‘वेल्हाळ देशी नवी’ (सदानंद मोरे)

‘वेल्हाळ देशी नवी’ (सदानंद मोरे)

सा  तवाहनकालीन महाराष्ट्री प्राकृत आणि चक्रधर-ज्ञानेश्‍वरांची मराठी या दोन्हींच्या मधील जैनांनी संवर्धित केलेल्या मराठी भाषेच्या अवस्थेला ‘अपभ्रंश’ किंवा ‘देशी’ असंही म्हटलं जातं. ज्ञानेश्‍वरांनी आपल्या मराठीसाठी ‘प्राकृत’ आणि ‘देशी’ असे शब्द वापरले आहेत; परंतु ‘अपभ्रंश’ शब्द मात्र टाळला आहे. याचं कारण म्हणजे हा शब्द उघडउघड निंदाव्यंजक आहे.

ते काहीही असो. अधिक काटेकोरपणानं सांगायचं झाल्यास जैनांनी मराठी भाषेला नुसतंच सावरलं-सांभाळलं असं नसून, तिला धर्मभाषेची प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. चक्रधर आणि त्यांच्या महानुभाव पंथानं तिची तत्त्वज्ञानाची म्हणजे दर्शनाची भाषा म्हणून जडण-घडण केली. ज्ञानेश्‍वर आणि त्यांचे वारकरी पंथ त्या दिशेनं आणखी पुढं गेले; पण पुढं जाताना त्यांनी तत्त्वज्ञान, कला, व्यवहार अशा प्रकारच्या भाषिक प्रयोगांमधल्या सीमारेषा पुसून टाकल्या. याचं कारण म्हणजे त्यांनी मुळात जगण्यामधले असे भेदच मिटवून द्वंद्वातीत होण्याचा मार्ग पत्करला. त्यांच्या या दृष्टीचं प्रतिबिंब आपोआपच त्यांच्या भाषाव्यवहारात पडलं.

या प्रक्रियेच्या चर्चेची सुरवात करताना आपल्या मूळच्या सूत्राकडं ध्रुवपदाप्रमाणे परतायला हवं. ते सूत्र म्हणजे ‘इये मराठीचिये नगरी । ब्रह्मविद्येचा सुकाळु करी । देणे-घेणे सुखचि वरी। होऊ देई या जगा।।’

ही ओवी म्हणजे ज्ञानेश्‍वरीच्या बाराव्या अध्यायातल्या श्रीगुरुनिवृत्तिनाथ यांना अंबेच्या म्हणजे मातृदेवाच्या रूपात पाहून केलेल्या नमनातली एक ओवी आहे. मराठी भाषा हीच एक नगरी आहे, असं समजून ज्ञानेश्‍वर रूपकात्मक शैलीत बोलतात. ‘मराठी भाषेच्या या नगरात ब्रह्मविद्येचं इतकं वैपुल्य असू दे की ती देण्याचा आणि घेण्याचा असे दोन्ही व्यवहार सुखरूप होऊ दे,’ अशी ही श्रीगुरूंकडं केलेली विनवणी आहे.

ब्रह्मविद्या ही अत्यंत गहन असल्यानं मुळात ती जाणणारे थोडे, त्यातही ती दुसऱ्याला द्यायचं काम आणखी कठीण. त्यातला पहिला अडथळा म्हणजे स्त्रिया, शूद्र आणि अतिशूद्र यांना तिचा अधिकारच नाही, असं मानण्याचा!  इतकंच नव्हे तर, ज्या भाषेत ती सांगितली जाते, त्या भाषेचा म्हणजेच संस्कृतचाही अधिकार नाही. आता हा क्‍लिष्ट विषय सर्वसामान्यांना समजावून सांगायचा तोसुद्धा अशा रीतीनं, की सांगणाऱ्यालाही त्रास होऊ नये व ऐकून ग्रहण करणाऱ्यालाही त्रास होऊ नये. ज्ञान देण्याचा व ग्रहण करण्याचा असे दोन्ही व्यवहार सुखानं व्हायला हवेत. तुकोबांची भाषा वापरून सांगायचं झाल्यास ‘सुखाचे व्यवहारे सुखलाभ झाला। आनंद कोंदला मागे-पुढे’ असं व्हायला हवं.
याचा अर्थ असा होतो, की गीता हा कृष्ण आणि अर्जुन यांच्यातला संवाद असल्यामुळं मुळात कृष्णानंच अर्जुनाला तशा पद्धतीनं सांगायला हवं. ज्ञानेश्‍वर नेमकं हेच करतात. त्यांचा कृष्ण अर्जुनाला म्हणतो ः ‘‘जेणे जेणे का भेदे। चित्त तुझे बोधे। तैसे तैसे विनोदे। निरुपिजेल।।’

पण मुद्दा शैलीचा असला तरी शैलीपुरता मर्यादित नाही. ब्रह्मविद्येचं देणं-घेणं, सांगणं-ऐकणं, समजणं-समजावणं हे जर असं सुखरूप (केवळ सुलभ-सोपं नव्हे!) व्हायचं असेल तर पारंपरिक न्यायघटित, व्याकरणमीमांसेनं घडवलेली शैली वापरून चालणार नाही, हे उघड आहे. कारण, या शैलीच्या अंतर्गतही सुलभीकरणाची सोय आहे. अन्नंभट्टाच्या ‘तर्कसंग्रह’ या न्यायावरच्या पुस्तकात ते ‘बालानां सुखबोधनाय’ असल्याचं म्हणजेच बालबोध म्हणता येईल अशा शैलीत लिहिलं असल्याचं लेखकानंच सांगितलं आहे. त्या प्रकारचा अवघड आणि सोप्या शैलींमधला भेद ज्ञानेश्‍वरांना अभिप्रेत नाही. त्यांना निरुपणातलं एकूणच प्रमाणपरिवर्तन (Paradigm shift) हवं आहे. ते कोणत्या प्रकारचं तर ‘नवरसा भरवी सागरू। करवी उचित रत्नांचे आगरू। भावार्थाचे गिरिवरू। निपजवी माये।।’

ब्रह्मविद्येचं निरुपण करत असतानाच त्यात नवरसांची निष्पत्ती व्हावी, असं त्यांचं मागणं आहे. यासंदर्भात त्यांना ‘रत्न’ या शब्दानं पारंपरिक अलंकारशास्त्रातले अलंकार अभिप्रेत आहेत. या रत्नांना ‘उचित’ हे विशेषण लावून त्यांनी साहित्यशास्त्रामधले काश्‍मिरी पंडित क्षेमेंद्र यांच्या औचित्यसिद्धान्ताचं सूचन केलं आहे.

अशा प्रकारे ब्रह्मविद्येच्या निरुपणाला रस, अलंकार, औचित्य यांची जोड देत असतानाच, आपण भगवद्‌गीतेचा अन्वयार्थ सांगत आहोत, याचं व्यवधान ज्ञानेश्‍वर सुटू देत नाहीत. त्यांना ग्रंथातून ‘भावार्थाचे गिरिवरू’ निष्पन्न करावयाचे आहेत. ज्ञानेश्‍वरीला ‘भावार्थदीपिका’ हे दुसरं नाव आहे, हे जाणकारांना ठाऊकच आहे. ज्ञानेश्‍वर गीतेचा अन्वयार्थ लावताना शब्दार्थ सांगत नाहीत, तर भावार्थ प्रकट करतात. गीतेच्या संदर्भात भावार्थ म्हणजे स्वतः श्रीकृष्णाला अभिप्रेत असलेला अर्थ. गीता हे कृष्णार्जुन संवादाला व्यासांनी दिलेलं ग्रंथरूप आहे. हा संवाद अर्थात संस्कृत भाषेत व गद्यात झाला. व्यासांनी त्याला अनुष्टुभ छंदात गोवून काव्यरूप दिलं; पण हा सगळा व्यवहार शब्दांचा आहे. ज्ञानेश्‍वर श्रोत्यांना सांगतात ः ‘तया शब्दांआतील भावो। मी पाववीन तुमचा ठावो। आइका म्हणे ज्ञानदेवो। निवृत्तीचा।।’ विशेष म्हणजे, श्रोतेही त्यांना तसाच प्रतिसाद देतात ः ‘‘देवाचे मनोगत। तू जाणत आहासी मूर्त’’

रस, अलंकार, औचित्य, भावार्थ यांनी युक्त असलेल्या भाषिक व्यवहाराचं दुसरं नाव साहित्य. ज्ञानेश्‍वर श्रीगुरूंना प्रार्थना करतात ः ‘‘साहित्यसोनियाचिच खाणी। उघडवी देशियेचिया आक्षोणी। विवेकवेलीची लावणी। ही देई सैंघ।।’’

देशी भाषा म्हणजेच मराठी ही जणू भूमी आहे. या भूमीच्या मधून साहित्यरूपी सोन्याच्या खाणी प्रकट होऊ दे,’ असा या प्रार्थनेचा एक भाग आहे. साहित्यव्यवहार हा सहसा भावनेचा प्रांत आहे. विशेषतः काव्यव्यवहारात तर निश्‍चितच अशी सार्वत्रिक समजूत आहे. Spontaneous overflow of emotions हे वर्णन प्रातिनिधिक मानायला हरकत नाही; पण ज्ञानेश्‍वर इथंही आपली बुद्धिनिष्ठा सोडायला तयार नाहीत. ज्या भूमीतल्या खाणीतून त्यांना साहित्याचं सोनं काढावयाचं आहे, त्याच भूमीत त्यांना विवेकाचा वेलही लावायचा आहे.

विवेकाचं म्हणजेच बुद्धीचं कार्य तर्क करणं हे आहे; पण तर्क आणि कुतर्क यांच्यात फरक करता आला पाहिजे. ज्ञानेश्‍वर तो करायला चुकत नाहीत. अशा कुतर्कातूनच छल, वितंडा हे प्रमाद संभवतात. ज्ञानेश्‍वर सद्‌गुरूंकडं मागणं मागतात  ः पाखांडाचे दरकुटे। मोडी वाग्वाद अव्हांटे। कुतर्काचि दुष्टें। सावजें फेडी।।’

साहित्यशास्त्रात रससिद्धान्ताचं महत्त्व प्रस्थापित झाल्यानंतर ज्ञानेश्‍वरीची निर्मिती झाली, हे सर्वमान्य आहे. त्यामुळं अलंकारादिकांचं महत्त्व मान्य करूनही रस हेच साहित्यकृतीचं प्राणतत्त्व असल्याचं कुणी नाकारत नव्हतं. साहित्यातल्या दृश्‍यकाव्यात म्हणजेच नाटकात प्रथम आठ रस होते, त्यात शृंगार रस सर्वश्रेष्ठ मानला गेला होता. रससिद्धान्त काव्याला (केवळ श्राव्य) लागू करण्याच्या प्रक्रियेनं दोन महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. एक म्हणजे नाट्यातल्या अर्थनिष्पत्तीसाठी उपयोगी पडणाऱ्या अभिनय या घटकाची उणीव भरून काढण्यासाठी ध्वनी नावाच्या नव्या घटकाची संकल्पना आणि दुसरं म्हणजे मूळ आठ रसांमध्ये ‘शांत’ या नवव्या रसाची भर. या देवाण-घेवाणीच्या व परस्परप्रभावाच्या प्रक्रियेतला पुढचा टप्पा म्हणजे काव्यातल्या या शांत रसाला नाट्यात प्रविष्ट करून घेणं! पण या सगळ्या तपशिलाची आपल्याला इथं गरज नाही. इथं महत्त्वाचा मुद्दा हा आहे, की शृंगाराला श्रेष्ठ रस मानणाऱ्या संस्कृत साहित्यात शृंगारासाठी महाराष्ट्री प्राकृतातल्या गाथा वापरल्या जात. महाराष्ट्री प्राकृतचं सौंदर्य ही त्यामुळं सर्वमान्य झालेली गोष्ट होती. त्यालाच अनुलक्षून ज्ञानेश्वरांनी आपली निर्मितिप्रक्रिया स्वतःच उलगडून दाखवली आहे, ती अशी  ः‘तैसे देशियेचे लावण्य। हिरोनि आणिले तारुण्य। मग रचिले अगण्य। गीतातत्त्व।।’’

मराठीतून गीतेचा अर्थ सांगताना म्हणजेच ब्रह्मविद्येचं निरुपण करताना मराठीच्या मूळ सौंदर्याला सोडचिठ्ठी देऊन ती रुक्ष व नीरस करण्याऐवजी तिच्यातली सौंदर्यदर्शक रसवत्ता कायम ठेवून ज्ञानेश्‍वर ब्रह्माचं निरुपण करतात. तुकोबांची भाषा वापरून सांगायचं म्हटलं तर ‘वाचेचिया आळा कवळिले ब्रह्म’. ज्ञानेश्‍वर भाषेच्या माध्यमातून ब्रह्माला गवसणी घालत आहेत.

देशी भाषेतलं लावण्य अबाधित ठेवून तिच्यातून ब्रह्मनिरुपण करताना आपण एक प्रकारची नवी भाषा घडवत आहोत, याचीही जाणीव ज्ञानेश्‍वरांना अर्थातच होती. ते म्हणतात ः ‘दाऊ वेल्हाळ देशी नवी। जी साहित्याते चोजवी। अमृताते चुकी ठेवी। गोडसपणे।।’
परत एकदा तुकोबांचा आधार ः ‘अमृत राहिले लाजोनि माघारे। येणे रसे थोरे ब्रह्मानंदे।।’
स्वतः ज्ञानेश्‍वरांच्या शब्दांत सांगायचं म्हणजे ज्ञानेश्‍वरी हे ‘आधीच ज्ञानाचे बोलणे। तेही येणे रसाळपणे.’

अशा प्रकारे ब्रह्मविद्येला रसाळ करत असताना, नवरसांची निष्पत्ती करत असताना अर्थातच निष्पन्न होणाऱ्या रसांमध्ये शांत रस जर प्रमुख असेल तरच ते ब्रह्मविद्येशी सुसंगत होईल हे उघड आहे. ते सामर्थ्यही ज्ञानेश्‍वरांच्या देशी भाषेत आहे.  ज्ञानेश्‍वर म्हणतात ः ‘देशियेचेनि नागरपणे। शांतु शृंगाराते जिणे।’

इथं ज्ञानेश्‍वरांनी केलेली शब्दयोजना महत्त्वाची आहे. ‘देशी भाषा म्हणजे प्राकृत आणि संस्कृत म्हणजे नागर’ या प्रचलित समजुतीला छेद देत ज्ञानेश्‍वर आपली देशी 
हीच नागर असल्याचं सांगतात आणि ती इतकी नागर आहे, की जिच्यामुळं शृंगार रस हा शांत रसापुढं निष्प्रभ ठरतो. ज्ञानेश्‍वरांना ‘निराळी बोली देखसी। सनागर’ अशी पावती त्यांच्या श्रोत्यांकडूनच मिळाली आहे.

वरील विवेचनावरून हे लक्षात यायला हरकत नाही, की ज्ञानेश्‍वरांची ज्ञानेश्‍वरी ही कृती आणि या कृतीतच त्यांनी काव्यासंबंधी वेळोवेळी व्यक्त केलेले विचार एवढ्या सामग्रीच्या आधारे एक स्वतंत्र साहित्यशास्त्र निर्माण होऊ शकेल, एवढी क्षमता तीत निश्‍चितच आहे. संतांच्या वेगळ्या प्रकारच्या साहित्यशास्त्राची शक्‍यता व गरज सर्वप्रथम प्रा. वासुदेव बळवंत पटवर्धन यांनी सूचित केली होती. त्यानंतर तसा एक प्रयत्न डॉ. मा. गो. देशमुख यांनी केला. अगदी अलीकडं दिलीप पुरुषोत्तम चित्रे यांनी ‘पुन्हा तुकाराम’मधून आणि ‘अनुभवामृताचे अंतर्ध्वनी’मधूनही तसा प्रयत्न केला. चित्रे यांच्या मते ‘अमृतानुभव’ हे तर ज्ञानेश्‍वरांचं कलास्वरूपशास्त्रच (Aesthetics) आहे. चित्रे यांना ज्ञानेश्‍वर व काश्‍मिरी परंपरा यांच्यातला अनुबंध ज्ञात झाला होता. पटवर्धनांच्या काळात या परंपरेतले ग्रंथ उपलब्धच झालेले नव्हते. देशमुखांनी सिद्ध केलेल्या साहित्यशास्त्रात रामदासांना केंद्रस्थानी ठेवल्यामुळं ते अपुरे ठरले.
ज्ञानेश्‍वरीतला साहित्यविचार सारांशानं व्यक्त करणारी एक ओवी नेहमी उद्‌धृत केली जाते ः

‘वाचि बरवे कवित्व। कवित्वि बरवे रसिकत्व। रसिकत्वि परतत्त्व। स्पर्शु जैसा।।’
साहित्यप्रकारांत काव्य चांगलं, काव्यात रसयुक्त काव्य श्रेष्ठ आणि रसयुक्त काव्यांतही ज्या काव्याला परतत्त्व स्पर्श झाला आहे, ते श्रेष्ठ. किंवा उत्तम, चांगलं.
‘काव्याच्या माध्यमातून परतत्त्वाचं प्रतिपादन करता येतं,’ हे प्रसिद्ध बौद्ध तत्त्वज्ञ कवी अश्‍वघोष यांनी ‘सौंदरानंद’ या काव्यात स्पष्ट केलं आहे.‘काव्यव्याजेन्‌ तत्त्वकथितमिह मोक्षः परमिति’ असं अश्‍वघोष सांगतात.

अश्‍वघोष ‘मोक्ष किंवा निर्वाण हेच परतत्त्व’ असल्याचं सांगतात. ते त्यांच्या बौद्ध तत्त्वज्ञानाशी सुसंगत आहे. बौद्ध अनात्मवादी म्हणजे शाश्‍वत अशी आत्मवस्तू अस्तित्वात नाही, असं मानणारे आहेत; परंतु ते निर्वाण (मोक्ष) मानतात. अशा निर्वाणाचं निरुपण करणारं काव्य ते शक्‍य मानतात. ‘सौंदरानंद’ हे तसं काव्य होय. या प्रकारच्या काव्यातला रस हा शांत रस असणार हे उघड आहे. काव्याप्रमाणे असं नाटकही शक्‍य असल्याची बौद्धांची भूमिका आहे. हर्षाचं ‘नागानन्द’ हे त्याचं उदाहरण.

वैदिक परंपरेतल्या साहित्यमीमांसकांनीही हे मान्य केलं होतं. मात्र, बौद्ध परंपरेतला काव्यशास्त्रावरचा स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध नसल्यामुळं ते रसांच्या स्थायी भावांची संगती कशी लावत असत, हे कळायला मार्ग नाही. आत्मवस्तूलाच काय; परंतु कशालाही स्थायी - कायमचं किंवा शाश्‍वत मानणं हे बौद्धांच्या क्षणवादात, अनित्यवादात बसत नाही.

ज्ञानेश्‍वर ब्रह्मवादी असल्यामुळं त्यांना शाश्‍वत परतत्त्व म्हणजेच ब्रह्माचं अस्तित्त्व मानायला अडचण नाही. रसिक म्हणजेच रसयुक्त अथवा रसाळ काव्याला परतत्त्वाचा म्हणजे ब्रह्माचा स्पर्श झाला की ते श्रेष्ठ ठरतं, ही त्यांची भूमिका.
ज्ञानेश्‍वरी हे असं परतत्त्वस्पृष्ट रसयुक्त काव्य आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com