चंद्र कोरतो सावली...!

आनंद घैसास
रविवार, 28 मे 2017

एकूणच ग्रहणांचं गणित काय आहे, हे पाहणं फार मजेशीर असतं. अर्थात ते थोडं गणिताशी आणि खगोलीय भूमितीशीही निगडित आहे. चंद्र-सूर्याचे आकाशातले भ्रमणकाल आणि त्या मार्गावरचे त्यांचे छेदनबिंदू यांचं ते गणित आहे. आणखी पावणेतीन महिन्यांनी, म्हणजे २१ऑगस्ट रोजी होणारं खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेतून पाहता येऊ शकणार आहे. खगोलप्रेमींना अमेरिकेत येऊन हे ग्रहण पाहण्याचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याचं नियोजन लगेचच करावं लागेल, त्यासाठी आधीच दिलेली ही माहिती! कारण, जेमतेम तीनच महिने हातात आहेत आणि अमेरिकी व्हिसा मिळवायचा असेल, तर आतापासूनच जुळवाजुळव करावी लागेल... 

रं तर येत्या वर्षभरात भारतातून खग्रास सूर्यग्रहण पाहण्याचा योग काही येणार नाहीये. दोन वर्षांनी २६ डिसेंबर २०१९ ला दक्षिण भारतातून केरळ, उटी, पलक्कड, करूर, तर तामिळनाडूत त्रिचनापल्ली, श्रीलंकेतली काही शहरं आणि नंतर इंडोनेशिया या भागातून कंकणाकृती सूर्यग्रहण होणार आहे, जानेवारी २०१० मध्ये कन्याकुमारी-रामेश्वरहून दिसलं होतं त्याचप्रमाणे. डिसेंबर २०१९ नंतर लगेचच सहा महिन्यांनी २१ जून २०२० मध्ये आफ्रिकेच्या मध्यातून सुरू होऊन, उत्तर भारतातून, पंजाब, हरियाना, अगदी डेहराडूनमधून, पुढं टिहरीमधून चीनच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गावरून जेव्हा चंद्राची सावली जाणार आहे, तेव्हाही ते कंकणाकृती ग्रहण असणार आहे; पण भारतातून खग्रास ग्रहण दिसण्यासाठी २० मार्च २०३४ पर्यंत थांबावं लागणार आहे आणि ते दिसणार आहे जम्मू-काश्‍मीरच्या कारगिलसारख्या भागातून. अजून १७ वर्षांनी. तेव्हा मी ८० वर्षांचा असेन,असलो तर...

हे सांगायचं कारण असं, की या वर्षीच खग्रास सूर्यग्रहण निवांतपणे पाहण्याचा योग आहे; पण ते अमेरिकेतून. अमेरिकेच्या पॅसिफिक महासागराच्या पश्‍चिम किनाऱ्यापासून अटलांटिक महासागराच्या पूर्व किनाऱ्यापर्यंत एका ११५ किलोमीटर रुंदीच्या आडव्या पट्ट्यात या ग्रहणादरम्यान चंद्राची सावली मार्गक्रमण करणार आहे. या सावलीच्या मार्गावर सूर्याच्या खग्रास स्थितीचं दर्शन होणार आहे. तो दिवस आहे २१ ऑगस्ट २०१७. या मार्गावर या ग्रहणाचा मध्य ३७.३५ अंश उत्तर अक्षांश आणि -८९.७ पश्‍चिम रेखांश या जागी होणार असून, ती जागा इलिनॉइस राज्यात कार्बोंडेल शहराच्या थोडं दक्षिणेला असणाऱ्या ‘जायंट सिटी स्टेट पार्क’ या ठिकाणी नेमकी एका विस्तृत मैदानासारख्या ठिकाणी आहे. ही एक फारच चांगली गोष्ट आहे, जिथून एकाच वेळी अनेकांना या खग्रास ग्रहणाचं दर्शन होऊ शकेल. अमेरिकेत ऑगस्ट महिना आकाश निरभ्र असणारा उन्हाळी महिना असतो. आपल्यासारखा पावसाळी महिना नसतो. या संधीचा लाभ अनेक खगोलप्रेमी संस्थांनी आणि अमेरिकी सरकारी/निमसरकारी संस्थांनी घेण्याचं ठरवलं आहे. या खग्रास सूर्यग्रहणाचं निरीक्षण करण्यासाठी, खगोलनिरीक्षकांसाठी, तसंच सामान्य जनतेसाठीही, वेगवेगळ्या ठिकाणी सुमारे  एक हजार संस्था खग्रास सूर्यग्रहणाची ही घटना पाहण्याची व्यवस्था करणार आहेत. हे का? तर अमेरिकेत अशी संधी फार कालावधीनंतर येत आहे. सुमारे २६ वर्षांनी.

एकतर चंद्राची सावली आपल्यावरून सरकत जाताना जो काही अनुभव येतो, तो फारच मजेशीर असतो आणि तो मी स्वत: अनुभवला आहे. तेही गेल्या शतकातलं भारतातून दिसलेलं पहिलं, म्हणजे १६ फेब्रुवारी १९८० चं खग्रास सूर्यग्रहण पाहताना. हे ग्रहण आम्ही कप्पतगुड्डा या कर्नाटकातल्या गदगजवळच्या एका खेड्याजवळून पाहिलं होतं. तिथल्या लोखंडाची खाण असलेल्या सुमारे तीन हजार फूट उंच डोंगरमाथ्यावरून आम्ही हा अनुभव घेतला. आसपासचा २०/२५ किलोमीटर परिघाचा परिसर वरून स्वच्छ दिसत होता. दुपारची वेळ होती. अचानक पश्‍चिमेकडून सरसरत अंगावर येणारी सावली, शेजारी सगळीकडं अंथरून ठेवलेल्या अनेक धोतरांवरून काळ्या-पांढऱ्या सरसरत्या नागांच्या नाचाप्रमाणे सावलीचे पट्टे काढत पुढं आली आणि सगळं आसमंत काळवंडलं...!

भर दुपारी आकाशात चंद्र-सूर्य यांनी एकमेकांवर येत एक चमकदार हिऱ्याची अंगठी बनवली, त्यानंतर दिसला मोत्यांचा हार (बेलीज्‌ बीड्‌स) आणि अचानक सूर्याचा संपूर्ण भाग झाकला गेल्यावर सूर्यकिरिटाचं, सूर्याच्या वातावरणाचं ते पहिलं दर्शन. लक्षात आलं, की निळं आकाश अचानक काळवंडलं होतं आणि सूर्याशेजारी जवळच छोटा बुध दिसला - जो मी प्रथमच पाहत होतो - आणि दिसला शुक्र. हे दोन ग्रह दिसायला लागले. मृग नक्षत्रातले तारे आणि व्याधाचा ताराही दिसायला लागला होता. हे सगळं झालं केवळ दोन मिनिटांच्या आतच; पण याच अनुभवानं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली...मी खगोलनिरीक्षक बनलो ! असो.

अमेरिकेत या २१ऑगस्टच्या ग्रहणादरम्यान काही संस्था तर आधी दोन आणि नंतर एक असे एकूण चार दिवसांच्या भरगच्च खगोलशास्त्रीय संमेलनांचं आयोजन करणार आहेत. हे मुद्दाम आत्ता लिहिण्याचे, आपल्याला कळवण्याचं कारण हे, की जर कुणाला अमेरिकेत येऊन हे ग्रहण पाहण्याचा लाभ घ्यायचा असेल, तर त्याचं नियोजन लगेचच करावं लागेल...जेमतेम तीनच महिने हातात आहेत आणि अमेरिकी व्हिसा मिळवायचा असेल, तर आतापासूनच जुळवाजुळव करावी लागेल!

***

का होतात ही ग्रहणं आणि त्यांची वैशिष्ट्य काय हे आता पाहू. चंद्राची पृथ्वीभोवती फिरण्याची कक्षा पृथ्वीच्या सूर्याभोवती फिरण्याच्या कक्षेशी सुमारे पाच अंशाचा कोन करते. म्हणजे ती थोडी तिरपी आहे. जर या दोन्ही कक्षांची प्रतलं आहेत असं मानलं, तर चंद्राचं कक्षाप्रतल पृथ्वीच्या कक्षाप्रतलाला दोन ठिकाणी छेदतं. या दोन छेदनबिंदूंनाच ‘राहू’  आणि ‘केतू’ असं म्हणतात.

राहू-केतू हे ग्रह नाहीत आणि कुणी अशुभ राक्षसही नाहीत. ते आकाशातले सतत जागा बदलणारे बिंदू आहेत. प्रत्यक्ष त्या जागी काहीही नसतं. चंद्राच्या कलण्यामुळं वर जाणाऱ्या म्हणजे दक्षिणेकडून उत्तरेकडं जाणाऱ्या चंद्राच्या मार्गावरच्या छेदनबिंदूला ‘राहू’, तर उत्तरेकडून दक्षिणेकडं जाणाऱ्या मार्गावरच्या छेदनबिंदूला ‘केतू’ असं म्हणतात. या दोन बिंदूंपाशी जेव्हा (बिंदूच्या दोन्ही बाजूंना १७ अंशांच्या आत) चंद्र असतो, तेव्हा ग्रहणं होतात. जेव्हा तो पृथ्वी आणि सूर्य यांच्यामधे असतो, तेव्हा सूर्यग्रहण, तर जेव्हा तो आणि सूर्य यांच्यामध्ये पृथ्वी असते तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्यानं चंद्रग्रहण होत असतं.

सूर्यग्रहण नेहमी अमावास्येला, तर चंद्रग्रहण नेहमी पौर्णिमेलाच होतं, हे वेगळं सांगायला नको. सूर्याभोवती फिरताना सगळे ग्रह जसे पश्‍चिमेकडून पूर्वेकडं फिरत असतात, तसाच चंद्रही पृथ्वीभोवती फिरताना पूर्वेकडंच फिरतो. सुमारे २७ दिवसांत त्याची पृथ्वीभोवती एक फेरी होते. त्यामुळं एका दिवसात आपल्या आकाशात तो सुमारे  १३ अंश प्रवास करतो. पृथ्वी ३६५ दिवसांत, एका वर्षभरात सूर्याभोवती एक फेरी मारत असल्यानं आपल्याला एका दिवसात सूर्य आकाशात एक अंशानं पुढं जाताना भासतो.

या प्रकारामुळं चंद्र प्रत्येक अमावास्येला सूर्याला पश्‍चिमेकडून पूर्वेकडं ओलांडून जातो; पण कक्षेतल्या पाच अंशांच्या तिरपेपणामुळं प्रत्येक अमावास्येला सूर्यग्रहण काही होत नाही, तसंच पृथ्वी काय आणि चंद्र काय दोघंही फिरताना काही वर्तुळाकार मार्गानं फिरत नाहीत. ते लंबवर्तुळाकार फिरतात. त्यामुळं ते आपापल्या कक्षाकेंद्रात असणाऱ्या वस्तूपासून, (म्हणजे पृथ्वी हा सूर्यापासून, तर चंद्र हा पृथ्वीपासून) कधी जवळ, तर कधी लांब असतात. पृथ्वीचं सूर्यापासूनचं अंतर कधी १४.७ कोटी किलोमीटर, तर कधी १५.२ कोटी किलोमीटर असतं. या फरकामुळं (सुमारे ५० लाख किलोमीटरचा फरक) सूर्याचं दृश्‍यबिंब (एकूण दिसणारा गोलाकार) कमी-अधिक होत असतं. या वर्षी चार जानेवारीला सूर्य पृथ्वीच्या सगळ्यात जवळ होता, तर तीन जुलैला तो पृथ्वीपासून सगळ्यात दूरवर असणार आहे. या तारखा दर वर्षीही साधारणतः तीन/चार जानेवारी अथवा तीन/चार जुलै अशाच राहतात. यांना पृथ्वीची ‘उपसूर्य-स्थिती’ आणि ‘अपसूर्य-स्थिती’ असं म्हणतात.

हीच बाब चंद्रापासूनच्या पृथ्वीच्या अंतराचीही होत असते; पण ते दर महिन्यात दोनदा होत असतं, त्याच्या वेळा आणि तारखांचं एक मोठं कोष्टकच करावं लागेल. ते काही इथं आत्ता देत नाही. चंद्राच्या पृथ्वीजवळच्या स्थितीला ‘उपभू-स्थिती’ आणि ‘अपभू-स्थिती’ असं म्हणतात. त्यामुळं चंद्राचाही आकाशात दिसणारा रोजचा आकार (कला नव्हे; एकूण गोलाकार) नेहमीच बदलता असतो.

अर्थात या बिंबाच्या आकारबदलाच्या दोघांच्याही गोष्टी आपल्याला नुसत्या डोळ्यांनी समजून येत नाहीत; पण हीच बाब सूर्यग्रहणाच्या वेळी मात्र ते खग्रास दिसणार की कंकणाकृती हे निश्‍चित करते!

चंद्र-पृथ्वीच्या बदलत्या अंतरामुळं कधी कधी, तर चंद्राच्या सावलीच्या एकाच मार्गावर काही ठिकाणाहून खग्रास, तर काही ठिकाणाहून कंकणाकृती सूर्यग्रहण दिसतं. यांना ‘संयुक्त (हायब्रीड) ग्रहण’ असं म्हटलं जातं. एका वर्षात किती सूर्यग्रहणं होणार हे अशा सगळ्या गोष्टींवर ठरतं. एकविसाव्या शतकात एकूण२२४ सूर्यग्रहणं होणार आहेत. त्यातली ७७ खंडग्रास, ७२ कंकणाकृती, ६८ खग्रास आणि सात संयुक्त असणार आहेत. यातली दोन कंकणाकृती आणि एक खग्रास ही ग्रहणं ‘केंद्रच्युती’ असणारी आहेत, म्हणजे या पारिभाषिक शब्दाचा अर्थ असा, की जरी सावलीचा काही भाग पृथ्वीच्या पृष्ठभागावर पडणार असला, तरी सूर्य, चंद्र आणि पृथ्वी बरोबर सरळ रेषेत येण्याची जी स्थिती असते - जिला ग्रहणाचा केंद्रबिंदू म्हटलं जातं - तो मात्र थोड्याशा फरकानं पृथ्वीच्या पृष्ठभागाला वंचित राहणार आहे. (चंद्राच्या छायेचा अक्ष पृथ्वीवर तिच्या केंद्रापासून त्रिज्येच्या ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त अंतरावर असल्यास असं होतं).

या शतकात एका वर्षात सर्वाधिक चार सूर्यग्रहणं पाहायला मिळणार आहेत. ती २०११ मध्ये दिसली होती आणि आता २०२९, २०४७, २०६५, २०७६ आणि २०९४ या वर्षी होणार आहेत. आतापर्यंत सर्वाधिक कालावधीचं म्हणजे सगळ्यात अधिक काळ खग्रास स्थितीत दिसणारं सूर्यग्रहण २००९ मधलं २२ जुलै रोजी झालेलं ग्रहण होते. ते भारतातून सुरत, बडोदा, नंदुरबार, शहादा ते वर वाराणसी, पाटणा, जलपैगुडी, भूतानमधला काही प्रदेश आणि नंतर चीनपर्यंत दिसलं होतं. हेही ग्रहण मी पाहिलं आहे. जरी भारतातून सुमारे साडेतीन मिनिटं खग्रास स्थिती पाहता आली होती, तरी याचा केंद्रबिंदू पॅसिफिक महासागरात होता, जिथून सगळ्यात जास्त म्हणजे, सहा मिनिटं ३९ सेकंदाची खग्रास स्थिती होती! सूर्यग्रहणात सगळ्यात कमाल खग्रास स्थिती १२ मिनिटं २९ सेकंद एवढी असू शकते. ग्रहणाच्या बाबतीत आपण नेहमी ‘ग्रहणाचे वेध लागले’, ‘प्रथम स्पर्श’, ‘ग्रहण सुटलं’, ‘मोक्ष’ असे काही शब्द ऐकतो; पण म्हणजे नक्की काय होत असतं, ते कित्येकदा समजून येत नसतं.

यासाठी एक छोटा प्रयोग घरच्या घरी करून पाहता येईल. त्यासाठी एक छोटी विजेरी आणि छोटा चेंडू आपल्याला लागेल. विजेरी म्हणजे सूर्य आणि चेंडू म्हणजे चंद्र. विजेरीचा प्रकाश एका भिंतीवर पाडा. विजेरी जागची न हलवता आपल्याला विजेरीसमोरून एका बाजूनं दुसऱ्या बाजूला चेंडू सरकवत न्यायचा आहे. भिंतीपासून विजेरी तीन-चार फुटांवर, तर चेंडू त्यांच्यामध्ये निम्म्या अंतरावरून हलवायचा आहे. अशा प्रकारे चेंडू नेल्यास त्याची सावली भिंतीवर कशी पडते ते पाहा. चेंडूची नेहमीच मध्यभागी गडद आणि त्याच्या आजूबाजूला मोठ्या वर्तुळाकार आकारात थोडी फिकट राखाडी सावली पडते. चेंडू एखाद्या काडीवर चिकटवून किंवा दोऱ्यानं टांगून घेतल्यास चेंडूसोबत हाताची सावली मध्ये त्रास देणार नाही. यातल्या गडद सावलीला ‘प्रच्छाया’, तर फिकट सावलीला ‘उपच्छाया’ म्हणतात. 

चंद्राचीही पृथ्वीवर अशीच छाया पडते; पण आपणही पृथ्वीवरूनच चंद्राकडं पाहत असल्यानं या छायांमधला फरक आपल्याला कळत नाही. आता विजेरी तुम्ही तुमच्या स्वत:कडं रोखा. विजेरीसमोरून चेंडू नेताना त्यानं विजेरी पूर्ण झाकेल इतक्‍या अंतरावर ती हवी. पाहा, चेंडू विजेरीवरून जाताना मधे आल्यानं जेव्हा तो थोडासाच आड येतो, तेव्हा विजेरीचं वर्तुळ दिसणं बंद होतं, ती कोरीसारखी दिसू लागते. अशा वेळी आपल्यावर फिकट छाया पडलेली असते. हेच खंडग्रास ग्रहणात होतं; पण जेव्हा विजेरीचा संपूर्ण प्रकाशित भाग चेंडूनं झाकला जातो, तेव्हा मात्र आपल्यावर गडद छाया पडलेली असते. हे खग्रास सूर्यग्रहणासारखं, तर विजेरीच्या आकारापेक्षा चेंडू आपल्यापासून लांब धरल्यानं लहान दिसताना, संपूर्ण चेंडू जरी विजेरीवर आला तरी सगळ्याच बाजूंनी विजेरी जशी दिसत राहील, तसं होते कंकणाकृती ग्रहणात. यात पाहा, विजेरीच्या वर्तुळाला जेव्हा चेंडू पहिल्यांदा झाकायला लागतो, त्याला ‘प्रथम स्पर्श’, चेंडूनं विजेरी पूर्ण झाकल्यावर ‘द्वितीय स्पर्श’, चेंडूनं विजेरीची पहिली कडा सोडली आणि तो आत यायला लागला की ‘तृतीय स्पर्श’ आणि चेंडूची थोडीशीही कडा विजेरीवरून दिसेनाशी झाली की त्याला ‘चतुर्थ स्पर्श’ किंवा ‘ग्रहणाचा मोक्ष’ असं म्हणतात. त्यामुळं संपूर्ण ग्रहणकाळ हा खग्रास स्थितीहून बराच मोठा असतो. हे असे चार स्पर्शबिंदू सूर्यग्रहणात निरीक्षणासाठी वेळ सांभाळण्यासही उपयोगी पडतात. कारण सूर्याचा थोडासाही भाग जर दिसत असेल तर आपल्याला विजेरीकडं जसं पाहता येतं, तसं तिथं सूर्याकडं पाहता येत नाही.

नुसत्या उघड्या डोळ्यांनी सूर्याकडं अजिबात पाहता कामा नये. कायमचा अंधपणा येण्याची शक्‍यता असते. आपण भिंगानं सूर्याची छोटी प्रतिमा घेऊन कागद, कापूस जाळायचे खेळ केलेले आठवा. आपल्या डोळ्यांतही भिंग असतं आणि सूर्याकडं पाहताना अर्थातच डोळ्यातल्या मागच्या पडद्यावर सूर्याची प्रतिमाच तयार होत असते. सूर्याच्या या प्रतिमेमुळं पडद्याचा तो भाग जळून जाईल! डोळ्यांतल्या पडद्याच्या पेशी एकदा जळून मेल्या की त्या जागी नव्या पेशी तयार होत नाहीत! त्यामुळं ग्रहण पाहताना खास ग्रहणासाठी बनवलेले चश्‍मे वापरले पाहिजेत; पण गंमत म्हणजे जेव्हा खग्रास स्थिती येते, म्हणजे चंद्र जेव्हा सूर्याला पूर्णपणे झाकतो, तेव्हा मात्र ती स्थिती, ते ग्रहणचश्‍मे काढून, उघड्या डोळ्यांनीच पाहायची असते.

फारच बहारदार असते ही स्थिती. सूर्य दिसत नसतो; पण सूर्याचं वातावरण - जे आपल्याला एरवी कधी दिसत नसतं ते - (याला ‘सूर्यकिरीट’ असं म्हणतात) या वेळी दिसते. सर्वत्र अंधकार पसरलेला असतो. सूर्याच्या जवळच असणारे तारे, ग्रहही त्या वेळी या अंधारलेल्या आकाशात दिसायला लागतात! असे दिवसा तारे दिसण्याचे प्रसंग नेहमी मात्र येत नाहीत. मला मात्र हे पाहायची संधी बऱ्याच वेळा मिळाली आहे, असो.

२१ ऑगस्टला होणाऱ्या ग्रहणात अमेरिकेत जास्तीत जास्त दोन मिनिटं ४१.६ सेकंदांपर्यंत खग्रास स्थिती दिसणार आहे. या कालावधीत जर दुर्बिणीनं थोडी वर्धित केलेली प्रतिमा पाहिली तर सूर्यकिरिटासोबतच सूर्यावर होणारे उद्रेक, सौरज्वालाही पाहायला मिळण्याची शक्‍यता असते. ही संधी आम्हाला  १९९५ मध्ये २४ ऑक्‍टोबरला झालेल्या खग्रास सूर्यग्रहणात मिळाली होती. हे सूर्यग्रहण आम्ही उत्तर प्रदेशातल्या लखनौजवळच्या हमीरपूरहून पाहिलं होतं. २१ ऑगस्टचं ग्रहण हे सूर्यग्रहणांच्या ‘सारोस’ लिकेतल्या १४५ क्रमांकाच्या शृंखलेतल्या एकूण ७७ ग्रहणांपैकी २२ वं ग्रहण असणार आहे. या शृंखलेतलं पहिलं ग्रहण चार जानेवारी १६३९ ला झालं होतं, तर शृंखलेतलं शेवटचं ग्रहण  १७ एप्रिल ३००९ ला होईल. या शृंखलेत एकूण ४१ खग्रास,  एक कंकणाकृती आणि एक संयुक्त ग्रहण असणार आहे, तर बाकीची सगळी ३४ ग्रहणं फक्त खंडग्रास होणार आहेत. सारोस मालिकेतली ग्रहणं दर १८ वर्षं ११ दिवसांनी होतात. फक्त प्रत्येक ग्रहणानंतरचं पुढचं ग्रहण सुमारे १२० अंशांनी पश्‍चिमेकडच्या भागावर दिसतं. या १४५ क्रमांकाच्या शृंखलेतली ग्रहणं ‘राहू’ बिंदूशी होतात आणि त्यांचे मार्ग अधिकाधिक दक्षिणेकडं होत जातात. एकाच प्रकारच्या ग्रहणांची जी पुनरावृत्ती होते, त्यांना विविध क्रमांकाच्या शृंखला किंवा कधी कधी ‘ग्रहणांचं कुटुंब’ म्हणूनही ओळखलं जातं.

एकूणच ग्रहणांचं गणित काय आहे, हे पाहणं फार मजेशीर असतं. अर्थात ते थोडं गणिताशी आणि खगोलीय भूमितीशीही निगडित आहे. चंद्र-सूर्याचे आकाशातले भ्रमणकाल आणि त्या मार्गावरचे त्यांचे छेदनबिंदू याचं ते गणित आहे. या ग्रहणांच्या कुटुंबांविषयी पुन्हा कधीतरी पाहू या. आता मात्र अमेरिकेला २१ ऑगस्टचं सूर्यग्रहण पाहायला जाण्यासाठी काय आणि कशी तयारी करायची, ते पाहणं महत्त्वाचं. अधिक माहितीसाठी आणि

आयोजक संस्था आणि निरीक्षणस्थळांसाठी : 
http://www.space.com/३३७९७-total- solar-eclipse-२०१७-guide.html 
आणि https://eclipse२०१७.nasa.gov पाहा.

'सप्तरंग'मधील लेख वाचण्यासाठी क्लिक करण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal astronomy total solar eclipse Anand Ghaisas