गर्दीत 'एकाकी' पडलेल्यांशी 'बोलतं' होऊ या... 

शनिवार, 13 जानेवारी 2018

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी 'मृत्युपत्र' असं शीर्षक देऊन अत्यंत विचारपूर्वक, कुठेही खाडाखोड न करता 'सुसाईड नोट' लिहिण्याइतका मनाचा ठामपणा बाळगणाऱ्या या पिढीच्या मनात काय चाललंय, याचा ठाव लागण्यासाठी पालकांना, शिक्षकांना अन्‌ तुम्हा-आम्हा सर्वांनाच 'बोलतं' व्हावं लागेल... 
 

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी 'मृत्युपत्र' असं शीर्षक देऊन अत्यंत विचारपूर्वक, कुठेही खाडाखोड न करता 'सुसाईड नोट' लिहिण्याइतका मनाचा ठामपणा बाळगणाऱ्या या पिढीच्या मनात काय चाललंय, याचा ठाव लागण्यासाठी पालकांना, शिक्षकांना अन्‌ तुम्हा-आम्हा सर्वांनाच 'बोलतं' व्हावं लागेल... 
 
'पाचोऱ्यात बॅंकेच्या उपसरव्यवस्थापकाची रेल्वेगाडीखाली आत्महत्या', हा तेथील बातमीदाराने सकाळी सकाळी व्हाटस्‌ ऍपवर टाकलेला एका ओळीचा मेसेज वाचल्यावर 'पहिल्या पानाची बातमी', असा शिक्का बसून ती आम्हा वाचणाऱ्यांच्या मनःपटलावरुन पुढं सरकली. काही वेळाने घटनेविषयी आणखी थोडीफार माहिती आली आणि नंतर सविस्तर बातमीसोबत आत्महत्येपूर्वी त्या व्यक्तीने लिहिलेली चिठ्ठीच वाचायला मिळाली. त्यातील आशय पानावरचे आठही कॉलम भेदत जाणारा होता. बातमीत 'न मावणारं' बरंच काही होतं तिच्यात... चिठ्ठी कसली? मिनाल कठाणे या 'एकाकी' तरुणाचं अस्वस्थ करणारं ते होतं 'मृत्युपत्र'... 

गोंदियाचा रहिवासी असलेला मिनाल हा जेमतेम 27 वर्षांचा तरुण. थेट परिक्षेतून एका राष्ट्रीयीकृत बॅंकेच्या पाचोरा शाखेत उपव्यवस्थापक पदावर साधारण तीन महिन्यांपूर्वी रुजू झालेला. मिळालेल्या माहितीनुसार, बॅंकेत येण्याआधी काही दिवस त्याचा विवाह झाला होता; पण तो टिकला नाही. वैवाहिक जीवन फुलण्याआधीच उध्वस्त झाल्यामुळे नैराश्‍याने घेरलेल्या मिनालला आधार होता, तो कुटुंबाचा. त्याचे कुटुंबीय गोंदियात आणि तो जळगावजळच्या पाचोऱ्यात. अंतराने लांब असला, तरी मनाने कुटुंबाजवळ घोटाळणाऱ्या या मुलाला नैराश्‍यात एकाकीपणाच्या भावनेने ग्रासले. त्यातच त्याच्या वडिलांनी गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून त्याच्याशी बोलणे सोडलेले. या मुलाने 'आयएएस' व्हावं, ही त्यांची अपेक्षा आणि तो ते साध्य करीत नाही, तोवर बोलायचंच नाही, असा जणू त्यांनी पण केलेला. वडिलांच्या दराऱ्याने आईही त्याच्याशी बोलेना. घरच्यांपासून दूर, मनाने दुभंगलेल्या अवस्थेत एकटाच राहणारा मिनाल पालकांच्या अपेक्षांमुळे होत असलेल्या उपेक्षेने उध्वस्त झाला. याचदरम्यान त्याच्या मनात आत्महत्येचा विचार डोकावला, पण अवतीभवतीच्या काही भल्या माणसांनी त्याला धीर देत परावृत्त केले. तो रोज बॅंकेत कामावर जात राहिला, पण जगण्यातलं चैतन्य हरवलं होत. यांत्रिकपणे सारे व्यवहार सुरू असायचे. सकाळी येताना जवळच्या टपरीवर एकावेळी तीन-चार सिगारेट ओढून तो बॅंकेत जायचा. मधल्या वेळी, बॅंक बंद झाल्यावरही पुन्हा टपरीवर.. त्याला ओळखणाऱ्या, आसपासच्या लोकांना हे दिसत होते; पण त्यांच्या शब्दांसाठी त्याचे कान कधीच बंद झाले होते अन्‌ ज्या शब्दांसाठी ते आसुसले होते, ते त्याच्यापर्यंत कधी आलेच नाहीत. अखेर ही घालमेल त्याने त्याच्या बाजूने संपवली. सहा जानेवारीला सकाळी पाचोऱ्याजवळ गाळण शिवारात त्याने स्वतःला रेल्वेरुळावर झोकून दिले... 

मिनालने आत्महत्येआधी लिहिलेल्या चिठ्ठीतला आशय वाचणाऱ्याला हलवून टाकतो. त्याने या चिठ्ठीला 'मृत्यूपत्र' म्हटलंय, जे त्यानं त्यादिवशी सकाळी 7 वाजून 52 मिनिटांनी फेसबुकवरही पोस्ट केलं. त्यानंतर त्याला परावृत्त करणाऱ्या, 'आमचा फोन उचल' असे सांगणाऱ्या 'कमेंट' धडाधड पडत राहिल्या, पण त्यातील कशालाच आता तो 'रिप्लाय' देत नव्हता. 'अरे, असं काही करु नको; आयुष्य खूप सुंदर आहे, मित्रा...' असं सांगणाऱ्या पोस्टला 'लाइक' करुन माघारी वळण्याऐवजी तो जगण्यालाच 'डिसलाइक'चा उलटा अंगठा दाखवून गेला होता... 

साधारण दहा-बारा दिवस आधी अशी काहीशी घटना पाचोऱ्यातच घडली होती. भडगाव इथे पोलिस दलात नोकरी करणाऱ्या संगीता निकम हिनेही रेल्वेखाली आत्महत्या केली. तिचा पती जवळच्या गावी रेल्वेतच नोकरी करतो. दोघांनाही सरकारी नोकरी. त्यामुळं खरं तर संसार सुखाचा व्हायला हवा होता. पण, तसं झालं नाही. लग्नाला दोन वर्ष झालेल्या संगीतानेही वयाच्या तेविसाव्या वर्षी आयुष्य संपवले. त्यानंतर पती-पत्नीतील विसंवादाचे कारण पुढे आले, तिला दोन वेळा गर्भ न राहिल्याने दोघांमध्ये समज-गैरसमज आणि त्यातून तणाव वाढला. वादविवाद अन्‌ मानसिक कोंडमारा असह्य होऊन संगीताने हे टोकाचे पाऊल उचलले असण्याची शक्‍यता वर्तवली गेली... 

संवादाच्या अभावाने अन्‌ विसंवादाने घडलेल्या या दोन घटना. ज्यांची मुलं मोठी होताहेत, त्या पालकांना नि अशी मुले असलेल्या प्रत्येक कुटुंबाला अंतर्मुख व्हायला लावणाऱ्या. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या नित्य नव्या आविष्कारांनी संवाद-संपर्क साधने समृद्ध होत असताना कुटुंबातला, नात्यांमधला कमी होत चाललेला संवाद कुठल्या थराला नेऊ शकतो, याची ही उदाहरणे. बोटांच्या स्पर्शावर सारे जग आले, तरी या साऱ्या गजबजाटातही एकाकी पडत चाललेल्या हृदयांच्या अंतरंगातून जाणारा 'स्पेक्‍ट्रम' तयार झाला नाही. उलट 'फोर-जी'च्याही पुढं धावू लागलेल्या एका जनरेशनला दुसरीशी जोडणारं, नात्यांचं मोल जाणणारं नि जपणारं 'ट्रू-जी' तंत्र मात्र हातून निसटत चाललं आहे. मिनाल आणि संगीता या तरुणांच्या आत्महत्या आपल्याला अस्वस्थ करीत असतील, तर त्यांच्या कुटुंबांच्या वेदनांची जाणीव होऊ लागेल. दोघांच्या कौटुंबिक पातळीवरील कारणे काहीही असली, तरी त्या कुटुंबांवर झालेल्या आघाताची तीव्रता त्यामुळे कमी होत नाही. म्हणूनच त्यांच्या दुःखाची जाणीव साऱ्यांना असावी नि प्रत्येकाची शोकसंवेदनाही त्यांच्यासोबत हवीच. पण, केवळ प्रेमाच्या चार शब्दांनी या घटना टळल्या असत्या, हे वास्तव स्वीकारावे लागतेच... 

मुले शिक्षण-नोकरीच्या निमित्ताने दूर गेली, तरी मनाने दुरावू नयेत, याची काळजी सगळ्याच पालकांनी घेतली पाहिजे. आपली प्रतिष्ठा, अहंकार जपण्यासाठी मुलांचे आयुष्य पणाला लावायचे का? आणि त्यातून अंतिमतः साध्य तरी काय होणार आहे? आपल्यावर लादलेल्या अतिरेकी अपेक्षांचे ओझे दूर सारत कुटुंबातील कुणीतरी समजून घ्यावे, चार शब्द प्रेमाने बोलावे, ही भावना किती नैसर्गिक असू शकते, हे जवळच्यांनाच कळणार नसेल तर..? कुटुंबातील एखाद्याची मनोवस्था कळणार नसेल वा कळूनही मनाचे पोलादी दरवाजे उघडले जाणारच नसतील तर..? आपली किमान धीर देणारी भाषा नि भावनाच त्याच्या वा तिच्यासाठी जगण्याचा 'आधार' असू शकते, हे कुणालाच जाणवले नाही तर..? या आणि अशा प्रश्‍नांनी आपण अस्वस्थ होत असू, तर अवतीभवतीच्या मिनाल, संगीतांशी आपण बोलायला हवं. त्यांच्याशी संवाद वाढवायला हवा, तो सुसंवादाकडे न्यायला हवा. कुठल्यातरी कारणाने एकाकी मानसिक, भावनिक अवस्थेत हरवू लागलेल्यांना पाठीवर हात टाकत कुटुंबात आणलं पाहिजे. खरं तर ही जबाबदारी जशी प्रत्येक कुटुंबाची नि कुटुंबातील प्रत्येकाची, तशी साऱ्या समाजाचीही आहे. 

वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी 'मृत्युपत्र' असं शीर्षक देऊन अत्यंत विचारपूर्वक, कुठेही खाडाखोड न करता 'सुसाईड नोट' लिहिण्याइतका मनाचा ठामपणा बाळगणाऱ्या मिनालच्या पिढीचा ठाव लागण्यासाठी पालकांना, शिक्षकांना अन्‌ तुम्हा-आम्हा सर्वांनाच 'बोलतं' व्हावं लागेल...

Web Title: marathi news marathi features psychological depression Vijay Buwa