चम्मतग (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 16 जुलै 2017

डोकं खाजवत शंतनू म्हणाला : ‘‘चष्मा कसा घालावा, याचं मी उत्तर देऊ शकेन असं वाटतंय मला. कारण, मागं मी एकदा जत्रेला गेलो होतो, तेव्हा मला ही चम्मतग अचानकच कळली होती. जत्रेत मी एक रंगीत चष्मा घेतला होता. मी एका हातानं आइस्क्रीम खात दुसऱ्या हातानं चष्मा घालू लागलो, तेव्हा बाबा मला खूप जोरात ओरडले होते. : ‘अरे शंभ्या... दोन्ही हातांनी चष्मा घाल.’

आज सगळे अन्वयच्या घरी जमणार होते; पण अन्वयच्या बाबांनी काही वेगळाच प्लॅन तयार केला होता. बाबा घराखालीच उभे होते. थोड्याच वेळात शंतनू, नेहा, पालवी, पार्थ आणि वेदांगी असे सगळेजण आले.

बाबांकडं पाहत म्हणाले : ‘‘हे काय? घरी नाही का जायचं?’’

‘‘आज आपण या भागाला छोटीशी प्रदक्षिणा घालणार आहोत. चालता चालता तुम्ही न बोलता अनेक गोष्टी पाहायच्या आहेत. नंतर त्यातल्याच आपण काही निवडणार आहोत. मग त्यांचं पुढं काय करायचं, हे मी तुम्हाला नंतर सांगेन.’’

‘‘ पण...पण मी तर खूप गोष्टी पाहीन. अं...अं... १००० गोष्टी पाहीन. म...म...तुम्हाला त्यातल्या किती सांगायच्या?’’

हे ऐकल्यावर बाबा म्हणाले : ‘‘अगदी चांगला प्रश्न विचारलास पार्थ. खरंय तुझं. तुम्ही १००० कशाला तर १०००० गोष्टी पाहणार आहात. फक्त त्या कोणत्या पाहणार आहात, ते जसं तुम्हाला माहीत नाही, तसंच ते मलाही माहीत नाही...’’

‘‘म्हणजे...?’’

‘‘मला माझ्या बोलण्यात थोडी सुधारणा करू दे. आपण सगळे मिळून काही गोष्टी बघणार आहोत, एकमेकांना दाखवणार आहोत. ओके?’’
आता मात्र सगळ्यांनी ‘‘हो..हो...’’ करत माना हलवल्या; पण खरंतर कुणालाच काही नीटसं कळलं नव्हतं.

सगळे निघाले प्रदक्षिणेला.

पार्थला चष्म्याचं दुकान दिसलं. त्यानं सगळ्यांना दाखवलं. शोकेसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चष्मे ठेवलेले होते. ते पाहता  पाहता पार्थला एक नवीनच गोष्ट कळली. तिथं एकूण तीन प्रकारचे चष्मे होते. पूर्ण फ्रेममध्ये काच बसवलेला चष्मा. अर्धीच फ्रेम; पण काचा मात्र खालून मोकळ्याच असणारा चष्मा. चारही बाजूंनी मोकळा असणारा रिमलेस चष्मा.

वारी पुढं निघाली. बाजूच्या इमारतीमध्ये एक माणूस चार पायांच्या शिडीवर चढून काहीतरी विजेचं काम करत होता आणि त्याच्या मदतीला दोन माणसं खाली उभी होती. नेहाना हे दृश्‍य सगळ्यांना दाखवलं.

समोरच्या दुकानात बसलेले आजोबा हातात भिंग घेऊन पेपर वाचत होते. हे पाहताच वेदांगीनं सगळ्यांचं लक्ष तिकडं वेधलं.

रस्त्यावरच्या एका गाड्यावर काही माणसं वडापाव आणि कांदाभजी खात होती. शंतनूचं लक्ष बरोब्बर तिथंच गेलं! जिभल्या चाटत आणि पोटावर हात फिरवत तो बाबांना म्हणाला : ‘‘पाहा...पाहा ती भाग्यवान माणसं.’’

हे ऐकताच सगळे फसफसून हसले. 

आता पालवी आणि अन्वय जोरात शोधाशोध करत होते. 

पण आता प्रदक्षिणा संपली होती. 

पालवी आणि अन्वयला पटकन कुठलीच गोष्ट नीट सापडली नव्हती. दोघांना थोपटत बाबा म्हणाले : ‘‘अरे, तुमच्यासाठी दोन इंटरेस्टिंग गोष्टी मी घरी ठेवल्या आहेत.’’

आणि हा सगळा मोर्चा अन्वयच्या घरी परतला.

आता सगळ्यांनाच उत्सुकता होती...की आता काय करायचं?

पण बाबा तर काही बोलेचनात.

इतक्‍यात आई मुलांसाठी खाऊ घेऊन आली.

खाऊ खाता खाता पार्थनं विचारलं : ‘‘अं...म्हणजे मी ते चष्म्याचं दुकान पाहिलं. ते वेगळे चष्मे पण तुम्हाला दाखवले. म...आता मी काय करायचं? मी ते सगळे चष्मे घालून पुन्हा एकदा प्रदक्षिणा खालायची का?’’

खाता खाता सगळेच खुसखुसून हसले.

बाबा म्हणाले : ‘‘चला, आता आपण पार्थपासूनच सुरवात करू या...’’

‘‘म्हणजे? प्र..द..क्षि..णा..?’’

‘‘अरे पार्था, माझं बोलण तर पुरं होऊ दे. आजचा आपला खेळ थोडा वेगळा आहे. तुम्ही जे जे पाहिलं आहे, त्या त्या प्रत्येक बाबीविषयी मी सहा प्रश्न तुम्हाला विचारणार आहे आणि त्यांची उत्तरं तुम्ही सगळ्यांनी मिळूनच द्यायची आहेत. आता तुम्ही तीन प्रकारचे चष्मे पाहिले. मला सांगा, या चष्म्यांची नीट काळजी घेण्यासाठी नेमकं काय काय केलं पाहिजे? उदाहरणार्थ : 

१) चष्मा टेबलावर ठेवताना कसा ठेवावा?
२) टेबलावर ठेवलेला चष्मा कसा उचलावा?
३) चष्मा कसा घालावा?
४) घातलेला चष्मा कसा काढावा?
५) चष्मा कसा पुसावा?
६) रात्री झोपताना चष्मा चष्म्याच्या पेटीत कसा ठेवावा?’’

‘‘...हे तर अगदीच सोपे प्रश्न आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर मी एकटीच देऊ शकेन. खरंच,’’ असं नेहानं म्हणताच बाबांनी तिला थांबण्याची खूण केली.बाबा सगळ्यांनाच समजावत म्हणाले : ‘‘थांबा. उत्तर देण्याची घाई करू नका. या सगळ्या प्रश्‍नांच्या मागं एक सूत्र दडलेलं आहे...’’

‘‘सूत्र म्हणजे...?’’

पार्थला जवळ घेत बाबा सांगू लागले : ‘‘जे थेट सांगत नाही तर सुचवतं ते सूत्र. ते सूत्र असं आहे, की ‘प्रत्येक डिझाईन म्हणजे एक तर्कशुद्ध मांडणी असते, जी विज्ञानाच्या भक्कम पायावर उभी आहे.’ आता आपण काही गोष्टी पाहिल्या, तर काही घटना पाहिल्या. घटनेचा विचार करताना, त्यांमधल्या विज्ञानाचा पाया जर निसटला तर काय गोंधळ होऊ शकतो, हेही आपण समजून घेणार आहोत. मला माहीत आहे, आता हे ऐकून तुम्हाला फारसं काही कळलं नसणार. कारण, वेगळा विचार करण्याच्या आणि मांडण्याच्या अनोख्या पद्धतीची आपण ओळख करून घेत आहोत. म्हणून जरा धीर धरा. उत्तर सांगताना तुमचा तर्कशुद्ध विचार हा विज्ञानाच्या पायावर उभा आहे ना, इतकचं तपासून पाहा. म्हणजे तुम्हाला त्या डिझाइनमागची किंवा घटनेमागची खरी ‘चम्मतग’ समजली, असं म्हणता येईल...’’

हात वर करत नेहा म्हणाली : ‘‘मला कळली. चष्मा टेबलावर ठेवताना सुलटा ठेवावा. हो की नाही?’’

हे ऐकताच सगळ्या मुलांनी माना डोलावल्या. आता मुलं उत्सुकतेनं बाबांकडं पाहू लागली.

बाबा म्हणाले : ‘‘उत्तर बरोबर आहे; पण मी त्यात आपल्या चम्मतग सूत्रानुसार थोडी सुधारणा करतो. चष्मा टेबलावर सुलटा ठेवल्यानं चष्म्याच्या काचांना इजा पोचत नाही, त्या स्वच्छ राहतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे, चष्मा सुलटा ठेवला असता समजा चुकून थोडासा दाब चष्म्यावर वरून पडला तरी त्याच्या काचा तुटत किंवा फुटत नाहीत. कारण, त्या वेळी चष्म्याच्या काड्या स्प्रिंगप्रमाणे काम करतात; पण असाच दाब चष्मा उलटा ठेवला असताना जर पडला तर काचा लगेच तडकतात आणि फुटतात.’’

हे ऐकताच सगळ्या मुलांचे चेहरे उजळले.

एकमेकांना दोन्ही हातांनी टाळ्या देत मुलं म्हणाली : ‘‘हं...आता लागले डोक्‍यात दिवे. कळले सगळे नवे!’’

हात उंचावत पार्थ म्हणाला : ‘‘आता मी सांगतो...म्हणजे मीच सांगतो. ‘टेबलावर

ठेवलेला चष्मा कसा उचलावा,’ याचं उत्तर आहे हातानं उचलावा. कारण पायानं उचलताना आपण धडपडू ना...?’’

हे ‘धडपडू उत्तर’ ऐकून सगळेच खसाफस आणि ढसाढस हसले. पार्थ मात्र गोंधळला.

पार्थला सांभाळत आणि सगळ्यांकडं पाहत डोळे मोठे करत वेदांगी म्हणाली : ‘‘पार्थ, तुझं बरोबरचं आहे रे. तुझ्या उत्तरातला उरलेला भाग मी सांगते. टेबलावरचा चष्मा उचलताना काचेला आपला स्पर्श होणार नाही, अशा प्रकारे तो उचलला पाहिजे. म्हणजेच टेबलावरचा चष्मा उचलताना...चष्मा जिथं नाकावर टेकतो, त्याला काय म्हणतात...?’’

‘‘त्याला ब्रिज म्हणतात.’’

‘‘...हां, तर चष्मा उचलताना तो ब्रिज धरूनच उचलला पाहिजे. कारण संपूर्ण चष्मा हा त्या ब्रिजवरच तोलला जात असतो. जर काड्या धरून चष्मा उचलला, तर त्या काड्यांवर वजन आल्यानं त्या वाकतील किंवा त्यांच्या बिजागऱ्या सैल होतील. त्यामुळं संपूर्ण चष्म्याचा तोलच बिघडेल आणि तो नीट बसणार नाही.’’

टाळ्या वाजवत पार्थ म्हणाला : ‘‘अगदी बरोबर. खरंतर हीच चम्मतग मला सांगायची होती; पण सांगता येत नव्हतं.’’

आता मात्र सगळेच टाळ्या वाजवत म्हणाले : ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’

डोकं खाजवत शंतनू म्हणाला : ‘‘चष्मा कसा घालावा, याचं मी उत्तर देऊ शकेन असं वाटतंय मला. कारण, मागं मी एकदा जत्रेला गेलो होतो, तेव्हा मला ही चम्मतग अचानकच कळली होती. जत्रेत मी एक रंगीत चष्मा घेतला होता. मी एका हातानं आइस्क्रीम खात दुसऱ्या हातानं चष्मा घालू लागलो, तेव्हा बाबा मला खूप जोरात ओरडले होते. : ‘अरे शंभ्या... दोन्ही हातांनी चष्मा घाल.’ बाबा ओरडले म्हणून तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं..’’

‘‘आआँ? का वाईट वाटलं?’’

‘‘कारण, तेव्हा घाबरून माझ्या हातातलं आइस्क्रीमच खाली पडलं आणि चष्मा नाकावर अडकला. खरं म्हणजे तेव्हा आइस्क्रीम तोंडात जाऊन चष्मा खाली पडला असता तर मला अधिक बरं वाटलं असतं!’’

‘‘पण त्यामुळं तुला चम्मतग तरी कळली, की एका हातानं चष्मा घालायला गेलं तर काय होतं...?’’

‘‘काय होणार? हातातलं आइस्क्रीम खाली पडतं...!’’ पार्थ निरागसपणे म्हणाला.

सगळे गारेगार गुरगुर्गत म्हणाले : ‘‘पार्थ, अगदी आइस्क्रीमसारखाच आहे.’’

‘‘एकच काडी हातात धरून चष्मा घालण्याचा प्रयत्न केला, तर संपूर्ण चष्म्याचा तोल जातो आणि त्याच्या काड्या फाकतात, वाकतात, ताणल्या जातात. पर्यायानं चष्मा चेहऱ्यावर तिरका बसतो.’’

‘‘शाबास शंतनू. म्हणजेच चष्मा घालताना दोन्ही काड्या हातात धरूनच तो घातला पाहिजे...’’बाबांना मध्येच थांबवत पालवीनं विचारलं : ‘‘पण नेमक्‍या कुठल्या ठिकाणी त्या काड्या धरल्या पाहिजेत?’’

‘‘शाबास. फार चांगला प्रश्‍न विचारलास,’’ असं म्हणत बाबांनी तिच्या हातात चष्म्याची एक जुनी फ्रेम दिली. 

त्या फ्रेमवर थोडा वेळ प्रयोग केल्यानंतर पालवी म्हणाली : ‘‘कळलं. अंगठा आणि तर्जनी यांनी काड्यांच्या बिजागरीजवळ पकडायचं.’’

सब का कल्ला - ‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’

पालवी पुढं म्हणाली : ‘‘आता पुढच्या प्रश्नाचं उत्तरही देऊन टाकते. चष्मा काढतानासुद्धा काड्या तिथंच धरायच्या आहेत पण...’’

‘‘आता पण काय? काढ ना चष्मा...’’

‘‘तिथंच खरी चम्मगत आहे, जी मला आत्ताच समजली आहे. चष्मा काढताना चष्मा पुढं ओढून काढायचा नाही...’’

‘‘अगं, पण पुढं न ओढता चष्मा कसा काढणार?’’

‘‘तेच तर सांगतेय. चष्मा काढायच्या वेळी तो न ओढता आधी किंचित वर उचलायचा आणि मग पुढं ओढायचा...कारण त्या काड्यांचं डिझाईन पाहा नं. हीच तर त्यातली ‘चम्मतग’ आहे.’’

‘‘अगदी बरोबर बोललीस पालवी. आता चष्मा कसा पुसावा, हे समजण्यासाठी तुम्ही त्या तिन्ही फ्रेमचं डिझाइन समजून घेतलं, की त्यातली चम्मतग शोधता येईल,’’ असं म्हणत बाबांनी तीन वेगवेगळ्या प्रकारच्या फ्रेम मुलांना दिल्या.

वेदांगी आणि पार्थ, शंतनू आणि पालवी, अन्वय आणि नेहा अशा तीन गटांत मुलं काम करू लागली. 

वेदांगी म्हणाली :‘‘आमच्याकडं असणारी फ्रेम बंदिस्त आहे. म्हणजे काचेच्या चारही बाजूंनी फ्रेम आहे. त्यामुळं या काचा पुसताना काचा हलत नाहीत म्हणून काचेवरून कुठल्याही एकाच दिशेनं कापड फिरवणं हीच यातली चम्मतग.’’

पालवी म्हणाली : ‘‘आमच्याकडं हाफ रिमलेस फ्रेम आहे. म्हणजे यामध्ये काचा खालच्या बाजूनं नायलॉनच्या दोऱ्यानं बांधलेल्या असून, त्या दोऱ्याची गाठ बिजागरीच्या जवळ आहे. म्हणून हा चष्मा पुसताना कापड ब्रिजकडून बिजागरीच्या दिशेनंच फिरवलं पाहिजे. जर चुकून ते उलट दिशेनं फिरवलं, तर ती गाठ सैल होईल आणि काच तिरकी होईल आणि पुसताना चष्म्याचा ब्रिज हातात धरायचा. यही है चम्मतग.’’

अन्वय म्हणाला : ‘‘आमच्याकडं तर रिमलेस चष्मा आहे. म्हणजे यातल्या काचा केवळ चार बारीक स्क्रूवर तोललेल्या आहेत. हा फारच नाजूक चष्मा आहे. यातली चम्मतग शोधण्यासाठी आम्हाला फारच वेळ लागला. हा पुसताना पण ब्रिजच हातात धरायचा आहे; पण एक बोट मात्र ब्रिजवरच्या स्क्रूवर ठेवलं पाहिजे. पुसतानाची दिशा ‘ब्रीज ते बिजागरी’ अशी असली तरी जोर मात्र अजिबात लावायचा नाही...’’

‘‘का? नाहीतर मग चष्मा साफ कसा होईल?’’

‘‘हीच त्या डिझाइनमधली चम्मतग आहे. स्क्रू आणि काच यामध्ये पातळ रबराची

किंवा फायबरची एक नळी आहे. चुकून जरी जास्त जोर लागला तर ही नळी फाटेल

आणि स्क्रू काचेला लागेल. काच तडकेल किंवा वाकडी होईल. अगदी हलक्‍या हातानं हे काम करावं लागतं. मला वाटतं, असे चष्मे साफ करण्यासाठी वेगळे स्प्रेसुद्धा मिळतात.’’

‘‘अगदी बरोबर! तुम्हा सगळ्यांना आता चम्मतग समजू लागली आहे,’’ बाबा म्हणाले;

पण त्यांना थांबवत वेदांगीनं विचारलं : ‘‘पण आणखी एक प्रश्‍न आहेच, की रात्री झोपताना चष्मा चष्म्याच्या पेटीत कसा ठेवावा?’’

बाबा हसतच म्हणाले : ‘‘आता खूपच वेळ झाला आहे. आता हा प्रयोग तुम्ही घरी जाऊन

करून बघा. आपण पुढच्या रविवारी सगळ्या चम्मतग एकदम शोधू या. तोपर्यंत

मीसुद्धा थोडा अभ्यास करून ठेवतो.’’

स्वयंपाकघराकडं पाहत शंतनू म्हणाला : ‘‘आता आपण सगळे मिळून स्वयंपाकघरातून येणारा ‘चुरूचुरू आवाज आणि खमंग वासामागची’ चम्मतग शोधू या आणि अनुभवू या...कसं?’’

पालकांसाठी गृहपाठ : 

  • आज पालकांसाठी गृहपाठ नाही!
  • ‘जेव्हा पालकांना गृहपाठ नसतो तेव्हा शहाणे पालक आपल्या आजूबाजूला दडलेल्या अनेक चम्मतग शोधून काढण्याचा गृहपाठ स्वखुशीनं करतात’ ही चिनी म्हण तुम्ही ऐकली असेलच!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Rajiv Tambe