वेळापत्रक नव्हे; अभ्यासपत्रक हवं (राजीव तांबे)

वेळापत्रक नव्हे; अभ्यासपत्रक हवं (राजीव तांबे)

म  हिन्यातला पाचवा रविवार हा खास पालकांसाठी राखीव असल्यानं आज सगळ्या मुलांचे पालक वेदांगीच्या घरी जमले होते. थोडाफार फराळ आणि चहा-पाणी झाल्यावर गप्पांना सुरवात झाली.

नेहाची आई म्हणाली : ‘‘परीक्षा जवळ आली की आमच्या घरातलं वातावरण गरम होऊ लागतं. म्हणजे अभ्यास करण्याच्या बाबतीत नेहा माझं काही म्हणजे काहीच ऐकत नाही. मी सांगेन त्याच्या नेमकं उलट तरी वागायचं किंवा भलतंच काहीतरी करायचं. मला समजत नाही, आपण इतकं प्रेमानं सांगतो तरी आपलीच मुलं आपलं का ऐकत नाहीत?’’

शंतनूचे बाबा म्हणाले : ‘‘एखादं उदाहरण सांगा म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ते आम्हाला कळेल.’’

‘‘हं सांगते. परीक्षा जवळ आली म्हणजे जास्त अभ्यास करायला पाहिजे. नेहमीचं टीव्ही पाहणं, खेळणं, गप्पा मारत टाईमपास करणं हे सगळं बंद केलं पाहिजे. पहाटे लवकर उठलं पाहिजे. पाठांतर केलं पाहिजे...पण हे ती काही करतच नाही. पहाटे  अजिबात उठत नाही. म...अभ्यास होणार कसा? माझ्या लहानपणी परीक्षा जवळ आली की माझी आई मला पहाटे उठवायची. मला आलं घातलेला गरमागरम चहा करून द्यायची. माझ्या सोबत बसायची. त्या वेळी माझा खूप अभ्यास व्हायचा. आता मी हे नेहाला सांगितलं तर माझं बोलणं ती हसण्यावारी नेते. आता काय करायचं?’’

‘‘मी एक गोष्ट सुचवते म्हणून रागावू नका. आपलं बालपण आणि आपल्या मुलांचं बालपण यांची अजिबात तुलना करू नका. आपल्या बालपणी जसं होतं तसंच आपल्या मुलांच्या बाबतीत व्हायला पाहिजे, असा आग्रह तर अजिबातच धरू नका...’’ पालवीची आई म्हणाली.

पालवीच्या आईला थांबवत नेहाच्या आईनं विचारलं : ‘‘मग, काय करायचं काय? हात चोळत पाहत बसायचं? अहो, त्यांनी अभ्यास करायला पाहिजे की नाही? आणि त्याबद्दल त्यांना सांगितलं पाहिजे की नाही? सांगा ना...’’

‘‘मुलांना ‘अभ्यास करा,’ असं तर सांगितलंच पाहिजेच...फक्त सांगण्याची पद्धत बदलली पाहिजे.’’

‘‘म्हणजे? आता तिला इंग्लिशमधून सांगू की कानडीतून?’’

‘‘शांत व्हा. इंग्लिश आणि कानडी या भाषा झाल्या; पण मी सांगते आहे पद्धतीविषयी. तर.. आपल्या सांगण्याची पद्धत बदलण्याआधी आपण आपल्या मुलांची अभ्यास करण्याची पद्धत समजून घेतली पाहिजे.’’

पालवीच्या आईला थांबवत अन्वयच्या बाबांनी विचारलं : ‘‘अभ्यास करण्याची पद्धत म्हणजे? वाचन, लेखन आणि पाठांतर हीच तर अभ्यासाची पद्धत ना? काय?’’
बाकीच्यांनी माना डोलावल्या.

‘‘नाही. प्रत्येक मुलाची अभ्यास करण्याची पद्धत वेगळी असते आणि मुलांना त्यांच्या त्यांच्या पद्धतीप्रमाणे अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य दिलं तरच मुलं पुढं जातात, नाहीतर अभ्यासातच जखडली जातात.’’

नेहाची आई म्हणाली : ‘‘खरं सांगू का, तुम्ही काय बोलताय ते मला अजिबात कळत नाहीए असं नाही. मला थोडंफार कळतंय; पण नेमकं काय करायचं तेच कळत नाहीए. त्यामुळं माझा गोंधळ आणखीच वाढलाय. प्लीज, मला जरा सोपं करून सांगा.’’
‘‘अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर, परीक्षेच्या वेळी घरात मुलांसाठी अभ्यासाचं, म्हणजे अभ्यास करण्याचं, वेळापत्रक तयार करण्याची पद्धत असते. तर असं वेळापत्रक अजिबात करायचं नाही. त्यामुळंच मुलांचा अभ्यास कमी होतो.’’

‘‘अहो, काय सांगताय काय? अभ्यासाचं वेळापत्रक केलेलं असतं म्हणून मुलं एका जागी तरी तेवढा वेळ बसतात; पण वेळापत्रकच केलं नाही तर सगळाच खेळखंडोबा होईल. तुम्ही आमचा गोंधळ आणखीच वाढवता आहात...’’

‘‘तुमचं बोलणं अर्धसत्य आहे. वेळापत्रकामुळं मुलं एका जागी बसतात हे खरंच आहे; पण त्यामुळं त्यांचा अभ्यास होतोच असं नाही. कारण या ‘अभ्यासाच्या वेळापत्रका’त अभ्यासापेक्षा वेळेला महत्त्व जास्त आहे. वेळ पाळण्यावर अधिक फोकस आहे आणि ‘अभ्यास होतोच आहे’ असं गृहीत धरलेलं आहे. त्यामुळं मुलांचं लक्ष हे अभ्यासापेक्षा ‘वेळ’ पाळण्याकडंच जास्त असतं. मुलं वारंवार घड्याळाकडं पाहत असतात. अशा वेळी अभ्यास संपवण्याची वेळ कसोशीनं पाळली जाते; पण अभ्यास सुरू करण्याची वेळ काटेकोरपणे पाळली जातेच असं नाही. आणि दुसरा धोका म्हणजे, मुलांनी काटेकोर वेळ जर का पाळली असेल तर त्यांचा अभ्यास झालेलाच आहे, असं समजून त्या अभ्यासाचं मूल्यमापन केलं जात नाही, तर वेळापत्रकातल्या वेळा पाळल्याबद्दल त्याचं अधिक कौतुक होतं.’’

‘‘हे मात्र अगदी खरंय तुमचं; पण आता यावर उपाय काय?’’

‘‘अगदी सोपा उपाय. अभ्यासाचं वेळापत्रक तयार न करता ‘अभ्यासपत्रक’ तयार करायचं. या ठिकाणी सगळा फोकस हा अभ्यासावर असेल आणि त्यासाठी ‘वेळ’ पाळण्याचं बंधन नसेल, तर ती मुलांची नैतिक जबाबदारी असेल आणि ही जबाबदारी त्यांनी स्वत:हून स्वीकारलेली असल्यानं त्यांना ती जाचक वाटणार नाही.’’

‘‘अं...एखादं उदाहरणंच सांगा, म्हणजे आणखी सोपं होईल.’’

‘‘हो, नक्की. वेळापत्रकात आपण ‘किती वेळ अभ्यास करणार’  हे ठरवत असतो. या ठिकाणी मात्र ‘किती अभ्यास करणार’ हे ठरवायचं आहे. आज दिवसभरात किती अभ्यास पूर्ण करायचा? याची यादी मुलांच्या मदतीनं तयार करायची. उदाहरणार्थ : मराठीच्या तीन कवितांचं रसग्रहण आणि प्रश्‍न, इंग्लिशचे तीन धडे, भूगोलाच्या एका धड्याची उजळणी आणि २० गणितं. हा ठरलेला अभ्यास त्या मुलानं/-मुलीनं त्याच्या अभ्यास करायच्या पद्धतीनं आणि त्याच्या वेळेनुसार पूर्ण करायचा आहे. अभ्यास पूर्ण झाल्यानंतर आपण तो मुलाच्या मदतीनं तपासून पाहायचा. जर मुलानं लवकर अभ्यास पूर्ण केला तर त्याला अधिक वेळ मोकळा मिळेल. यामुळं साहजिकच पटापट अभ्यास पूर्ण करण्याकडं मुलांचा कल राहतो. त्यातही विशेष म्हणजे, पटापट अभ्यास करण्याची पद्धत मुलं स्वत:हूनच शोधतात. कारण, त्यांना अभ्यासही करायचा असतो आणि वेळही वाचवायचा असतो,’’ पालवीची आई बोलायची थांबली.

‘‘फारच सुंदर. या वेळी आम्ही हा प्रयोग करूच; पण मला एक शंका आहे...,’’ नेहाची आई बोलताना मध्येच थांबली... कारण, विचारावं की विचारू नये, असं तिला वाटत होतं. शेवटी धीर करून तिनं विचारंलच : ‘‘आपण पूर्ण स्वातंत्र्य देऊनही जर मुलांनी अभ्यास केला नाही आणि नुसती टंगळमंगळ केली तर त्यांना कुठली शिक्षा करायची? की त्यांना काही बोलायचंच नाही?’’

‘‘हो, हो. माझ्या मनात हीच शंका होती. मुलांनी ‘मग करतो.. मग करतो’ म्हणत टाईमपासच केला तर काय? आपल्या चांगुलपणाचा मुलांनी गैरफायदा घ्यायला नको.’’
‘‘प्रथम मुलांना हा मोह होईल. शक्‍य आहे की, मुलम वेगवेगळ्या सबबी सांगून अभ्यास न करण्याची कारणं शोधतील. अशा वेळी त्यांना दोन गोष्टी सांगून सावध करता येईल. एक, तू अभ्यास केला नाहीस तर नुकसान तुझंच होणार आहे; आमचं नाही. तू अभ्यास न करणं म्हणजे तू स्वत:लाच फसवण्यासारखं आहे. तू अजुन सुधारू शकतोस आणि पुढं जाऊ शकतोस. मी तुला तुझी चूक सुधारण्याची आणखी एक संधी देते. दोन, आज ठरवलेला अभ्यास पूर्ण झाल्याशिवाय झोपता येणार नाही. जोपर्यंत तुझा अभ्यास पूर्ण होत नाही, तोपर्यंत मीही जागी राहीन. कारण ‘हा अभ्यास’ आपण दोघांनी मिळून ठरवला आहे; त्यामुळं तो पूर्ण करण्याची जबाबदारी आपल्या दोघांचीही आहे. तुला काही मदत हवी असेल तर मी तयार आहे; पण आपण आज जे ठरवलं आहे, ते आजच पूर्ण करायचं, मागं हटायचं नाही; पण शिक्षा करून, शासन करून प्रश्‍न सुटणार नाही.’’
‘‘का बरं..?’’

‘‘शिक्षा केल्यानंतर कुठल्याही मुलाला जोमानं अभ्यास करण्याची स्फूर्ती तर येत नाहीच, उलट मुलाच्या मनात कटुता निर्माण होते. थोडक्‍यात सांगायचं तर, ‘तू ठरवलेला अभ्यास तू करू शकतोस’ अशी उमेद मुलाच्या मनात निर्माण करणं आणि ‘तू जे जे ठरवशील ते ते तू करू शकतोस’ असा विश्‍वास मुलांच्यात पेरणं हे आपलं पालक म्हणून काम आहे आणि मुलांवर विश्‍वास टाकला तर ते सहजी शक्‍यही आहे.’’
शंतनूची आई म्हणाली : ‘‘खूपच छान. आम्ही कधी असा विचारच केला नव्हता आणि मला खात्री आहे, की शंतून कितीही हूड असला तरी याप्रकारे जर त्याला सांगितलं तर तो नक्कीच ऐकेल. खरं सांगते, माझं तर टेन्शन खूपच कमी झालं.’’

इतक्‍यात नेहाचे आणि पालवीचे बाबा सगळ्यांसाठी चहा-फराळ घेऊन आले आणि पुढच्या खुसखुशीत गप्पा चहामध्ये विरघळू लागल्या.

गृहपाठ पालकांसाठी :

  • अभ्यास करताना मुलांना तुमचा सहभाग नको असतो, तर सहवास हवा असतो. 
  • सक्ती आणि अभ्यास यांचा छत्तीसचा आकडा आहे, तर प्रेरणा आणि अभ्यास यांचा त्रेसष्टचा आकडा आहे. आता तुम्हीच ठरवा की तुम्हाला ३६ व्हायचं आहे की ६३?
  • मुलांच्या बाबतीत शिक्षा करून कुठलाच प्रश्‍न सुटत नाही तर तो अधिक चिघळतो. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला आपल्या मुलाला शिक्षा करण्याची इच्छा होईल तेव्हा तेव्हा आपलं मन मोठं करून मुलाला अधिकाधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा. मग मुलं तुमच्यातलं प्रेम ओळखतात आणि त्याला तसाच प्रतिसाद देतात. 
  • मुलांना त्यांच्या पद्धतीनं अभ्यास करण्याचं स्वातंत्र्य देणं हे सुजाण पालकत्व आहे.

‘आपण ज्यांच्यावर प्रेम करतो, त्यांना शिक्षा करू शकत नाही,’ ही अत्यंत महत्त्वाची प्राचीन चिनी म्हण नेहमी लक्षात ठेवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com