गुणवत्ता तपासण्याचे निकष

श्रीरंग गोखले
रविवार, 11 जून 2017

गुणवत्ता प्रमाणित करणारी ‘आयएसओ-९०००’ ही महत्त्वाची प्रणाली; हिच्यामुळं एक शिस्त लागते. ‘या प्रणालीमुळं आमचा व्यवसाय वाढेल का,’ हा प्रश्‍न गैरलागू असतो. कारण, ही पायाभरणी असते व फायदा नक्कीच होतो. काहीही असलं तरी दस्तावेजीकरण हे अद्ययावत व नेटकं असावं लागतं. ड्रॉइंग्ज, रिपोर्टस, स्टॅंडर्डस, परिणाम, उद्दिष्टं या सगळ्यांचं कागदोपत्री जतन फार महत्त्वाचं असतं. ज्ञान मिळवण्याइतकंच ज्ञानाचं संकलनही महत्त्वाचं होय.

गुणवत्ता राखणं महत्त्वाचं, हे सगळ्यांना पटलेलं असतं; पण ती मोजायची कशी? तिचे काही निकष आहेत. पहिला म्हणजे FOR (Fall Off Rate). तुमच्या उत्पादनप्रक्रियेत प्रथमतःच अचूक वस्तूंचं प्रमाण किती हे सांगणारा निर्देशांक. दुरुस्ती, वर्गवारी, मलमपट्टी यांचं प्रमाण कमी पाहिजे. दुसरा पैलू FCR (Field Call Rate). बाजारपेठेत ग्राहकाकडून आलेल्या तक्रारी व बाजारात असलेल्या आपल्या एकूण वस्तू यांचं गुणोत्तर. याचा कल कमी होत जाणारा हवा. पहिल्या पैलूत उत्पादनप्रक्रियेची गुणवत्ता कळते, तर दुसऱ्यात डिझाईनची. 

गुणवत्तेची एक प्रतिमा किंवा ‘माहोल’ हा एखाद्या कारखान्यात किंवा ऑफिसमध्ये प्रवेश केल्या केल्या जाणवतो. जाणवला पाहिजे. उत्पादनाच्या क्रमाप्रमाणे मालाची हालचाल, लेआउट, स्वच्छता, तसंच उद्दिष्टं-कामगिरी-गुणवत्ता यांचा तपशील दाखवणारे ताजे तक्ते, उत्सुक आणि कार्यरत कामगारांचा सहभाग या सगळ्याचा ठसा प्रवेश करणाऱ्या व्यक्तींवर लगेच उमटतो.

गुणवत्ता प्रमाणित करणारी ISO-९००० ही महत्त्वाची प्रणाली; हिच्यामुळं एक शिस्त लागते. ‘या प्रणालीमुळं आमचा व्यवसाय वाढेल का,’ हा प्रश्‍न गैरलागू असतो. कारण, ही पायाभरणी असते व फायदा नक्कीच होतो. काहीही असलं तरी डॉक्‍युमेंटेशन हे अद्ययावत व नेटकं असावं लागतं. ड्रॉइंग्ज, रिपोर्टस, स्टॅंडर्डस, परिणाम, उद्दिष्टं या सगळ्यांचं कागदोपत्री जतन फार महत्त्वाचं असतं. ज्ञान मिळवण्याइतकंच ज्ञानाचं संकलनही महत्त्वाचं. जगभरातलं हे ज्ञान हा आमच्या कंपनीचा, म्हणजे ‘फिलिप्स’चा ठेवा होता.

तुमच्या प्रक्रियेत सॉर्टिंग, रिपेअर, रिवर्क यांचं प्रमाण खूप असेल, तर प्रक्रियेचं पुनरुज्जीवन करणं उचित. हातानं काम, पुढं मदतीला जिग व फिक्‍शर, Poka Yoke सारखं तंत्र, कौशल्याचं प्रशिक्षण, सेमी-ऑटोमेशन व नंतर फुल ऑटोमेशन असे टप्पे असू शकतात. एका प्लास्टिकच्या नळीवर तांब्याच्या तारेचे वेढे दिलेल्या फेरो-कॉईल्स आम्हाला लागत असत. पुरवठादार प्रथम हातानं गुंडाळून या कॉईल्स बनवत असे. नंतर त्यानं हॅंड-ड्रिलिंग मशिन आडवं ठेवून त्यावर ते काम सुरू केलं. त्यांना नंतर काउंटर लावून वेढे अचूक करण्यात आले. कालांतरानं माहिती काढून सेमी-ऑटोमॅटिक मशिन्स आणण्यात आली व नंतरच्या काळात तैवानला जाऊन सुंदर अशी ऑटोमॅटिक मशिन्सही आणली गेली. फेरो-कॉईल्सच्या त्या कामाचा असा पायरीपायरीनं विस्तार झाला.

***

उत्पादनप्रक्रियेसाठी केलेल्या गुंतवणुकीतून गुणवत्ता सुधारतेच; पण समग्र किंमतही कमी होते, हे मी कायम अनुभवत असे. आमचा प्लास्टिक कॅबिनेट बनवणारा एकजण मुंबईला होता. त्याच्याकडं मी पहिल्यांदा गेलो तेव्हा मोल्ड झालेले पार्टस लगेच दुसऱ्या विभागामध्ये नेले जात होते. तिथं रिवर्क करणाऱ्यांची एक रांगच होती. बर काढणं, खडबडीतपणा घासणं, डाग पुसणं, पॉलिश अशी अनेक कामं तिथं चालत होती. याउलट आमच्या लोणीच्या कारखान्यात मोल्ड इतका काटेकोरपणे बनवलेला असे व मशिनरीचीही व्यवस्थित देखभाल असे. त्यामुळं तयार झालेला पार्ट थेट पॅकिंगसाठीच्या खोक्‍यात जाई. एवढंच नव्हे तर, एक ऑपरेटर दोन मशिन पाहू शके.

गुणवत्ता ही ग्राहकाचा विचार करणारी हवी हे तर खरंच; पण काही वेळा ग्राहकापलीकडं जाऊन समाजाचा, शाश्‍वत पर्यावरणाचा विचार करणारीही ती असायला हवी. त्यासाठी आमची कंपनी फार काटेकोर असे. घातक पदार्थांची एक यादी तयार असे व त्या पदार्थांऐवजी दुसरे पदार्थ वापरावे लागत असत. उदाहरणार्थ: कॅडमियम, शिसं, ग्लासवूलऐवजी आम्ही झिंक, कथील व कॉटनवेस्ट वापरत असू. लॅमिनेटेड पॅकिंग बॉक्‍स खूप छान दिसे; पण त्याला बंदी होती. कारण, कागदाच्या पुनःप्रक्रियेत अडचण येत असे. आम्ही मिक्‍सर विकायला सुरवात केली, तेव्हा वितरकांकडून एक अभिप्राय आला, की प्रतिस्पर्ध्यांचं ड्राय ग्राइंडरचं ब्लेड चकचकीत व सुंदर दिसतं; त्यापुढं आपलं जुनाट वाटतं. आम्ही ते बदलायचा घाट घातला; पण हॉलंडकडून सूचना आली, की आहे तेच ठेवावं. कारण, फूड ग्रेड नसलेल्या स्टेनलेसमुळं पदार्थ बारीक करताना स्टीलचे सूक्ष्म कण पदार्थात उतरण्याची शक्‍यता असते.

सुरवातीच्या छोट्या रेडिओसंचांमध्ये स्टॅंडबाय पॉवर पाच वॉट होती. ती वर्षभरात एक वॉटपर्यंत करायची हमी कंपनीनं दिली होती. रेडिओसाठी मल्टिपल पॅकिंग बॉक्‍स बनवून आम्ही थर्माकोलची ५० टक्के बचत केली होती. पर्यावरण व ग्राहकहिताच्या अशा गोष्टींची जाहिरात केली जात नसे.

ग्राहकांसाठी आम्हाला मुद्दाम फेरफार करावे लागत. जगात कुठंही वीजप्रवाह २३० व्होल्ट + - १० टक्के असतो. आपल्या इथं तो १८० ते २७० असा काहीही असू शके! त्यासाठी जास्त भक्कम ट्रान्स्फॉर्मर करावे लागत; तसंच विजेची वारंवारिता अचूक ५० HZ हवी. ती तशी नसल्यानं क्‍लॉक रेडिओत नवं सर्किट करावं लागे. म्हणजे पॅकिंग, धूळ, सदोष वीजप्रवाह, संचाचा आकार, रेडिओची सेन्सिटिव्हिटी अशा अनेक बाबी भारतीय ग्राहकांसाठी विचारात घ्याव्या लागत.

***

विचारमंथनातून किंवा मिळालेल्या तपशिलाचं वर्गीकरण करून समस्या सोडवायची तंत्रं आतापर्यंत पाहिली; पण काही वेळा प्रयोगांचाही आधार घ्यावा लागतो. शेनिन नावाच्या विचारवंतानं शोधलेली ‘डिझाईन ऑफ एक्‍सपरिमेंट्‌स’ (DOE) ही प्रयोगसिद्ध प्रणाली खूपच उपयुक्त आहे. तीवर संशोधन केलेले जगन्मान्य तंत्रज्ञ केकी भोट यांच्या कार्यशाळेचा लाभ घेण्याचं भाग्य मला लाभलं. यात पाच-सहा प्रकार आहेत. त्यातले सुलभ असे पहिले तीन पाहू या. जुळणीप्रक्रियेतून सगळ्याच वस्तू निर्दोष येत नसतात. निर्दोष व खराब वस्तू एकाच वेळी येत असतील, तर खराब वस्तूतलं वैगुण्य हमखास शोधता येतं. पहिल्या प्रकारात सदोष व निर्दोष वस्तूंची नुसत्या निरीक्षणानं तुलना केली जाते. डोळसपणे व चिकाटीनं केलेली तुलना दोषी घटक दाखवते. दुसरा प्रकार ः वस्तू ही अनेक घटकांची बनते. या घटकांची जुळणी काही उपरचनांमध्ये होत असते. (Sub-assembly), यातली उपरचना सदोष आहे, हे समजण्यासाठी ‘घटकांचा शोध’ (Component search) हे तंत्र उपयोगी पडतं. यात चांगल्या उपरचनेतल्या एकेका घटकाची सदोष रचनेतल्या घटकाशी अदलाबदल करून वाईट उपरचना चांगली कुठल्या घटकानं झाली हे ताडलं जातं. खात्री करून घेण्यासाठी वाईट घटकानं चांगली रचनाही वाईट व्हायला हवी! तिसऱ्या प्रकारात वेगवेगळ्या पाळीतल्या, वेगवेगळ्या वेळांच्या, वेगवेगळ्या टप्प्यांवरच्या जुळणीचा तपशील हा प्रक्रियांमुळं येणारी तफावत दर्शवतो (Multi-vary). वस्तूतल्या अनेक घटकांमधल्या एकमेकांवर होणाऱ्या प्रभावानं गुणधर्म बदलतात. त्यासाठी विश्‍लेषणाची विशिष्ट पद्धत वापरावी लागते. माझे मित्र विद्युत बापट यांनी यात मोठं प्रावीण्य प्राप्त केलेलं आहे. 

***

गुणवत्ता एका पातळीवर आली, की पुरवठादारांनाही याविषयीचं प्रशिक्षण देणं फायद्याचं ठरतं. मी कंपनीत दाखल झालो तेव्हा ‘क्वालिटी’ व ‘इन्‌कमिंग इन्स्पेक्‍शन’ हे विभाग जेवढे मोठे होते, त्यापेक्षा ते मी कंपनी सोडतानाच्या वेळी कितीतरी छोटे झालेले होते. व्यवसाय वाढूनही! कारण, गुणवत्ता राखण्याबाबतची जबाबदारी सगळ्यांनीच स्वीकारलेली होती. गुणवत्तेची बांधणी, प्रणाली, तपासणीची प्रक्रिया, आधुनिकीकरण असं उच्चभ्रू वातावरण आपल्याकडच्या छोट्या छोट्या उद्योजकांकडं कुठलं असणार? त्यांच्या दृष्टीनं गुणवत्ता म्हणजे काय? ‘गुणवत्ता’ या विषयावर छोट्या कारागिरांसमोर अचानकपणे बोलण्याचा प्रसंग एकदा आला. त्यांना मी सोप्या शब्दांत गुणवत्ताप्रणाली व तत्त्वं सांगितली. प्रश्नांना उत्तरं देऊन स्पष्टीकरण दिलं. सरतेशेवटी ते मूर्ती बनवणारे, शिवणकाम करणारे, लाकडी भेटवस्तू बनवणारे कारागीर होते. मी सांगितलेल्यापैकी त्यांना काय समजलं आहे, ते शेवटी जाणून घेतलं. त्यांची उत्तरं ऐकून मी चकित झालो. ‘आर्द्रता-चेंबर’ऐवजी वस्तू काही दिवस बाथरूममध्ये ठेवू,’ ‘जास्त तापमानावर तपासणीसाठी काचा किंचित उघड्या ठेवून कार उन्हात ठेवून तीमध्ये संबंधित वस्तू ठेवू,’ ‘खूप वेळा हाताळून पाहू,’ ‘थोड्या अंतरावरून खाली सोडून वस्तू मोडेल किंवा काय हे तपासून पाहू’, ‘सेलोटेप लावून रंग उडतोय किंवा कसे, हे तपासून पाहू’, असे गुणवत्ता तपासण्याविषयीचे वेगवेगळे पर्याय त्यांनीच दिले! (पूर्वी कपडे शिवण्यापूर्वी शिवणकाम करणारी व्यक्ती कापड भिजवून रंग जात आहे किंवा कसे वा कापड आटतंय किंवा कसे हे तपासायचीच की). त्या कामगारांचा तो उत्साह व आकलनशक्ती पाहून ‘मोठमोठ्या शब्दांपेक्षा आतून आलेली जाणीव हीच गुणवत्तेची खात्री देते’ हे पटलं.

'सप्तरंग'मधील सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Shriranga Gokhale