सुनिये तो जरा, जो हकीकत है, कहते है हम... (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर
रविवार, 24 सप्टेंबर 2017

‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा...’ हे आशा भोसले यांनी गायलेलं संस्मरणीय गाणं संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. या गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं. ‘सुनिये तो जरा’ हा अंतरा सुरू होतो, तेव्हा ॲकॉर्डियन वाजतं. दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी सॅक्‍सोफोन वाजतं. आशा भोसले यांनी टाकलेले उसासे, वेगवेगळ्या पद्धतीनं गायलेलं ‘जहाँ तक...’ हे शब्द...असं सगळंच अफलातून!

हेमंतकुमार आणि नूतन यांनी गायलेलं ‘लहरों पे लहर’ हे गाणं डीन मार्टिन यांच्या The man who plays mandolino या अप्रतिम गाण्यावर आधारित आहे. संगीतकार स्नेहल भाटकर यांनी संगीतदिग्दर्शन केलेल्या या गाण्यात ‘लहरों पे लहर, उल्फत है जवाँ, रातों की सहर, चली आओ यहाँ’ अशा मुखड्यातल्या प्रत्येक ओळीनंतर, अंतऱ्यामध्ये मेंडोलिन वाजत राहतं. या दोन्ही गाण्यांतलं मेंडोलिन अगदी संतूरसारखं वाजतं. सन १९६० मध्ये आलेल्या या ‘छबिली’ सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं नूतनची आई, अभिनेत्री शोभना समर्थ यांनी. या सिनेमातली ‘ए मेरे हमसफर’, ‘हे बाबू’ ही गाणी नूतन यांनी सुरेल गायली होती. विशेषत: ‘ए मेरे हमसफर’ या गाण्यात मेंडोलिननं सुरवात झाल्यावर नूतन आणि ॲकॉर्डियन अशी जुगलबंदी ऐकण्यासारखी आहे. लिन हे इटालियन वाद्य आहे. या वाद्याचा आकार बदामासारखा असतो म्हणून या वाद्याला मेंडोलिन असं म्हटलं जातं. इटालियन भाषेत बदामाला मेंडोरिया म्हणतात, त्यावरून मेंडोलिन. मेंडोलिन या वाद्याचे पूर्वज म्हणजे मेंडोला. ल्युट (Lute) हे सोळाव्या आणि सतराव्या शतकात युरोपमध्ये लोकप्रिय झालेल्या स्ट्रिंगवाद्यांच्या कुटुंबाला दिलेलं नाव आहे. मेंडोलिन हे ल्युट-कुटुंबातलं एक वाद्य. हे अठराव्या शतकात इटलीत पहिल्यांदा वाजवलं गेलं. एकोणिसाव्या शतकापर्यंत मेंडोलिन पाश्‍चिमात्य देशांत ऑर्केस्ट्रामध्ये वाजवलं जात असे.

या वाद्याची माहिती घेण्यासाठी मेंडोलिनप्रेमींचा ग्रुप स्थापन करणारे अनिल पेंडसे यांची भेट घेतली. त्यांनी सांगितलं : ‘‘मेंडोलिन हे इटालियन वाद्य भारतीय शास्त्रीय संगीतात आणण्याचं श्रेय संगीतकार सज्जाद हुसेन यांना जातं. मेंडोलिनला आठ तारा असतात. दोन तारांच्या चार जोड्या. खालच्या स्वरांतल्या चार जाड तारा आणि वरच्या स्वरांतल्या चार तारा. सज्जाद यांनी मूळ वाद्याशी इमान राखून त्यात शास्त्रीय संगीतात वाजवण्यासाठी योग्य ते बदल केले. खालच्या स्वरांतली एकेक तार कमी केली. २+२+१+१ आणि चार तरफेच्या तारा वेगळ्या लावल्या. सज्जाद तीन सप्तकांसाठी तीन वेगवेगळे मेंडोलिन वाजवायचे. मेंडोला हे मूळ वाद्य खर्जात आलापी करण्यासाठी वाजवलं जातं. काही सतारीये जसं खर्जात आलाप करण्यासाठी सूरबहार वाजवतात अगदी तसंच. सतार वाजवण्याचे जसे दोन प्रकार आहेत, तसेच मेंडोलिन वाजवण्याचेही दोन प्रकार आहेत : तंतकारी अंगानं आणि गायकी अंगानं. सज्जाद गायकी अंगानं वाजवायचे. मेंडोलिनचं शक्तिस्थान असलेला ट्रिमोलो इफेक्‍ट (दोन स्वरांचं द्रुत लयीत वादन) त्यांच्या वादनात प्रकर्षानं असे. संपूर्ण गायकी अंगानं ख्याल, ठुमरीची नजाकत, टप्पा प्रकारातल्या अवघड ताना सज्जाद यांच्या वादनातून ऐकाव्यात. ‘हरिकंस’सारखे अवघड राग सोपे करण्याचं कौशल्य सज्जाद यांनी रियाजानं प्राप्त केलं होतं. ‘‘सज्जाद यांनी पुण्यात १९७९ मध्ये ‘सवाई गंधर्व महोत्सवा’त आणि १९८१ मध्ये बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातल्या कार्यक्रमात मेंडोलिनवादन केलं होतं. ‘सवाई’मध्ये त्यांचं मेंडोलिनवादन ऐकण्यासाठी पंडित भीमसेन जोशी, पु. ल. देशपांडे यांची आवर्जून उपस्थित होती. त्या वेळी मेंडोलिनवर सतार, सरोद, संतूर आणि विशेष म्हणजे वीणेच्या आवाजाचा आभास निर्माण करून सज्जाद यांनी सगळ्यांना  मंत्रमुग्ध केलं होतं,’’ अशी आठवण पेंडसे यांनी सांगितली.

सज्जाद म्हणायचे, ‘तुम्ही वाद्यावर प्रेम केलंत तर त्याला तुम्ही जसं वळण द्याल तसं ते वाजेल.’ नंतर त्यांनी हिंदी सिनेमांसाठी संगीतदिग्दर्शन केलं. सज्जाद यांच्या मेंडोलिनवादनाच्या ध्वनिफिती इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यांनी मेंडोलिनवर कसं प्रभुत्व मिळवलं असेल, याची कल्पना या ध्वनिफिती ऐकून येते. ‘ऐ दिलरुबा, नजरें मिला, कुछ तो मिले गम का सिला’ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं हार्प आणि मेंडोलिन यांनी सजलेलं गाणं आहे. सज्जाद यांनी संगीतबद्ध केलेल्या या सुरेल गाण्यात मेंडोलिन वाजवलं आहे सज्जाद यांचे चिरंजीव नसीर आणि मुस्तफा यांनी.

महंमद रफी यांनी गायलेलं ‘दुलारी’ सिनेमातलं ‘सुहानी रात ढल चुकी’ हे गाणं बघितलं तर वाटेल की मेंडोलिन वाजवायला किती सोपं आहे; पण कोणतंही वाद्य इतकं सोपं नसतं. मेंडोलिन हे वाद्य शिकण्यासारखं का आहे, याची कारणमीमांसा पेंडसे यांनी सांगितली. ते म्हणाले : ‘‘हे वाद्य तुम्ही एकटे वाजवू शकता...कुठंही नेऊ शकता...वजनाला अवजड नाही...तारा तुटल्या तरी त्या लावणं सोपं आहे...साथ नसली तरी तुम्ही पूर्ण गाणी वाजवू शकता...अर्थात रियाज केल्यानंतर.’’ लिन लावण्याच्या दोन पद्धती आहेत. मूळ इटालियन पद्धतीनं ‘म-सा-  प-रे’ असं लावलं जातं आणि शास्त्रीय संगीतासाठी यात बदल करून ‘म-सा- प-सा’ किंवा ‘प-सा- प-सा’ अशा स्वरांतही तारा लावल्या जातात. स्ट्रोक वाजवण्याच्याही दोन पद्धती आहेत. मूळ इटालियन पद्धतीप्रमाणे सुरवातीला वरून खाली तार छेडली जाते आणि शास्त्रीय संगीतासाठी त्यात बदल करून स्ट्रोक खालून वर वाजवून सुरवात केली जाते.

सज्जाद यांनी जसं भारतीय शास्त्रीय संगीतात मेंडोलिन आणलं, तसं कर्नाटक शास्त्रीय संगीतात मेंडोलिनवादनाला वेगळं स्थान मिळवून दिलं यू. श्रीनिवास या युवा कलाकारानं. कर्नाटक शास्त्रीय संगीतात गमक आठ तारांच्या मेंडोलिनमध्ये वाजवता येत नाही. त्यामुळं पाच किंवा सहा तारांचं मेंडोलिन वाजवलं जातं. श्रीनिवास यांनी मेंडोलिनवादनात प्रावीण्य तर मिळवलंच; शिवाय भारतात आणि विदेशांत कार्यक्रमांद्वारे ते लोकप्रियही केलं. कर्नाटक शास्त्रीय संगीतात मैफली, अल्बम, उस्ताद झाकीर हुसेन यांच्याबरोबर ‘शक्ती’सारखे कार्यक्रम देश-विदेशांत त्यांनी केले. श्रीनिवास यांचं मेंडोलिन ऐकताना असं जाणवत नाही, की मेंडोलिनमध्ये गमक शक्‍य नसते. अशक्‍य ते शक्‍य करून दाखवणाऱ्या या मेंडोलिनवादकाचं ता. १९ सप्टेंबर २०१४ रोजी अकाली निधन झालं आणि एका तरुण कलाकाराला रसिक मुकले.

***

‘ये है रेशमी जुल्फों का अंधेरा...’ हे आशा भोसले यांनी गायलेलं संस्मरणीय गाणं संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी स्वरबद्ध केलेलं आहे. या गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं. ‘सुनिये तो जरा’ हा अंतरा सुरू होतो, तेव्हा ॲकॉर्डियन वाजतं. दुसऱ्या अंतऱ्यापूर्वी सॅक्‍सोफोन वाजतं. आशा भोसले यांनी टाकलेले उसासे, वेगवेगळ्या पद्धतीनं गायलेले ‘जहाँ तक...’ हे शब्द...असं सगळंच अफलातून. आशा भोसले यांनी गायलेल्या ‘तेरा दिल कहाँ है, सब कुछ यहाँ है’ या गाण्यातही मेंडोलिन वाजत राहतं आणि नायिकेच्या हातात दिसतंसुद्धा. सुरवातीला तारा छेडल्यानंतर ती नुसतंच ते वाद्य कुरवाळत बसते आणि रिदमसुद्धा जुळत नाही. त्यामुळं बघण्यापेक्षा गाण्यातल्या मेंडोलिनची ओळख पटण्यासाठीच हे गाणं ऐकणं श्रेयस्कर! आशा भोसले यांनी ‘तेरा दिल कहाँ है’ हे गाताना नायकाच्या कानात हलकेच सांगितल्यासारखा स्वर लावला आहे. रोशन यांनी संगीतबद्ध केलेलं ‘चाँदनी चौक’ (१९५४) या सिनेमातलं गाणं सचिनदेव बर्मन यांच्या ‘ठंडी हवाएँ लहरा के आएं’ या ‘नौजवान’ (१९५१) सिनेमातल्या गाण्यावर आधारित होतं.

***

शंकर-जयकिशन यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘हलाकू’ (१९५६) या सिनेमातलं ‘ये चाँद, ये सितारे’ हे लता मंगेशकर यांनी गायलेलं गाणं मेंडोलिननं सुरू होतं. गाण्यात प्रामुख्यानं मेंडोलिनच वाजतं, जोडीला व्हायोलिन. अंतऱ्याला मेंडोलिन-व्हायोलिन जुगलबंदी ऐकण्यासारखी आहे. मीनाकुमारी ही गाणी करताना जितकी सहज वावरते, तितकाच अजित अवघडलेला वाटतो. याच सिनेमातलं ‘दिल का ना करना ऐतबार कोई’ हे लता मंगेशकर-महंमद रफी यांचं गाजलेलं गाणं मेंडोलिनसाठी बऱ्याच वेळा ऐकलं. ‘ऐतबार’, ‘कोई’ हे शब्द ज्या आर्ततेनं लता मंगेशकर यांनी गायले आहेत त्याला तोड नाही. या गाण्यात हेलनच्या नृत्याचा पवित्र नजरेनं आनंद घेणारा अजित आणि नंतर ‘मोना डार्लिंग’ म्हणणारा अजित यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. याच सिनेमात 

‘अजी चले आओ’ हे लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं गाणंही आहे. या सगळ्या गाण्यांत आणि पार्श्‍वसंगीतामध्येसुद्धा मेंडोलिन वाजवणारे जे कलाकार आहेत, त्यांचं नाव आहे डेव्हिड दांडेकर. 

हिंदी सिनेसृष्टीत मेंडोलिन वाजवण्यात वाकबगार असणारे डेव्हिड यांनी शंकर-जयकिशन यांची बरीच गाणी मेंडोलिननं सजवली आहेत. ‘संगम’ सिनेमातलं ‘ओ महबूबा, तेरे दिल के पास है मेरी मंझिल-ए-मकसूद’ हे गाणं डेव्हिड यांच्याच मेंडोलिननं सुरू होतं. ‘आवारा’, ‘अनाडी’ या सिनेमातली, तसंच ‘ये रात भीगी भीगी’ यांसारखी गाणी आठवा. मेंडोलिन वाजतंच. ‘मेरा नाम जोकर’ या सिनेमात शाळेतला ऋषी कपूर सिम्मी गरेवालला बघतो तो सीन सिनेरसिकांच्या लक्षात असेलच. या प्रसंगाला जे पार्श्‍वसंगीत वाजतं, ती मेंडोलिनची धून अप्रतिम आहे.  शंकर-जयकिशन यांनीच स्वरबद्ध केलेल्या ‘तुम्हे और क्‍या दूँ मै दिल के सिवा’ या गाण्यात लता मंगेशकर अंतरा गातात... ‘मुरादें हो पूरी, सजे हर तमन्ना, मोहब्बत की दुनिया के तुम चाँद बनना’ या ओळीनंतर मेंडोलिन वाजतं, त्याचा परिणाम लक्षणीय आहे. ‘है कली कली के लब पे’ या तलत महमूद आणि श्‍यामा यांनी गायलेल्या गाण्यात याच ओळीनंतर मेंडोलिन वाजतं. ते डेव्हिड यांनीच वाजवलेलं आहे. खय्याम यांचं संगीतदिग्दर्शन असल्यामुळं रसिक हे अरेबिक संगीत गुणगुणत राहतात.

‘तू...तू है वो ही’ हे ‘ये वादा रहा’ या सिनेमातलं गाणं माझं अत्यंत आवडतं आहे. अशा गाण्यांत मेंडोलिन कुणी वाजवलं आहे इत्यादी प्रश्‍नांसाठी मेंडोलिनवादक प्रदीप्तो सेनगुप्ता यांच्याशी संपर्क साधल्यावर त्यांनी या वाद्याबद्दल आणि वादकांबद्दल आणखी माहिती दिली. त्याबद्दल पुढील लेखात...

'सप्तरंग'मधील इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Suhas Kirloskar