पावसाळ्यातल्या आणखी धम्माली

राजीव तांबे
सोमवार, 10 जुलै 2017

पालवीनं सगळ्यांना आपला फोटो दाखवला. ती म्हणाली : ‘‘हा फोटो बघून मला गंमत वाटली, की या सर्व छत्र्यांत एक पण काळी छत्री का नाही? म्हणजे या सर्व छत्र्या घेऊन जाणाऱ्या फक्त बायका आणि मुलीच आहेत का? आणि समजा या बायका आणि मुली असतील, तर त्या कुठे आणि का चालल्या आहेत? मी याबद्दलच खूप विचार केला; पण मला उत्तर मिळेना. मग मी थोड्या वेगळ्या प्रकारे विचार करू लागले. म्हणजे ज्याप्रमाणं बसमध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात, प्रत्येक ट्रेनमध्ये डबा स्त्रियांसाठी राखीव असतो, तसंच बहुधा हा रस्ता स्त्रियांसाठी राखीव तर नसेल?’’ 

आज पहाटे पाऊस पडला होता; पण नंतर मात्र पावसानं जरा विश्रांती घेतली होती. मागच्या रविवारी सगळे पालवीकडं जमले होते. यावेळी सगळे नेहाकडं जमले. मागच्या वेळी अन्वय, पालवी, नेहा आणि शंतनू यांना त्यांच्या फोटोंबद्दल बोलण्याची संधीच मिळाली नव्हती. त्यामुळं आज हे चौघं बोलण्यासाठी अगदी टपून बसले होते.

‘पावसाळा’ या विषयावरचे वर्तमानपत्रात आलेले सहा फोटो पालवीच्या बाबांनी जमवले होते. प्रत्येक मुलानं मिळालेला फोटो काळजीपूर्वक पाहायचा. तो फोटो पाहिल्यानंतर त्याच्या मनात काय विचार येतात, त्याला काय वाटतं, किंवा त्याला काय सुचवावंसं वाटतं याविषयी त्यानं फक्त बारा मिनिटांच्या वेळेचा वापर करून पाच ओळी लिहायच्या किंवा पाच मिनिटं बोलायचं, असा तो खेळ आहे.

नेहा पटकन हात वर करत म्हणाली : ‘‘मी फर्स्ट. मी वाचते.’’

नेहानं आपला फोटो दाखवला. ‘रस्त्यावर पाणी तुंबलं आहे. वाहनं अडकली आहेत. मुलं पावसात भिजत पाण्यात मस्ती करत आहेत. मोठी माणसं दुकानाच्या वळचणीला उभी आहेत,’ असा तो फोटो होता.

‘‘हे चित्र मी अनेक वेळा पाहिलं आहे आणि तेही निरनिराळ्या ठिकाणांहून. पाण्यात अडकलेल्या बसमध्ये बसून, बाबांबरोबर दुकानाच्या वळचणीला उभं राहून, आमच्या घराच्या खिडकीतून असं अनेकदा; पण मी हे चित्र कधी स्वत: पावसात भिजत तर पाहिलं नाहीच; पण रस्त्यावर तुंबलेल्या पाण्यात मस्ती करत तर नाहीच नाही. हे चित्र किंवा हा फोटो पाहताना मला तरी असं वाटतंय, की ही जी मुलं ‘पाणमस्ती’ करत आहेत, तुंबलेल्या पाण्यात मनमुराद दंगा करत आहेत, गाडीवर चढून पाण्यात उड्या ठोकत आहेत, अशा या भाग्यवान मुलांचे पालक किंवा कुणी नातेवाईक त्या समोरच्या दुकानातल्या वळचणीला नक्कीच उभे नाहीत. कारण आपल्या मुलांनी केलेल्या अशा गोष्टी मोठ्या माणसांना अजिबात बघवत नाहीत; पण इतर मुलांचा दंगा मात्र ते कपाळाला आठ्या न घालता पाहत असतात. तुम्ही हा फोटो नीट पाहिलात, तर तुम्हाला एकाही मोठ्या माणसाच्या कपाळाला आठी दिसणार नाही. 

हा फोटो पाहून मला दोन वेगळेच फोटो दिसू लागले..’’

‘‘आँ..? ते कोणते?’’

‘‘पहिल्या फोटोत तीच माणसं तशीच वळचणीला उभी आहेत; पण फोटोतली ती पाणमस्ती आणि तुंबलेल्या पाण्यात दंगा करणारी मुलं मात्र त्या माणसांचीच आहेत. तर मग त्या माणसांचे चेहरे कसे दिसतील? त्यांचे हातवारे कसे असतील? ते काय-काय ओरडत असतील? आणि मुलांना कसा-कसा दम देत असतील? हे नुसतं मला दिसत नाहीये, तर ऐकू पण येतंय.’’

‘‘व्वा व्वा! आणि दुसरा फोटो कुठला?’’

‘‘या दुसऱ्या फोटोत वळचणीला लहान मुलं उभी आहेत आणि त्यांचे पालक पाणमस्ती करत आहेत आणि तुंबलेल्या पाण्यात दंगा करत आहेत. यावेळी त्यांची मुलं कपाळाला आठ्या न घालता आपापल्या पालकांना चिअर-अप करत असणार. दंगा करण्याच्या नवीन आयडीया शिकवत असणार. असंच वाटतंय मला.’’

‘‘ऊऊ. ऑऑ. ॲॲ. पॉपॉ. हा फोटो एकदम सही! एकदम खतरूड! अस्संच व्हायला पाहिजे, म्हणजे ओके बोके पक्के, काम शंभर टक्के,’’ सगळ्यांनी एकच कालवा केला.

बाबा हसतच म्हणाले : ‘‘अगदी खरंय तुझं. मलासुद्धा पाण्यात दंगा करायला आवडेल; पण मुलं वळचणीला उभी असताना नव्हे..’’

‘‘मग कधी? मग कधी?’’ सगळेच ओरडले.

‘‘अरे, असं काय करताय? मला पाण्यात दंगा करायला आवडेल पण.. तुमच्याबरोबर.. समझे?’’

हे ऐकताच मुलं ठसक्‍यात ठुसठुसून हसली.

शंतनू हात वर करत म्हणाला : ‘‘आता मी. मी म्हणजे मीच वाचणार. कारण मागच्या रविवारपासून मी थांबलो आहे.’’  शंतनूनं आपला फोटो सगळ्यांना दाखवला. भरून आलेलं आणि जणू ढगांमुळं ओथंबलेलं आभाळ. काळसर आणि काळ्याकुट्ट ढगाळ आकाशात चकाकणारी वीज. धूसर वातावरण. रस्त्याच्या कडेला चहावाल्याकडं झालेली गर्दी. 

शंतनू बोलू लागला : ‘‘मला माझ्या आवडीचाच फोटो मिळाला आहे. अशा ढगाळ पावसाळी वातावरणात मला निखाऱ्यावर भाजलेली मक्‍याची कणसं आणि त्याला लिंबू आणि शेंदेलोण-पादेलोण लावून खायला आवडतात. काही वेळा ही कणसं न सोलता भाजली, तर त्या पानातल्या पाण्यावर आतले दाणे हलकेच शिजतात आणि त्याची चव भन्नाटच लागते. अशा वेळी गवती चहा आणि आलं घातलेला चहा प्यायलाही मला आवडतो; पण अशा वातावरणात खूप वेळ वाट पाहण्याचा फार म्हणजे फारच कंटाळा येतो. काही वेळा वाट पाहून-पाहून जीव घुसमटून जातो..’’

‘‘अरे ए.. कुणाची वाट पाहतोस तू? कुणाची एवढी वाट पाहतोस?’’

‘‘कमालच आहे तुमची! तुम्ही म्हणजे अगदीच अळणी थालीपीठं आहात. अरे अशा या ढगाळ कुंद वातावरणात, विजांच्या लखलखाटात कुणाची बरं वाट पाहणार? सांगा पाहू..?’’

‘‘अरे ए.. आमचाच प्रश्न आम्हाला काय विचारतोस? तू म्हणजे झेरॉक्‍स मशीनच आहेस यार. सांग काय ते लवकर.’’

‘‘मी पावसाची वाट पाहत असतो. पावसात मस्त भिजण्यासाठी जीव व्याकूळ झालेला असतो; पण तरीही.. खरं सांगतो, विजांचा लखलखाट सुरू झाला, की थोडी भीती वाटतेच. घरात बसून खिडकीतून चकाकणाऱ्या विजा पाहायला मला खूप आवडतात; पण रस्त्यावर उभं राहून तर नाहीच नाही. म्हणून या फोटोमध्ये मी कुठंतरी आहे, असं मला वाटत नाही; पण ‘त्या’ विजा नसत्या ना...तर शिरलो असतो या फोटोत आणि प्यायलो असतो तो वाफाळलेला चहा.’’

पार्थ जोरात टाळ्या वाजवत म्हणाला : ‘‘मी पण. मी पण त्या विजांना अगदी जरासाच घाबरतो; पण जास्तीच भीती वाटली ना...तर मग मी डोळेच बंद करून घेतो.’’

बाबांनी विचारलं : ‘‘आता आपण एक छोटा ब्रेक घ्यायचा का?’’

सगळे काही म्हणायच्या आतच पालवी म्हणाली : ‘‘नाही. आता मी वाचणार आहे. माझा फोटो मस्तच आहे.’’

पालवीनं सगळ्यांना आपला फोटो दाखवला. लहान-मोठ्या रंगबिरंगी छत्र्यांनी रस्ता भरला आहे.

‘‘हा फोटो बघून मला गंमत वाटली, की या सर्व छत्र्यांत एक पण काळी छत्री का नाही? म्हणजे या सर्व छत्र्या घेऊन जाणाऱ्या फक्त स्त्रिया आणि मुलीच आहेत का? आणि समजा या स्त्रिया आणि मुली असतील, तर त्या कुठं आणि का चालल्या आहेत? मी याबद्दलच खूप विचार केला; पण मला उत्तर मिळेना. 

मग मी थोड्या वेगळ्या प्रकारे विचार करू लागले. म्हणजे ज्याप्रमाणं बसमध्ये स्त्रियांसाठी जागा राखीव असतात, प्रत्येक ट्रेनमध्ये गार्डच्या बाजूचा डबा स्त्रियांसाठी राखीव असतो किंवा निवडणुकीत पण स्त्रियांसाठी आरक्षण असतं, तसंच बहुधा हा रस्ता स्त्रियांसाठी राखीव तर नसेल? आणि मग तसं असेल, तर मग या रस्त्याच्या बाजूच्या रस्त्यावर फक्त काळ्या आणि राखाडी छत्र्यांचीच गर्दी दिसेल. म्हणजेच हा मी पाहत असलेला फोटो हा अर्धाच फोटो आहे तर..? असंही वाटलं मला.

...आणि आणखी एक गोष्ट म्हणजे, या सर्व छत्र्यांमधे एकरंगी छत्र्या फारच कमी आहेत. ज्या आहेत त्या गोल नाहीत, तर त्या चौकोनी किंवा काही वेगळ्याच आकाराच्या आहेत; पण सर्वांत महत्त्वाचं म्हणजे एकासारखी एक अशी एकही छत्री नाही. म्हणजेच जेवढ्या रंगबिरंगी वेगवेगळ्या छत्र्या आहेत, तेवढ्याच वेगवेगळ्या मुली आणि स्त्रिया या छत्र्यांच्या खाली लपलेल्या आहेत. प्रत्येक स्त्रीचा स्वभाव वेगळा म्हणून त्यांच्या छत्र्याही वेगळ्या! हो की नाही?’’ पालवी बोलायची थांबली.

‘‘हो हो हो. हॉ हॉ हॉ. हो हो हो. हॉ हॉ हॉ’’ सगळे एका सुरात ओरडले.

‘‘बिलकूल सही.’’

‘‘आमच्या शाळेत तर, मुलांसाठी एक जिना, तर मुलींसाठी दुसरा जिना आहे. वर्गातसुद्धा मुली उजव्या हाताला आणि मुलं डाव्या हातालाच बसतात.’’

‘‘म्हणजे अख्खा फोटो अर्धाच आहे ना?’’ असं पार्थनं विचारताच सगळे ठकाठूक ठोकाठूक हसले.

बाबांनी पालवीला पण शाबासकी दिली.

आता राहिला अन्वय. 
अन्वयनं आपला फोटो सर्वांना दाखवला. हिरवेगार डोंगर. झरे. डोंगरातून कोसळणारे धबधबे आणि इंद्रधनुष्य. 

अन्वय बोलू लागला : ‘‘हा फोटो पाहिल्यानंतर मला काही सुचेचना. हा काहीतरी जादूचा फोटो असावा, असं वाटलं. मी जसजसा बारकाईने हा फोटो पाहू लागलो, तसतसा मी या फोटोत आत जातोय, असं मला वाटू लागलं. म्हणजे क्षणभर मला वाटे : ‘मी त्या डोंगरावर उभा आहे. त्या हिरव्यागार जंगलातून फिरतोय. ओल्या मातीतून चालतोय. मध्येच त्या झऱ्यात डुंबतोय. झऱ्याची झुळझुळ आणि खुळखुळ ऐकतोय. ते थंडगार पाणी घटघटा पितोय. धबधब्याच्या जवळ उभं राहून इंद्रधनुष्य पाहतोय.’

थोड्या वेळानं हे काँबिनेशन बदलायचं. म्हणजे मी धबधब्यात भिजतोय. एक गार शिरशिरीत लहर अंगातून जातेय. सोसाट्याचा वारा सुटलाय आणि झाडं गदागदा हलत आहेत. तर काही वेळानं मी भानावर यायचो. हा फोटो पाहताना ‘ते आधीचं’ आठवून मजा वाटायची. मी विचार करू लागलो, आपलं असं का होत असेल? किंबहुना गेले चार दिवस मी हाच विचार करत होतो; पण अचानक हे कोडं सुटलं..’’

‘‘कसं काय कोडं सुटलं?’’

‘‘मला असं वाटलं, प्रत्येक माणसाच्या मनात, स्वप्नात अशा काही जागा असतात, त्या तो डोळे बंद करूनसुद्धा पाहू शकतो. मात्र, डोळे उघडे ठेवून तो त्याचा शोध घेत असतो. हा फोटो म्हणजे माझ्या स्वप्नातली जागा असावी.. जी मी शोधतो आहे. म्हणून तर मी त्या डोंगरावर भटकून आलो. झऱ्यात भिजून आलो. धबधब्यात न्हातान्हाता डोळ्यांत इंद्रधनुष्य साठवून आलो. खरंच खूप वेगळाच अनुभव दिला मला या माझ्या ‘ड्रीमफोटो’नं.’’

बाबा भलतेच खूश होत म्हणाले : ‘‘कमाल आहे! मला वाटतं, जेव्हा आपण स्वप्नांच्या खूप जवळ जातो तेव्हा असा अनुभव येत असावा. आता प्रत्येकानं आपापली ‘ड्रीमप्लेस’ पाहायचा ध्यास घ्यायला हवा. खरं म्हणजे त्या फोटोचं अत्यंत बारकाईने निरीक्षण करताना तू त्यात इतका गुंतलास, की ‘आपणच तिथं आहोत’ असा आभास तुझ्यासाठी निर्माण झाला.’’

आई म्हणाली : ‘‘सहा फोटो पाहून सहा मुलं काय कमाल करू शकतात हे केवळ अवर्णनीयच आहे. फोटो जमा करताना या फोटोत इतक्‍या धम्माल भन्नाट गोष्टी लपल्या असतील, याची आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती...’’

इतक्‍यात मुलं ओरडली : ‘‘बापरे.. तीन तास झाले. आमच्या क्‍लासची वेळ झाली हो..’’

...आणि एका क्षणात ती मुलं फुलपाखरासारखी भुर्रकन्‌ उडून गेली. हा रविवार बिनखाऊचा म्हणजे ‘उपवासाचा रविवार’ झाला.

पालकांसाठी गृहपाठ : 

  • हा खेळ खेळण्यासाठी फोटोचीच आवश्‍यकता आहे, असं काही नाही.
  • फोटोच्या ऐवजी मुलांना त्यांच्या आवडीचं ‘कल्पनादृश्‍य’ वापरायला सांगा.
  • मुलांना लगेच बोलणं सुचत नसेल, तर मुलांना वेळ वाढवून द्या. यासाठी धीर धरा; पण कृपया मुलांना बोलण्याची घाई आणि सक्ती करू नका.
  • काही मुलं एखादवेळेस बोलणारच नाहीत, तर तेही समजून घ्या. कारण प्रत्येक मुलाची व्यक्त होण्याची पद्धत वेगळी असते.
  • मुलं सर्जनशील होण्यासाठी मुलांना चुका करण्याची मोकळीक द्या.
  • ‘रोज नवीन चुका करा; पण एक चूक एकदाच करा.’ ही चिनी म्हण सदैव लक्षात ठेवा.

    'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Rajiv Tambe