरी आपल्याकडे काहीही नाही. दरिद्री आहोत आपण जगाला नवे काही देण्याच्या बाबतीत. आपण नव्या काळातील शिक्षणाचे मॉडेल देऊ शकत नाही. आपण संशोधने देऊ शकत नाही. त्यासाठी पुरेशी संधी देऊ शकत नाही. आपण नवा विचार देऊ शकत नाही. आपण चिकित्सेला आणि प्रश्‍नार्थकतेला शत्रू मानतो आणि त्यामुळेच आपल्या समाज जीवनात नव्या विचारांचा गर्भपात होतो. विकसित देशांना आपल्याकडून जातीय दंगली शिकायच्या नाहीत. धर्मवेड शिकायचे नाही. त्यांना नुसते पुतळे उभारायचे नाहीत. अस्मितांचे प्रश्‍न माणसांच्या प्रश्‍नांहून मोठे करायचे नाहीत. गोरक्षणाच्या वेडात निरपराधांचे जीव घ्यायचे नाहीत आणि बलात्कारित स्त्रीच्या देहात सळाखी खुपसण्याचे अमानुषपणही त्यांना शिकायचे नाही. त्यांचे प्राधान्यक्रम वेगळे आहेत. त्यांच्या देशाचे प्रश्‍न असतील. अस्मितांचेही प्रश्‍न असतील. पण, ते माणसांच्या प्रश्‍नांहून मोठे नाहीत. म्हणून त्या देशांना 'विकसित' म्हणायचे.

आपल्या भारत नावाच्या देशाची संस्कृती थोर होती वगैरे सारे बरोबर आहे. जगातले बरेच वल्कलात वावरत होते तेव्हा शून्याचा शोध भारतात लागला होता, हेही खरे आहे. स्वातंत्र्योत्तर काळात हरितक्रांती इत्यादी गोष्टी करून आपण बरीच मजल मारली हेही खरे आहे. ज्या देशात सुई तयार होत नव्हती, तिथे अंतराळयान तयार होते, ही मोठीच गोष्ट आहे. पण, गेल्या दीडेक शतकात मूलभूत संशोधनात भारताने भर घातल्याचे दिसत नाही. स्वातंत्र्यानंतरही संशोधनाच्या क्षेत्रात फार मोठा पराक्रम घडलेला नाही. रेडिओ असो वा टीव्ही, लॅण्डलाइनचा फोन असो वा मोबाईल; भारताचे संशोधनाच्या क्षेत्रातले योगदान अगदी नगण्य आहे. मानवाच्या जगण्यात ज्या गोष्टींनी मोठा फरक घडवला, त्यातले काहीही तयार करण्याची किंवा शोधून काढण्याची ऊर्जा देणारे वातावरणच नसेल तर हे सारे घडूच शकत नाही. असे वातावरण सरकारच्या पुढाकाराने, शैक्षणिक वातावरणातून आणि सामाजिक औदार्यातून निर्माण होत असते. प्रश्‍नार्थक असण्याला सन्मान असला आणि चिकित्सेला इज्जत मिळाली तर असे वातावरण निर्माण होते. यातले काय आपल्याकडे पुरेशा प्रमाणात आहे, हे आपण कधी तरी तपासले पाहिजे. झालेच तर सरकारची या शिक्षण-संशोधनादी क्षेत्रांसंबंधीची बांधीलकीही तपासली पाहिजे. अमेरिका जीडीपीच्या पावणे तीन टक्के खर्च संशोधनावर करतो. चीन दोन टक्के खर्च करतो. जपानचा संशोधनावरील खर्च जीडीपीच्या (सकल राष्ट्रीय उत्पन्न) साडेतीन टक्‍क्‍यांवर आहे...आणि भारताचा खर्च फक्त 0.85 टक्के !...धड एक टक्काही नाही. केनिया आणि चिलीसारखे देश आपल्या बरोबरीत आहेत. शिक्षणाचेही तेच. अमेरिका आणि ब्रिटन प्रत्येकी सुमारे 6 टक्के जीडीपी शिक्षणावर खर्च करतात आणि भारताचा खर्च जेमतेम तीन-साडेतीन टक्के...युगांडाच्या बरोबरीचा!...आणि आपण गप्पा करतो महासत्ता आणि विश्‍वगुरुत्वाच्या. 

वास्तव असे, की आपण सत्तर वर्षांत ज्या वेगाने पुढारलो, त्यापेक्षा अधिक वेगाने मागे जात आहोत. अंतराळ याने उडत असतील. रस्ते-पूल बनत असतील. पण, शिक्षणात मूलभूत सुधारणा होताना दिसत नाहीत. संशोधनावर सरकारचे लक्ष नाही. एकाने इंजिनिअरिंग केले की भरमसाठ इंजिनिअर्स...एकाने सोयाबीन पेरले की साऱ्यांच्या शेतात सोयाबीन..! सोबतीला मध्ययुगीन मानसिकतेचे हिडीस प्रदर्शन. ठिकठिकाणी रानटी न्यायाचे जलसे आणि त्याचेही समर्थन करणारे लोक. हे मागासणेच आहे. हे अमानुष आहे. आपल्या समाजातील माणुसकीचा विकास थांबल्याचे हे लक्षण आहे. जिथे माणुसकी थांबते, तिथे कल्याणाचा विचारही थांबतो आणि हे सारे थांबले, की विचार थांबतो आणि संशोधनही ठप्प होते. तेच आपल्या देशाचे झाले आहे.

देशात लोकशाही आहे. बऱ्यापैकी स्थैर्य आहे. बव्हंशी कायद्याचे राज्य आहे. पण, समाज प्रगल्भ झाल्याचे 'फिलिंग' येत नाही. शिक्षण संस्थांमध्ये असलेले वातावरण त्या देशाची प्रकृती घडवत असते. नव्या पिढीला संशोधनासाठी पोषक वातावरण शिक्षण संस्थांमध्ये दिसत नाही. क्‍लासेस ओसंडून वाहतात आणि शाळा-महाविद्यालये ओस पडतात तेव्हा साऱ्या शिक्षण व्यवस्थेचा पराभव झालेला असतो. म्हणायला उच्च शिक्षणात पीएच.डी. वाल्यांची संख्या वाढली. पण, मूलभूत संशोधनात फारशी प्रगती नाही. या गोष्टींसाठी सरकारचा आणि शिक्षण-संशोधन क्षेत्रातील धुरिणांचा पुढाकार लागतो. तो नाही. शिक्षणाच्या क्षेत्रात आणि त्याच्या बरोबरीने संशोधनाच्या क्षेत्रात खर्च वाढविला पाहिजे. त्याचवेळी या प्रक्रियांचा दर्जाही उंचावला पाहिजे. तेही नाही. प्राध्यापकांना प्रचंड पगार दिले जातात. काय उपयोग आहे?... देशातले दहा-वीस टक्के प्राध्यापक तरी मूलभूत संशोधन करतात का? पीएच.डी.चे प्रबंध हा संशोधनाचा निकष असेल तर भारत त्यात जागतिक आघाडी घेऊ शकतो. पण, या पीएच. डी.मध्ये 'ओरिजिनॅलिटी' किती, याचा शोध घेण्यासाठी विद्यापीठनिहाय चौकशी समित्या बसवल्या तर शेकडो लोकांचे पितळच उघडे पडेल. आपल्याकडे प्रज्ञा आहे. प्रज्ञावंत घडविण्यासाठी व त्यांना टिकवण्यासाठी लागणारी व्यवस्था मात्र नाही. ती निर्माण केली गेली म्हणून साऱ्या जगाला अमेरिकेचे आकर्षण आहे. तिथे सृजनासाठी पोषक वातावरण आहे. उच्च शिक्षण कष्टाचे आहे. पण, डोनेशनची 'नॅशनल' दुकानदारी नाही. त्यामुळे जगभरातील टॅलेन्ट अमेरिकेत किंवा युरोपात जाते. मानवी सभ्यतेच्या आरंभी आग लागण्याच्या घटनेचा अन्वयार्थ शोधला गेला म्हणून जग इथवर आले. गोल फिरणारा ओंडका पाहून चाकाचा शोध लागला आणि माणूस त्यावर स्वार होऊन कुठल्या कुठे जाऊन पोचला. चंद्रावर आणि मंगळावरसुद्धा त्याने पाऊल ठेवले. आपण त्या पावलांशी नाते सांगायचे आणि पुढे जायचे, की आपलीच धर्म आणि जातीय वेडाची 'पुष्पक' विमाने उडवण्यात आणि रानटी न्यायव्यवस्थेच्या पुनःस्थापनेत धन्यता मानायची?...कधी तरी हे ठरवावे लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com