जुने प्रश्‍न आणि नवे परीक्षक (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 30 जुलै 2017

हा पाचवा रविवार असल्यानं आज मुलं नव्हेत, तर त्यांचे पालक एकत्र जमणार आणि मुलं आपापल्या घरी चम्मतग करणार, असं ठरलंच होतं.

नेहाच्या घरीच सगळे जमले. थोडंफार खाणं आणि चहा झाल्यावर गप्पांना सुरवात झाली. नेहाची आई म्हणाली ः ‘‘या मुलांच्या ‘संडे क्‍लब’मुळं खूप फायदा होतो. विशेष म्हणजे, मुलं एकमेकांकडून शिकायला शिकली आहेत.’’

हा पाचवा रविवार असल्यानं आज मुलं नव्हेत, तर त्यांचे पालक एकत्र जमणार आणि मुलं आपापल्या घरी चम्मतग करणार, असं ठरलंच होतं.

नेहाच्या घरीच सगळे जमले. थोडंफार खाणं आणि चहा झाल्यावर गप्पांना सुरवात झाली. नेहाची आई म्हणाली ः ‘‘या मुलांच्या ‘संडे क्‍लब’मुळं खूप फायदा होतो. विशेष म्हणजे, मुलं एकमेकांकडून शिकायला शिकली आहेत.’’

‘‘खरंय तुमचं. आधी अन्वयला वाटायचं, की आपल्याला सगळं माहीत आहे आणि आपलं काही चुकत नाही. त्यामुळं जर एखादी गोष्ट त्याच्या हातून चुकली तर ती चूक शोधून काढण्याऐवजी तो स्वतःलाच दोष देत राहायचा. आपलं चुकलं म्हणजे आपल्यातच काही प्रॉब्लेम आहे, असं त्याला वाटायचं. ‘अरे, अडलं असेल तर इतरांना विचार’ असं त्याला सांगितलं तर तो त्याला त्याचा अपमान वाटायचा. ‘मी कशाला विचार? मला काय समजत नाही?’ असं तोऱ्यात म्हणायचा; पण या संडे क्‍लबमुळं त्याच्यात बदल झाला...’’

‘‘काय बदल झाला?’’

‘‘नेहाची आई म्हणाली तसा बदल अन्वूमध्येही झाला. आता अडलं तर, चुकलं तर तो इतरांची मदत घेतो. म्हणजे ‘कुणाकडूनही शिकण्यात त्याला कमीपणा वाटत नाही’ हा माझ्या दृष्टीनं झालेला मोठा फायदा आहे.’’

‘‘तसं म्हणाल तर माझ्यातही एक बदल झाला,’’ असं पार्थच्या बाबांनी म्हणताच सगळे त्यांच्याकडं पाहू लागले.

पार्थचे बाबा हसतच म्हणाले ः ‘‘मी आता मुलांकडूनही शिकतो. या आठवड्यातली गंमत आहे. आजोबा झोपताना डोळ्यांत औषध घालतात. त्या दिवशी लाईट गेले होते. आजोबांची झोपायची वेळ झालेली. आमच्या औषधांच्या कपाटात वेगवेगळ्या औषधांच्या बाटल्या आहेत. रात्री लाईट गेले असताना त्या कपाटातून आजोबांच्या डोळ्यात औषध घालायची नेमकी बाटली शोधणं भलतचं कठीण काम. आणि हे काम पार्थला जमणंच शक्‍य नाही, याबद्दल माझी खात्री होती. इतक्‍यात आजोबांनी पार्थला औषधाची बाटली आणायला सांगितली आणि पार्थ टुणकन उडी मारून उठला. मी पार्थला थांबवत म्हणाले ः ‘‘थांब, कुठंतरी धडपडशील, नाहीतर भलत्याच औषधाची बाटली आणशील आणि आजोबांच्या डोळ्यांची...’’

तेव्हा मला थांबवत पार्थ म्हणाला ः ‘‘बाबा, जरा शांत राहा. डोळ्यांत औषध घालण्याची आपल्याकडं एकच बाटली आहे. तिचं डिझाईन आणि तिची रचना मला माहीत आहे. मी अंधारात केवळ स्पर्शानं ती बाटली ओळखू शकतो. आणि बाबा, मी जर योग्य बाटली आणायला चुकलो तर मग मला बोला.’’

‘‘खरं सांगतो, पार्थच्या उत्तरानं माझी बोलतीच बंद झाली. आपण काही वेळा मुलांवर विश्‍वास टाकायला कमी पडतो किंवा त्याला इतकं काही समजत नसेल, असा उगीचच पूर्वग्रह करून घेतो, असंही वाटलं मला त्या वेळी. आता ही चूक मी करत नाही; पण एक मात्र खरं, की या संडे क्‍लबमुळं पार्थचा कुठलंही काम करण्याबाबतचा आत्मविश्‍वास वाढला आहे. तो आता अधिक जबाबदारीनं काम करतो.’’

‘‘अहो, इतकंच काय...रविवारी घरी आल्यावर पार्थ इतका उत्तेजित असतो, की कुणी कुणी काय काय केलं, हे सांगत असतानाच त्याला आणखी नवीन गोष्टी सुचत असतात...’’

‘‘मला एक गोष्ट सुचवायची होती...’’

‘‘कोणती? सांगा ना...’’

‘‘आता पुन्हा ऑक्‍टोबरमध्ये पाच रविवार आहेत, तेव्हाच आपण सगळे पुन्हा भेटणार. मला वाटतं, तोपर्यंत आपण काही प्लॅनिंग करून ठेवू. म्हणजे विशेषतः या मुलांचे कुठले खेळ घ्यायचे ते ठरवू; जेणेकरून त्यांची शिकण्याची गती वाढू शकेल,’’ अन्वयची आई बोलायची थांबली आणि सगळ्यांनीच माना डोलावल्या. 

शंतनूचे बाबा म्हणाले ः ‘‘त्यापेक्षा आज आपण खरंच गप्पा मारू. कारण, नियोजन करण्यासाठी थोडा वेळ लागेल. १५ दिवसांनी आपण नियोजनासाठी म्हणूनच भेटू; पण ही आपली बैठक गुप्त ठेवू या.’’

ही कल्पना सगळ्यांनाच आवडली.

‘‘त्या चित्रांच्या खेळामुळं तर आम्ही सगळे खूप शिकलोच; पण त्यात आम्ही खूप भरही घातली.’’

‘‘म्हणजे? वर्तमानपत्रातली चित्रं पाहून त्यावर बोलायचं...तोच खेळ ना?’’

‘‘हो, हो. तोच खेळ; पण आता आम्ही त्या खेळासाठी जिवंत चित्रं वापरायला सुरवात केली आहे.’’

‘‘अहो नेहाची आई, आम्हाला जिवंत प्राणी-पक्षी माहीत आहेत; पण चित्रं कशी काय जिवंत? ‘जिवंत चित्र’ हा काय प्रकार आहे?’’ वेदांगीच्या आईनं हसतच विचारलं.

‘‘अहो, त्या खेळाला नेहानं ठेवलेलं नाव ते. आम्ही दोघी संध्याकाळी कधी कधी  खिडकीत गप्पा मारत बसतो; पण आता मात्र खिडकीतून दिसणारं एखादं दृश्‍य पाहतो आणि मग त्या दृश्‍याच्या अवतीभवती गप्पा मारतो. काही वेळा त्या दृश्‍यातला एखादा शब्द निवडतो, वस्तू निवडतो आणि त्याच्या आजूबाजूनं गप्पागप्पी सुरू करतो.’’

‘‘म्हणजे..? एखादं उदाहरणच सांगा की...’’

‘‘उदाहरण कशाला, आपणच दोन मिनिटं हा खेळ खेळू या की... चला, आपण खिडकीत जाऊ या.’’

आता सगळे आई-बाबा खिडकीतून डोकावू लागले.

हातात रंगाचे डबे, ब्रश, रोलर आणि सायकलला शिडी अडकवून रंगारी रस्त्यावरून चालले होते, त्यांच्याकडं बोट करत नेहाची आई म्हणाली ः ‘‘ ‘हे आहे आपलं ‘जिवंत चित्र.’ आता या दृश्‍याच्या अवतीभवती आणि या दृश्‍यातल्या वस्तूंच्या आजूबाजूला आपल्याला खूप काही बोलता येईल,’’ नेहाच्या आईला थांबवत बाबा म्हणाले ः ‘‘म्हणजे खूप काही शोधता येईल तेव्हाच खूप काही बोलता येईल.’’

‘‘अगदी बरोबर. आणि मुख्य म्हणजे, हे जिवंत चित्र असल्यानं ते सारखं बदलत आहे; त्यामुळं या बदलांचा मागोवा घेत आपल्याला पुढं घडू शकणाऱ्या बदलांविषयी भाकीतही करता येईल.’’

अन्वयच्या बाबांना थांबवत शंतनूची आई म्हणाली ः ‘‘मला आणखी एक गोष्ट सुचत आहे. ज्याप्रमाणे पुढच्या बदलांविषयी भाकीत करता येईल, त्याचप्रमाणे मागं घडून गेलेल्या गोष्टींविषयीही अंदाज बांधता येतील की.’’

‘‘अगदी बरोबर. ‘जिवंत चित्रा’तला हाच ‘जिवंत’पणा आहे!’’

सगळेच खसखसून हसले. 

नेहाची आई म्हणाली ः ‘‘मला एक विचित्र प्रश्‍न सतावतो आहे. मी तो खरं म्हणजे शाळेतल्या पालकसभेत वर्गशिक्षकांनाच विचारणार होते; पण नाही विचारला.’’

‘‘का नाही विचारला?’’

‘‘मला वाटलं, वर्गशिक्षक उत्तर देतीलही; पण प्रश्‍न ऐकल्यामुळं एखाद्‌वेळेस त्यांचं नेहाविषयीचं मत बदलूही शकतं. तुम्ही सगळेच नेहाला त्या शिक्षकांपेक्षा अधिक चांगले ओळखता. म्हणून मग तुम्हालाच प्रश्‍न विचारायचं ठरवलं.’’

‘‘काही गंभीर नाही ना?’’

‘‘नाही, नाही. आजकाल नेहा गाणी ऐकत अभ्यास करते आणि येता-जाता उगाचच आरशात डोकावून पाहते. आरशात पाहून केसांच्या बटा पुढं-मागं करते. म्हणजे नेहमीच नव्हे; पण करते. त्यामुळं मला तिची काळजी वाटते.’’

पार्थचे बाबा म्हणाले ः ‘‘तुमच्या प्रश्‍नाचे दोन भाग आहेत. पहिल्या भागाचं उत्तर मला माहीत आहे. कारण, हा जुनाच प्रश्‍न आहे...’’

‘‘जुनाच प्रश्‍न म्हणजे?’’

‘‘सांगतो...सांगतो. गाणी ऐकत अभ्यास करणं अजिबात वाईट नाही. आपण मूल्यमापन अभ्यासाचं करायचं आहे फक्त; गाण्यांचं नव्हे. काही मुलांची ही अभ्यासाची पद्धत असू शकते. कारण, अभ्यास करताना ही मुलं काही सारखी गाणी ऐकत नसतात, तर स्वतःला गाण्यांच्या भिंतीत कोंडून घेत असतात. वाटलं तर मध्ये मध्ये गाणं ऐकतात; पण लगेच अभ्यासाला भिडतात. अशा वेळी मुलांचा अभ्यास झाल्यावर, तो किती झाला आहे, हे आपण तपासू शकतोच की.’’

‘‘कसं तपासणार?’’

‘‘एक सोपी गोष्ट विचारतो? तुमच्यापैकी कुणी सकाळी रेडिओ ऐकत स्वयंपाक करत असतं का?’’

‘‘हो, मी करते’’ शंतनूची आई म्हणाली.

‘‘मग उद्या एक काम करा. चार गाणी संपल्यानंतर, पहिलं गाणं आठवतं का पाहा? नाही आठवत आपल्याला. कारण, आपलं लक्ष आपल्या कामावर असतं.’’

‘‘खरंय तुमचं. जरासा विरंगुळा म्हणून मी गाणी लावून ठेवते; पण गाणी कुठली ऐकली, हे मात्र नाही सांगता येणार हं.’’

‘‘मुलांचही अगदी तसंच होतं...’’

‘‘पण त्या जुन्या प्रश्‍नाचं काय?’’

‘‘मला वाटलं, तुम्ही ओळखलं असेल! अहो, ही माझीच लहानपणीची सवय असल्यानं मला उत्तर माहीतच होतं की.’’

हे ऐकून सगळेच ठसठसले.

पालवीची आई म्हणाली ः ‘‘या वयात मुलं असं करतातच. फक्त प्रत्येकाची पद्धत वेगळी.’’

‘‘म्हणजे...?’’ ‘‘आरशासमोर रेंगाळणं, बटा काढणं, डिओ, परफ्यूम किंवा कुठल्यातरी क्रीमसाठी हट्ट करणं, कपड्यांची जराशी इस्त्री चुरगळली तर किरकिर करणं वगैरे. कारण, आता आपली मुलं मोठी होत आहेत. वयात येत आहेत. तेव्हा आपण हे समजून घेतलं पाहिजे.’’

‘‘अशा वेळी मुलांना संशयाची नव्हे; तर विश्‍वासाची गरज असते. तुमच्या आश्‍वासक सहवासाची गरज असते..’’

‘‘कारण, हा प्रश्‍नही तसाच फार फार जुना आहे...!’’

‘‘आणि या जुन्या प्रश्‍नांच्या प्रश्‍नपत्रिका आपण सोडवलेल्या आहेत. आपण शंभर टक्के पासही झालो होतो; पण आता भीती वाटते कारण...कारण...’’

‘‘कारण, आता आपल्याला आपल्या प्रश्‍नपत्रिका सोडवायच्या नसून आपल्याच मुलांच्या उत्तरपत्रिका तपासायच्या आहेत.’’

‘‘म्हणजे जुन्याच प्रश्‍नांची नव्यानं उत्तरं शोधायची आहेत...’’

‘‘पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, नव्यानं उत्तरं शोधताना आपण आपल्या मुलांना त्यांच्या चुका सतत दाखवायच्या नाहीत. त्यांच्या चुकांवरून त्यांना टोचून बोलायचं नाही, ‘तू मागं चुकला होतास म्हणून आता पुढंही चुकशील,’ असं तर मुलांना कदापि बोलायचं नाही...’’

‘‘मुलं चुकली तर मग काय करायचं काय...?’’

‘‘जर मुलं चुकत असतील तर त्यांची चूक त्यांना न दाखवता, त्या चुकीविषयी चकार शब्द न उच्चारता ती चूक कशी सुधारता येईल यासाठी मुलांना प्रेरित करणं आणि त्यासाठी मुलांना सकारात्मक प्रेरणा देणं, हे पालकांकडून अपेक्षित आहे.’’

डोळे पुसत नेहाची आई म्हणाली ः ‘‘खरंच, तुमच्या बोलण्यानं मला धीर मिळाला. मी खूप गांगरले होते; पण आता मात्र मला चांगली स्पष्टता आली. काही वेळा आपणच आपल्या मुलांना समजून घ्यायला कमी पडतो, तर काही वेळा ‘मुलं चुका करतील’ या कल्पनेनंच अधिक घाबरतो.’’

‘‘आता आपलाही संडे क्‍लब सुरू करायला पाहिजे, असं वाटू लागलंय मला.’’
‘‘अहो, घड्याळाकडं लक्ष आहे का? निघायला हवं. घरी मुलं एकटीच आहेत.’’

पालकांसाठी गृहपाठ

  • तुमच्या मुलांची अभ्यास करण्याची पद्धत कृपया मुलांकडून समजून घ्या आणि त्यांच्यावर पूर्ण विश्‍वास टाका. त्यांना धीर द्या आणि मग पाहा. मुलं एक पाऊल पुढं जातातच.
  • मुलांबाबतचे निर्णय मुलांशी विचारविनिमय करूनच घ्या. 
  • ‘जे पालक मुलांना चुकांमधून शिकण्याची हिंमत देतात, तेच मुलांसोबत मोठे होतात,’ ही चिनी म्हण सदैव लक्षात ठेवा!

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Rajiv Tambe