सोडू नका विज्ञानाची कास (आनंद घैसास)

सोडू नका विज्ञानाची कास (आनंद घैसास)

विज्ञानाशी संबंधित नवं संशोधन, माहिती पोचवणाऱ्या सदराचा हा अखेरचा भाग. अनेक मजकुरांसंदर्भात अनेकांनी काही प्रश्‍न, शंका विचारल्या. त्यांच्यापैकी काही प्रातिनिधिक शंकांचं हे निरसन. विज्ञान हा कधीही न संपणारा एक प्रवास आहे. त्याची कास कधीही सोडायची नाही. त्यातून अनेक उत्तरं मिळतात आणि नव्यानं काही प्रश्‍न तयार होत असले, तरी त्यांची उत्तरं शोधण्यासाठीही पुन्हा विज्ञानच दिशा देतं.
 

प्रिय, विज्ञानमित्र-मैत्रिणींनो...

गेली दोन वर्षं मी आपल्याशी या ‘विज्ञानजिज्ञासा’ सदरामधून संवाद साधत आहे. दर महिन्यात कधी दोनदा तर कधी तीनदा, एकाआड रविवार मी विविध विज्ञान विषयांवरचे लेख देत आलो आहे. नव्यानव्या संशोधनासंबंधी प्रत्येक लेखातच काही ना काही द्यायचा प्रयत्न तर होताच; पण त्यात त्या त्या विषयाशी निगडित अधिक माहिती सर्वसामान्य वाचकांपर्यंत पोचवायचाही प्रयत्न होता. या लेखमालेला आपल्याकडून नेहमीच चांगला प्रतिसाद लाभत गेला आहे, त्यासाठी वाचकांचे मनोमन आभार. कित्येक वाचकांनी प्रत्यक्ष फोनवर माझ्याशी संवाद साधला होता, काहींनी ई-मेलवर संदेश पाठवला होता, तर काहींनी व्हॉटसअप वरून संपर्क केला होता. ‘ई-सकाळ’ची माझ्या लेखाची ‘संदर्भजोडणी’ मी फेसबुकवरही टाकत होतो. त्यावरही अनेकांच्या प्रतिक्रिया येत होत्या. या प्रतिक्रियांमध्ये त्यांनी जसे त्यांच्या आवडीच्या विषयांबाबत धन्यवाद दिले होते, तसेच अनेकांनी हे नवे विषय खासकरून मराठीतून, सोप्या रीतीनं मांडण्यासंबंधी अधिक समाधान व्यक्त केले होते. पण यापेक्षाही मला सर्वांत अधिक आवडलेल्या प्रतिक्रिया होत्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या, युवा पिढीतल्या, सध्या अभ्यासात रस असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या. लेखातल्या विषयासंबंधी अधिक सखोल माहिती विचारणाऱ्या, नवे प्रश्न करणाऱ्या या प्रतिक्रिया अर्थात मला अधिक आवडल्या. मी त्यांना उत्तरंही पाठवायचो; पण ती थोडक्‍यात, ई-मेलवर किंवा काहींनी तर व्हॉटस्‌अपवर विचारल्यानं त्यावरच मेसेजमधून उत्तरं पाठवणं होत असे. हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे दोन वर्षांनंतर हा आजचा माझा या सदराचा सांगता करण्याचा लेख आहे.

माझे नेहमीचे काही वर्गमित्र, जे माझ्या लेखांचे वाचकही आहेत, ते गेल्या आठवड्यात मला भेटले होते. त्यांनी बोलताबोलता मला सुचवलं, की हे जे प्रश्न, तू त्या प्रतिक्रिया देणाऱ्याला किंवा विद्यार्थीमित्रांना पाठवले आहेस, ते इतरांनाही समजायला हवेत. तेच का नाही तू या सांगतेच्या लेखात देत? मला हा विचार पटला आणि मी एकूणच कोणत्या प्रश्नांना उत्तरं दिली, ते जुने ई-मेल, व्हॉट्‌सॲपचे मेसेज काढून पाहू लागलो. 

ध्यास धरा, पाठपुरावा करा
काही प्रश्न खूप खासगीही आहेत, असं लक्षात आलं. बरेचसे प्रश्न ‘मी सध्या बारावीमध्ये आहे, पुढे शास्त्रज्ञ बनायचे आहे तर काय करू...’ अशाही प्रकारचे होते. यासाठी माझं एक नेहमीचं उत्तर आहे, ते म्हणजे काहीही करा; पण ते मन लावून करा, मेहनतीला पर्याय नाही. मार्गदर्शन देणारे, शिकवणारे कसे आहेत, नामवंत कॉलेज आहे की नाही, यापेक्षा आपल्याला शिकायचं आहे, तर ते कसंही करून शिकायची आपण केलेली धडपड फार महत्त्वाची ठरते. पुस्तकं ही माझ्या स्वत:च्या बाबतीत सर्वांत श्रेष्ठ गुरू ठरली आहेत. कथा कादंबऱ्या वाचाव्यात- नाही असं नाही; पण विविध ग्रंथप्रदर्शनांतून मिळणारी पुस्तकंच प्रचंड ज्ञानाचं भांडार आपल्यासमोर आणत असतात. त्याची कास धरा. टीव्हीमुळं आपला फार वेळ फुकट वाया जातो, ते टाळा. सध्या आपल्या हाताशी इंटरनेट आलं आहे. त्यावरही अनेक पुस्तकं आणि माहिती आपण पाहू शकतो. त्याची मदत घ्या आणि एक गोष्ट म्हणजे आताच कोणत्या विषयात काम करायचं ते मनाशी घट्ट ठरवू नका. कारण वाचन करताना कोणत्या विषयाची आवड वाटेल आणि तो नंतर तुमच्या आयुष्याचं गमक ठरेल, याचा आज काहीच अंदाज नाही येऊ शकणार. मात्र, नंतर ध्यासच नाही, तर वेड लागल्याप्रमाणं एखाद्या विषयाचा पाठपुरावा केल्याखेरीज हाती काही लागत नाही हेही खरं. विज्ञान हा विषयच फार मोठा आहे. त्यात अनेक विषयांचं ज्ञान असणं हे आवश्‍यकच ठरतं. त्यामुळंच आधी मूलभूत विज्ञान आणि नंतर इंजिनिअरिंग किंवा त्याच्या विरुद्ध आधी इंजिनिअरींग आणि नंतर मूलभूत विज्ञान असं करणारे अनेक जण सध्या संशोधन क्षेत्रात काम करताना दिसतात. याबाबतीत माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचं उदाहरण प्रेरणादायी आहे. असो.

परग्रहवासी आहेत का?
काही प्रश्न वारंवार विचारले जात होते, ते अपूर्ण राहिलेल्या कुतूहलामुळं आणि विविध वाहिन्यांच्या अतिरंजित बातम्यांमुळंही. त्यातला ‘परग्रहवासी, एलियन आहेत का, हा एक, तर उडत्या तबकड्या खऱ्या आहेत का, हा त्यासोबतचा दुसरा प्रश्न. विचित्र स्वरूपाचे प्राणी कुठंतरी कोणाला तरी दिसले, ते परग्रहवासी असावेत काय इत्यादी...माझ्या दोनपेक्षा जास्त लेखांमध्ये म्हणजे मग ते ‘सेटी’ प्रकल्पाबाबत असो, अवकाशात सोडलेल्या प्रकाशाच्या दबावावर चालणाऱ्या पतंगयानाच्या प्रयोगाबाबत असो, की ‘ट्रेपिस्ट १’ आणि ‘प्रॉक्‍झिमा बी’ या सर्वांत जवळच्या आणि पृथ्वीसमान वस्तुमानाच्या परग्रहाबाबतचा लेख असो. त्यामुळं हे कुतूहल वाढणं साहजिक आहे. परग्रहांचा शोध सतत अनेक प्रकल्पातून चालू असल्यानं रोजच त्यांची संख्या वाढती असणार आहे; पण त्या परग्रहांवर सजीवसृष्टी असण्याचे संकेत अजूनपर्यंत हाती लागलेले नाहीत. नुकत्याच एका ताऱ्याभोवती (केप्लर-९०) सूर्याप्रमाणं आठ ग्रहांची मालिका आहे, असं समजलं आहे; पण ती ग्रहमाला आपल्यापासून सुमारे २,५४५ प्रकाशवर्षं अंतरावर आहे. 

आजमितीस म्हणजे १ डिसेंबर २०१७पर्यंत नोंदवले गेलेले एकूण ३७१० ग्रह, २७८० ग्रहमालिका, ज्यात एकापेक्षा जास्त ग्रह आहेत अशा एकूण ६२१ ग्रहमालिका आपल्याला माहीत झाल्या आहेत. यात आजपर्यंत पृथ्वीसमान असणारे मात्र हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच आहेत. मात्र, यापैकी कोणत्याही ग्रहापर्यंत आपण प्रत्यक्ष पोचू शकणार नाही, हेही तेवढंच खरं. कारणं दोन. एक आपल्या आयुष्याची मर्यादाच, तर दुसरं कारण यानाचा वेग आणि कापायला लागणारं अंतर. आपलं आयुष्य एवढं छोटं आहे, की आज उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान (ताशी सरासरी वीस हजार किलोमीटर वेग) अवकाशयानानं जरी प्रवास करायचा म्हटला, तरी आपल्याला सूर्यानंतर सर्वांत जवळच्या प्रॉक्‍झिमा सेंटॉरी ताऱ्याशी असणाऱ्या ग्रहापर्यंत पोचण्यास एकूण  दोन लाख ४८ हजार वर्षं लागतील! (प्रकाशाचा वेग ३,००,००० किलोमीटर/सेकंद x ६० सेकंद x ६० मिनिटं x २४ तास x ३६५ दिवस x ४.५ प्रकाशवर्षं = ग्रहाचं एकूण अंतर किलोमीटरमध्ये. या अंतराला २०,००० किलोमीटर / तास x २४ तास x ३६५ दिवस = या यानानं वर्षभरात कापलेलं अंतर. या दोन किमतींचा भागाकार केल्यावर, तिथं पोचण्यासाठी लागणारा कालावधी येतो.) या हिशेबात पृथ्वीवर सध्या असलेल्या मानव संस्कृतीच्या, म्हणजे दोन पायावर चालणाऱ्या ‘शहाण्या मानवा’च्या (होमो सॅपिअनच्या) पृथ्वीवरील जन्मापासूनचं वयही सुमारे तेवढ्याच वर्षांचं भरतं. जरा उलट विचार केल्यास, एखादा आपल्यासारखा ‘शहाणा एलियन’ अशा एका जवळच्या ग्रहावरून प्रवास करून येत, आज जर आपल्याला भेटणार असेल, तर तो आपल्या आदिमानवाच्या काळात त्याच्या घरून निघाला असेल...म्हणजे प्रत्यक्ष तो नव्हे, तर त्याच्या अनेक पिढ्या त्या आपल्याकडं येणाऱ्या यानातच व्हाव्या लागणार!...शिवाय पृथ्वीवर ज्या काळी आदिमानव होता, त्या काळी तो तर कोणत्याही प्रकारे या एलियनशी संपर्क करूच शकत नव्हता. मग इतक्‍या दूरच्या त्या परग्रहवासीयांना कसं बरं कळलं असेल, की या सूर्यमालेतल्या तिसऱ्या ग्रहावर सजीवसृष्टी आणि बुद्धिमान मानव असेल... शिवाय कित्येक पिढ्या यानात होण्यासाठी, यानाचा आकार केवढा हवा इथपासून विचार करावा लागणार. यानातून फक्त एका प्राण्याला पाठवून उपयोग नाही. प्राण्यांच्या जोड्या, नर-माद्यांच्या असायला हव्यात...ज्यांच्यातून पुढील पिढी निर्माण व्हायला हवी. शिवाय नव्या जन्माला येणाऱ्या त्यातल्या सर्वांचीच वाढ अंतराळवीरांसारखी व्हायला हवीच...मग त्यांचं शिक्षण वगैरे सगळं यानातच करावं लागलं असणार बरं का!...त्या यानात इतकी वर्षं सतत अन्नपुरवठा होण्याचीही सोय नको का करायला?...म्हणजे अन्नसाखळीचीच व्यवस्था पाहिजे, जी वनस्पतींमधूनच प्राप्त होते. म्हणजे शेती, बागायती सोबत आली. त्यासाठी जमीन, पाणी, खतं, आणि हो, सतत उन्हासारखा प्रकाश लागणार...यानाच्या सर्व व्यवस्था चालू राहण्यासाठी विद्युतपुरवठा लागणारच. हे सारं शक्‍य व्हायला हवं! ठरवा आता तुम्हीच, की अशा परिस्थितीत ते परग्रहवासी आपल्याला किंवा आपण त्यांना भेटण्याची शक्‍यता किती ते! शिवाय हे सर्वांत जवळच्या परग्रहाला गृहीत धरून मांडलेले विचार आहेत...जो ग्रह फक्त ४.५ प्रकाशवर्षं दूरवर आहे. २,५४५ प्रकाशवर्षं दूर असणाऱ्या ग्रहासंबंधी काय बरं गणित करावं लागेल?... ‘इंटरस्टेलर ट्रॅव्हल’ म्हणजे आंतरतारकीय प्रवासाच्या रंजक विज्ञानकथा कितीही मनोवेधक असल्या, वाटल्या, तरी हे सारं विचारात घ्यावंच लागेल. मात्र, हे विचारात घेतलं, तरी एक आशा कायम आहे, की आपल्या आकाशगंगेत एकूण दोनशे अब्जांहून जास्त तारे आहेत. त्यातल्या कित्येकांना ग्रहमालिका असू शकतात. अशा अगणित दीर्घिका विश्वात आहेत, त्या अर्थी कुठं न कुठं सजीवांचं असणं हे तर्काला धरून आहे. आणखी एक कारण आहे, की साऱ्या विश्वात असणारे रासायनिक घटक सारखेच आहेत, ज्यातूनच जीवसृष्टीची निर्मिती झाली आहे.

वैज्ञानिक-अवैज्ञानिक संदेश
कित्येकदा सामाजिक माध्यमांतून विशेषत: व्हॉटस्‌ॲपवरून अनेक अवैज्ञानिक संदेश मोठा वैज्ञानिकतेचा आव आणत फिरत असतात. या दिशाभूल करणाऱ्या संदेशांबद्दलही ‘हे खरं आहे का’पासून ‘हे असं दिसत असेल तर आम्हालाही तिथं जाऊन पाहता येईल काय...’ असं विचारलं जात होतं. खरं तर ही छायाचित्रं मुद्दाम बदल केलेली असतात. कधीकधी दोन-तीन छायाचित्रांचं ते मिश्रणही असू शकतं. जसं ‘उत्तर ध्रुवावरून घेतलेलं हे छायाचित्र आहे,’ असं सांगितलेलं असतं, त्या छायाचित्रात क्षितिजावर सूर्य दिसत असतो आणि त्याच्या डोक्‍यावरच चंद्रही असतो. तोही चांगला छायाचित्रभर मोठ्या आकाराचा. सूर्य मात्र ठिपक्‍याएवढा! आता एक गोष्ट लक्षात घ्या, की आपण विज्ञान शिकतो. एखादी वस्तू तिच्या अंतराच्या प्रमाणात लहान अथवा मोठी दिसणार. चंद्र आपल्यापासून जेवढा दूर आहे, त्यापेक्षा सूर्य चारशेपट दूर असला, तरी तो चंद्राच्या तुलनेत चारशेपट मोठाही आहे. त्यामुळंच हे दोघंही आपल्याला सारख्याच आकाराचं, त्यांची बिंबं जवळजवळ एकाच आकाराची दिसतात. त्यामुळंच तर खग्रास ग्रहण होऊ शकतं. हां, जेव्हा सूर्य थोडा जवळ आणि चंद्र थोडा दूर असं असेल, तर कंकणाकृती ग्रहण होते, ज्यात चंद्राच्या भोवती सर्व बाजूंनी सूर्य दिसत राहतो. मात्र, हा फरक कांकणभरच असतो. शिवाय या छायाचित्रात चंद्राची कोरही कोणत्याही तिथीची असते. खाली सूर्य असेल तर किती अंतरावर चंद्राचा गोळा असल्यास, त्यावर पडणारा प्रकाश कसा असेल, हे जरासंही आपण लक्षात का घेत नाही?

दुसरं एक...‘आज चंद्र सर्वांत जवळ येत असल्यानं तो काही काळ विविध रंगांत, किंवा सप्तरंगात दिसणार आहे...’ अरेच्चा! आकाशात चंद्र दिसतो, तो त्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळं. तो प्रकाश कोणत्या कोनातून त्याच्यावर पडलेला आहे आणि त्यावेळी आपण तो कोणत्या कोनातून पाहत आहोत, त्यावर त्याच्या कला, म्हणजे त्याचा प्रकाशित भाग किती दिसतो ते अवलंबून असतं. हे झाले तिथीसोबत बदलणाऱ्या कलांबद्दल; पण चंद्र पृथ्वीभोवती फिरतो तो लंबवर्तुळाकार कक्षेत. त्यामुळं तो महिन्यातून एकदा जवळ, तर एकदा लांबवर असतो ही गोष्ट खरी आहे. मात्र, ही अंतरं ‘उपभू बिंदू’ आणि ‘अपभू बिंदू’ म्हणून ओळखली जातात. या अंतरांमध्ये सुमारे ५०,००० किलोमीटरचा फरक असतो. १ जानेवारीला २०१८ ला, रात्री ९:५६ ला, चंद्र उपभू बिंदूशी, म्हणजे पृथ्वीपासून सर्वांत जवळ ३,५६,५६५ किलोमीटर अंतरावर असणार आहे, तर १५ जानेवारीला पहाटे दोन वाजता तो अपभू बिंदूशी म्हणजे पृथ्वीपासून ४,०६,४५९ किलोमीटर अंतरावर आहे. https://www.fourmilab.ch/earthview/pacalc.html  या वेबसाइटवर जाऊन तुम्हाला कोणत्याही दिवसाची चंद्राची ही कमी अधिक अंतराची स्थिती जाणून घेता येईल. ज्याला ‘अपोगी आणि पेरिगी कॅलक्‍युलेटर’ म्हणतात. असो. तरी पण एवढ्या लांब अंतरावर असणाऱ्या चंद्रबिंबात या पन्नास हजार किलोमीटरच्या फरकानं फारसा फरक पडत नाही! सर्वांत मोठे चंद्रबिंब ३६’ ६’’ (म्हणजे ३६ कोनीय मिनिट ६ कोनीय सेकंद), तर सर्वांत लहान चंद्रबिंब २९’ २०’’ (म्हणजे २९ कोनीय मिनिट २० कोनीय सेकंद) एवढं असतं. आपल्याला डोळ्यांनी नुसतं चंद्राकडं पाहताना, हा फरक कधीच कळून येत नाही. (कारण ६० कोनीय सेकंद म्हणजे एक कोनीय मिनिट आणि ६० कोनीय मिनिटं म्हणजे फक्त १ अंश) त्यामुळं चंद्र काय आणि सूर्य काय, आकाशात सुमारे अर्ध्या अंशाच्या कोनात व्यापणारं बिंब असतं. असा हा सूक्ष्म फरक असताना त्यांच्यामुळं चंद्राला रंग दिसतील असं कधीच होणार नाही. वातावरणातल्या धुळीमुळं चंद्र क्षितिजाशी असताना, उगवताना किंवा मावळताना, त्याचा रंग थोडासा पिवळसर किंवा तांबूस दिसतोही कधीकधी; पण त्यामध्ये निरनिराळ्या रंगाच्या छटा कधीच दिसून येत नाहीत.

वैज्ञानिक ‘अंधश्रद्धा’ नकोत
आणखी एक...‘आज रात्री अमुक वाजल्यापासून तमुक वाजेपर्यंत काही ‘वैश्विक किरण’ मोठ्या प्रमाणात पृथ्वीवर येत असल्यानं आपले मोबाईल बंद ठेवा...’ यात मुळात ज्यांनी हा संदेश तयार केलेला असतो, त्यांनाच काही मूलभूत वैज्ञानिक गोष्टी माहितीच नाहीत हे जाणवतं. मात्र, विज्ञानातल्या काही संज्ञांचा नीट अर्थ माहीत नसलेल्या आणि स्वत: कधी तर्क आणि कार्यकारणभावाचा वापर न केलेल्या सर्वसामान्य जनतेचं अशा भूलथापांना चटकन बळी पडणं होतं. तीच गोष्ट वैश्विक किरणांची. अवकाशातून आपल्याकडं येणारे हे किरण प्रामुख्यानं दूरवरच्या सुपरनोव्हा उद्रेकांमधून आलेले किंवा दीर्घिकांकडून आलेले असतात. ते उच्च ऊर्जाकण असले, तरी ते एकतर अलग पडलेले प्रोटॉनकण (बीटा किरणांसारखे), म्युऑन्स किंवा गॅमा किरण असतात. जे आपल्याकडं सतत येत असतात, अशी एक धारणा होती. सूर्याकडून येणारे न्यूट्रिनो आणि क्ष-किरणही यात असतात. पण आपल्या पृथ्वीकडं येताना यांना आधी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामुळं अडवलं जातं; मात्र तरीही जेव्हा हे वातावरणात शिरलेच, तर यांची हवेच्या रेणूंबरोबर जी अभिक्रिया होते त्यामुळं यांचं विकिरण होतं. हवेतल्या विविध रेणूंचे या किरणांमुळं आयन बनतात. त्यामुळं ते वैश्विक किरण जमिनीपर्यंत कित्येकदा पोचतच नाहीत. खूप उंचावर असणाऱ्या वेधशाळांमध्ये त्यांचा थोडा परिणाम जाणवतो, हे खरं आहे. काही संगणकीय ‘रॅम’मध्ये २५६ मेगाबाइटमध्ये एक या प्रमाणात वैश्विक किरणांमुळं काही बदल झालेला दिसून आला आहे.

वातावरणाबाहेरच्या उपग्रहांवरच्या संगणकीय प्रणालींना जरी त्यांचा धोका जास्त वाटला, तरी तसा प्रत्यक्ष अनुभव फक्त एकदाच व्हॉयेजर यानामध्ये एका संगणकीय प्रणालीत जाणवून आला होता. मात्र, तो बिघाड इतर कशामुळं नाही म्हणून तो वैश्विक किरणांमुळे असावा असं अनुमान होतं. मात्र, आपल्या खिशातल्या, घरातल्या मोबाईलवर त्यांचा कोणता परिणाम होईल, एवढ्या प्रमाणात ते पोचू शकतील ही शक्‍यता नाही. जर असा काही परिणाम होतही असेल, तर तो काही विशिष्ट वेळेत, तेही फक्त रात्री काही तासांपुरता मर्यादित असणार नाही. तसंच तो परिणाम ज्याप्रमाणं चालू मोबाईलवर होईल, तसाच तो बंद मोबाईलवरही होईलच! शिवाय तो तर सगळ्याच इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंवर जगभर होईल; पण असं फक्त जवळच्या एखाद्या ताऱ्याचा स्फोट झाला तर होणं शक्‍य आहे. त्यामुळं घाबरून जाण्यात काही अर्थ नाही. या वैश्विक किरणांचं वातावरणात शिरल्यावर काय होतं, त्यात कसे आणि किती उंचीवर बदल होतात, ते डॉ. होमी भाभा यांनी शोधून काढलं होतं. वैश्विक किरणांची हवेतल्या मूलद्रव्यांशी जी आंतरक्रिया होते, त्यातून हवेतल्या मूलद्रव्यांना जी अतिरिक्त ऊर्जा मिळते, त्यामुळं त्यांचं आयनीभवन होऊन त्यांची समस्थानिकं बनतात आणि ती सर्वदूर विखुरतात. या त्यांच्या (आयसोटोप्सच्या) विखुरण्याला, ‘भाभा विकिरण’, ‘भाभा स्कॅटरिंग’ याच नावानं आता जगभर ओळखलं जातं. त्यामुळं अशा नेटवर्क बंद ठेवण्याच्या बातम्यांचे उद्देश काही वेगळेच असू शकतात. कंपन्यांनाच नेटवर्कच्या काही खास कामांसाठी, दुरुस्तीसाठी काही वेळासाठी कमी दळणवळण असलेलं बरं असं वाटत असतं. (कित्येकदा गुन्हेगारी स्वरूपाचेही काही लोक असे मेसेज पसरवून तुम्ही बंद ठेवलेल्या नेटवर्कचा त्या कालावधीत वापर करून घेण्याची शक्‍यता असते.) तुमच्या वापरातून सुटका मिळालेल्या अवस्थेत नेटवर्क असावं असाही त्यात इरादा असू शकतो...असो. असे मेसेजेस तयार करणाऱ्या काही खास वेबसाइटही आहेत. काही विज्ञानाचे शब्द वापरायचे, नवीन शोधांचं काही तत्त्व अर्धवट वापरून एक बोगस बातमी तयार करायची, जुने कोणते तरी दाखले द्यायचे आणि लोकांना मूर्ख बनवायचं, हाच त्यामागचा उद्देश असतो. अशा वैज्ञानिक अंधश्रद्धांना आपण मात्र पारखून घ्यायला शिका...

पण एक मात्र करा...हे नक्की कसं असतं ते पाहण्यासाठी अशी एखादी वेबसाइट नक्की पाहा, आपलेच डोळे उघडण्यास त्याने मदत होईल, गंमतही येईल...पाहा...
https://www.scoopwhoop.com/inothernews/indian-internet-hoaxes/#.u४h५j१ive
हे पाहिल्यावर तुम्हाला कळेलच, की आपण अशा किती चुकीच्या गोष्टींवर विश्वास ठेवतो. तेही चुकून.!
आपल्या सर्वांना विज्ञानाची कास न सोडण्याच्या शुभेच्छा!

(हे पाक्षिक सदर आता समाप्त होत आहे)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com