‘उत्खनन’ एका पुरातन बांधकामाचं (आनंद घैसास)

‘उत्खनन’ एका पुरातन बांधकामाचं (आनंद घैसास)

‘क  शाला उगाच जुनं खणून काढताय’ हे भांडणं मिटवण्यासाठी आलेल्या मध्यस्थाचं एक नेहमीचं वाक्‍य. जुन्या गोष्टी जमिनीत खोलवर दडलेल्या असतात, हाही पूर्वापार चालत आलेला एक समज, कल्पना. जुन्या जमान्यात मौल्यवान वस्तू घरातच कुठं तरी पुरून ठेवण्याची, लपवून ठेवण्याची पद्धत होती. कुठंतरी गुप्त तळघरात हा खजिना अनेक पिढ्या लपवलेला असतो, अशा कथा आणि तो मिळवण्यासाठी तेवढ्याच गुप्तपणे केलेलं खोदकाम यावरून हे वाक्‌प्रचार आले असले, तरी ऐतिहासिक किंवा त्याहून प्राचीन काळातले, बहुतेक प्रागऐतिहासिक नमुने उत्खननांमधूनच मिळालेत, हे खरं आहे.

हे उत्खनन, खणणं मात्र एखाद्या इमारतीचा पाया किंवा विहीर खणल्यासारखं, किंवा शेत खणल्यासारखं नसतं. अतिशय सावकाश, हळूहळू, छोट्या छोट्या कुंचल्यांनी मातीचे थर अलगद बाजूला करत हे ‘खजिना’ शोधकार्य चालतं. यातला ‘खजिना’ हा कित्येकदा असतो जीवाश्‍मांचे दगड-धोंडे, मातीची तुटकी खापरं, मडक्‍यांचे तुकडे आणि कित्येकदा तर हाडांचे सांगाडे! या सांगाड्यांबरोबर त्यांच्या मृत्यूनंतरच्या प्रवासासाठी ठेवलेल्या त्यांच्या वस्तू...मग ती एखादी गळ्यातली खड्यांची माळ असो, की धान्य-बिया भरलेलं एखादं वाडगं. इजिप्तमध्ये अशा थडग्यांमधून अनेक हिरे, मोती, सोन्याची आभूषणंही मिळाली आहेत. असो.

‘पुरातत्त्वविज्ञान’ या शाखेचा उदय तसं म्हटलं, तर फार पुरातन नाही. पुरातन वस्तूंच्या कुतूहलातून, मोहातून, त्यांच्या ऐतिहासिकपणाचंच मनोमन कौतुक करणाऱ्या आणि अशा वस्तूंचा वैयक्तिक संग्रह करणाऱ्या माणसांमधून खरं तर या विज्ञान शाखेचा जन्म झाला. ‘आम्ही काल्पनिक सिद्धांत नाही, तर प्रत्यक्ष पुराव्यांनी इतिहास सांगतो,’ असं त्यांचं म्हणणं हे तेव्हा ‘दर्पोक्तीच’ वाटत असे; पण त्यातूनच  सतराव्या आणि अठराव्या शतकात हळूहळू एक विज्ञानशाखा म्हणून या पुरातत्त्व-विज्ञानाला मान्यता मिळू लागली. पुराणवस्तूंचा संग्रह करणाऱ्या काही हौशी संशोधकांनी पंधराव्या शतकातच ग्रीक-रोमन संस्कृतीचा असा ऐतिहासिक लेखाजोखा घेतलेला आढळतो. ‘प्लाइओ बिओण्डो’ या इटालियन ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह करणाऱ्या आणि स्वत:ला ‘इतिहासकार’ असं म्हणणाऱ्यानं, जुन्या रोमन वास्तू आणि वस्तू यांची अहवालात्मक टिपणं काढलेली आढळतात. ‘जॉन लेलॅंड’ आणि ‘विल्यम कॅमडॅन’नं सोळाव्या शतकात ब्रिटिश गावकुसांचं असंच पुरातत्त्व 
सर्वेक्षण केलेलं दिसतं.

‘स्टोन हेंज’चं उत्खनन
पहिलं पद्धतशीर सर्वेक्षण आणि त्यानंतर उत्खनन झालं ब्रिटनमधल्या ‘स्टोन हेंज’ या महाकाय शिळांच्या, वर्तुळाकृती रचनांचं. या अशा शिळांच्या वर्तुळांच्या अनेक रचना मग युरोपात अनेक ठिकाणी आहेत, याकडं सर्वांचं लक्ष वेधलं आणि त्यासंबंधी शोधमाहिमा सुरू झाल्या. त्यानंतर इटलीतल्या ‘पाँपेई’ शहराच्या उत्खननातून मिळालेल्या माहितीनं तर जगभरात खळबळ माजवली. व्हेसुवियस या ज्वालामुखीच्या उद्रेकांमुळं इसवीसन ७९मध्ये, त्याच्या धूळ आणि राखेखाली गाडले गेलेलं आख्खं शहरच या उत्खननात हाती लागलं होतं. तेही राखेत गाडलेल्या अवस्थेत, जशाच्या तशा राहिलेल्या अनेक मानवी कलेवरांसकट. यात भीतीमुळं धावणारी, बचावासाठी लपून बसण्याच्या अवस्थेतली, काही घरात कामात असणारी, तर काही झोपेतच गाडली गेलेली माणसं होती. ‘हरक्‍युलेनियम’मध्ये १७३८मध्ये, तर ‘पाँपेई’मध्ये १७४८मध्ये ही उत्खनने त्या काळच्या पद्धतीनं करण्यात आली होती; पण यांचा सर्व युरोपभर फार मोठा प्रभाव पडला. 

विल्यम कनिंग्टन (१७५४ ते १८१०) यानं त्याच्या राहत्या गावाच्या आसपासच केलेल्या (जुन्या वस्तूंच्या संग्रहासाठी); पण अनेक खोदकामांच्या कामामुळं, आधी एकट्याच्या मेहनतीनं आणि पैशातून केलेलं काम अपुरं वाटल्यानं इतरांची मदत घेऊन, अनेक चर खणून, त्यात सापडलेल्या वस्तूंचं माहितीसकट प्रदर्शन भरवणारा म्हणून याला पुरातत्त्व उत्खननांचा जनक मानलं जातं. सर रिचर्ड कोल्टनं त्याला या कामात आर्थिक साह्य केलं होतं. १७९८च्या दरम्यान विल्टशायर इथं केलेल्या शोधकामातून निओलिथिक आणि ब्राँझ युगातल्या वस्तूंच्या नमुन्यांच्या निरीक्षण अहवालाचे मसुदे आणि खोदकामाच्या त्याच्या काही पद्धतींचं आजही अनुकरण करण्यात येतं.

एकोणिसाव्या शतकात अधिक काटेकोरपणे निरीक्षणं घेण्याचा, वस्तूंचा ऐतिहासिक मागोवा घेताना, त्यांच्या कालावधींचा अनुक्रम लावताना त्यांना एकूण जागतिक संदर्भात ते नीट कोंदणात बसवण्याचा प्रघात पडला. सर विल्यम्स फ्लॅन्डर्स पेट्रीने इजिप्तमध्ये केलेल्या विविध शोधकार्यामुळं अनेक प्राचीन फरोह, राण्या, त्यांची थडगी, ममी, स्मशानभूमींमध्ये ममींसोबत ठेवलेल्या अनेक मौल्यवान वस्तू, विशेष म्हणजे पुरातन मातीच्या (सिरॅमिक) भांड्यांवरून त्या सर्वांच्या कालावधीची क्रमवारी लावणं शक्‍य झालं. यासाठी फ्लॅंडर्सना पुरातत्त्व शाखेत महत्त्वाचं मानलं जातं. त्यानंतर ‘ट्रॉय’ या पुरातन शहराचं ‘हिसारलीक’ भागातलं, १८७०च्या सुमारास झालेलं ‘बहुस्तरीय’ पद्धतीनं केलेलं उत्खनन, त्याची पद्धती, त्यातून हाती लागलेल्या वस्तू आणि त्यातून मिळालेले पुरातन वास्तुरचनेचे पुरावे यांनाही खूपच प्रसिद्धी मिळाली. कारण या उत्खननातून एकूण नऊ पुरातन शहरं एकमेकांशी संबंधित होती, हा ‘हेलिनिस्टिक कालावधीचा’ इतिहास हाती आला. त्याचवेळी ‘क्रेट’ विभागातही अशीच प्रगत संस्कृती होती, तेही उत्खननातून उजेडात आलं, जिला ‘मिनिअन संस्कृती’ म्हणून ओळखलं जातं. 

‘ग्रिड’ प्रकारच्या उत्खननाचा पाया
१९२० ते ३०च्या दरम्यान सर मॉर्टिमर व्हीलर यांनी ‘शिस्तबद्ध’ चौकोनी जाळीच्या आकारात ‘ग्रिड’ प्रकारच्या उत्खननांचा पाया घातला आणि त्यानंतर इतर सर्व विज्ञान शाखांचा पद्धतशीर वापर या पुरातत्त्वविज्ञानासाठी व्हायला लागला. नमुन्यांची वैज्ञानिक परीक्षणं ही नुसत्या निरीक्षणांसोबत महत्त्वाची गणली जाऊ लागली. विसाव्या शतकाच्या सुरवातीला अनेक विश्वविद्यालयातून हळूहळू पुरातत्त्वविज्ञान शाखेला मान्यता मिळत गेली आणि त्यातून पदवी, पदविका आणि पदव्युत्तर शिक्षण मिळणं सुरू झालं. सध्या तर या क्षेत्रात काम करणारे बहुतेक सर्व जण या विषयातले पदवीधारक आहेत.

मात्र, एक बाब लक्षात घेतली पाहिजे, की ‘डायनॉसॉरसाठी केलेलं उत्खनन’ हे काही ‘पुरातत्त्व’ विभागाचे काम नाही. पुरातत्त्वविज्ञान, पुराभिलेख शोधकाम हा केवळ वैज्ञानिक नव्हे, तर मानवी संस्कृती, तिचा विकास, विशेषत: लेखनकला सर्वदूर विकसित होण्याआधीच्या काळच्या परिस्थितीचा मागोवा, त्या काळातल्या मानवाचं राहणीमान, वापरातल्या वस्तू, घरांची, शहरांची गावांची अवस्था, वास्तुशास्त्राचा विकास यांचा परामर्श घेणं हे अधिक महत्त्वाचं काम आहे. त्यामुळं याला एक वैज्ञानिक बाजू असली, तरी ही अधिक प्रमाणात एक ‘मानव्य’ शाखाच धरली जाते.

सुमारे ३३ लाख वर्षांपूर्वीच्या, पूर्व आफ्रिकेतल्या अश्‍मयुगातल्या मिळालेल्या दगडांच्या हत्यारांपासून ते अगदी गेल्या दशकातल्या मानवनिर्मित कलाकृती, वस्तूंपर्यंतच्या कालखंडाबाबत पुरातत्त्वसंशोधक काम करतात. या कामात त्यांना साहजिकच सामाजिक भान सांभाळत काम करावं लागतं. यात अनेक अडचणी असतात. कधी शासकीय परवानग्या लागतात. शोधकार्य जिथं करायचे त्या जमिनीच्या मालकीचे वाद असतात. खजिन्याच्या आशेनं होणाऱ्या लुटीच्या घटना तर नेहमीच्याच. वस्तीपासून दूर, गूढ वातावरणात एकाकी परिसरात राहावं लागतं ते वेगळंच.

तंत्रज्ञानाची मदत
उत्खनन हे नेहमीच खूप शांतपणे करावं लागतं. टिकाव, फावडी, कुदळी वापरून करायचं हे खोदकाम नसतं. जमिनीखाली नक्की काय सापडेल ते माहीत नसल्यानं चक्क लहान कुंचल्यांनी (ब्रशनं) हळुवारपणे माती बाजूला करत शोधकाम करावं लागतं. त्यामुळं या कामात बराच कालावधी लागतो. हळुवारपणे वरचा थर बाजूला करताना, बऱ्याच वर्षांनंतर एखादी वस्तू हाती लागते; पण ती खरोखरच पुरातन किंवा ऐतिहासिक महत्त्वाची आहे की नाही याची शहानिशा मात्र तिच्या वैज्ञानिक विश्‍लेषणांनंतरच होते. पूर्वी फारशी वैज्ञानिक साधनंही नव्हती; पण आता मात्र रासायनिक पृथक्करणापासून, क्ष किरण, त्रिमित सीटी स्कॅन, अल्ट्रासाउंड सोनोग्राफी, संगणकीय प्रतिमा विश्‍लेषण अशा अनेक तंत्रांचा वापर करून, नमुन्यांचं अंतर्गत परीक्षणही करता येतं. लाखो वर्षं जुन्या कवटीच्या केलेल्या अशा तपासणीतून, एखाद्या वृद्धाचे काही दात त्याच्या तरुणपणीच कोणत्यातरी आघातानं (मारामारी?) पडलेले होते, इथपर्यंत आता समजून येऊ शकतं. असो. जीवाश्‍मांच्या एकूण जडणघडणीतून, तर कधी ‘कार्बन डेटिंग’मधून प्राचीनतेचा अंदाज घेता येतो. 
सध्या एक नवं तंत्र पुढं येत आहे. ते म्हणजे दूरसंवेदन. उपग्रहामार्फत उच्च विभेदनक्षमता (हाय रेझोल्युशन) असलेल्या प्रतिमाग्रहणातून, छायाचित्रातून, जे जमिनीवरून लक्षात येत नाही, चटकन दिसून येत नाही, तेही आता हाती लागू शकतं. यातही अधिक प्रगत तंत्रं आता वापरली जातात. रडार, मग ते सूक्ष्मतंगलांबीची प्रारणं वापरून केलेलं संवेदन असो, तर कधी अवरक्त, कधी अतिनील, कधी क्ष किरण, अशी प्रारणं वापरून, उपग्रहामार्फत दूरसंवेदनानं पृथ्वीच्या पृष्ठभागाचं केलेलं निरीक्षण असो. लेझरनं उंचीमापन करण्याचं तंत्र आता आलं आहे. त्याचसोबत विमानातून, हेलिकॉप्टरनं विविध उंचीवरून घेतलेल्या ‘विहंगम’ प्रतिमा, एवढंच नव्हे तर आता छोटे ‘ड्रोन’ वापरून काढलेली छायाचित्रंही पुरातत्त्व संशोधनासाठी उपयोगात आणली जातात.

पुरातन बांधकामाचा शोध 
उपग्रहांनी घेतलेल्या आणि एका संगणकीय कार्यक्रमात साठवलेल्या अशाच ‘विहंगम’ प्रतिमांच्या साह्यानं नुकताच एक शोध लागला आहे, तोही पुरातन बांधकामांचा. सामान्य वस्तीपासून दूरवर, दुर्गम भागातल्या काही भूपृष्ठीय प्रतिमा पाहत असताना, डेव्हिड केनेडी या वाळवंटी प्रदेशाशी रममाण होणाऱ्या एका पश्‍चिम ऑस्ट्रियातल्या विश्वविद्यालयीन प्राध्यापकाला हा शोध लागला आहे. आजकाल बहुतेक सर्वांना माहीत असणाऱ्या ‘गुगल अर्थ’ या संगणकीय भौगोलिक नकाशाचा संगणकीय कार्यक्रम (सॉफ्टवेअर प्रोग्रॅम-ॲप) पाहत असताना सौदी अरेबियाच्या वाळवंटी भागात त्याला काही चौकोनी दगडी भिंतीसारख्या रचना दिसल्या. या दुर्गम भागात हे काय बरं, असा विचार मनात आल्यावर त्याची अधिक माहिती जमवण्याचा अर्थातच त्यांनी प्रयत्न केला. या शोधात अधिक रस घेतला.

जुन्या काळच्या शेतशिवाराच्या, मोठ्या अंगणाला घातलेल्या कुंपणाला लावलेल्या दरवाजासारखी, झडपांसारखी रचना दिसणारे हे आयताकृती आकार, सौदी अरेबियाच्या वाळवंटी खोऱ्यात दिसून आले आहेत. एक-दोन नाही, तर अशा एकूण चारशे रचना या आसपासच्या प्रदेशात मिळाल्यानं या आश्‍चर्यात अधिकच भर पडली आहे. या सगळ्या रचना दगडांनी बांधलेल्या, फारशा उंच नसलेल्या भिंतींच्या आहेत. ‘हरत खैबर’ या सौदी अरेबियाच्या पश्‍चिममध्य प्रदेशात या दगडी भिंती आढळून आल्या आहेत. फार पूर्वी झालेल्या लाव्हाच्या उद्रेकामधून तयार झालेल्या छोट्याछोट्या घुमटाकार टेकड्यांच्या उतारांवर या दरवाजासारख्या रचना अधिक प्रमाणात आहेत. या रचनांच्या आसपास लाव्हाच्या वाहण्याच्या, प्रवाहाच्या खुणा आहेत. या रचना वस्तीपासून दूर, वाळवंटातल्या ओबडधोबड प्रदेशात असल्यानं त्या आधी कोणाच्या लक्षात आल्या नसाव्यात. एका घुमटाकार टेकडीच्या तर सगळ्या बाजूंच्या उतारावर या रचना दिसतात. शिवाय काही भिंतींवरून लाव्हाचा प्रवाह वाहत गेलेलाही दिसून आला आहे. म्हणजे यातल्या काही रचना उद्रेकाच्या आधीच्या असाव्यात, असाही अंदाज करता येतो. संशोधकांना यांचा अजून नक्की कालावधी ठरवता येत नसला, तरी उद्रेकाच्या आधी असणाऱ्या रचना सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीच्या, तर नंतरच्या रचना सुमारे सात हजार वर्षांपूर्वीच्या कालावधीतल्या असाव्यात, असा एक कयास आहे. प्रत्यक्षात तिथं जाऊन, उत्खनन, परीक्षण करण्याच्या योजना आता बनत आहेत.

बांधकामांचा हेतू अज्ञात
या रचनांचे आकार चौकोनी असले, तरी विविध प्रकारचे आहेत. काही आकार इंग्लिश कॅपिटल ‘आय’ अक्षरासारखे, तर काही एकमेकाशेजारी दोन ‘आय’ आकाराचे आयत शेजारी शेजारी एकमेकांना चिकटवल्यासारखे आहेत. काही इंग्रजी ‘एच’ आकारासारखेही आहेत. मात्र, त्यांचं प्रयोजनच काय, ते तिथं बांधले कोणी, का हे मात्र अजून कोणी सांगू शकत नाही. या दरवाज्याच्या आकारातील सर्वांत मोठा १६९९ फूट उंचीचा (लांबीचा), तर सर्वांत लहान फक्त ४३ फूट उंचीचा (लांबीचा) आहे. या संपूर्ण परिसरचाची रचना पाहता आणि या लाव्हाच्या प्रवाहाच्या खुणा पाहता, वस्तीयोग्य नाही, हे प्रथमदर्शनीच कळतं. कदाचित या उद्रेकांआधी हा परिसर माणसांची वस्ती असलेला असू शकतो; पण तसं असेल तर या रचना आणखी पुरातन, प्राचीन काळातल्या ठरतील. या परिसरातली ही बांधकामं म्हणजे सर्वांत पुरातन मानवनिर्मित ठिकाणं ठरतील, असं याचे प्रमुख संशोधक केनेडी यांनी म्हटलं आहे. या दरवाजाच्या बांधकामांसोबतच अशा आकाशातून छायाचित्रांच्या माध्यमातून तयार केलेल्या नकाशांचा वेध घेताना, काही पतंगासारखे दगडी आकार, काही वर्तुळाकार दगडी आकार, ज्यांमध्ये त्या वर्तुळात विविध आऱ्यासारख्या रचना दिसतात, तेही अनेक ठिकाणी मिळाले आहेत; पण ते बरेचसे वाळवंटातल्या ‘ओॲसिस’च्या, पाण्याच्या उपलब्धतेच्या, पुरातन मानवी वस्तीयोग्य परिसरातले आहेत. मात्र, या वर्तुळाकार किंवा पतंगाच्या रचनांचा आता मिळालेल्या दरवाज्यांच्या रचनांशी काही संबंध आहे काय ते काही अजून जुळवता येत नाही.

उपग्रहांच्या दूरसंवेदक छायाचित्रांमधून हे संशोधन आता हाती लागलं असलं, तरी १९८०च्या दशकात व्हिल कॅम्प आणि जॉन रोबोल यांनी ज्वालामुखींच्या उद्रेकांबाबत, लाव्हाच्या प्रवाहातून झालेल्या भौगोलिक रचनांचा अभ्यास करताना इथल्या एका लाव्हाच्या घुमटावरची ही दगडी भिंतीसारखी रचना पाहिली होती. त्यांना ही भिंत ज्या छोट्या घुमटाकार टेकडीवर दिसली होती, ती त्यापेक्षा आकारानं मोठ्या असणाऱ्या आणि ‘जेबेल अब्याद’ म्हणजे ‘पांढरा डोंगर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेकडीशेजारची होती अशी त्यांची नोंद आहे. मात्र, या भागाचं याहून अधिक संशोधन आजपर्यंत झालेले नाही. सध्यातरी हे लाव्हाचे घुमट सक्रिय ज्वालामुखी नाहीत, तर निद्रिस्त स्वरूपातले आहेत. हा परिसरच सध्या कोणत्याही भूस्तरीय बाबतीत सक्रिय दिसत नाही; पण हे सारे लाव्हाचे प्रवाह ‘बसाल्ट’ या अग्निजन्य काळ्या दगडाच्या प्रकारचे आहेत. आपल्या सह्याद्रीमध्येही हाच बसाल्ट आढळतो. यांच्या जमिनीतून वर येऊन शीलारस थंड होण्याचा कालावधी सुमारे साडेआठ हजार वर्षांपूर्वीचा असल्याचं अनुमान आहे.

‘फरिक अल्‌ सहरा’ नावाची वाळवंटात स्वत: प्रवास करून त्याबद्दलची प्रवासवर्णनं छायाचित्रांसह लिहिणारी, त्याचा ब्लॉग चालवणारी एक हौशी पर्यटन संघटना सौदी अरेबियात आहे. ती ‘द डेझर्ट टीम’ म्हणूनही ओळखली जाते. हे हौशी मंडळ आणि ‘एरिअल फोटोग्राफिक अर्काइव्ह फॉर आर्किओलॉजी इन द मिडल इस्ट’ हे आता या शोधकार्यात केनेडींबरोबर उतरलं आहे. यांनाही आता पुढील संशोधनासाठी काही जागतिक संस्थांचं आर्थिक सहकार्य लाभलं आहे. हा गेल्या काही वर्षातल्या कामाचा आढावा घेणारा संपूर्ण शोधनिबंध ‘जर्नल ऑफ अरेबियन आर्किऑलॉजी अँड एपिग्राफी’च्या या महिन्याच्या (ऑक्‍टोबरच्या) अंकात प्रसिद्ध झाला आहे. तसंच केनेडींचा या बाबतीतला एक छोटा व्हिडिओही ‘युट्यूब’वर आलेला आहे. 

या ‘हरत खैबर’ परिसरात अनेक छोट्या विवरांसारख्या रचना उपग्रहीय छायाचित्रातून दिसून येतात. ती विवरं पूर्वीच्या सक्रिय ज्वालामुखींच्या आसपासची, वायू आणि शीलारस बाहेर टाकणाऱ्या नलिकांची मुखं आहेत, ज्यांना ‘उष्मवायू नलिकानिष्कास द्वार’ म्हणतात. त्यांच्या आसपासही या दरवाजाच्या आकाराच्या दिसणाऱ्या बांधकामाच्या भिंती आहेत; पण विशेष लक्ष देण्याची बाब म्हणजे, उपग्रहांच्या २०१२मध्ये केलेल्या सर्वेक्षणातल्या छायाचित्रात दिसणाऱ्या काही भिंती २०१५च्या सर्वेक्षणातल्या अवकाशीय छायाचित्रात लुप्त झालेल्या आहेत!

या वाळवंटी ओसाड आणि मुख्य वस्तीपासून दूर असणाऱ्या जागांवर तसं कोणाचंच नियंत्रण नाही. ही जागा कोणाच्याच ‘मालकीची’ नाही, त्यामुळं काही संरक्षण नाही. वाढत्या विकासकामांसाठी इथं दगडी चिरे आयते मिळत असल्यानं ते उखडून नेले जात आहेत...ते तिथं कोणी, कसे आणि केव्हा आणले, कशासाठी हा भिंती बांधण्याचा प्राचीन खटाटोप केला गेला होता, हे कळण्याआधीच!... त्यामुळं या गोष्टींना ‘संरक्षित परिसर’ करण्याची आवश्‍यकता आहे, अशी चिंता अरेबियाच्या पुरातत्त्व संग्रहालयाच्या प्रमुखांनी आता व्यक्त केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com