‘मूड’ मॉन्सूनचा (डॉ. रंजन केळकर)

डॉ. रंजन केळकर
रविवार, 1 ऑक्टोबर 2017

सप्टेंबर महिना सरला, तरी मॉन्सून अजून काढता पाय घेण्याची चिन्हं नाहीत. यंदाचा मॉन्सून एकूणच अनेक प्रकारे वैशिष्टपूर्ण ठरला. त्याचं वितरण असमान होतंच; पण त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे एकूणच हवामान अंदाज, हवामानशास्त्र विभाग चर्चेत राहिले. यंदाच्या मॉन्सूनचं नेमकं वेगळेपण काय, ‘पर्जन्यमाना’पेक्षा सर्वसामान्यांचं ‘पर्जन्यभान’ वाढलं आहे का, यंदाचा मॉन्सून ‘स्वच्छंद’पणे बरसण्याचं नेमकं कारण काय, सरासरीएवढा मॉन्सून म्हणजे आदर्श स्थिती आहे का आदी विविध प्रश्‍नांचं वैज्ञानिक विश्‍लेषण.

सप्टेंबर महिना सरला, तरी मॉन्सून अजून काढता पाय घेण्याची चिन्हं नाहीत. यंदाचा मॉन्सून एकूणच अनेक प्रकारे वैशिष्टपूर्ण ठरला. त्याचं वितरण असमान होतंच; पण त्याच्याशी संबंधित अनेक महत्त्वाच्या घटनांमुळे एकूणच हवामान अंदाज, हवामानशास्त्र विभाग चर्चेत राहिले. यंदाच्या मॉन्सूनचं नेमकं वेगळेपण काय, ‘पर्जन्यमाना’पेक्षा सर्वसामान्यांचं ‘पर्जन्यभान’ वाढलं आहे का, यंदाचा मॉन्सून ‘स्वच्छंद’पणे बरसण्याचं नेमकं कारण काय, सरासरीएवढा मॉन्सून म्हणजे आदर्श स्थिती आहे का आदी विविध प्रश्‍नांचं वैज्ञानिक विश्‍लेषण.

ॡत्य मॉन्सूनची ओळख करून द्यायची झाली, तर तो भारतात दर वर्षी न चुकता येणारा एक पाहुणा आहे, असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्याची आपण आतुरतेनं वाट पाहतो, त्याचं स्वागत करतो, चार महिने त्याच्या सहवासाचा लाभ घेतो; पण शेवटी इतर कोणत्याही पाहुण्यासारखी त्याचीही परत जायची वेळ येते. साधारणपणे एक जूनच्या सुमारास मॉन्सून केरळवर दाखल होतो आणि एक सप्टेंबरच्या आसपास तो पश्‍चिम राजस्थानवरून परत निघतो. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही तारखा क्वचितच काटेकोरपणे पाळल्या जातात. यंदाच्या वर्षी मॉन्सूननं अगदी २९ सप्टेंबरपर्यंत परत निघायचं नावच घेतलेलं नाही. दर वर्षी येणाऱ्या या आपल्या पाहुण्याचा मुक्काम यंदा जवळजवळ एका महिन्यानं लांबला आणि आता कुठं तो परत जायच्या तयारीत आहे. यंदाचा मॉन्सून अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण ठरला, त्यामुळं एकूणच यंदाच्या मॉन्सूनचा आढावा घ्यायची आता वेळ आली आहे. 

नाराजी आणि विनोदही...
अलीकडच्या काळात हवामानशास्त्रानं जगभरात आणि विशेषतः भारतात खूप प्रगती केली असल्याचं आपल्याला मानावंच लागेल. भारतीय लोक परदेशात जाऊन आल्यावर नेहमीच तिकडच्या हवामानाच्या अंदाजांची वाखाणणी करत असतात. भारतीय हवामानशास्त्र विभागानं आता अत्याधुनिक डॉप्लर रडारचं जाळं देशभर पसरवलं आहे. इस्रोचे दोन संवेदनशील उपग्रह वातावरणाचं अहोरात्र निरीक्षण करत आहेत. देशात ठिकठिकाणी स्वयंचलित उपकरणे बसवली गेली आहेत. परदेशाहून सक्षम मॉडेल्स आयात केली गेली आहेत आणि त्यांचा वापर करण्यासाठी अतिशक्तिशाली संगणक उपलब्ध आहेत. अशा सर्व अद्ययावत सुविधांनी भारतीय हवामान खातं आज सुसज्ज झालं असल्याचं आपण पाहत आहोत. अर्थात तरीसुद्धा इतर देशांसारखं भारतीय हवामान खातंही अचून अंदाज का वर्तवू शकत नाही, असा प्रश्‍न सर्वसामान्य जनतेला पडतो. 

भारताच्या वातावरणावर जून ते सप्टेंबर या चार महिन्यांत नैॡत्य मॉन्सूनचं साम्राज्य असतं. जूनच्या आधीच मॉन्सूनच्या आगमनाचे वेध लागतात आणि सप्टेंबरच्या अंती तो तातडीनं परततो, असंही नाही. म्हणून वर्षातले सहा महिने आपल्या देशात मॉन्सूनची चर्चा होत राहिली, तर त्यात नवल नाही. या काळात हवामानशास्त्र विभाग विविध स्तरांवर आपले पावसाचे अंदाज वर्तवत राहतो. लोक पावसाइतकीच त्या अंदाजांची आतुरतेनं वाट पाहत असतात; पण पुष्कळदा त्यांचं समाधान होत नाही. मग हवामानाचा अंदाज एक चर्चेचा आणि कधी कधी विनोदाचाही विषय बनतो. 
नेहमीप्रमाणे यंदाच्या मॉन्सूनच्या दरम्यानही हवामानाच्या अंदाजांविषयी व्यंग्यचित्रं रेखाटली गेली. एवढंच नाही, तर दोन घटनांमुळं हवामान खातं जास्त चर्चेत आलं.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार ऑगस्टमध्ये म्हणाले ः ‘‘हवामान खात्याची भाकितं इतक्‍यांदा चुकली आहेत, की या वेळी त्यांचा अंदाज बरोबर आला, तर मी स्वतः हवामानशास्त्रज्ञांच्या तोंडात साखर घालीन.’’ प्रत्यक्षात त्यानंतरच्या तीन-चार दिवसांत हवामानशास्त्र विभागानं सांगितल्याप्रमाणं राज्यात खरोखरच सर्वदूर भरपूर पाऊस पडला. विशेष म्हणजे पवार यांच्या कार्यकर्त्यांनी खरोखर पुण्याच्या सिमला ऑफिसच्या भव्य वास्तूमध्ये काम करणाऱ्या शास्त्रज्ञांना भेट म्हणून साखरेचं एक पोतं दिलं. असाच आणखी एक प्रकार यंदा घडला.

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका घटनेबाबत थेट नाराजी व्यक्त केली. यामागची पार्श्वभूमी सांगायची, तर २६ जुलै २००५ रोजी मुंबईत पडलेल्या अभूतपूर्व पावसामुळं निर्माण झालेली भयानक परिस्थिती मुंबईकर अजून विसरलेले नाहीत. तशी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये म्हणून गेल्या बारा वर्षांत अनेक उपाय केले गेले असले, तरीसुद्धा मुंबईकरांच्या मनातली भीती संपूर्णपणे नाहीशी झालेली नाही. यंदा २९ ऑगस्टला ती सुप्त भीती जागृत झाली, असं म्हणायला हरकत नाही. त्या दिवशी काही तासांच्या अवधीत कोसळलेल्या मुसळधार पावसानं मुंबई पुन्हा एकदा जलमय झाली. तरी पण परिस्थिती बहुतांशी आटोक्‍यात राहिली. मात्र, त्यानंतर झालं असं, की दुसऱ्या दिवशीही म्हणजे ३० ऑगस्ट रोजी तसाच पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान खात्याकडून वर्तवली गेली. यावेळी मात्र तितक्‍या मोठ्या प्रमाणात पाऊस पडला नाही. हवामान अंदाजाच्या आधारावर राज्य सरकारनं ३० ऑगस्टला सरकारी कार्यालयांना आणि शैक्षणिक संस्थांना सुटी दिली आणि लोकांना घराबाहेर न पडण्याचा सल्ला दिला; पण सरकारनं घेतलेले हे खबरदारीचे उपाय काहीसे व्यर्थ ठरले. त्यामुळं या संदर्भात फडणवीस यांनी केंद्रीय पृथ्वीविज्ञान विभागाचे मंत्री डॉ. हर्षवर्धन यांना एक पत्र लिहून हवामान खात्याच्या चुकीच्या अंदाजाबद्दल आपली नाराजी व्यक्त केली. 

मुंबईत पाऊस कुठं, कधी आणि किती पडणार याचं भाकित करण्याचं काम निर्विवादपणे हवामान खात्याचं आहे. ते भाकीत अचूक ठरावं म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करणं हवामान खात्याकडून अपेक्षित आहे; पण पावसाच्या रूपानं पडलेल्या पाण्याचा निचरा करण्याची जबाबदारी हवामान खात्याची निश्‍चितपणे नाही. इथं एक गोष्ट लक्षात घेण्यासारखे आहे, ती म्हणजे मुंबईत पुन्हा एकदा म्हणजे १९ सप्टेंबर रोजी तशीच परिस्थिती उद्भवली. मुंबईवर पूर्ण सप्टेंबर महिन्यात जेवढा पाऊस अपेक्षित असतो, तेवढा पाऊस अवघ्या २४ तासांत कोसळला. यावेळी मात्र हवामानाचा अंदाज व्यवस्थितपणे दिला गेला होता, शासकीय यंत्रणा सज्ज होती आणि मुंबईचं जनजीवन तुलनेनं फारसं विस्कळित झालं नाही. हे प्रशंसनीय नाही का? मात्र, एकूणच यंदा सर्वांचं ‘पाऊसभान’ खूप जागृत झाल्याचं जाणवलं.

‘सरासरी’चा अंदाज
हवामान खात्याकडून मॉन्सूनच्या पर्जन्यमानाचं दीर्घावधी पूर्वानुमान दोन टप्प्यांत केलं जातं. त्या प्रथेनुसार यंदाच्या मॉन्सूनसाठीचं पहिलं पूर्वानुमान एप्रिल महिन्याच्या मध्यावर घोषित करण्यात आलं. देशात जून-सप्टेंबर या चार महिन्यांतलं एकूण पर्जन्यमान सरासरीच्या ९६ टक्के राहील, असा अंदाज वर्तवण्यात आला. हवामान खात्याच्या व्याख्येनुसार, त्याला ‘सामान्य किंवा सरासरी मॉन्सून’ म्हटलं गेलं. त्याशिवाय पावसाचं वितरण समसमान राहण्याची चांगली शक्‍यता आहे, असंही सांगण्यात आलं. ही गोड बातमी लोकांच्या मनात ताजी असतानाच, नैॡत्य मॉन्सून अंदमान-निकोबारमध्ये १४ मे २०१७ रोजी म्हणजे सहा दिवस आधीच दाखल झाला आहे, असं हवामानशास्त्र विभागानं जाहीर केलं. नैॡत्य दिशेनं वाहणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह अधिक प्रबळ बनल्यामुळं तो केरळवर वेळेआधी पोचेल, अशी एक आशा लोकांच्या मनात निर्माण झाली आणि राज्यातली जनतासुद्धा आतुरतेनं आकाशाकडं बघू लागली. प्रत्यक्षात मात्र देशाच्या मुख्य भूमीवर मॉन्सूनचं व्हावं तसं जोरदार आगमन झालं नाही. राज्याच्या सीमेवर मॉन्सून अनेक दिवस खोळंबून राहिला. शेतकऱ्यांच्या आशेचं निराशेत रूपांतर झालं. मॉन्सूनच्या आगमनाच्या आधारावर केल्या गेलेल्या पेरण्या वाया गेल्या आणि शेतकऱ्यांना दुबार पेरणीचं संकट झेलावं लागलं. अनेकांनी नेहमीच्या पिकांऐवजी दुसरी पिकं निवडली. 

असमान वितरण
यंदाच्या मॉन्सूनच्या पावसाचं वितरण समसमान होईल, हे हवामान खात्यानं व्यक्त केलेलं दीर्घावधी पूर्वानुमान चुकत असल्याचं निदर्शनास आलं.       

यंदाचा पाऊस शेतकऱ्यांच्या अपेक्षेनुसार पडला नाही, हेही मान्य करावे लागेल. शेतीसाठी पाऊस नको असताना अतिवृष्टी आणि पाऊस गरजेचा असताना कोरडं आकाश अशी परिस्थिती अनेकदा उद्भवली. तिचा कृषी उत्पादनावर नेमका काय परिणाम झाला असावा, हे कालांतरानं स्पष्ट होईल; पण काही विपरीत चिन्हं आताच दिसू लागली आहेत. यंदाच्या खरीप हंगामाचं अन्नधान्य उत्पादन गेल्या वर्षापेक्षा २.८ टक्के कमी राहील, अशी शक्‍यता केंद्र सरकारच्या कृषी विभागानं नुकतीच व्यक्त केली आहे. खाद्यतेलाच्या बाबतीत तर ७.७ टक्के घट होण्याची शक्‍यता वर्तवण्यात आली आहे. अर्थात सप्टेंबरच्या शेवटीशेवटी पडलेला चांगला पाऊस रब्बी पिकांसाठी लाभदायक ठरणार आहे. 

यंदाच्या मॉन्सूनचे एकंदर पर्जन्यमान सरासरीपेक्षा केवळ पाच टक्के कमी राहिलं आणि हवामान खात्याचं दीर्घावधी पूर्वानुमान त्या बाबतीत खरं ठरलं असलं, तरी पावसाचं वितरण समसमान झालं नाही, ही एक महत्त्वाची बाब आहे. यंदाच्या मॉन्सूनचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे देशाच्या विविध भागांत आलेले महापूर. १५ ऑगस्टला देश स्वातंत्र्यदिन उत्साहानं साजरा करत असताना बिहार, झारखंड, पश्‍चिम बंगाल, आसाम, अरुणाचल, नागालॅंड, मणिपूर आणि ओडिशा अशी अनेक राज्यं पूरपरिस्थितीचा सामना करण्यात गुंतलेली होती. बिहारमध्ये तर जुलैमध्ये इतका कमी पाऊस पडला होता, की तिथं दुष्काळाची चिंता होती; पण ऑगस्टच्या मध्यावर परिस्थिती एकाएकी बदलली. अचानकपणे इतका पाऊस पडला, की लाखो लोक पूरग्रस्त झाले, त्यांना सुरक्षित जागी हलवावं लागलं आणि त्यांची मदत शिबिरांमध्ये सोय करावी लागली. बिहारच्या कोसी नदीचा नेपाळमध्ये उगम आहे. तिथं अतिवृष्टी झाली, की बिहारमध्ये महापूर येतो. यंदाही तसंच घडलं. 

गुजरातमध्येही अतिवृष्टी 
गुजरातमध्ये अतिवृष्टी क्वचितच होते. यंदा जुलै महिन्याच्या शेवटीशेवटी मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर एकाच वेळी उद्भवलेल्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळं गुजरातला पावसानं झोडपून काढलं. अनेक ठिकाणी सरासरीच्या दुप्पट-तिप्पट पर्जन्यवृष्टी झाली. पाऊस अनेक दिवस टिकून राहिला आणि त्यानं शंभर वर्षांचा विक्रम मोडला. पिकं वाहून गेली, साठ जणांचा मृत्यू झाला, जनजीवन विस्कळित झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः हवाई पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. आसामच्या जनतेसाठी ब्रह्मपुत्रेचा महापूर ही एक नित्याची बाब आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात मात्र आसामला गेल्या तीन दशकांतल्या सर्वांत गंभीर परिस्थितीला तोंड द्यावं लागलं. दोन लाख लोकांसाठी मदत शिबिरं उभारण्यात आली. काझिरंगा राष्ट्रीय अभयारण्याचा विस्तृत भाग पाण्याखाली आला.  

मॉन्सूनच्या पर्जन्यमानाच्या गणतीसाठी एक जून ते तीस सप्टेंबर हा कालावधी विचारात घेतला जातो. त्यानुसार हवामानशास्त्र विभाग आपली अधिकृत आकडेवारी लवकरच जाहीर करील; पण एक जून ते २७ सप्टेंबर २०१७दरम्यानच्या पर्जन्यमानाची आकडेवारी विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. देशाच्या ६३० जिल्ह्यांपैकी निम्म्या जिल्ह्यांना सरासरीएवढं एकूण पर्जन्यमान लाभलेलं आहे, ही चांगली गोष्ट आहे; परंतु २१० म्हणजे देशातल्या एकतृतियांश जिल्ह्यांना सरासरीच्या वीस टक्‍क्‍याहून कमी पाऊस मिळाला आहे, ही बाब चिंतेची आहे. उर्वरित वर्षात ज्यांना पावसाचा तुटवडा झेलावा लागणार आहे, असे हे २१० जिल्हे पंजाब, हरियाना, दिल्ली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश या राज्यांत आणि महाराष्ट्रात प्रामुख्यानं विदर्भात मोडतात.

महाराष्ट्रात ‘कहीं खुशी कहीं गम’ 
महाराष्ट्रातले कोरडे जिल्हे आहेत गोंदिया (-३७ टक्के), यवतमाळ (-३३ टक्के), चंद्रपूर (-३२ टक्के), अमरावती (-२९ टक्के), वाशिम (-२८ टक्के), हिंगोली, भंडारा (-२७ टक्के), गडचिरोली (-२३ टक्के), अकोला, नांदेड (-२१ टक्के), आणि परभणी (-२० टक्के). मात्र, त्यापेक्षाही समाधानाची बाब म्हणजे यंदा मध्य महाराष्ट्रातल्या आणिमराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यांना सरासरीपेक्षा अधिक पाऊस लाभलेला आहे. नगर (+५९ टक्के), पुणे (+५४ टक्के), ठाणे (+३४ टक्के), नाशिक (+३३ टक्के), उस्मानाबाद (+२८ टक्के), सोलापूर (+२७ टक्के), पालघर (+२६ टक्के) या जिल्ह्यांत चांगली स्थिती आहे. वीस सप्टेंबरच्या सुमारास पडलेल्या मुसळधार पावसामुळं जायकवाडी घरण तुडुंब भरलं आणि नऊ वर्षांत पहिल्यांदाच त्याचे दरवाजे उघडून धरणातलं पाणी सोडावं लागलं. त्याच सुमारास खडकवासला, पानशेत, कोयना आदी धरणांचेही दरवाजे उघडावे लागले होते. 

मॉन्सूनची ‘स्वच्छंदी खेळी’
प्रशांत महासागराचा विषुववृत्तीय भाग सरासरीपेक्षा खूप तापतो, तेव्हा तिथं ‘एल्‌ निनो’ उद्भवला आहे, असं म्हटलं जातं. त्याउलट जेव्हा समुद्राचं तापमान सरासरीपेक्षा खूप कमी होते, तेव्हा ‘ला निना’ निर्माण झाल्याचं म्हटलं जातं. भारतीय मॉन्सूनचा पाऊस आणि प्रशांत महासागरीय तापमान यांच्यात खऱ्या अर्थानं एकास-एक असा सहसंबंध अजून प्रस्थापित झालेला नाही; पण ज्या वर्षी ‘एल्‌ निनो’ निर्माण होतो, त्या वर्षी भारतीय मॉन्सूनसाठी तो एक धोक्‍याचा इशारा मानला जातो आणि त्याच्या उलट ‘ला निना’ मॉन्सूनसाठी एक शुभचिन्ह समजलं जातं. गेल्या अनेक वर्षांत ‘एल्‌ निनो’ आणि ‘ला निना’ हे बहुचर्चित विषय बनले आहेत. भारतीय मॉन्सूनच्या संदर्भात जे काही बरेवाईट घडतं, त्याचं मूळ प्रशांत महासागराच्या तापमानात आहे, असं शास्त्रज्ञ सांगत आले आहेत; पण ते सर्वस्वी खरं नाही. अनेक वर्षी ‘एल्‌ निनो’ असूनही भारतात चांगला पाऊस पडल्याची उदाहरणं आहेत. तरीही ‘एल्‌ निनो’च्या आधारावर भारतात भीतीचं वातावरण तयार करणारे अनेक परदेशी शास्त्रज्ञ आहेत. भारतीय मॉन्सून जणू ‘एल्‌ निनो’चा गुलाम आहे, अशी निराधार कल्पना ते पसरत असतात. 
या सगळ्या पार्श्‍वभूमीवर यंदा एक विशेष गोष्ट घडली. प्रशांत महासागराचं विषुववृत्ताजवळचं तापामान सरासरीच्या तुलनेत कमीही झालं नाही वाढलंही नाही. ते सरासरीएवढंच राहिले. म्हणून या वर्षी ‘एल्‌ निनो’ आणि ‘ला निना’ या सुप्रसिद्ध प्रक्रियांची निर्मिती झालीच नाही. त्यामुळं या वर्षीच्या मॉन्सूनवर त्यांचा प्रभाव पडण्याचा प्रश्नच नव्हता आणि हवामानशास्त्रज्ञांना त्यांचा उल्लेखही करता आला नाही. थोडक्‍यात म्हणजे यंदाचा मॉन्सून कोणाच्याही दबावाखाली किंवा प्रभावाखाली न राहता स्वच्छंदपणे स्वतःची खेळी खेळायला मोकळा झाला. अशा प्रकारची उदाहरणं फार कमी आहेत आणि त्यांच्यावर सखोल संशोधन व्हायला हवं.  

‘सामान्य मॉन्सून’ म्हणजे काय?
आणखी एक महत्त्वाचा प्रश्न विचारात घेतला पाहिजे, तो म्हणजे ‘सामान्य मॉन्सून’ खरोखर कसा असावा, याची एक व्यापक सर्वमान्य अशी व्याख्या करता येईल का? सध्या तरी ते शक्‍य नाही. कारण लोकांच्या मनात मॉन्सूनविषयी विभिन्न संकल्पना आहेत, ज्यांचा मेळ घालणं कठीण आहे. शेतकऱ्यांची मुख्य गरज ही आहे, की मॉन्सून निर्धारित तारखेला यावा, मग पेरण्या पार पडल्यानंतर पावसाच्या हलक्‍या सरी पडत राहाव्यात, आकाश सारखंच ढगाळ राहू नये म्हणजे पिकांवर रोग पडणार नाहीत, ऐन कापणीच्या समयी पाऊस पडू नये. शहरी लोकांना वाटतं, की मुसळधार सरी कोसळू नयेत, झाडं पडू नयेत, रस्त्यावरचं पाणी वाहून जावं, जनजीवन सुरळीत चालू राहील एवढाच पाऊस पडावा. पिण्याच्या पाण्याचं आणि सिंचनाचं नियोजन करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची इच्छा असते, की लोकांच्या आणि शेतीच्या गरजा भागतील एवढा पाण्याचा साठा नेहमीच घरणांत आणि तळ्यांत उपलब्ध असावा, मॉन्सूनचा पाऊस थांबण्यापूर्वी धरण पूर्ण भरलेलं असावं, म्हणजे बाकीच्या महिन्यांत पाणीकपात करावी लागणार नाही. पर्यटकांना वाटतं, की त्यांना पावसाची मजा लुटता यावी म्हणून पाऊस शनिवार-रविवारी पडावा. 

हवामानशास्त्रज्ञ ज्याला ‘सामान्य मॉन्सून’ म्हणतात, तो कोणत्याही दृष्टीनं आदर्श मॉन्सून नसतो. ते केवळ अनेक वर्षांच्या आणि विविध प्रदेशांवरच्या पर्जन्यमानाची सरासरी काढतात आणि जो मॉन्सून सरासरीइतका पाऊस देतो, त्याला ते ‘सामान्य’ म्हणतात. रोजच्या जीवनात जेव्हा उल्लेखनीय असं काहीच नसतं, तेव्हा आपण ‘सामान्य’ असा शब्दप्रयोग करतो. एखाद्या विद्यार्थ्याची प्रगती सामान्य असली, तर तो प्रशंसापात्र ठरत नाही. सामान्य माणूस म्हणजे ज्याला जगात कोणतंच महत्त्वाचं स्थान नाही अशी व्यक्ती. सामान्य मॉन्सूनची हवामानशास्त्रीय संकल्पना अगदी अशाच प्रकारची आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे, अन्यथा आपला अपेक्षाभंग होण्याची शक्‍यता आहे. 

‘सरासरी’नं समाधान नाही
सुखांची आणि दुःखांची सरासरी काढून जीवनात समाधान मिळत नाही किंवा पाप आणि पुण्य यांची बेरीज-वजाबाकी करून मोक्षप्राप्ती होत नाही. मग अनावृष्टी आणि अतिवृष्टी यांची सरासरी काढून मॉन्सून ‘सामान्य’ असल्याचं म्हणणं कितपत बरोबर आहे? निरभ्र आकाशाची आणि ढगफुटीची सरासरी काढता येते का? अलीबागच्या आणि नगरच्या पावसाची सरासरी काढून कोणती माहिती मिळते? हवामानाचे अंदाज सबळ विज्ञानावर आधारलेले असावेत, ते अचूक ठरावेत, त्यांची भाषा सुलभ असावी, ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी हवामानशास्त्रज्ञांनी सरासरीच्या भाषेतून बाहेर पडायची आता वेळ आली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Ranjan Kelkar Monsoon