शेतकऱ्यांचे हित जोपासणारे शिवराय

श्रीमंत कोकाटे
सोमवार, 19 फेब्रुवारी 2018

छत्रपती शिवाजी महाराजांनी सदैव रयतेचा, शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केला. शेतकरीहितासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी वेळोवेळी प्रशासनाला दिल्या. शिवजयंतीनिमित्त शिवरायांच्या शेतीविषयक धोरणावर दृष्टिक्षेप

छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास प्रेरणादायक आणि वैभवशाली आहे. त्यांनी मोठा पराक्रम गाजवून रयतेचे स्वराज्य निर्माण केले. मोगल, आदिलशाही, इंग्रज यांच्या विरोधातील त्यांची लढाई राजकीय होती, धार्मिक नव्हती. त्यांचा राज्यकारभार लोकाभिमुख होता. शिवाजी महाराजांनी नेहमीच कष्टकरी, शेतकरी यांचे हित जोपासले. 

शिवकाळात अनेकदा दुष्काळ पडला. सिंचनाचे प्रमाण कमी होते. उद्योग-व्यवसाय मर्यादित होते. तरीदेखील शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाहीत. कारण शिवरायांचे शेती आणि शेतकरीविषयक धोरण. ते त्यांच्या अनेक पत्रांतून आणि आज्ञापत्रांतून स्पष्टपणे दिसते. स्वराज्य स्थापनेच्या रणसंग्रामात त्यांनी शेतकऱ्यांची कधीही हेळसांड होऊ दिली नाही. तेवीस ऑक्‍टोबर 1662 रोजी सर्जेराव जेधे यांना पाठविलेल्या पत्रात शिवाजी महाराज म्हणतात, ""तुमच्या इलाख्यात मोगलांची फौज (शाहिस्तेखान) येत असल्याची बातमी हेरांनी दिली आहे. त्यामुळे इलाख्यातील सर्व रयतेला लेकराबाळांसह घाटाखाली सुरक्षित जागा असेल तेथे पाठवणे. या कामात हयगय करू नका. या कामात हयगय कराल, तर तुमच्या माथी रयतेचे पाप बसेल. गावोगावी हिंडून सेतपोत जतन करणारांचे हित जोपासावे. या कामात दक्षता बाळगावी.'' परचक्रापासून शेती अणि शेतकरी वाचला पाहिजे, याबाबत शिवरायांनी घेतलेली काळजी आजदेखील पथदर्शक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून त्यांनी लढाया केल्या नाहीत. शेतकऱ्यांच्या हिताला त्यांनी नेहमीच प्राधान्य दिले.

शिवरायांनी 19 मे 1673 रोजी चिपळूण (हलकर्ण) येथील जुमलेदार, हवालदार आणि कारकुनांना पाठवलेल्या पत्रात शेतकऱ्यांशी कसे वागावे, याचे नीतिशास्त्रच सांगितलेले आहे. ""जनावरांचा चारा काटकसरीने वापरा. चाऱ्याची उधळपट्टी कराल तर पावसाळ्यात जनावरांना उपास पडेल, घोडी मरायला लागतील. मग तुम्ही कुणब्याकडून (शेतकऱ्यांकडून) धान्य, भाकरी, गवत, फांद्या, भाजीपाला आणाल. मग शेतकरी उपाशी मरेल, ते निघून जातील. मग ते म्हणतील, की तुम्ही तर मोगलापेक्षा अधिक जुलमी आहात. शेतकऱ्यांचा तळतळाट लागेल. त्यामुळे शेतकऱ्यांस काडीचादेखील त्रास देऊ नका. तुम्हाला गवत, धान्य, भाजीपाला, लाकूड हवे असेल, तर बाजारातून योग्य मोबदला देऊन विकत आणावा. कोणाकडून जुलूम अथवा अत्याचार अथवा भांडण करून घेऊ नका.'' काटकसरीने वागा, अत्याचार करू नका, शेतकऱ्यांना त्रास देऊ नका, अशा सक्त सूचना शिवरायांनी अधिकाऱ्यांना दिल्या होत्या. 

जनावरे, गवत, शेतीमाल, शेतकरी याबाबत शिवाजी महाराज किती दक्ष असत, हे त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या सूचनांवरून स्पष्ट होते. ""संध्याकाळी झोपताना चुली, आगट्या, रंधनाळे विझवून झोपत जावा. अन्यथा विस्तव गवताला, पिकाला, लाकडाला लागेल आणि ते भस्मसात होईल. तेलाचा दिवा विझवत जा, अन्यथा पेटती वात उंदीर घेऊन जाईल व गवत, लाकूड, धान्य जळून जाईल. त्यामुळे पागा बुडेल. शेतकरी नष्ट होईल. त्यामुळे दक्ष राहा.'' आग लागल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आग लागूच नये, याची काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या. 

""शेतकऱ्यांना लुटू नये, शेतकऱ्यांची चोरी करू नये, शेतकऱ्यांची इमानेइतबारे सेवा करावी. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठासदेखील मन दाखवू नये. शेतकऱ्यांच्या काडीसदेखील हात लावू नये. जर तुम्ही तसे कराल, तर मी तुमच्यावर राजी नाही (नाराज आहे.) असे समजावे,'' असे शिवाजी महाराजांनी 5 सप्टेंबर 1676 रोजी आपल्या सुभेदाराला लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले आहे. 

स्वराज्यातील शेतीमालाला रास्त भाव मिळेल, याकडे शिवरायांनी लक्ष दिले. अतिरिक्त शेतीमाल योग्य मोबदला देऊन खरेदी केला. तो परमुलखात नेऊन विकण्याची सोय केली. शिवरायांनी शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती कशी केली, ते पुढील उल्लेखावरून स्पष्ट होते. 

""जिन्नसच वसूल घेऊन जमा करीत जाणे आणि मग वेळच्या वेळी विकत जाणे. महाग विकेल आणि फायदा होईल ते करीत जाणे. वसूल हंगामशीर घ्यावा आणि साठवण करून विक्री अशी करावी, की कोणत्या वेळेस कोणता जिन्नस विकायचा, माल तर पडून राहता कामा नये आणि विक्री महाग झाली पाहिजे. दहा बाजार केले तरी चालतील, पण मालाला भाव मिळाला पाहिजे. त्याचा फायदा होईल.'' 

टंचाईच्या काळात शिवाजीराजे शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. टंचाईप्रसंगी शिवाजीराजे आपल्या सुभेदाराला सांगतात, ""कष्ट करून गावोगावी फिरा. शेतकऱ्यांना गोळा करा. ज्याला बैलजोडी आणि जोत हवा असेल त्याला ते द्या. पैसे द्या. खंडी, दोन खंडी धान्य द्या. दिलेल्या मदतीचा वसूल वाडीदिडीने करू नका. मुद्दलच जेवढी हळूहळू ऐपत आल्यानंतर घ्या. त्यासाठी तिजोरीवर दोन लाख लारी बोजा पडला तरी चालेल.'' आपल्या राज्यातील मजूर, गरीब, शेतकरी सुखी राहिला पाहिजे, तो उपाशी झोपता कामा नये, त्यासाठी तिजोरीवर प्रसंगी बोजा पडला तरी चालेल, ही शिवरायांची भूमिका होती. त्यांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले, हे त्यांच्या वरील आदेशावरून स्पष्ट होते. 

कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी आज आत्महत्या करत आहेत. शेतीमालाला उत्पादनखर्चावर आधारित भाव मिळत नाही, तर दुसरीकडे धान्याची आयात केली जात आहे. त्यामुळे शेतकरी वैफल्यग्रस्त झाला आहे. अशा वेळी शेतकऱ्यांना आधार देऊन उभे करण्यासाठी शिवरायांच्या शेतकरी धोरणाची देशाला गरज आहे. 

एका आज्ञापत्रात शिवाजी महाराज म्हणतात, ""आरमारासाठी झाड हवे असेल तर आंबा-साग तोडू नका. कारण ती एका सालात पैदा होत नाहीत. शेतकऱ्यांनी त्यांना अनेक वर्षांपासून लेकराबाळांप्रमाणे वाढविलेले असते. ती झाडे तोडली तर शेतकऱ्यांच्या दुःखास पारावार राहणार नाही. ती तोडणे म्हणजे प्रजापीडन आहे. झाड हवे असेल तर जीर्ण झालेले झाड त्याच्या मालकाच्या परवानगीने त्याचा योग्य मोबदला देऊन त्याला आनंदी करून तोडून न्यावे. अत्याचार सर्वथा न करावा.'' जमीन संपादनाचा योग्य मोबदला मिळावा यासाठी शेतकऱ्यांना आज संघर्ष करावा लागतो. अनेकदा शेतकऱ्यांवर अन्याय होतो. पण शिवाजीराजे म्हणतात, ""शेतकऱ्यांवर अत्याचार न करता त्यांना योग्य मोबदला देऊनच संपादनूक करावी.'' 

शिवरायांनी नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले. प्रशासनाला वेळोवेळी शेतकरीहितासाठी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतीमालाला योग्य भाव मिळेल, याकडे लक्ष दिले. शेती आणि अर्थव्यवस्थेला ऊर्जितावस्था येण्यासाठी शिवरायांच्या शेतकरीभिमुख धोरणाची आजही गरज आहे. 
 

Web Title: Marathi News Pune News Editorial Pune Edition Shivaji Maharaj Article Shrimant Kokate