हा छंद जिवाला लावी पिसे.. (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर
रविवार, 22 ऑक्टोबर 2017

मेंडोलिन पहिल्यांदा कोणत्या सिनेसंगीतात वाजलं असेल? भारतात चित्रीकरण झालेल्या पहिल्या पूर्ण लांबीच्या सिनेमात. ता. १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आलम आरा’ या सिनेमात मेंडोलिन वाजवलं होतं बेहराम इराणी यांनी. मेंडोलिनसह वेगवेगळ्या वाद्यांची ओळख संगीतकार सी. रामचंद्र यांनीही हिंदी सिनेसंगीतातून श्रोत्यांना करून दिली. या वाद्याचा उपयोग त्यांच्या गाण्यांमध्ये कसा करण्यात आला आहे, यासाठी ‘मेरे मन का बावरा पंछी’ (अमर दीप), बेचैन नजर, बेताब जिगर (यास्मिन), अपलम चपलम (आझाद) यांसारखी गाणी ऐकावीत. 

‘मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं...’ मराठीजनांना परिचित असलेल्या या गाण्यात तालवाद्याबरोबर मेंडोलिन हे एकच वाद्य प्रामुख्यानं वाजतं. लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं लहानपणापासून ऐकत आलो आहे; पण मेंडोलिनकडं कधी इतकं लक्ष गेलं नव्हतं. कधी कधी खूप परिचयाच्या गाण्यातली खुबी समजली, की तीच गाणी पुन्हा वेगळ्या अंगानं ऐकण्याचा आनंद अवर्णनीय असतो.

संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांची चाल आणि अनिल मोहिले यांचं संगीतसंयोजन असलेल्या या गाण्यात मेंडोलिन वाजवलं आहे रवी सुंदरम यांनी. लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या बऱ्याच गाण्यांत त्यांनी वाजवलेलं मेंडोलिन ऐकायला मिळतं. ‘ए दिन तो जाबे ना, माना तुमी जो तोई कोरो’ हे याच गाण्याचं बंगाली व्हर्जन आहे (१९७५). त्यातही मेंडोलिन असंच ऐकू येतं. -महंमद रफी यांनी गायलेल्या ‘तुझे रूप सखे, गुलजार असे...हा छंद जिवाला लावी पिसे’ या गाण्यात मेंडोलिन आणि तबला या दोनच वाद्यांची साथ आहे. संगीतकार श्रीकांत ठाकरे यांनी संगीतबद्ध केलेल्या या गाण्यात अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं आणि या अनोख्या वाद्याच्या स्वरातून श्रोते अंतऱ्याच्या पहिल्या शब्दाच्या स्वरापर्यंत जाऊन पोचतात. तो प्रवास श्रवणीय आहे. कवी आरती प्रभू यांचं हृदयनाथ यांनी संगीतबद्ध केलेलं  आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं  ‘ती येते आणिक जाते’ हे गाणं अकॉर्डियन आणि मेंडोलिनच्या जुगलबंदीमुळंच श्रोते पुनःपुन्हा ऐकत असतात. अभिनेत्री सुलोचना यांना नृत्य करताना बघून आश्‍चर्य वाटावं असं गाणं ‘अत्तराचा फाया तुम्ही मला आणा राया’ हे मेंडोलिननं सजलं आहे. अशी अनेक मराठी गाणी मेंडोलिनसाठी पुन्हा ऐकता येतील.
***

मेंडोलिन पहिल्यांदा कोणत्या सिनेसंगीतात वाजलं असेल? भारतात चित्रीकरण झालेल्या पहिला पूर्ण लांबीच्या सिनेमात. ता. १४ मार्च १९३१ रोजी प्रदर्शित झालेल्या ‘आलम आरा’ या सिनेमात मेंडोलिन वाजवलं होतं बेहराम इराणी यांनी. 

संगीतकार सी. रामचंद्र यांनी हिंदी सिनेसंगीतातून वेगवेगळ्या वाद्यांची ओळख श्रोत्यांना करून दिली. पाश्‍चात्य संगीत आणि भारतीय शास्त्रीय संगीत यांचं फ्यूजन त्यांच्या संगीतात ऐकू येतं. ‘मेरे मन का बावरा पंछी’ (अमर दीप), बेचैन नजर, बेताब जिगर (यास्मिन), अपलम चपलम (आझाद) यांसारखी गाणी या वाद्याचा उपयोग कसा केला गेला आहे, यासाठी ऐकावीत. परशुराम हळदीपूर यांनी सी. रामचंद्र, ओ. पी. नय्यर या संगीतकारांकडं मेंडोलिन वाजवलं. ‘नया दौर’मधलं ‘माँग के साथ तुम्हारा’ हे गाणं मेंडोलिननं सुरू होतं आणि नंतर टांग्याचा ठेका. नय्यर यांच्याकडं सहाय्यक संगीतकार असलेले जी. एस. कोहली यांनी संगीतकार या नात्यानं केलेल्या गाण्यावर नय्यर यांची छाप दिसते. त्यांच्या ‘ये रंगीन महफिल गुलाबी गुलाबी’ (शिकारी) या गाण्यात आशा भोसले यांच्या स्वरामुळं ‘दिल का आलम शराबी शराबी’ होतो. या गाण्यात अंतऱ्यापूर्वी मेंडोलिन वाजतं ते गाण्याच्या लयीच्या दुप्पट लयीत. असा ट्रिमोलो इफेक्‍ट हे मेंडोलिनचं अविभाज्य अंग आहे. ‘सरगम’ सिनेमातलं ‘परबत के उस पार’ या गाण्यात मेंडोलिनवादनासाठी प्यारेलाल यांनी खास जसवंतसिंग यांना दिल्लीहून बोलावलं होतं. ज्यांनी ‘विविध भारती’ बारकाईनं ऐकलेलं असेल, त्यांना मेंडोलिनची एक धून आठवत असेल. दोन कार्यक्रमांमध्ये फिलर म्हणून वाजवली जाणारी ही धून जसवंतसिंग यांनी वाजवली आहे.
***

तर हे असं वेगवेगळ्या संगीतकारांनी आणि वादकांनी गाण्यात वापरलेलं आणि वाजवलेलं ल्युट कुटुंबातलं वाद्य अनोखा परिणाम साधतं. रमेश सोळंकी यांनी संगीतकार अनिल विश्‍वास यांच्याकडं ते वाजवलं. संगीतकार शंकर-जयकिशन यांची गाणी अजरामर करणारे मेंडोलिनवादकही बरेच आहेत. लक्ष्मीकांत, परशुराम, किशोर देसाई, डेव्हिड, रवी सुंदरम, महेंद्र भावसार, नायडू. ‘आवारा’ सिनेमातल्या प्रसिद्ध स्वप्नदृश्‍यात खरं तर चार वेगवेगळ्या धून-चाली आहेत  ‘तेरे बीना आग ये चाँदनी, तू आजा...ये नही है ये नही है जिंदगी, जिंदगी ये नही...ओम्‌ नमः शिवाय...’ यानंतर मेंडोलिन वाजतं आणि लता मंगेशकर गातात ‘घर आया मेरा परदेसी’. हे गाणं म्हणजे डेव्हिड यांनी वाजवलेलं मेंडोलिन, लाला गंगावणे यांच्या ढोलकीची जुंगलबंदीच आहे.
***

सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेल्या ‘आजा रे परदेसी’ या गाण्याच्या अंतऱ्यात ‘घडी घडी मेरा दिल धडके’ हे गाणं मेंडोलिनवर वाजतं. ओ. पी. नय्यर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि आशा भोसले-महंमद रफी यांनी गायलेलं ‘देख कसम से’ गाणं मेंडोलिननं सुरू होतं. सचिनदेव बर्मन यांचं ‘मोरा गोरा अंग लई ले’ हे गाणं याच वाद्यानं सजलं आहे. सचिनदेव बर्मन यांच्या ‘काँटो से खिंच के ये आँचल’ या गाण्यात किशोर देसाई यांनी मेंडोलिन वाजवलं आहे. देसाई यांची गाणी सलग ऐकली, तरी त्यांची रेंज आणि विविधता लक्षात येते. उदाहरणार्थ ः ‘ताजमहल’ सिनेमातलं ‘जो वादा किया वो निभाना पडेगा’ हे संगीतकार रोशन यांचं गाणं, ‘रहे ना रहे हम’ (सचिनदेव बर्मन), तुम बिन जाऊ कहाँ (राहुलदेव बर्मन), नैन मिले चैन कहाँ (बसंत बहार) ही गाणी,  ‘चंद्रलेखा’, ‘कठपुतली’मधली गाणी, आ अब लौट चले (शंकर जयकिशन), लग जा गले, तू जहाँ जहाँ चलेगा, आप की नजरों ने समझा (मदन मोहन), शीशा हो या दिल हो (लक्ष्मीकांत-प्यारेलाल), परदेसीया, ये सच है पिया, तन डोले मेरा मन डोले, जादूगर सैंय्या (हेमंतकुमार) अशा असंख्य गाण्यांमधून ही विविधता जाणवते.
***

राहुलदेव बर्मन यांच्याकडं वाजवणारे वादक - किशोर देसाई, रवी सुंदरम, मुस्तफा. ‘परिंदा’ हा सिनेमा बघण्यासारखा आणि त्याचं संगीत ऐकण्यासारखं आहे. मार्लन ब्रॅंडो यांची अप्रतिम भूमिका असलेल्या ‘ऑन द वॉटरफ्रंट’ या सिनेमावर आधारित ‘परिंदा’ केवळ रजत ढोलकिया यांचं पार्श्‍वसंगीत ऐकण्यासाठी मी कितीतरी वेळा बघितला आहे. राहुलदेव बर्मन यांनी संगीतबद्ध केलेली सर्व गाणी एक से बढकर एक आहेत. आशा भोसले यांनी गायलेलं ‘प्यार के मोड पे, छोडोगे जो बाहे मेरी’ हे गाणं प्रदीप्तो सेनगुप्ता यांनी वाजवलेल्या मेंडोलिननं सुरू होतं. हे गाणं एकदा आशा भोसले यांचं आर्जव ऐकण्यासाठी, एकदा मेंडोलिनसाठी आणि एकदा सॅक्‍सोफोन-बासरीसाठी ऐकलं की तीन मिनिटांचं गाणं तयार करताना किती कलाकारांचं योगदान असतं याची कल्पना येते. अर्थात माधुरी दीक्षितचा अभिनयही सुरेख आहे. सिनेमात स्वभाव बदलतो त्यानुसार अनिल कपूरची केशरचना बदलते हेही बघण्यासारखं आहे. याच सिनेमातल्या ‘कितनी है प्यारी प्यारी दोस्ती हमारी’ या गाण्यातलं प्रदीप्तो यांनी वाजवलेलं मेंडोलिन श्रवणीय आहे.
***

आपण काय आणि कसं ऐकतो त्यानुसार आपला कान तयार होतो. आजच्या लेखाचा उद्देश वेगवेगळ्या गाण्यांमध्ये एका अनोख्या वाद्याचा उपयोग कुणी किती विविध प्रकारे केला आहे, हे जाणून घेणं हा होता. तशी मेंडोलिनमय गाणी बरीच आहेत. हे युरोपीय वाद्य आपल्या संगीतकार-वादकांनी आपलंसं केलं आणि आपलं मन डोलू लागलं. ‘साज-ए-दिल छेड दे’ असं आपण गाऊ लागलो. मेंडोलिनवरचे लेख लिहिता लिहिता बऱ्याच गाण्यांत मेंडोलिन ऐकू येऊ लागलं. जिकडं तिकडं मेंडोलिन हे एकच वाद्य दिसू लागलं. ‘बेईमान बालमा मान भी जा’ या गाण्यात नलिनी जयवंतच्या हातात, तसंच ‘कहीं पे निगाहें, कहीं पे निशाना’ या गाण्याच्या सुरवातीला वहीदा रहमानच्या हातात मेंडोलिन दिसलं. काहीतरी बदल हवा म्हणून ‘गॉडफादर’ सिनेमा बघितला तर त्या सिनेमाच्या थीम म्युझिकमध्येही मेंडोलिन असल्याचं लक्षात आलं. असा हा छंद जिवाला लावी पिसे...

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Suhas Kirloskar mandolin