दारिद्य्र लपवायचंय? जा अहमदाबादला! (उत्तम कांबळे)

दारिद्य्र लपवायचंय? जा अहमदाबादला! (उत्तम कांबळे)

दारिद्र्य लपवल्यानं संपतं की संपवल्यानं संपतं. ते लपवून काय उपयोग...? पण ते राज्यकर्त्यांना - मग ते इथले असतो की विदेशांतले - कसं कळणार? ते समस्यांच्या मुळाशी न जाता असे वरवरचे उपाय योजत असतात. खासकरून कुणी विदेशी पाहुणा आपल्या देशाच्या भेटीवर आला असता त्याला झोपडपट्टी वगैरेंसारखं आपलं दारिद्र्य दिसू नये म्हणून आख्खी झोपडपट्टीच झाकली जाते! खरंतर दारिद्र्य लपवण्याचा हा ‘शोध’ चीननंच लावला आहे. विकासरस्त्याभोवतालची आख्खी गावंच्या गावं ते लपवतात. चीननं लावलेल्या या ‘शोधा’चीच री भारतात गुजरातनंही चीनच्या प्रमुखांच्या दौऱ्याच्या वेळी ओढली होती...

झिमझिम आवाज काढत, हिरव्यागार वनश्रीनं सजलेल्या डोंगरटेकड्यांना गुदगुल्या करत, कधी स्वतःची फुटकी धार करून धबधब्याचं रूप घेत, कधी कोवळ्यागार, तर कधी तापलेल्या उन्हा-किरणाचा पाठलाग करत, कधी धुक्‍या-ढगाचं रूप घेत, सूर्यबाबाला लपाछपीचा खेळ शिकवत पडणारा पाऊस बघत सापुताऱ्याच्या वाटेवरून गुजरातमध्ये प्रवास करणं खूपच आनंददायी वाटतं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सौंदर्यस्पर्धेत भाग घेण्यासाठी सज्ज झालेली वनश्री, भरून वाहणारे ओढे, कुणाच्या तरी मिठीत जाण्यासाठी ओढीनं धावणाऱ्या शेवग्याच्या शेंगेसारख्या नद्या, आपलं तांबूस वैभव मिरवणारा आणि मस्ती करत करत वयात येऊन, तुऱ्याला आलेला भात, तर काही ठिकाणी लवकर वयात येऊन लवकर म्हातारं झालेलं भाताचं पीक, सापुताऱ्याच्या अंगावर सातत्यानं सुरू असणारा धुक्‍याचा खेळ... बाप रे बाप...! किती विलोभनीय, किती सुंदर! कोणत्याही ब्यूटीपार्लरमध्ये न जाता, कोणताही स्प्रे मारून न घेता कसा काय एवढा निसर्ग थटतो, नटतो, मुरडतो आणि डाव्या डोळ्याची भुवई नाजूकपणे वर करत अलगद खुणावतोही...आता बालकवी असायला हवे होते, असं सातत्यानं वाटत राहतं. निसर्गाची आणि आत काळजाचीही पडझड, रोपण, अँजिओग्राफी वगैरे सुरू असण्याच्या या काळात वावरणाऱ्यांना हा सगळा सुंदर निसर्ग काळजात साठवणं कसं शक्‍य आहे आणि समजा शक्‍य होत असंल, तर जागा कुठंय? ही झुलणारी, डोलणारी झाडं, गाणारे पक्षी, नवरदेवासारखे सजलेले डोंगर बघताना काय काय डोक्‍यात यायला लागतं...सुचायला लागतं! पण उतरतं कुठं काळजातून बाहेर आणि एवढं सगळं मावंल कसं कुठल्या तरी यंत्राच्या पडद्यावरच...?

बऱ्याच वर्षांनी मोदीबाबाच्या गुजरातमध्ये जात होतो. ‘वारसाशहर’ ठरलेल्या अहमदाबादेत जात होतो. यापूर्वी जेव्हा जेव्हा गेलो तेव्हा तेव्हा कोणत्या ना कोणत्या दंगलीनं हे शहर जखमी झालेलं होतं. डोक्‍यावर, हातावर, कपाळावर, गालावर झालेल्या जखमा सुकवण्यासाठी पट्ट्या दिसायच्या. आता काय असंल हा एक प्रश्‍न होताच. पूर्वी कोणे एके काळी आंदोलक असणारे मोदी आता पंतप्रधान बनलेले आहेत. गुजरातमध्ये २४ तास कोणत्या ना कोणत्या प्रयोगशाळा सुरू असतात. त्यातून काय काय तरी बाहेर पडतं आणि भारतासाठी प्रत्येक वेळेला एक नाव आणि एक विशेषण बाहेर पडतं तेही इथूनच. कधी स्वच्छ भारत, कधी धावणारा, कधी उभा राहणारा भारत, कधी सबसिडीमुक्त भारत, कधी कधी एक्‍स्प्रेस हायवेवरून सगळ्यांना घुमवणारा भारत, कधी मन की, तर कधी तन की बात, असं बरंच काही बाहेर पडत असतं. मोबाईलच्या हॅंडसेटवर एक नवा स्क्रीनसेव्हर येतो. व्हॉट्‌सॲपवर अंगठ्यांची गर्दी होते. हे सगळं घेऊनच अहमदाबादमध्ये प्रवेश केला.

शनिवारी सुटी असल्यानं बहुतेक सगळे चकाकते रस्ते वाहनधारकांसाठी मैत्रीपूर्ण बनलेले. पहिल्यांदा जुन्या गेस्ट हाऊसमध्ये गेलो, जिथं महात्मा गांधींच्या एका खटल्याची सुनावणी झाली होती. आता गुजरातमध्ये गांधीजींचा वापर क्रियापदासारखा करावा लागणं, हे स्वाभाविकच आहे. जग, देश, माणूस आणि समाज बदलण्यासाठी निघालेल्या गांधीजींचीही एक प्रयोगशाळा म्हणजे गुजरात. अर्थात, गुजरात तेव्हा स्वतंत्र आसन बाळगून नव्हता. ती गोष्ट नंतरची. मोदींनीही गुजरातला प्रयोगशाळा केली ती ‘शत-प्रतिशत भाजप’ बनवण्यासाठी. त्यात ते सध्या तरी यशस्वी झाले आहेत. पुढचं काय ते नटून-थटून आणि आयटम-साँग म्हणणाऱ्या साबरमतीलाच ठाऊक.

पूर्वी ती बापूजींची भजनं ऐकायची. आता घोषणा ऐकतेय. ऑनलाइन होण्याचाही प्रयत्न करतेय. साबरमती आश्रमात प्रदर्शनं मोठी आहेत. पुस्तकं, वस्तूंची विक्रीही होतेय. बापूजींचं जीवनदर्शन कोरीव कामात, फोटोत भिंतीला चिकटलेलं आहे. कुसुमाग्रज म्हणाले होते, की बापूजींच्या मागं शासकीय भिंती. याची प्रचीती घेण्यासाठी गुजरात एक चांगलं ठिकाण आहे. साबरमती आश्रम म्हणजे बापूजींची प्रयोगशाळा, विचारशाळा, आंदोलनशाळा. खूप छान वाटतं तिथं फिरताना. गेल्या काही वर्षांपासून एक समांतर चित्रप्रदर्शन तिथं उभं राहत आहे. ते म्हणजे मोदींच्या कर्तृत्वाचं प्रदर्शन. या प्रदर्शनात धावणारा भारत दिसतोय, तर शेजारच्या चित्रात हातानं काठी टेकवत दांडीयात्रेला, मिठाच्या सत्याग्रहाला निघालेला भारत दिसतोय. इकडं मुली वाचवा, असं आवाहन आहे, तर तिकडं स्वच्छतेसाठी पोझ देऊन उभ्या राहिलेल्या भजन म्हणणाऱ्या मुली आहेत. छान वाटतं आणि काय काय तरी सुचायलाही लागतं.

साबरमती नदी बापूजींसाठी रचलेल्या चरित्रात वाचता येत असे. लहानपणी आपण सगळ्यांनीच हे चरित्र पाठ केलेलं असतं. पाठांतरशक्ती तेव्हा खूप असते. सन १८६९..., २ ऑक्‍टोबर..., गाव फार सुंदर...नाव त्याचं पोरबंदर... तिथं जन्मले गांधी....नाव त्यांचं मोहनदास वगैरे खूप छान वाटायचं पाठ करताना... आशय समजून न घेता पाठ केलेल्या गोष्टी खूप लवकर विस्मरणात जातात. मग कुणी तुषार गांधी पुस्तक लिहून बसतो ः ‘लेटस्‌ किल गांधी’... बाप रे किती हिंसक टायटल! आणि तेही बापूजींवरील ग्रंथाला!! पण पुस्तक वाचल्यावर खूप छान वाटतं...तर साबरमतीमाय आता नवं आणि जुनं अहमदाबाद समजून सांगणारी एक रेषा वाटते. खूप मोठं तंत्रज्ञान, ज्ञान, सौंदर्यकल्पना, खूप सिमेंट, दगड वापरून आणि खूप मोठ्या फाटक्‍या-तुटक्‍या माणसांना हुसकून रिव्हर फ्रंट तयार केला आहे. अर्थात दोन्ही बाजूंनी. या फ्रंटवरून चालताना आपण भारतात नव्हे, तर कुठंतरी युरोपात सजवलेल्या, कमर्शिअल केलेल्या नदीच्या काठी फिरतोय, असं वाटतं. सकाळ-संध्याकाळ इथं इंडियातली खूप माणसं येतात. कुणाचं बीपी, कुणाचा डायबेटिस कमी होतो. नेत्रसुख प्रचंड लाभतं. प्रेमाच्या आणाभाका घेणाऱ्यांचीही गर्दी. शिवाय पर्यटकही असतात. बापूंचा माणूस वगळता सगळ्यांची एक सुंदर गर्दी असते. आत प्रदर्शनाच्या ठिकाणी वस्तूखरेदीसाठीही गर्दी असते. बापूजींच्या पुतळ्यापासून ते तीन चिनी माकडांपर्यंत...लोक काय काय खरेदी करत असतात म्हणून सांगू! खरेदी करणारे इंडियातले जरी असले, तरी बार्गेनिंग करण्याचा मोह कुणालाही होतोच. हा मोह बाहेर पडला, की सेल्समनच्याही ओठावरून एक उत्तर बाहेर पडतंय ः ‘खादीवर आता पूर्वीइतकी सबसिडी मिळत नाहीय. कमी होत होत आता पाच टक्‍क्‍यांपर्यंत आलीय...’ बापूजींवर लिहिलेल्या किंवा त्यांनी लिहिलेल्या ग्रंथांवर पाच-दहा टक्के सवलत मिळाली तीही तासभर भाषण केल्यानंतर. भाषण ऐकून सेल्सवुमनला वैताग आला असावा कदाचित...

बराच वेळ साबरमती आश्रमात घालवला. दिवसाचे डोळे जड होऊ लागले आणि सायंकाळ उगवली. कुणीतरी बातमी आणली, की उद्या नव्या राष्ट्रपतींचा गुजरातदौरा आहे. सगळा परिसर सुरक्षाव्यवस्थेच्या ताब्यात जाणार आहे. जागा रिकामी करा...कुणीतरी म्हणालं ः ‘काय राव, बापूजींनी कधी हयातीत सिक्‍युरिटी बाळगली नाही आणि या प्रदर्शनाला कशासाठी?’ प्रश्‍नकर्त्याला ठाऊक नसावं, की तिकडं वर्ध्यात बापूजींच्या पुतळ्याचा चष्मा चोरीला गेला आहे आणि तो परत मिळालेला नाहीय. म्हणजे चष्मा चोरणारा चोर सापडलेला नाहीय. काही माणसं मेल्यावर डेंजरस बनतात. सावधगिरीचा उपाय म्हणून ठिकठिकाणी सिक्‍युरिटी येतच असते आणि ती का येऊ नये...? कुणाचं तरी रक्षण करण्यासाठी सुरक्षाव्यवस्था असते आणि तिच्या अस्तित्वासाठी काहीतरी असावं लागतं...

अतिविशिष्ट शासकीय निवासस्थानातली रात्र खूपच अस्वस्थ गेली. राष्ट्रपतींचा दौरा असल्यानं आम आदमीला कधीही गेस्टहाऊस रिकामं करण्यास सांगितलं जातं. खाली खानावळीत बऱ्याच पोलिसांनी भोजन केलं होतं. आम्ही आमच्यासाठी पूर्वकल्पना देऊन बनवायला लावलेलं भोजनही संपलं होतं. सुरक्षारक्षक आनंदानं जेवले; पण पैसे द्यायला तयार ते होईनात. ‘आम्ही प्रेसिडेंटच्या सिक्‍युरिटीसाठी आलो आहोत’, असं ते सांगत होते. कॅंटीननचा व्यवस्थापक आणि त्यांच्यात बराच काळ वाद झाला. व्यवस्थापक म्हणायचा ः ‘कोणत्या तरी साहेबाच्या रूमचा नंबर सांगा. आम्ही बिल तिकडं ढकलतो.’ पण रक्षक काय असा नंबर सांगू शकतात? पुढं काय झालं साबरमतीलाच माहीत...!

दुसऱ्या दिवशी साबरमतीचा काठ म्हणजे रिव्हर फ्रंट चालून घेतला. तिथंही बंदोबस्ताचा अतिरेक आणि थोड्याच वेळात हा फ्रंटही बंद होणार होता. अकराच्या सुमारास वेगवेगळ्या पुलांवरून नदी आणि शहर पाहायचं ठरवलं. खरंतर इथं ‘पतंग’ नावाचं एक हॉटेलही आहे. टॉवर आहे. तिथं गेल्यावरही शहर दिसतं. रस्ते बहुतेक ठिकाणी सिक्‍युरिटीच्या ताब्यात गेल्यानं तिथं जाणं शक्‍य नव्हतं. मग आम्ही परीक्षितनगरच्या पुलावर आलो. पूर्वी तिथं शहरातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी होती. तशी ती साबरमतीच्या दोन्ही काठांवरही होती. नदी सुंदर करण्यासाठी ही सगळी कुरूपता पळवून लावण्यात आली. एक बरं झालं, की आश्रमाच्या आसपास चालणाऱ्या हातभट्ट्याही गेल्या; पण पळवून लावलेले लोक कुठं गेले हे ‘गुगल’साहेबही शोधू शकला नाही. हातभट्ट्या बंद पडल्याचं लोकांना एवढं काही वाटलं नाही. कारण, नियम आणि कायदा थोडा दुर्लक्षित करून फिरता आलं की दारूच दारू असते.

...तर परीक्षितनगरातले सगळेच्या सगळे लोक काही हटले नाहीत. झोपडपट्टी मागं रेटत, रेटत एक फ्लाय ओव्हर तयार झाला. तो तुम्हाला थेट आश्रमाच्या दारात पोचवू शकतो. अजूनही मुंग्यांसारख्या झोपडपट्ट्या आणि तिथं माणसं आहेत. याच पुलावर कुणीतरी महाराजांचा एक मोठा फोटो लावून त्याखाली लिहिलं आहे ः ‘धन नव्हे, पाणी मागतोय आम्ही...’ आता या माणसाला कोण सांगणार, की आता सगळ्यात मोठं धन पाणीच आहे. विशेष म्हणजे, हा बोर्ड साबरमतीजवळ. पाण्यानं भरलेल्या साबरमतीजवळ पुलाच्या कठड्याचं जणू चुंबन घेणाऱ्या एका झोपडीसमोर एक तरुण बाजेवर बसला होता. तो थोडा समोर आला. अस्वस्थ वाटत होता. कुठल्या तरी एका कंपनीत नोकरी करणारा हा तरुण वाल्मीकी समाजाचा होता. गुजरातमध्ये हा समाज खूप मोठा आहे. बापूजींनी पुढं काँग्रेस अधिवेशनात मैल्याची पाटी आपल्या डोक्‍यावर का उचलली, याचं एक कारण इथंही सापडतं. ‘नाच्यो बहोत गोपाल’ पुस्तक वाचल्यावरही वाल्मीकी समाज कळतो. ...तर हा तरुण म्हणाला ः ‘‘राष्ट्रपती येणार आहेत. कदाचित झोपडपट्टी झाकली जाईल असं वाटतंय.’’

‘झोपडपट्टी झाकणं’ हा शब्दच मी पहिल्यांदा ऐकत होतो. उत्सुकता म्हणून विचारल्यावर तो म्हणाला ः ‘‘एकदा चीनचे अध्यक्ष आश्रमात येणार होते. याच रस्त्यावरून जाणार होते. त्यांच्या नजरेस ही झोपडपट्टी, दारिद्य्र दिसू नये म्हणून प्लास्टिकचा एक मोठाच्या मोठा कागद पांघरून काही वेळासाठी झोपडपट्टी लपवली गेली होती. आज तसं होईल काय, असं वाटायला लागलंय. सहज विचार आला मनात... भीती वाटतेय; पण हेही खरंच की. राष्ट्रपती आपले असल्यानं तसं काही आता होणार नाही, असं वाटतंय.

मी ः आपलं दारिद्य्र दुसऱ्याला नाही दिसलं तर चालतं...
तो ः हो. तसंच असायला पाहिजे. मोदीसाहेबांना वाटतं, की बाहेरच्यांना दारिद्य्र दिसू नये.

काय बोलावं कळतं नव्हतं. दारिद्य्र लपवल्यानं संपतं की संपवल्यानं संपतं. लपवून काय उपयोग...? पाण्यातल्या कचऱ्यासारखं ते कधी तरी वर येणारच... आंध्र प्रदेशात चंद्राबाबू नायडू यांनी अमेरिकी अध्यक्षाला आपल्या राज्यातले भिकारी आणि त्याअनुषंगानं दारिद्य्र दिसू नये म्हणून भिकाऱ्यांना खूप पैसे आणि खाऊ देऊन कोंडून ठेवलं होतं. इथही तेच झालं म्हणायचं. खरंतर दारिद्य्र लपवण्याचा शोध चीननं लावला. विकासरस्त्याभोवतालची आख्खी गावंच्या गावं ते लपवतात. मोदीबाबांनी चीनमध्ये याचा अभ्यास केला असावा. जगभर सातत्यानं फिरणारा त्यांच्याशिवाय दुसरा नेता नाही. दौऱ्यात ते अभ्यास करतात. दारिद्य्र लपवण्याचा अभ्यासही त्यांनी केला असावा. ...तर पूर्वी बापूजी हयात असताना आंतरराष्ट्रीय पातळीवरचे खूप नेते साबरमती आश्रमात यायचे. बापूजी त्यांना सर्वोदय, अंत्योदय वगैरे सांगायचे. ‘गरिबात परमेश्‍वर बघा’ म्हणायचे; पण आता तसं काही नाहीय. ‘विकासात, धावणाऱ्या इंडियात तो बघा’, असं सांगितलं जातंय. पंतप्रधान गुजरातचेच असल्यानं पुन्हा एकदा श्रीमंत राष्ट्राचे नेते साबरमतीला येऊ लागले आहेत. पाहुणा कितीही श्रीमंत असला, तरी यजमान मात्र त्याला आपलं दारिद्य्र दिसू नये, याची काळजी घेतोच की...कुरूपता जगजाहीर करून कशी चालेल? आणि तसं झालं तर इंडियानं धावण्याच्या स्पर्धेत पोझ घेतली आहे, हे कसं कळंल? दारिद्य्र लपवण्याचे आणि सौंदर्य मिरवण्याचे आणखीही काही प्रयोग किंवा इव्हेंट होत राहतील. त्या तरुणाशी काय बोलावं कळत नव्हतं. त्यालाही कळत नसावं, की दारिद्य्र का लपवतात...?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com