नवरीचं रडणं (उत्तम कांबळे) | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uttam Kamble writes about marriage rituals

खरंतर कुठल्याच गोष्टीचा दिखावा करण्याची आवश्‍यकता नसते. अंतरंगातल्या भाव-भावना, संवेदना ही तर यादृष्टीनं अतिशय खासगी बाब. ती शक्‍यतो खासगीतच ‘साजरी’ झाली तर तिचा आब राखला जातो. मात्र, आजकालचा जमाना ‘असण्या’पेक्षा ‘दिसण्या’चा आणि दाखवण्याचा जास्त आहे. ‘लग्नात बिदाईच्या वेळी रडणं’ ही खूप गहिरी, खूप खोल अशी बाबही या ‘दाखवण्या’च्या यादीत येईल व तिचंही काहीएक ‘तंत्र’ असेल, अशी कुणी कल्पनाही केली नसावी. मात्र, आपल्या कल्पना करण्या-न करण्यावर काहीच अवलंबून नसतं...तर बिदाईच्या वेळी हमखास रडू कसं आणावं, कलात्मकतेनं कसं रडावं यासाठी काही तंत्रंही सध्याच्या जमान्यात विकसित झालेली आहेत. 

नवरीचं रडणं (उत्तम कांबळे)

त्र्यंबकेश्‍वर रस्त्यावर एके ठिकाणी भजी चांगली मिळतात, हे ठाऊक होतं. माझे मित्र आणि त्यांच्या मुलांसोबत ३० किलोमीटरचा प्रवास करत तिथं गेलो होतो. नाशिकमधल्या एका गरीब कुटुंबानं हॉटेल चालवायला घेतलंय. हॉटेलमध्ये वेटर म्हणून एक अल्पवयीन शाळकरी मुलगी. तिला म्हटलं, ‘अल्पवयीन मुलांना मजूर म्हणून काम करता येत नाही,’ त्यावर तिचं उत्तर : ‘हॉटेल आमचंच आहे. वडिलांना सुटीत मदत करायला येते. शाळा सुरू झाली की नाही येणार...’या मुलीचं म्हणजे हिच्यासारख्या असंख्य मुला-मुलींचं उत्तर शासनाला कळलं असतं, तर बालमजूर प्रतिबंधक कायदा कदाचित वेगळा झाला असता. भजी खाऊन झाल्यानंतर जवळच १० किलोमीटरवरच्या चिखलवाडीत ‘सर्वहारा परिवर्तन केंद्रा’नं नुकतीच खोदलेली विहीर पाहण्याचं ठरलं. चिखलवाडीत गेल्यानंतर जाणवलं, की शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी पाऊस येणार...आदिवासींचाही तसाच अंदाज होता. मात्र, एकजण म्हणाला : ‘‘सांगता येत नाही; आजकाल पाऊस भामटा झालाय.’’ परतीच्या प्रवासात काळे ढग जमू लागले. मृद्गंध अनुभवायला मिळणार, असं वाटायला लागलं; पण भ्रमनिरास होऊ लागला. मृद्गंधासाठी पावसाचे थेंब जमिनीवर, मातीवर पडावे लागतात. रस्त्यावर असं काही नव्हतं. माती विरुद्ध सिमेंट अशा वन डे वॉरमध्ये माती बऱ्यापैकी हरली होती आणि सिमेंट जिंकलेलं होतं. रस्त्याच्या दुतर्फा गबर लोकांनी काँक्रिटची जंगलं उभं केली आहेत. पर्यावरण कायद्यानं त्यांच्यासाठी म्हणून अंग दुमडून घेतलेलं असावं.

आमच्याबरोबर असलेल्या मुलीच्या लग्नासाठी तिच्या आई-वडिलांनी हालचाली सुरू केल्याचं मलाही ठाऊक होतं. का कुणास ठाऊक; पण अनपेक्षितपणे एक प्रश्‍न पुढं आला आणि त्याचं उत्तर मुलीनं देऊन टाकलं. लग्नानंतर सासरी जाताना म्हणजे ‘बिदाईच्या वेळी मी रडणार नाही,’ असं ती एका झटक्‍यात सांगून मोकळी झाली. मला तिचं उत्तर खूप आवडलं; पण बहुतेक नवऱ्या वर्षानुवर्षं माहेरशी असलेली नाळ अलगदपणे तुटताना रडतात, हेही सगळ्यांनाच माहीत आहे. माझ्या आईच्या वयाच्या अनेक महिला आजही माहेरून सासरी जातानाच नव्हे, तर माहेरची आठवण आली तरी रडतात. हे रडू वास्तवात आलं, साहित्यात आलं, चित्रात, शिल्पात, नाट्यात आणि हिंदी सिनेमात तर खूपच आलं. ‘जा मुली जा’ असेल किंवा ‘बाबुल की दुवाएँ लेती जा’ असेल, या गाण्यांनी रडण्याला उत्तेजन दिलं. लग्नाच्या वेळी अशी गाणी लागली, की रडण्याची कळ आपोआपच दाबली जाते.

बिदाईच्या वेळी मुलीनं म्हणजे नवरीनं रडावं की नाही, याबाबत काही नियम नाहीत. असताही कामा नयेत; पण परंपरा मात्र वेगवेगळ्या पद्धतीचं गणित मांडते. ‘जी मुलगी मोठमोठ्यानं रडते, तिचं माहेरवर दांडगं प्रेम, तर जी मनातल्या मनात रडते तिचं कमी प्रेम आणि जी आत-बाहेर रडतच नाही तिचं प्रेमच नाही,’ अशी काहीशी ही चुकीची गणितं आहेत. मुलगी जिथं जन्माला येते, ते नातेवाइकांचं जग सोडताना तिला स्वाभाविकच वाईट वाटतं. मुलगा होस्टेलमध्ये निघाला तरी रडणारे आई-वडील आहेत. मिलिटरीत निघालेल्या मुलांना निरोप देतानाही रडणारे आहेत. या रडण्यामागं गणित नसतं, तर भावना असतात. याशिवाय, मुलींना माहेरी असणारं थोडंफार स्वातंत्र्यही गमवावं लागतं. सासर नावाच्या नव्या जगाचा अंदाज नसतो. अजून बरंच काहीतरी असतं. संवेदनांचा जल्लोष होतो. अश्रूंच्या रूपात तो बाहेर पडतो; पण हे झालं कालचं-परवाचं. बहुतेक मुली आता रडत नाहीत. याचा अर्थ त्या संवेदनाहीन आहेत असं नव्हे. रडूनच संवेदना व्यक्त होतात किंवा व्यक्त करता येतात असंही काही नाही. निवडलेल्या नव्या जगाला त्या आनंदानं सामोऱ्या जातात. जुने-नवे नातेसंबंध समजून घेतात. त्यांची एक वीणही तयार करतात. यातून मग परंपरेनंच एक प्रश्न तयार केला, की बिदाईच्या वेळेला रडायचं की नाही? ‘आम्हाला रडू आलंच नाही’ आणि ‘आमचं रडू थाबलंच नाही’ अशी टोकाची उत्तरं असतात. त्यांच्या त्यांच्या पातळीवर दोन्ही उत्तरं बरोबर असतात.

पाहता पाहता चर्चा ‘गुगल’वर आली. बिदाईच्या वेळी कसं रडावं, यासंबंधीची खूप माहिती वेगवेगळ्या शीर्षकांखाली आहे. घरी आल्यानंतर मी ती वाचली. आश्‍चर्यच वाटलं. ही माहिती म्हणजे संवेदनांचं किंवा रडण्याचं मॅनेजमेंटच आहे, जसं इव्हेंट मॅनेजमेंट असतं तसं. ‘रडण्यासाठी पाच महत्त्वाच्या टिप्स’, ‘रडण्यासाठी दहा महत्त्वाच्या टिप्स’, ‘कसं रडावं, किती रडावं’ आणि ‘एवढा सगळा अभ्यास करूनही रडू आलंच नाही तर काय करावं,’ याची उत्तरंही तिथं आहेत. रडणाऱ्या आणि न रडणाऱ्या महिलांचे अनुभव आहेत. सुंदर फोटो आहेत. मोक्‍याच्या वेळी रडण्यानं आणि त्यातून येणाऱ्या आसवांनी दगा दिला तर काय करायचं, याची उत्तरंही ‘रडण्यासाठीच्या गाइड’मध्ये आहेत. नाटक-सिनेमात कधीही रडण्यासाठी जी तंत्रं वापरतात, त्यांचा उपयोग कसा करावा...डोळ्यांच्या खाली, भुवयांना सजवण्यासाठी जे काही वापरलं जातं, त्यातच विशिष्ट वेळेनंतर रडू येण्यासाठी काहीतरी मिसळावं; रडू येईल...रडू येण्यासाठी दु:खद प्रसंग बोहल्यावर कसे आठवावेत...अशा बऱ्याच टिप्स आहेत. त्या वापरून रडण्यात यशस्वी झालेल्या महिलांचे अनुभवही आहेत. आता हे सगळं ‘मोले घातले रडाया...’सारखं कोण घडवतं, का घडवतं हा प्रश्न उरतोच. मातृप्रधान व्यवस्थेच्या काळात असं काही घडत नसावं. नवरीकडं नांदायला जाणारा नवराच रडत असावा किंवा ‘आपण पुरुष आहोत, रडायचं कसं,’ असा एक गर्विष्ठ प्रश्नही त्याच्या मनात निर्माण होत असावा. ऐनवेळी रडण्यासाठी काय काय युक्‍त्या लढवाव्यात, याची खूप माहिती गुगलवर आहे. मुळात माणसाला रडायचं कसं हे शिकवायचं की लढायचं कसं हे शिकवायचं, हा तर प्रश्न आहेच; पण रडण्याचा इव्हेंट केला जात असल्याच्या काळात याचा विचार कोण करणार? ‘खावं कसं’ याच्या कार्यशाळाही ‘उपचार-नवसंस्कार’ या नावाखाली वर्ष-दोन वर्षांच्या मुलांसाठी महानगरात घेतल्या जातात. अर्थात ही सगळी बडी मंडळी असतात. हाताला-ओठाला अन्नाचा कण, पाण्याचा थेंब लागणार नाही, याची काळजी ते घेतात. ‘इटिंग कल्चर’ म्हणतात त्याला. त्यापाठोपाठ आता हे ‘क्राइंग कल्चर...’! कळत नाहीय, मानवी मनातल्या मूलभूत-नैसर्गिक संवेदनांवर आणखी कसली कसली आवरणं चढवली जाणार आहेत. संवेदना व्यक्त करण्याची सक्ती असत नाही. तो उपचारही असत नाही. मग हे असं का घडतंय...? सगळ्यांनी मिळून उत्तरं शोधू या...!

'सप्तरंग'मधील सर्व लेख वाचण्यासाठी क्लिक करा