काही गवसलं, काही हरवलं (आनंद घैसास)

आनंद घैसास
रविवार, 9 जुलै 2017

सातत्यानं घेतलेल्या निरीक्षणांमधून आणि काही वेळा निव्वळ समोर होणाऱ्या घटनांकडं जाणीवपूर्वक लक्ष दिल्यानंही वैज्ञानिक अनुमानं काढता येतात. काही गोष्टी मात्र अचानकच समोर येतात. अमेरिकेच्या पूर्वेला असलेल्या नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या केप हॅटेरस या किनारपट्टीच्या एका टोकाशी गेल्या तीन महिन्यांत एक नवीन बेट जन्माला आलं आहे. जपानजवळ पाच वर्षांपूर्वी असंच एक बेट चक्क एका दिवसात तयार झालं. अमेरिकेतल्या लाऊझियानाच्या किनाऱ्यावर शेजारच्या समुद्राचं अतिक्रमण होत चालल्यानं तो पटापट पाण्याखाली चालला आहे आणि त्यामुळं या किनाऱ्याचा आकारही बदलत चालला आहे. या वैचित्र्यपूर्ण घटनांचं वैज्ञानिक विश्‍लेषण.

सध्या पावसाळी दिवस असले, तरी काही ठिकाणी अजूनही दुष्काळ चालू राहतोय की काय अशी परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळं पूरही आले आहेत. खरंतर या दोनही गोष्टी आपल्याला मारकच. निसर्गापुढं माणसाचं काही चालत नाही हेच खरं. विज्ञानानं अनेक गोष्टी जरी समजून येत असल्या, तरी निसर्गात नक्की कधी कुठं काय होईल, याचं भाकीत करणं तसं दुरापास्तच. आकाशात ढगच नसेल, तर पाऊस पडणार नाही, हे जितकं स्पष्टपणे सांगता येतं, तेवढी खात्री आकाशात पावसाळी वाटणारे ढग असूनही आता पाऊस पडेलच, असं सांगता येत नाही, हेही तेवढंच खरं. अर्थात सातत्यानं घेतलेल्या निरीक्षणांमधून आणि काही वेळा निव्वळ समोर होणाऱ्या घटनांकडं जाणीवपूर्वक लक्ष दिल्यानंही वैज्ञानिक अनुमानं काढता येतात, ती खरीही ठरतात. काही गोष्टी मात्र अचानकच समोर येतात आणि वाटतं- ‘‘अरेच्चा! असं कसं झालं...’’

परिसर अभ्यासासाठी भौगोलिक रचनांबद्दल माहिती गोळा करताना अशाच काही घटनांकडं माझं लक्ष वेधलं गेलं. पृथ्वीच्या भौगोलिक रचनांमध्ये बदल किती आणि कसा होतो याची माहिती शोधत असताना हाती लागलेल्या या काही गोष्टी...

एक गोष्ट आहे अमेरिकेच्या पूर्वेला असलेल्या नॉर्थ कॅरोलिना राज्याच्या किनाऱ्यालगतची. या किनाऱ्याशी असलेल्या केप हॅटेरस या किनारपट्टीच्या एका टोकाशी, गेल्या एप्रिलपासून म्हणजे गेल्या तीन महिन्यांत एक नवीन बेट जन्माला आलं आहे. आकार काही फार मोठा नाही; पण दीड किलोमीटर लांबीचं, कमानीच्या आकाराचं आणि दीडशे मीटर रुंदीचं हे बेट आता चांगलंच वर आलं आहे. वाळूचं हे बेट आणि मूळ किनारा यांच्यामध्ये सागराचा एक वाहता आणि खोल भाग आहे. एखाद्या वाहत्या खळाळत्या नदीसमानच हा भाग (खरं तर अशा भागाला खाडी म्हणतात; पण हा खाडी म्हणावे इतका मोठाही नाही) असल्यानं तो पार करणंही कठीण आहे; पण गेल्या महिन्यात केप हॅटेरसच्या मूळ किनाऱ्यावरून एक अकरा वर्षाचा लहान मुलगा आपल्या आईसोबत (जॅनेट रेगन) छोट्या होडक्‍यातून तिथं गेला होता. तेही विविधरंगी आणि विविध आकार असलेले शंख-शिंपले शोधण्याच्या नादात. त्यांनी या बेटाला ‘शिंपल्याचं बेट’ असं म्हटलं असलं, तरी अधिकृतपणे या बेटाचं नामकरण काही अजून झालेलं नाही. या बेटाचं अस्तित्व एप्रिलमध्ये एका वैमानिकाला प्रथम जाणवलं. त्यानं ते सागरी तटरक्षक दलाला कळवलं आणि नंतर त्याचं भौगोलिक निरीक्षण करण्याचं काम हाती घेण्यात आलं. सगळं सामान घेऊन प्रत्यक्ष बेटावर जाणं कठीण जात असल्यानं एका छायाचित्रकारानं ‘ड्रोन’चा वापर करून या बेटाची अनेक अंगांनी छायाचित्रं घेतली. या बेटाची काही छायाचित्रं विमानांमधून, तर काही उपग्रहातूनही घेण्यात आली; पण या नव्या बेटावर जाण्यास सामान्य नागरिकांना सध्यातरी सरकारी अधिकाऱ्यांकडून मनाई करण्यात आली आहे. याचं कारण काय, याची चर्चा करताना मुख्य किनारपट्टीवरच्या वाहतूकदारांच्या संस्थेच्या अध्यक्षांनी (बिल स्मिथ, कॅरोलिना बीच बग्गी असोसिएशन) सांगितलेली कारणं मजेशीर आहेत. ते म्हणाले, की यामधून वाहणाऱ्या छोट्याशा समुद्राच्या पट्ट्यात शार्क आणि स्टिंगरे हे पोहणाऱ्यांना धोकादायक ठरणारे मासे मोठ्या प्रमाणात आहेत; पण त्याहीपेक्षा हा किनारा हौशी मासेमारी करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा आवडता होता. त्यामुळं त्यांच्या मासेमारीच्या गळाचे अनेक आकडे, हूक या सागरातून वर आलेल्या वाळूच्या बेटावर जागोजागी पसरलेले आहेत. ते आधी या वाळूतून विंचरून काढावे लागतील- तरच या बेटावर फेरफटका मारता येईल. 

कॅरोलिना राज्याच्या किनारपट्टी आणि भौगोलिक विभागानं तर चिंता व्यक्त केली आहे, की हे वर आलेलं नवं बेट, या सागरात दर वर्षी होणाऱ्या चक्रीवादळाचं परिणामस्वरूप असेल, तर ते जसं सागराच्या अंतर्गत प्रवाहानं वाळू ढकलली गेल्यानं तयार झाले, तसंच ते आणखी काही महिन्यांत लुप्तही होऊ शकतं, किंवा आहे त्याहून आकारानं, उंचीनं वाढूही शकतं. शिवाय मजा म्हणजे या भागातल्या सागराची उंचीही दर वर्षी वाढते आहे, असं लक्षात येत आहे. या वाढत्या उंचीमुळंही ते पुन्हा पाण्याखाली जाऊ शकते, कारण असा बदल मुख्य किनारपट्टीच्या, केप हॅटेरसमध्येही दिसून येत आहे...

दुसरी गोष्ट आहे, तीही अशा एका अचानक जन्मलेल्या बेटाचीच; पण जपानच्या जवळची, पॅसिफिक महासागरातली. अमेरिकेजवळच्या अटलांटिक महासागरातून वर आलेल्या वाळूच्या बेटासारखी मात्र मुळीच नाही. अमेरिकेजवळचं बेट गेले तीन महिने हळूहळू वर येत होतं, तर जपानजवळचं बेट एका दिवसात तयार झालं! मात्र, ही घटना आहे पाच वर्षांपूर्वीची. २१ नोव्हेंबर २०१३ची. २० नोव्हेंबरला सारं काही शांत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळीच सागरात एका छोट्या बेटाशेजारी पाण्यातून धूर बाहेर येताना दिसला. जरा वेळात तिथलं पाणीही उकळायला लागलं आणि त्यातून वाफेचे लोळ वर यायला लागले. नंतर तर स्फोटासमान उद्रेकच झाला आणि वाफेसोबत धूळ आणि शीलारसाचे (लाव्हाचे) लपकेही खालून वर उंच उडायला लागले. हा होता एका नव्यानं तयार झालेल्या ज्वालामुखीचा उद्रेक. या उद्रेकातून वर येणारा शीलारस अर्थातच हवेत फेकला गेल्यावर थंड व्हायला लागला आणि त्याचं धूळ आणि खडकात रूपांतर होऊन ते आसपास साचत गेले. या नव्यानं तयार झालेल्या माती आणि खडकांच्या भरावातून, शिवाय ज्यालामुखीच्या मुखाची जमीन वर उचलली गेल्यानं एका दिवसात इथं एक शंकूच्या आकाराचं, वर एक लहानसं विवर असणारं हे नवं बेट जन्माला आलं.

जपानमधल्या टोकियोपासून दक्षिणेला सुमारे एक हजार किलोमीटर अंतरावर, बोनिन बेटांच्या मालिकेतलं, किंवा ‘ओगासावारा’ बेटांच्या समूहातलं हे चौथं बेट समजलं जातं. या बेटाला सध्या ‘निशिनोशिमा’ म्हणजे छोटासा ज्वालामुखी असं म्हणतात. उत्तर आयवोजिमा हे एक छोटं, मध्य आयवोजिमा हे एक मोठं ज्यावर वस्ती आहे असं आणि दक्षिण आयवोजिमा हे एक लहानसं अशी तीन बेटं निशिनोशिमाच्या थोडी पूर्वेला आहेत. २० नोव्हेंबर २०१३ला अस्तित्वात आलेला हा छोटा ज्वालामुखी जरी आता एका टेकडीसारखा, पाण्यातून वर डोकं काढलेला दिसत असला, तरी त्याच्या शिखराशी विवर आहे. या विवरातून लाव्हा येणं आज थांबलं असलं, तरी आजही वाफ आणि धुराचे लोट यातून बाहेर येत आहेत. त्यामुळं याला ‘जागृत ज्वालामुखी’ असंच अजून म्हणतात. काय सांगावं- यातून कदाचित एखादा मोठा उद्रेकही पुढंमागं होऊ शकतो. टोकियोचा एकूणच हा किनारा पॅसिफिक महासागराचाच भाग असला, तरी त्याला फिलिपिन्सचा समुद्रविभाग असं म्हणतात. या भागात सागराखालची तळाची जमीन कशी आहे, त्याचं विविध माध्यमांतून निरीक्षण आजपर्यंत झालेलं आहे. ते पाहिलं, तर या नव्या बेटाच्या जवळच आसपास पाण्याखाली एकापाठोपाठ एक अशी शिखरं, डोंगर दिसतात. त्यांच्या रांगाच आहेत. हे अजून निद्रिस्त असणारे ज्वालामुखीच आहेत, हेही कळलेलं आहे; पण त्यांचा उद्रेक उद्या होईल, की दहा हजार वर्षांनी हे मात्र पृथ्वीच्या पोटात त्या भागात काय चाललं आहे, ते कळलं तरच ठरवता येईल. असो. 

हा ‘निशिनोशिमा’ आहे छोटासा, फक्त तीनशे मीटर लांब आणि दोनशे मीटर रुंदीच्या नव्या बेटावर; पण गेल्या पाच वर्षांत त्याचे दगड थंड पडण्याखेरीज त्यात काही फरक पडत नसल्यामुळं दर्यावर्दी साहसी पर्यटकांचं हा ज्वालामुखी म्हणजे एक आकर्षणच बनत चालला आहे.

तिसरी घटनाही अशीच पर्यटकांचं आकर्षण ठरणारी बनली आहे; पण ती या नव्या बेटांच्या अगदी विरुद्ध नैसर्गिक कारणामुळं. जागाही अमेरिकेतली, लाउझियाना राज्यातली; पण ही घटना थोडी अधिक काळ चालू असलेली आहे आणि यापुढंही चालू राहील, अशी शक्‍यताही आहे. लाउझियानाच्या किनाऱ्यावर त्याच्या शेजारच्या समुद्राचं अतिक्रमण होत असल्यानं तो पटापट पाण्याखाली चालला आहे. त्यामुळं आज या किनाऱ्याचा आकारच बदलत चालला आहे. एके काळी जिथं किनाऱ्यावर सुंदर वृक्ष होते, बागा होत्या, तिथल्या वृक्षांची काही ठिकाणी पडझड झाल्यानं फक्त खोडंच दिसत आहेत, तर काही वृक्ष अजूनही पुरुषभर पाण्यात तग धरून उभे आहेत. इथं एका महिन्यात सुमारे एका फुटबॉलच्या मैदानाच्या क्षेत्रफळाएवढी जमीन चक्क पाण्याखाली खचून जात आहे! 

एकतर ही सागराखाली जाणारी जागा म्हणजे एक खाजण, दलदलीचाच प्रदेश आहे. हा प्रदेश ‘मिसिसिपी’ आणि ‘अटच्याफलाया’ या नद्यांची सागराला मिळणारी मुखं असणाराही आहे. पूर्वी या भागात मिसिसिपीच्या पुराबरोबर येणारा गाळ, माती भर घालत असे; पण या लांबलचक नद्यांमधला साचलेला, सध्याचा, विशेषत: वाळक्‍या पानांचा कचराच या गाळाला अडवून धरून ठेवू लागला आहे. त्यामुळं ही नैसर्गिक मातीची भर थांबली. शिवाय या जवळच्या भागातच नव्यानं खनिज तेलाचा शोध लागला. तेलविहिरींचे, तेलशुद्धीकरणाचे कारखाने वाढले. त्या निमित्तानं काढलेल्या कालव्यांनी आणि तेलवाहिन्यांसाठी टाकण्यात आलेल्या नलिकांचं बांधकाम या दलदलीच्या प्रदेशातल्या खाऱ्या पाण्याला साचून राहायला मदतगार झाले. जमिनीला घट्ट धरून ठेवणाऱ्या इथल्या मूळ वनस्पती खाऱ्या पाण्याखाली बुडून, मग सुकून सडून गेल्या. कुजून त्यांचा कचरा या साचलेल्या पाण्याखाली तळाशी जमत गेला. यातून त्याच्या मुळांनी धरून ठेवलेली घट्ट माती नाहीशी होऊन त्याचा चिखल बनत गेला. हा चिखल समुद्रात भरती-ओहोटीसोबत सहज वाहून जाऊ लागला. त्यातून जमिनीची धूप वाढली. त्यातून येथील सखलपणा वाढत गेला. यातून मेक्‍सिकोच्या आखातातून येणारी चक्रीवादळं थोपवून धरणारा वृक्षराजीचा किनाराच नष्ट होत गेला. ती चक्रीवादळं आता भूभागावर बऱ्याच खोलवर आत यायला लागली. किनारा दलदलीचा झाल्यानं जे सागरी उत्पन्न (हे थोडंथोडकं नाही, तर वर्षाकाठी साडेचार अब्ज किलो एवढं आहे) मिळत होतं मासेमारीतून, तेही मिळेनासं झालं. यात फक्त नैसर्गिक नव्हे, तर एकूणच नुकसान वाढलं.

हे नक्की कधीपासून चालले आहे, ते माहीत नाही; पण या भागाचं एक १९३१चं विमानातून काढलेलं छायाचित्र, आजच्या स्थितीशी तुलना केल्यास बरंच काही सांगून जातं; पण प्रत्यक्षात या भागाचं वैज्ञानिक साधनांनी निरीक्षण सुरू झालं २००५पासून. चक्रीवादळ ‘कॅतरिना’च्या हाहाकार उडवणाऱ्या अनुभवातून आलेलं हे शहाणपण म्हणावं लागेल. त्यातून आता दहा वर्षांचं जे सर्वेक्षण हाती आलं आहे, त्या प्रकल्पाचं नेतृत्व ‘निएनहुईस’ नावाच्या पर्यावरणतज्ज्ञांच्या बरोबरीनं त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी विविध युनिव्हर्सिटी आणि संस्थांच्या साह्यानं केलं आहे. त्यांनी या खाजणांचं अनेक अंगांनी संशोधन केलं. काटेकोर नकाशे बनवले. ते सारं काही नुकतंच ‘जिऑलॉजिकल सोसायटी ऑफ अमेरिकेच्या ‘जीएसए टुडे’ या जरनलमध्ये सविस्तर प्रसिद्ध झालं आहे. 

या संशोधनातून असं निदर्शनास आलं आहे, की या किनारपट्टीशी निर्माण झालेल्या खाजणाचं खचणं हे वर्षाकाठी सुमारे नऊ मिलिमीटर किंवा एक तृतियांश इंच एवढंच सरासरीनं होताना दिसत असले, तरी काही ठिकाणी ते वेगानंही होत आहे. म्हणजे मिसिसिपीच्या सागराशी मिळणाऱ्या मुखापाशी हा खचण्याचा दर सरासरीतच बारा मिलिमीटर आहे. खाजण खचण्याची तीन मुख्य कारणं : नदीतून येणारी भर थांबली, कुजून चिखल होऊन जमिनीची होणारी धूप आणि तिसरा प्रकार मात्र सगळ्या जगाची सध्याची जी चिंता आहे, तो म्हणजे महासागराचीच पाण्याची उंची वाढणं. ही सागराची उंची वाढणंसुद्धा दर वर्षाला तीन मिलिमीटर एवढी आहे. मात्र, या साऱ्याचा एकत्रित विचार करून त्याचं संगणकीय प्रारूप तयार केलं आणि आणखी काही वर्षांनी तिथं काय होईल, ते लक्षात घेतलं, तर ते फारच भयावह आहे, कारण त्यात सध्या मोठी भरभराट असलेली काही शहरंच दिसेनाशी झालेली दृष्टीस येताहेत. समुद्रानं त्यांना गिळंकृत केल्याचं दिसत आहे...अर्थात हे संगणकीय अनुमान आहे. या किनारपट्टीच्या संरक्षणासाठी, संवर्धनासाठी, समुद्राच्या आत येण्याला प्रतिबंध करणारी, मिसिसिपी नदीतला वाळक्‍या पानांच्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची एक योजनाही आता राबवण्याचं याच संशोधकांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचं प्रशासनानं आता मनावर घेतलं आहे. प्रशासनानं त्यासाठी पन्नास अब्ज डॉलर एवढी मोठी रक्कमही मंजूर केली आहे; पण एकूण पृथ्वीच्या सरासरी तापमानात प्रदूषणामुळं होणारी वाढ तशीच राहिली, किंवा कदाचित माणसाच्या हव्यासापायी ती वाढण्याचा दर वाढला, तर मात्र ध्रुवीय प्रदेशातला बर्फ वितळून, सागराच्या पाण्याची पातळी वाढण्याची शक्‍यता आहे. असं झालं, तर हे प्रयत्नही फुकट जाऊ शकतात, अशी चिंता यातल्या संशोधकांनीच व्यक्त केली आहे...

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Anand Ghaisas