आपण अधिक पुरातन... (आनंद घैसास)

आनंद घैसास
रविवार, 6 ऑगस्ट 2017

मोरोक्कोमधल्या ‘जेबेल आयरहौड’ या ठिकाणी झालेल्या उत्खननात मानवाच्या पूर्वजांविषयी नवी माहिती मिळाली आहे. ‘क्रिस्टल थर्मोल्युमिनन्स’सारख्या तंत्रामुळं या शोधाला नवे आयामही मिळाले आहेत. आधुनिक मानवाशी समानता दर्शवणारा ‘होमो सॅपिअन’ तीन ते साडेतीन लाख वर्षांपूर्वीही अस्तित्वात होता, असे या संशोधनाचे निष्कर्ष आहेत. थोडक्‍यात आद्य मानवाचं अस्तित्व सध्याच्या समजुतीपेक्षाही जास्त ‘पुरातन’ असल्याचं स्पष्ट झालं आहे. या संशोधनावर, त्यातल्या निष्कर्षांवर एक नजर.
 

इतिहास हासुद्धा एका प्रकारे भूतकाळाचा; पण आत्ता घेतलेला शोधच असतो. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे काळाच्या पडद्याआड अनेक गोष्टी विस्मृतीत गेलेल्या असतात. अनेक नैसर्गिक बदलांमुळं, मग ते ऊन, पाऊस, बर्फवृष्टी, त्यातून विविध प्रकारे होणारी धूप अशा नियमित गोष्टी असोत, की चक्रीवादळं, पूर, भूकंप, ज्वालामुखीचे उद्रेक, त्सुनामी अशा आपत्तींसारख्या अचानक आलेल्या घटना असोत, भूस्खलनाखाली किंवा नदीचा प्रवाह बदलल्यानं जमिनीचाच भूभाग बदलल्यानं असो, अनेक समोर असलेल्या गोष्टी नजरेआड गेल्यानं असो, इतिहासाचा एक सलग असणारा धागा मध्येच कुठं तरी गायब झालेला दिसतो. मग हाती असणाऱ्या खंडित, तुकड्यातुकड्यांची जोडणी करून इतिहासाचं रूप गोधडीसारखं सलग करून घ्यावं लागतं, त्यातल्या राहून गेलेल्या जागा शोधाव्या लागतात. असे दुवे जोडता न आल्यानं इतिहासाची जी एकसंधता गेलेली जाणवते, तीच मग कुतूहल जागृत करते. त्यातून शोध घेण्याची कल्पना जोर धरते. प्रत्यक्ष निरीक्षणं, प्रयोग आणि वैज्ञानिक आधारांवर निष्कर्ष काढून इतिहासाचे जुने दुवे एकमेकांना जोडण्याचं काम सुरू होतं. मानवाचा, एकूणच मानववंशाचा इतिहास शोधण्याचे प्रयत्नही असेच हाती लागलेल्या माहितीच्या तुकड्यातुकड्यांचे आहेत. आजही त्यांचं जोडकाम चालू आहे. त्यातला एक फार पुरातन तुकडा नुकताच हाती आला आहे, तोही सुमारे एका दशकाच्या तपश्‍चर्येतून...

आद्य मानव मूळचा आफ्रिकेचा
आजवर हाती आलेल्या संशोधनात, आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावर ‘होमो सॅपिअन’ या आधुनिक मानवसदृश प्राण्यांची वस्ती होती, ते आपले मूळ पूर्वज. आद्य मानव. त्यांच्यापासून सगळ्या जगात मानवी समाजाची प्रगती, उत्क्रांती होत गेली असावी आणि या मानवांनी सागराच्या किनाऱ्याकिनाऱ्यानं स्थलांतर करत अख्ख्या पृथ्वीलाच आपला अधिवास बनवला असावा, अशी संकल्पना आजपर्यंत रूढ आहे. याचं एक प्रमुख कारण म्हणजे १८७१च्या डार्विनच्या ‘डिसेंट ऑफ मॅन’ या पुस्तकाचा प्रभाव. यात त्यानं मानवाची उत्क्रांती एकाच मूळपुरुषापासून किंवा एका आद्य कुटुंबापासून, वस्तीपासून झाली आणि ती वस्ती आफ्रिकेतली होती, असं अनुमान काढलं होतं; पण त्यासाठी त्यानं काही ठोस पुरावे त्या काळी दिले नव्हते. मात्र, अगदी १९८०पर्यंत जे काही उत्खननांमधून हाती लागत गेलं, ते मात्र याच अनुमानाला पुष्टी देणारं ठरत होते. त्यामुळं हा ‘होमो सॅपिअन’ मूळचा आफ्रिकेचा ही भूमिका वैज्ञानिकांमध्ये दृढ होत गेली. लॅटिन भाषेत ‘होमो’ म्हणजे माणूस आणि ‘सॅपिअन’ म्हणजे ‘शहाणा.’ ‘होमो सॅपिअन’ (शहाणा मानव) हे नाव आधुनिक मानवाशी साधर्म्य दर्शवणाऱ्या जीवाश्‍मांना, त्या अवशेषांवरून अनुमानित केलेल्या भूतकाळातल्या आद्य मानवांना, सर्वप्रथम १७५८मध्ये ‘कार्ल लिनॅअस’ या जीवशास्त्रज्ञानं सुचवलं होतं.

उत्क्रांतीत याच्या आधीचा मानवाचा टप्पा ‘निअँडरथल’ आणि ‘होमो इरेक्‍टस’ म्हणजे दोन पायावर चालू-धावू शकणाऱ्या मानवसदृश प्राण्यांचा मानला जातो. काही वैज्ञानिक ‘निअँडरथल’ हीसुद्धा ‘होमो सॅपिअन’ची एक उपजाती आहे, असं मानतात. तीच बाब ‘होमो ऱ्होडेसिएन्सिस’ या उपजातीबाबत. तेही ‘होमो इरेक्‍टस’नंतरचे; पण ‘होमो सॅपिअन्स’च्या अधल्यामधल्या काळातले आणि प्रगतीच्या मधल्या टप्प्यावरचे असावेत, असा अंदाज आहे. उत्खननातून मिळालेले या प्राण्यांचे जीवाश्‍म, विशेषत: त्यांच्या डोक्‍याचे, कवटीचे भाग, ज्यांच्या आकाराचा, रचनेचा अंदाज घेतला जाईल असे भाग, त्यांचे हाडांचे सापळे, त्यांची रचना, पायाची बोटं, हाताचा पंजा- जो ‘एप’, ‘चिपांझी’ किंवा इतर माकडांसारखा नाही, तर ज्यात इतर बोटांच्या समोरून ज्याची मूठ बनते अशी अंगठ्याची, हाताच्या पंज्याची रचना आहे- अशांना मानवांच्या प्रगतीपथावरचे टप्पे, उत्क्रांतीतले भागीदार मानलं गेलं. त्याच्या मिळालेल्या अवशेषांचं ‘कार्बन कालनिर्धारण’ केल्यावर (कार्बन डेटिंग : जीवाश्‍मांमध्ये शिल्लक असणाऱ्या किरणोत्सारी कार्बन १४वरून, या कार्बनच्या ‘अर्धक्षयकाला’वरून तो पदार्थ किती प्राचीन आहे ते ठरवण्याचं एक तंत्र आहे) ते सुमारे एक ते दोन लाख वर्षांपूर्वीचे आहेत, हे समजलं होतं; पण १९८०नंतर या जीवाश्‍मांच्या नमुन्यामधून, त्यांच्या पेशींमधल्या ‘मायटोकाँड्रिया’मधून डीएनए मिळवून, त्याचं विश्‍लेषण करण्याची सुरवात झाली. या डीएनए विश्‍लेषणातून या नमुन्यांचा जगातल्या इतर नमुन्यांशी, एकमेकांशी असलेला संबंधही प्रस्थापित करणं शक्‍य झालं. ही नवी माहिती हातात पडत गेली, तसतसं या ‘शहाण्या माणसा’च्या अधिवासाचं मूळ ठिकाण आफ्रिकेतलंच आहे, हेच अधिक प्रकर्षानं पुढं येत गेलं. आफ्रिकेतली विविध ठिकाणची उत्खननं, तिथं मिळणारे मानवसदृश प्राण्यांचे जीवाश्‍म आणि त्यांची भौगोलिक ठिकाणं हेच दाखवू लागली, की आफ्रिकेतून सुमारे साठ हजार वर्षांपूर्वी या शहाण्या मानवानं सागराच्या किनाऱ्यानं आधी उत्तरेकडं स्थलांतर केलं आणि तो पूर्वेस मध्यआशिया खंडाच्या दिशेनं मार्गस्थ झाला. आद्य मानव आफ्रिकेतून आधी इजिप्तमधे गेला आणि तिथून जगातल्या इतर ठिकाणी... असाही आता एक निष्कर्ष हाती आला आहे. असो.

मोरोक्कोमधले जीवाश्‍म
या पार्श्वभूमीवर, इसवीसन १९६०मध्ये, एका खाणीच्या संदर्भात आफ्रिकेच्या उत्तरेस असणाऱ्या मोरोक्कोमधे खड्डे खणत होते, तेव्हा तिथं काही मानवसदृश कवटीचे जीवाश्‍म सापडले. डोळ्यांच्या वर भुवयांच्या जाड उंचवट्यांच्या जागा आणि एकूण कवटीचा छोटा आकार यावरून त्यावेळी तो एक ‘निअँडरथल’चा आणखी एक नमुना सापडला म्हणून सामान्यत: गणला गेला. जमिनीच्या किती खोलवरून, कोणत्या स्तरातून तो मिळाला, त्यावरून त्याचं कालनिर्धारण सुमारे चाळीस हजार वर्षं असावं, असं त्यावेळी गृहीत धरण्यात आलं होतं; पण २००४मध्ये, याच्याच आसपासच्या भागात आणखी एक मानवसदृश हाडांचा सापळा सापडला. त्याचं मात्र सर्वांगीण परीक्षण झालं. अगदी त्याच्या पेशीतला मायटोकाँड्रिया मिळवून, त्यातल्या डीएनएचंही विश्‍लेषण करण्यात आलं. ते आधी हाती आलेल्या नमुन्यांशी जुळणारं असलं, तरी अंदाजे चाळीस हजार वर्षांच्या कालावधीशी मात्र ते जुळत नव्हते. त्याचं कालनिर्धारण चक्क लाख वर्षांपेक्षाही जास्त म्हणजे १.६ लाख वर्षं आहे, असं जाणवलं. या प्रकारानं कुतूहल वाढलं. शिवाय ही कवटी ‘निअँडरथल’चीच आहे की नाही, ही शंकाही येऊ लागली.

हे अवशेष मिळालेल्या ठिकाणीच, परत एकदा अधिक खोलवर आणि पद्धतशीर उत्खनन करण्यासाठी परवानग्या मिळवून अखेर २०१०मध्ये प्रत्यक्ष उत्खनन कार्याची सुरवात झाली. मोरोक्कोमधल्या या ठिकाणाचं नाव ‘जेबेल आयरहौड’ आहे. ही एका छोट्या टेकडीसारखी जागा आहे, तिथं उत्खनन केल्यावर त्यात एक जुनी गुहा सापडली. या गुहेचा वापर सुमारे साडेतीन लाख वर्षांपूर्वी शिकार केल्यानंतर विश्रांतीचं ठिकाण म्हणून केल्याचे पुरावे सापडले. या ठिकाणी मातीखाली दबलेले आणि जीवाश्‍मात रूपांतर झालेले पाच मानवसदृश ‘होमो सॅपिअन’ प्रकारातले हाडांचे सापळे आणि कवट्या सापडल्या. सगळ्या शाबूत अवस्थेत नव्हत्या. काहींचे तुकडे पडलेले होते; पण या सगळ्यांचे संगणकीय त्रिमित प्रतिमाचित्र (सीटी स्कॅन प्रकाराने) तयार केल्यावर, त्यांची प्रतिमाचित्रं, ते भाग एकमेकांना जोडल्यावर, एका अखंड कवटीचं संगणकीय त्रिमित प्रतिमाचित्र मिळालं. या नव्या पद्धतीने कवटीची नेमकी रचना कशी असावी, ते आता समजून येण्यास मदत झाली. 

पाच जणांचे अवशेष
या उत्खननात एकूण पाच जणांचे अवशेष सापडले आहेत. यात तीन प्रौढ माणसं आहेत. एक पौगंडावस्थेतील तरुण आहे, तर एक सात-आठ वर्षांचा मुलगा आहे. या गुहेत आणि आसपास मिळालेल्या इतर अवशेषांवरून असं दिसून येत आहे, की ही माणसं, गवत चरणाऱ्या बकऱ्या-मेंढ्यांसारखी जनावरं शिकार करून खात असावेत. ते कधी झेब्रा आणि कदाचित रानगव्यासमान मोठी जनावरंही खात असावेत. हरणं, काळवीट अशांचीही शिकार अन्नासाठी होत असावी. दोन लाख ऐंशी हजार ते साडेतीन लाख वर्षांपूर्वीचा (जेव्हा सहारा हे वाळवंट नसून ‘हिरवाई’ असणारा तो एक प्रशस्त गवताळ माळरानाचा, झाडंझुडपं असणारा प्रदेश होता, तेव्हाचा) हा काळ. त्या काळातली अचानक भूस्खलनासारखी घटना या गुहेतल्या प्राण्यांना जमिनीखाली दबून जाण्यास कारण ठरली असावी, असं त्यांच्या अवशेषावरून लक्षात येतं. त्यांच्या अवशेषांबरोबरच दगडाची आयुधंही मिळाली. एवढंच नव्हे, तर इतरही विविध प्राण्यांचे अवशेषही मिळाले. त्यात बिबटे, सिंह, लांडगे, कोल्हे, खोकड, तरस असे हिंस्र प्राण्यांचे अवशेषही होते, तर साळू, ससे, कासवं, शंखाची घरं पाठीवर असणाऱ्या गोगलगायी, एवढंच नव्हे, तर गोड्या पाण्यातले कालवे, शिंपल्यांसारखे कवचधारी; पण आतून नाजूक मऊ मांसल भाग असणाऱ्या जीवांचेही जीवाश्‍म सापडले आहेत. 

नवीन तंत्रामुळं नवी माहिती 
मोठ्या जनावरांची लांब हाडं, त्यांच्या आतली अस्थिमज्जा खाण्यासाठी मुद्दाम तोडलेल्या स्वरूपात सापडली, तर काही हाडं आतला भाग खाण्यासाठी दगडांच्या साह्यानं ठेचून तोडलेलीही आढळली. या काळात ही माणसं शहामृगाची अंडीही खात असणार, असं तिथल्या अवशेषांवरून समजलं. या साऱ्यांची संगणकीय त्रिमित प्रतिमाचित्रं (सीटी स्कॅनिंग पद्धतीनं) तयार केल्यानंतर ही सारी माहिती हाती लागली. यातल्या ‘होमो सॅपिअन’च्या कवटीचा आकार आधुनिक माणसाशी मिळताजुळता असला, तरी डोक्‍याच्या पोकळीत बसणारा मेंदू थोडा छोटा, भुवयांची ठेवण अधिक पुढं आलेली, अधिक कमानदार, तर जबडा दणकट, मोठा आणि दात मोठे; पण एकसारखे असणारा आहे. या शोधकामात आता आणखी एका नव्या तंत्राची भर पडलेली आहे, ती म्हणजे ‘क्रिस्टल थर्मोल्युमिनन्स’ पद्धती. या पद्धतीत एखादा पुरातन स्फटिक, जर आधी कधी त्याला उष्णता मिळाली असेल, तर आता तापवल्यावर, किंवा त्यावर ठराविक प्रकारचा लेझर टाकला असता, त्या ठराविक तापमानाला प्रकाशाच्या प्रारणांचं ठराविक प्रमाणात उत्सर्जन करतो. त्या प्रारणांच्या (ही प्रारणं ठराविक रंगांची असतात, त्यांचं वर्णपटीय विभाजनही अभ्यासण्यात येतं) अभ्यासातून तो स्फटिक किती प्राचीन आहे, त्याचं कालनिर्धारण करता येतं. 

या उत्खननात सापडलेल्या वस्तू, आधी कधी तरी तप्त झाल्या असणारच. दगड एकमेकांना घासून आग तयार करण्यासाठी ते वापरले आहेत की नाही, इथपासून जनावरांचं मांस भाजून घेतलं असल्यास त्याचे शिल्लक राहणाऱ्या हाडांवर झालेले परिणामही यात लक्षात येतात. या ‘लेझर-उष्मा-दीप्ती’ तंत्रानं जेव्हा या पदार्थांचं कालनिर्धारण केलं गेलं, तेव्हा ते सुमारे तीन ते साडेतीन लाख वर्षांपूर्वीचे आहेत, हे निश्‍चित झालं. त्यामुळे आधुनिक मानवांशी समानता दर्शवणारा ‘होमो सॅपिअन’ सुमारे एक लाख वर्षांनी आणखी प्राचीन, पुरातन काळात मागं ढकलला गेला!
या संपूर्ण शोधकामाचा अहवाल म्हणावा असा शोधनिबंध आठ जूनच्या ‘नेचर’ या संशोधनाला वाहिलेल्या मासिकात प्रसिद्ध झाला आहे. या आधी असणारी ‘होमो सॅपिअन्सच्या’ अधिवासाची संकल्पना आता बदलावी लागणार आहे. मोरोक्कोतली ‘जेबेल आयरहौड’ ही जागा आफ्रिकेच्या उत्तर पश्‍चिम भागात आहे, तर या आधी मिळालेले होमो सॅपिअन्सचे अवशेष आफ्रिकेच्याच पूर्वेकडच्या ‘ओमो किबिश’ या इथिओपियातल्या ठिकाणचे (ज्यावरून होमो सॅपिअन्सचा काळ दोन लाख वर्षांपूर्वीचा आहे, असं आधी ठरवलं गेलं होतं) आहेत.  तिसरे अवशेष दक्षिण आफ्रिकेतल्या ‘फ्लोरिस्बाद’ या ठिकाणी मिळाले होते. त्यात या अवशेषांशी जुळणारी एक कवटी मागंच मिळाली होती, (इसवीसन १९३२) तिच्या कालनिर्धारणात तीही दोन लाख साठ हजार वर्षांपूर्वीची असल्याचं लक्षात आलं होतं; पण त्याकडं एवढं नीट लक्ष दिलं गेलं नाही, तसंच ती कवटी एका दुसऱ्याच उपजातीची (याला ‘होमो हायडेलबर्गेन्सिस’ किंवा ‘होमो हेल्माई’ प्रकारची) ठरवली गेली होती. असो. मात्र, आता आफ्रिकेच्या एका पूर्वेस असणाऱ्या ठिकाणाहून मानवाचा आद्य वंश वाढत गेला, असं नसून संपूर्ण आफ्रिका खंडभरातच हे आद्य मानव विखुरलेले असावेत, तेही त्याकाळी ‘नंदनवन’ असणाऱ्या, हिरवाईनं भरलेल्या, अनेकविध प्राण्यांची रेलचेल असणाऱ्या तीन ते साडेतीन लाख वर्षांपूर्वी...

काही प्रश्‍न कायमच
हा प्रदेश सोडून स्थलांतरित होण्यासाठी काय कारणं असतील, कोणत्या मार्गानं ते साऱ्या जगभर पसरत गेले असावेत, हे काही प्रश्न अजून अनुत्तरित आहेत. आज दिसणारे मानवी जमातीतले फरक कसे होत गेले, का होत गेले, त्याचा कालावधी काय असेही प्रश्न लगेचच आपल्याला पडतात. तेही असेच सलग इतिहासाच्या मालिकेतले निखळून गेलेले, न जुळणाऱ्या दुव्यांसारखे आहेत. काही का असेना, आपले पूर्वज आफ्रिकेतले आणि अधिक पुरातन, तीन लाख वर्षांपूर्वीचे होते हे तर आजवरच्या माहितीप्रमाणं निश्‍चित म्हणायला हरकत नाही... पुढं आणखी काय काय शोध लागतात, त्यावरच सत्य काय ते अवलंबून आहे...आजची धारणा उद्या बदलावीही लागेल...पण विज्ञानातून होणाऱ्या ज्ञानानं आपण सत्याच्या अधिक जवळ जात राहतो हेही नसे थोडके...

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Anand Ghaisas