ककारू खेळ (राजीव तांबे)

ककारू खेळ (राजीव तांबे)

अन्वय म्हणाला : 'आमचेही बहुधा ५२ झाले असावेत; पण आम्ही काही मोजलेले नाहीत.'' कुणीतरी विचारलं : 'अरे हो, पण या खेळाचं नाव काय? म्हणजे, आपण कुठला खेळ खेळलो म्हणून आपल्या मित्रांना सांगायचं?'' 'अं ऽऽ या खेळाचं नाव प्रत्येक वेळी बदलत असतं... म्हणजे आज या खेळाचं नाव आहे 'ककारू' खेळ!'' अन्वयनं सांगितल्यावर सगळेच किंचाळले : 'का ऽऽ य? हे काय विचित्र? ही कुठली भाषा?'' 
 

आज संध्याकाळी पार्थच्या घरी सगळे जरा लवकरच जमले होते. आज संध्याकाळचा जीभ खवळणारा चमचमीत, नाकानं सूं-सूं करावं लागेल असा झणझणीत आणि कानातून धूर येऊ शकेल असा सणसणीत झणका खाना मुलं तयार करणार होती आणि मोठी माणसं आरामात बसून खाणार होती. पदार्थ तयार करणं, ते सगळ्यांना देणं आणि नंतर भांडी घासून स्वच्छं करणं ही सगळी कामं मुलांनी वाटून घेतली होती. पदार्थ तयार करताना काही अवघड ठिकाणी शंतनूचे बाबा आणि नेहाचे बाबा मुलांना मदत करणार होते. ‘मदत करणार होते’ म्हणजे जर मुलांनी मदत मागितली तरच मदत करणार होते. 

चटकदार चमचमीत भेळ, गरमागरम झणझणीत रगडा पॅटिस आणि तिखट सणसणीत पाणीपुरी असा रग्गड बेत होता. सगळ्यात आधी भेळ. मग ब्रेक के बाद रगडा पॅटिस आणि पाणीपुरीची भैरवी असं ठरलं होतं. 

भेळ चापल्यानंतर नाक-तोंड पुसत सगळे खेळायला बसले. अन्वय म्हणाला : ‘‘आजचा खेळ आपण तीन गटांत खेळणार आहोत. तसा हा खेळ कितीही गटांत खेळता येऊ शकतो; पण आपण सहाजण असल्यानं आपण तीन गटांत खेळू. ’’ ...तर प्रथम गट तयार करू या. 

पार्थ म्हणाला : ‘‘मी आणि नेहा एका गटात*’’ 
पालवी म्हणाली : ‘‘मी आणि शंतनू दुसऱ्या गटात.’’ 
आता उरलेले अन्वय आणि वेदांगी तिसऱ्या गटात. 

अन्वय म्हणाला: ‘‘समोरच्या भांड्यात तीन चिठ्ठ्या ठेवल्या आहेत. प्रत्येक गटानं एक चिठ्ठी घ्यायची; मग मी सांगतो काय करायचं ते...’’

पहिल्या गटाच्या चिठ्ठीत लिहिलं होतं : रुमाल. 
दुसऱ्या गटाच्या चिठ्ठीत लिहिलं होतं : काठी. 
तिसऱ्या गटाच्या चिठ्ठीत लिहिलं होतं : कप. 
पार्थ म्हणाला : ‘‘मला खेळ कळला आहे. काठीला रुमाल बांधायचा आणि त्यात कप ठेवायचा किंवा रुमाल आणि काठी कपात ठेवायची. हो की नाही?’’ 
सगळेच फसफसून आणि खसखसून हसत होते. 

अन्वय म्हणाला : ‘‘पार्थ म्हणतो त्यानुसार खेळता येईल; पण मी जरा वेगळा खेळ सांगणार आहे. रुमाल, काठी आणि कप यांचा उपयोग करून तुम्हाला प्रत्येकी किमान 40 ते 45 गोष्टी किंवा क्रिया सांगता आल्या पाहिजेत, म्हणजे हे वापरून काय वेगळं करता येईल आणि कुठल्या वेगवेगळ्या क्रिया दाखवता येतील. उदाहरणार्थ: समजा आपण ‘बशी’ घेतली तर आपल्याला काय काय सांगता येईल? तर खाणं, चाटणं, निवडणं, पाखडणं, चिवडणं इत्यादी. तर सगळ्यांना खेळ कळला आहे का?’’ 

ढेकरा देत सगळे म्हणाले : ‘‘हो ऽऽ हो’’

आपल्याकडं वेळ आहे फक्त 28 मिनिटं आणि आपल्या शोधायच्या आहेत किमान 50 क्रिया-गोष्टी. आप का समय शुरू होता है अब... 

नेहा चिरचिरत म्हणाली : ‘‘पन्ना ऽऽ स गोष्टी? त्या कशा काय शोधायच्याऽऽ?’’ ‘‘कशा काऽऽय म्हणजे? डोकं वापरून शोधायच्या,’’ असं पार्थनं म्हणताच एकच धमाका झाला. 

तिन्ही गट तीन वेगवेगळ्या कोपऱ्यात गेले. कोपऱ्यात मुलांची खुसफूस सुरू झाली. 

बरोब्बर 28 मिनिटांनी अन्वयनं टाळ्या वाजवल्या आणि सगळे एकत्र जमले. 

पालवी म्हणाली :‘‘आम्ही आधी वाचणार. आमच्या गटासाठी होती ‘काठी.’’आता तुमच्या लागेल पाठी. 

 उकरणं  खणणं  तोलणं  ढवळणं  उचलणं 
 खुपसणं  उभी करणं  आडवी करणं  फेकणं 
झेलणं  मारणं  रंगवणं  गरगर फिरवणं  खेळणं 
 तोडणं  कापणं  जाळणं  धूर करणं  पुरणं 
 घासणं  टोचणं  फटका देणं  हवेत फिरवून आवाज
काढणं  तुकडे करणं  मोजणं  चावणं  आधार देणं
 कपडे वाळत घालणं  उंच उडवणं  तरंगणं 
 बुडणाऱ्याला वाचवणं  ढकलणं  खुपसून गोल फिरवणं 
 ठोकणं  शिकार करणं  कावड करणं  कुबडी करणं 
 अटकाव करणं  लांबची वस्तू दाखवणं  रोखणं 
 हाणणं  काठीच्या मदतीनं उडी मारणं 
 काठीवरून चालणं  भाजणं  गडगडत जाणं  सोल
 किसणं  भुगा करणं  ठिसूळ होणं  थापटणं.

सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवल्या. 

शंतनू म्हणाला : ‘‘आमचे बरोब्बर 50 झाले. आम्हाला आणखीही सुचत होते; पण काय करणार? वेळच संपला ना...’’  मुलांनी वाजवलेल्या टाळ्यांचा अर्थ मोठ्या माणसांनी वेगळाच घेतला. त्यांना वाटलं की मुलांन रगडा पॅटिस खायची घाई झाली आहे. मोठी माणसं किचनकडं धावली. 

शंतनू म्हणाला : ‘‘व्वा, व्वा! आमचे बरोब्बर 50 झाले म्हणून आता 100 टक्के रगडा हो जाय.’’ 

हा गरमागरम विषय निघाल्यावर मग सगळ्यांनीच एक छोटा ब्रेक घेतला. तोंड पुसत पार्थ म्हणाला : ‘‘आता आमची पाळी. खरं म्हणजे आमचा गट क्रमांक 1 आहे. म्हणजे आम्हीच आधी सांगायला पाहिजे होतं. आमच्या गटासाठी आहे ‘रुमाल.’ आता पाहा...रुमाल की कमाल की धमाल. 

 पिळणं  झटकणं  चोळणं  पुसणं  गाळणं 
 भिजवणं  सुकवणं  घडी करणं  चोळामोळा कर
 फाडणं  शिवणं  कुरतडणं  जिरवणं  शोषणं 
 फडकवणं  गाठ मारणं  गरगर फिरवणं  फेकणं 
 भिरकावणं  धुणं  उडवणं  बांधणं  टिपणं 
 लपेटणं  झाकणं  ओढणं  खुपसणं  छिद्र पाडणं 
 पारदर्शी असणं  ताणणं  टांगणं  सुरनळी करणं 
 पेटवणं  चुंबळ करणं  विझविणे  बुडवणं 
 इशारा करणं  बुचकळणं  बोळा करणं  कोंबणं 
 कापणं  तुकडे करणं  उसवणं  घासणं  चुबकणं 
 बांधणं  गच्च बांधणं  रंगवणं  चुरचुरीत होणं 
 रंग विटणं  निरगाठी मारणं  सुरगाठी मारणं 

‘‘हा ऽऽ हा! आमचे 52 झाले आहेत. ‘आम्ही हुशार आहोत,’ हे सांगताना आम्हाला जरा अवघडल्यासारखं होत आहे, म्हणून आमचा गट तर नंबर 1 आहेच; पण आम्हीही नंबर एकच आहोत.’’ पार्थच्या या ‘हुशारीच्या बोलण्यावर’ सगळ्यांनी माना डोलवत; पण एकमेकांकडं हळूच बघून हसत त्याला शाबासकी दिली. 

‘‘आता होता गट क्रमांक 3,’’ वेदांगी म्हणाली : ‘‘आमच्या गटासाठी आहे ‘कप.’ आता तुम्ही आमच्या गोष्टी ऐकाल तर बसाल गप.’’ 

 पिणं   चाटणं   गिळणं   फूंक मारणं   ढवळणं 
  हलवणं   उंच उडवणं   टिचक्‍या मारणं 
  कान दाखवणं   तळ गाठणं   विरघळवणं 
  साका तयार करणं   कडा दाखवणं   गोल दाखवणं 
  चिकटणं   खरवडणं   द्रव दाखवणं   घट्ट पदार्थ
  ओतणं   धार पाडणं   वाफा येणं   नासणं 
  फुटणं   ठिकऱ्या होणं   जोडणं   धुणं 
  विसळणं   खळबळवणं    पुसणं   टिपणं 
 बुडवणं  चिकट होणं  खराब होणं  डाग पडणं 
 कान तुटणं  पडणं  फेकणं  खळ्ळ्‌ खट्यॅक्‌ आवाज
होणं  भिरकावणं  झेलणं  कपात तोंड घालून बोलणं 
 काठोकाठ भरणं  कप कानाला घट्ट लावून घुमणारा 
आवाज ऐकणं  कपाच्या कानात बोट अडकवून कप 
गरागरा फिरवणं  कप फिरवून त्याच्या कानाचा उपयोग 
करून दिशा दाखवणं  धारभोळ भरणं  अर्धा भरणं 
 कपाचा उपयोग करून गोल काढणं  रंगवणं  बुडवणं 
 तरंगवणं  द्रव आणि लगदा यातला फरक दाखवणं.

अन्वय म्हणाला : ‘‘आमचेही बहुधा 52 झाले असावेत; पण आम्ही काही मोजलेले नाहीत.’’ 
‘‘अरे हो, पण या खेळाचं नाव काय? म्हणजे, आपण कुठला खेळ खेळलो म्हणून आपल्या मित्रांना सांगायचं?’’ 

‘‘अं ऽऽ या खेळाचं नाव प्रत्येक वेळी बदलत असतं... म्हणजे आज या खेळाचं नाव आहे ‘ककारू’ खेळ! 

सगळेच किंचाळले : ‘‘का ऽऽ य? हे काय विचित्र? ही कुठली भाषा?’’

अन्वय शांतपणे म्हणाला :‘‘क-का-रू म्हणजे कप, काठी आणि रुमाल खेळ! कळलं? खेळताना वस्तू बदलल्या की खेळाचं नाव बदलणार ना? का ऽऽ य?’’

सगळेच आनंदानं म्हणाले : ‘‘झंडू का फंडू हा खेळ गुंडू.’’

आता आपण या खेळाचा पुढचा भाग खेळणार आहोत... 

इतक्‍यात अन्वयला थांबवत पालवी, वेदांगी आणि नेहा म्हणाल्या : ‘‘प्लीज, आज नको...आज आम्हाला डान्स प्रॅक्‍टिसला जायचं आहे. तिथं उशीर होऊन चालणार नाही.’’

त्यांना थांबवत शंतनूनं विचारलं : ‘‘मऽऽ पाणीपुरीचं काय’’...? 

‘‘व्वा रे व्वा! पाणीपुरी खाऊनच आम्ही जाणार आहोत ना...’’ असं म्हणत सगळे शॉक लागल्यासारखे उठले आणि आनंदाने ओरडले : ‘‘ओके बोके पक्के तर काम शंभर टक्के’’ 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com