भारत एक्‍सप्रेस (राजीव तांबे)

राजीव तांबे
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

आज शंतनूच्या घरी भेटायचं ठरलं होतं.

शंतनूच्या आई-बाबांनी सगळी तयारी करून ठेवली होती. आज येणाऱ्या सगळ्यांना चकित करायचं होतं. थोड्याच वेळात नेहाची आई, अन्वयची आई, वेदांगीचे बाबा आणि पार्थचे बाबा आले. पाठोपाठच अन्वय, नेहा, पार्थ, वेदांगी आणि पालवी आल्या.
शंतनूची आई म्हणाली : ‘‘मी आज तुम्हाला एक विषय देते. या विषयावर नवनवीन खेळ कसकसे खेळायचे, हे तुम्ही सांगायचं. नवनवीन खेळ म्हणजे, जे आपण याआधी कधी खेळलेलो नाहीत असे खेळ; पण सगळ्या खेळांत सगळ्यांचा सहभाग मात्र हवाच.’’
‘‘म...हा विषय कुस्तीबिस्ती तर नाही ना?’’ पार्थनं असं विचारताच सगळे ठणठणून हसले.

आज शंतनूच्या घरी भेटायचं ठरलं होतं.

शंतनूच्या आई-बाबांनी सगळी तयारी करून ठेवली होती. आज येणाऱ्या सगळ्यांना चकित करायचं होतं. थोड्याच वेळात नेहाची आई, अन्वयची आई, वेदांगीचे बाबा आणि पार्थचे बाबा आले. पाठोपाठच अन्वय, नेहा, पार्थ, वेदांगी आणि पालवी आल्या.
शंतनूची आई म्हणाली : ‘‘मी आज तुम्हाला एक विषय देते. या विषयावर नवनवीन खेळ कसकसे खेळायचे, हे तुम्ही सांगायचं. नवनवीन खेळ म्हणजे, जे आपण याआधी कधी खेळलेलो नाहीत असे खेळ; पण सगळ्या खेळांत सगळ्यांचा सहभाग मात्र हवाच.’’
‘‘म...हा विषय कुस्तीबिस्ती तर नाही ना?’’ पार्थनं असं विचारताच सगळे ठणठणून हसले.

‘‘विषय चित्रकला आहे,’’ असं आईनं म्हणताच सगळ्यांच्या डोक्‍यात आयडियांचे जनरेटर सुरू झाले.

हात उंचावत पालवी म्हणाली : ‘‘मला सुचली आहे नवीन आयडिया. सगळ्यांनी मिळून एक चित्र काढायचं.’’

अन्वय म्हणाला : ‘‘मी पालवीच्या आयडियेमध्ये एक भर घालतो. आज आपण सगळे जण मिळून बाराजणं आहोत, म्हणून आपण बाराजणांनी मिळून वेगवेगळ्या १२ प्रकारची चित्रं काढायची किंवा रंगवायची.’’

‘‘वॉव ! एकदम सही आयडिया. फंडू आयडिया,’’ सगळेच म्हणाले.
‘‘पण हे १२ प्रकार म्हणजे कुठले प्रकार? आणि कुठली १२ प्रकारातली चित्रं काढायची? पार्थनं जरा कुरकुरतच विचारलं?’’

आई म्हणाली : ‘‘हेही तुम्ही मुलांनीच शोधायचं आहे. आम्ही फक्त मदतीला आहोत.’’
मुलं म्हणाली : ‘‘ओके. चला, पाच मिनिटांचा ब्रेक घेऊ आणि ५० आयडिया शोधू.’’
नेहा म्हणाली : ‘‘मुख्य म्हणजे चित्र काढण्याचे किंवा रंगवण्याचे वेगवेगळे प्रकार आधी शोधू या आणि मग कुठलं चित्र त्या त्या प्रकारासाठी निवडायचं हे ठरवू या.’’
मुलं बोलू लागली...

मी एक चित्र पाहिलं होतं, ते फक्त लहान-मोठे काळे ठिपके देऊनच रंगवलेलं होतं. त्याला बहुधा स्टम्पिंग म्हणतात असं वाटतं. यात कागदाचे लहान-मोठे कोन तयार केले जातात. या कोनांची टोकं म्हणजे लहान-मोठे बिंदूच असतात. ही टोकं काळ्या पावडरीत किंवा रंगात बुडवून मग ती कागदावर टेकवतात. लहान-मोठे काळे ठिपके आणि मध्ये सोडलेली पांढरी जागा यातून अतिशय सुंदर चित्र आकार घेतं. प्रत्येकानं वेगवेगळ्या आकाराचे कोन तयार केले, तर आपल्याला हा प्रकार वापरता येईल. प्रत्येकाचा ठिपका तर वेगळाच; पण प्रत्येकाची रंगच्छटाही वेगळी. ही ठिपकाठिपकी तर मस्तच होईल.

दोरा रंगांत भिजवून तो कागदाच्या घडीत ठेवायचा मग; घडी बंद करून तो हलकेच बाहेर खेचला की फार सुंदर आकारातली आकृती तयार होते. १२ दोरे एकाच वेळी वापरून आपल्याला भन्नाट आकृती काढता येईल. इथंसुद्धा प्रत्येकाचे दोरे वेगवेगळ्या जाडीचे आणि कमी-अधिक लांबीचे तर असतीलच; पण रंगही वेगवेगळे असतील. काहीजण तर पीळ दिलेले दोरेसुद्धा वापरू शकतात आणि विशेष गंमत म्हणजे, हे दोरे बाहेर ओढताना सगळ्यांनी सरळ न ओढता वेगवेगळ्या कोनांत ओढले तर ओले रंग एकमेकांत मिसळून नवीन विलक्षण रंगच्छटा तयार होतील.

 जुने टूथब्रश वापरून तुषारकाम करत चित्र किंवा लपवलेले आकार रंगवता येतील. यासाठी १२ टूथब्रश घेण्याची आवश्‍यकता नाही, तर १२ वेगवेगळ्या रंगच्छटा वापरता येतील.

आपल्या सगळ्यांच्याच बोटांचे ठसे वेगवेगळे आहेत. या ठशांचा उपयोग करून हत्ती, जिराफ, साप, अजगर, फुलपाखरू, ससा, अस्वल असे अनेक प्राणी काढता येतील. एकाच चित्रात दोघांच्या किंवा तिघांच्या बोटांची कॉम्बिनेशन्सही करता येतील. नागाची फणा दाखवण्यासाठी बाबांच्या अंगठ्याचे ठसे, तर शरीरासाठी नेहाच्या करंगळीचे ठसे असं करता येईल आणि झाड दाखवण्यासाठी तर सगळ्यांचेच ठसे वापरता येतील.

बोटांप्रमाणेच ठसेकामासाठी वेगवेगळ्या १२ वस्तू वापरूनही नवीन चित्र तयार करता येईल. उदाहरणार्थ : भेंडी, फरसबी, पडवळ, बीट, चिरलेलं आलं, कापलेला लसूण, सिमला मिरची, फ्लॉवर, कोबीच्या पानांची बारीक जुडी, कापलेल्या बटाट्यात कोरीव काम करून, कापलेल्या मुळ्यात कोरीव काम करून, सुरणाचे पंचकोनी, षटकोनी आकार कापून व त्यात कोरीव काम करून, कांदा आडवा कापला, की विविध आकारांतले गोल मिळतील. कांदा तिरका; पण उभा कापला तर थोड्या वेगळ्या आकाराच्या शंखाकृती मिळतील. कांदा कोनाच्या आकारात कापल्यास लहान-मोठे त्रिकोणी आकार मिळतील.

फक्त फुलांच्या पाकळ्या आणि हिरव्या पानांचा उपयोग करून आपल्याला आपल्या भारताचा राष्ट्रध्वज करता येईल.

एका मोठ्या कागदावर आपल्याला मस्त फ्री-हॅंड म्हणजे मुक्तहस्त चित्र काढता येईल. वेगवेगळे रंग वापरले तर आणखी मजा येईल.

फक्त जलरंगांचा उपयोग करून निसर्गचित्र काढता येईल.

निसर्गचित्र काढण्यासाठी जलरंगांप्रमाणेच नैसर्गिक रंगांचाही उपयोग करता येईल. उदाहरणार्थ : बीट, हळद, पालक, गाजर, चिंच, मुळा यांपासून चांगले रंग मिळतात.

भारताचा नकाशा काढून त्यातलं एकेक राज्य प्रत्येकाला देऊ. उरलेली राज्यं वाटून घेऊ. मग प्रत्येकानं आपापल्या राज्याचं वैशिष्ट्य लक्षात घेऊन त्याप्रमाणे ते रंगवायचं. हे तर लई भारी होईल.

पेन्सिल न वापरता फक्त ब्रशचा वापर करायचा. त्यासाठी वेगवेगळ्या नंबरचे गोल आणि चपटे ब्रश वापरायचे. माध्यम म्हणून जलरंगाचा वापर करता येईल किंवा पोस्टररंगही वापरता येतील. या प्रकारातून फक्त रंगांचं कोलाज करता येईल.

रंगांचं कोलाज करण्यासाठी आणखी एक पद्धत वापरता येईल. पोस्टररंग बोटाला लावून बोट कागदावर फक्त एकाच जागी वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार फिरवत राहायचे. यामुळं बोटांच्या ठशांच्या गतिमान रेषा कागदावर उमटतात. यातूनच कल्पक चित्र तयार होतं.

फुंकरचित्र हा प्रकारही वापरता येईल. पोस्टररंग थोडा पातळ करून घ्यायचा. प्रत्येकानं वेगवेगळ्या रंगांत दुसऱ्याचं नाव लिहायचं आणि ज्याचं नाव लिहिलेलं असेल, त्यानं आपल्या ओल्या नावावर भराभर फुंकर मारायची. ही फुंकर ही निरनिराळ्या दिशेनं मारायची म्हणजे सगळी नावं एकमेकांशी वेगवेगळ्या रंगीत प्रवाहांनी जोडली जातील. या चित्राला ‘फुंकर-बॉर्डर’ही करता येईल.

वेगवेगळी कट-निब वापरून एकमेकांच्या नावांचं सुलेखनही करता येईल. एकमेकांची नावं किमान तीन भाषांत तरी लिहायची. समजा, आपल्याकडं कट-नीब नसतील तर बाजारात चिझल-टिप्स किंवा कट-टिप्स असणारी मार्कर पेन मिळतात, त्या पेनांनी लिहिता येईल. वेगवेगळ्या आकर्षक वळणात नावं लिहिताना, त्या नावांचा असा काही लहजा समोर येतो, की तो पाहताना अपार आनंद होतो. खरं म्हणजे, आपण अशी नावं वेगळ्या वळणात लिहीत नाही; त्यामुळं असं काही नवीन करून पाहायला ही संधी चांगली आहे.

स्टेशनरीच्या दुकानात चारकोल स्टिक्‍स मिळतात म्हणजे ‘कोळशाच्या कांड्या.’ या कोळशाच्या कांड्या वापरून ही चित्रं काढली जातात; पण या कांड्यांनी चित्रं काढताना या कांड्या हातात पेन्सिलीसारख्या धरायच्या नाहीत. चित्र काढताना या कांड्या हातात आडव्या धरायला लागतात. विशेषत: व्यक्तिचित्र काढण्यासाठी याचा प्रामुख्यानं उपयोग करतात. आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करून पाहायला हरकत नाही. आपण सगळे मिळून एखादं मोठं चित्र काढू.

कागदाला कागद जोडून एक मोठा कागद तयार करू. हा कागद भिंतीवर चिकटवू. सगळे मिळून एक निसर्गचित्र काढू; पण ते चित्र रंगीत खडू, जलरंग, पोस्टररंग, कोळशाच्या कांड्या, नैसर्गिक रंग या सगळ्यांचा उपयोग करून रंगवू. खूप मजा येईल.

मागं आपण कोलाजचे कितीतरी नवीन प्रकार शोधले होते. त्यातला एखादा हट के प्रकार आपण सगळे मिळून वापरू.

पेन्सिलींचे अनेक प्रकार असतात. उदाहरणार्थ : ३H, २H, H, HB, २B, ३B, ४B, ५B, ६B, ७B इत्यादी. H म्हणजे हार्ड. या पेन्सिलींचं शिसं अत्यंत कडक आणि कठीण असतं. विशेषत: नकाशा काढणारे किंवा आर्किटेक्‍ट लोक या पेन्सिली वापरतात. आम्ही शाळेत वापरतो ती HB पेन्सिल. B म्हणजे बोल्ड, म्हणजे ठळक. या पेन्सिलमधलं शिसं मऊ आणि ठिसूळ असतं. चित्रकार शेडिंग करण्यासाठी अशा पेन्सिलींचा उपयोग करतात. फक्त अशा वेगवेगळ्या पेन्सिली वापरून सगळ्यांना मिळून एक मस्त चित्र काढता येईल, असं मला वाटतंय.

मला वाटतं, आपण एक मोठी आगगाडी काढावी. प्रत्येकानं आपल्याला हवा आहे, तसा एक रंगडबा या गाडीला जोडायचा. प्रत्येक डब्याचा रंग वेगळा आणि प्रत्येक डब्याचं डिझाईनही वेगळं. अशी १२ डब्यांची गाडी आपण काढू. नंतर या सगळ्या डब्यांना सुसंगत असेल असं आणि प्रत्येक डब्याचं छोटसं प्रतिबिंब पडलेलं असेल, 

असं त्याचं इंजिन आपण सगळे मिळून काढू. रंगवू. ही असेल आपली ‘भारत एक्‍स्प्रेस’.
‘‘आता थांबवा तुमची ही ‘भारत एक्‍स्प्रेस’ थोडा वेळ. मला वाटलं होतं, तुम्ही जेमतेम बाराच आयडिया शोधाल; पण तुम्ही तर कमालच केली. तुम्ही तर १८ पेक्षाही जास्त आयडिया शोधल्या आहेत, असं वाटतंय मला. कारण, पहिल्यांदा मी मोडत होते; पण नंतर तुमच्या या भन्नाट आयडिया ऐकता ऐकता मी इतकी थक्क झाले की मोजायलाच विसरले. कमाल आहे तुम्हा मुलांची. खरं म्हणजे, आम्हा मोठ्या माणसांनाही इतक्‍या मस्त कल्पना इतक्‍या कमी वेळेत सुचल्याच नसत्या. तुम्हा सगळ्यांना खूप खूप शाबासकी...’’

आईचं बोलणं पुरं होण्याआधीच सगळी मुलं आनंदानं हात उंचावत म्हणाली ः 
‘‘ओके बोके पक्के, काम शंभर टक्के.’’

  पालकांसाठी गृहपाठ 

  • मुलांसमोर एखादी नवीन कल्पना बीजरूपात अवश्‍य मांडा; पण तिचा विस्तार करण्याचं स्वातंत्र्य मात्र मुलांनाच द्या.
  • कल्पनेचा विस्तार करताना एखाद्या वेळेस मुलं तुमच्याकडं मदत मागतील; पण हा क्षण खूप महत्त्वाचा आहे. अशा वेळी त्यांना कुठलीही गोष्ट सविस्तर सांगू नका. कारण, अशा वेळी मदत करणं म्हणजे ‘फक्त सुचवणं’ हे लक्षात ठेवा.
  • मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणं हे पालकांचं काम आहे.
  • काही वेळा मुलांनी सुचवलेल्या कल्पना काहीशा वेडगळ वाटतील; पण अशा वेळी त्या कल्पनांवर कुठलंही मत व्यक्त करण्याचं निग्रहानं टाळा. शांत राहा. अशा वेळी थोडा अवसर मिळाली, की मुलं थोड्याशा चुकीतूनच नव्या कल्पनेवर उडी मारतात.
  • तुम्हाला न कळलेल्या कल्पना मुलांसोबत वाटून घ्या. हीच खरंतर दोघांच्याही शिकण्याची सुरवात असते.
  • ‘सर्वसामान्यांना वाटणाऱ्या वेडगळ कल्पनांमधूनच अभिनव कल्पना उत्तुंग भरारी घेतात,’ ही चिनी म्हण सदैव लक्षात ठेवा!
Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Rajiv Tambe