दातांच्या बंगल्याला चॉकलेटची कीड (उत्तम कांबळे)

Article in Saptaranga By Uttam Kamble
Article in Saptaranga By Uttam Kamble

गेल्या बऱ्याच दिवसांपासून दाढ दुखतेय म्हणून डॉ. विशाल जाधवच्या दवाखान्यात गेलो. आता हा विशाल म्हणजे पूर्वीचा बाळू. मराठवाड्यातून पोट भरण्यासाठी आपल्या बिगारी बापाबरोबर लहानपणीच नाशिकमध्ये येऊन एका झोपडपट्टीत राहणारा. राजू नाईकच्या नजरेस तो पडला. मायको फोरम आणि कविवर्य नारायण सुर्वे वाचनालयाच्या वतीनं त्याला शिकवण्याचं म्हणजे हवं तेवढं शिकवण्याचं राजूनं ठरवलं. बाळू शिकू लागला. शिकण्यात गती दाखवत दाखवत तो डॉक्‍टर म्हणजे दंतरोगतज्ज्ञ झाला. त्याला पत्नीही डेन्टिस्टच मिळाली. 

दोघांची चांगली प्रॅक्‍टिस चाललीय. बाळूनं मग सुंदर बंगला बांधला. पदव्युत्तर शिक्षण घेतच तो नोकरी करतोय. झोपडीतल्या पोरांना, लढणाऱ्या पोरांना प्रेरणा मिळावी, अशी त्याची एक यशोगाथा तयार झालीय. या बाळूनं (९८९०४६०७७१) पुढं नाव बदललं आणि ते विशाल केलं. अशा तर यशोगाथा अनेक आहेत; पण बाळूचं वैशिष्ट्य म्हणजे तो आपल्यामागं धडपडणाऱ्या, चाचपडणाऱ्या लोकांचा जो समूह आहे, त्यांच्यासाठी सातत्यानं काही करत असतो. सातत्यानं मागंमागं वळून पाहतो, हे त्याचं वैशिष्ट्य. गावाकडं आणि नाशिकमध्येही समाजसेवेचे त्याचे अनेक उपक्रम सुरू असतात.

डॉ. विशाल ‘रूट कॅनल’ करणार होता. मी खुर्चीत बसलो. मला तपासणार, तेवढ्यात रडणारा एक पोरगा घेऊन एक जोडपं आलं. उजव्या गालावर हात ठेवून, प्रसंगी तो दाबत हा पोरगा जोरजोरात रडत होता. विशालनं त्याला विचारलं : ‘‘काय होतंय?’’ यावर त्या पोराची आई म्हणाली : ‘‘तीन-चार दिवसांपासून त्याची दाढ दुखतेय. खाता-पिता येत नाही. एकसारखा रडतोय.’’

विशालनं त्याला खुर्चीत बसायला सांगितलं. तो बसायला तयार होईना. वैद्यकीय उपकरणं, याच्या चेहऱ्यावरचा मास्क, गंभीर वातावरण यामुळं तो घाबरला. जागच्या जागीच पाय आपटत रडायला लागला. त्याच्या बापानं दरडावून सांगितलं- ‘‘बस खुर्चीत’’; पण तो ऐकायला तयार होईना. आईच्या मागंमागं लपू लागला. मग विशालनं आईला बाहेर थांबायला सांगितलं. पुन्हा पोरासाठी बापाचा तोच आदेश...‘‘बस खुर्चीत!’’; पण पोरगा महावस्ताद. त्यानं रडण्याचा आवाज वाढवला आणि खुर्चीपासून दूर पळू लागला. मग त्याच्या वडिलांनी त्याला गच्च पकडलं. त्याला स्वत: खुर्चीत घेतलं. डॉक्‍टरनं माउथ मीटर तोंडात घालण्याचा प्रयत्न केला; पण हा तोंड उघडेना. शेवटी वडिलांनी एक शिवी हासडली आणि ‘‘डोकं फोडेन’’ अशी तंबी दिली. स्वत:ची बोटं त्याच्या तोंडात घातली. मग विशालनं माउथ मीटर घातलं. एक-दोन मिनिटं तपासल्यानंतर तो म्हणाला : ‘‘याची दाढ किडलीय. चॉकलेट जास्त खातो का?’’

वडील म्हणाला : ‘‘तेच खाऊन जगलाय. चॉकलेट नाही म्हटलं, की शाळेला जाणार नाही. जेवणार नाही असं म्हणतोय.’’

विशाल : ‘‘ठीक आहे. आपण ‘एक्‍स-रे’ही काढू या.’’

मग पुन्हा त्याची रडारड. त्यातच ‘एक्‍स-रे’ काढण्यात आला. दाढ किडलीय यावर शिक्कामोर्तब झालं. विशालनं एक गोळी लिहून दिली आणि ‘‘दोन दिवसांनी या,’’ असं सांगितलं.

विशाल आता माझ्याकडं वळणार, तोच आणखी एक आई आपली आठ-दहा वर्षांची पोरगी घेऊन आली. तिचीही दाढ दुखत होती. पोरगी रडत होती; पण तिनं खुर्चीत बसून तपासणीला प्रतिसाद दिला. मग तिच्याही दाढेचा ‘एक्‍स-रे.’ तिचीही दाढ किडलेली. तीही आता दोन दिवसांनी येणार.

ती बाहेर गेली आणि ‘‘मोठा आ करा, सर’’ असं म्हणत विशाल माझ्याजवळ आला. हॅन्डग्लूम्स चढवले. माउथ मीटर घेतला. तेवढ्यात बाहेर आणखी एका पोराचा मोठमोठ्यानं रडण्याचा आवाज. त्याच्या आईलाही घाई होती. ती आतच घुसली. ‘‘डॉक्‍टर साहेब, याची दाढ खूपच दुखतेय. काही करून लवकर करा. उद्या पायाभूत चाचणी. शाळेला गेला नाही तर शिक्षक रागावतील.’’ मी विशालला म्हटलं : ‘‘बघून घे त्याला. मी वाट पाहतो.’’

विशालनं त्यालाही जबरदस्ती करून तोंड उघडायला सांगितलं. ‘‘चॉकलेट खातो का भाऊ, कोणती खातो, किती खातो,’’ असे प्रश्‍न विचारत निदान जाहीर केलं- दाढ किडलीय!

विशालचं ऐकून आई म्हणाली : ‘‘तरीही मूर्खाला सांगत होते चॉकलेट खाऊ नकोस म्हणून; पण आजकालची पोरं आई-वडिलांना गिणतच नाहीत. शाळेला जा म्हटलं तर चॉकलेट दे, अभ्यास कर म्हटलं तर दे चॉकलेट! आता कशाला बोंबलतंय?’’

आई खूपच चिडली होती. तिच्याही हातात विशालनं कागद ठेवला. भितभितच तिनं ‘‘आजची फी किती आणि पुढच्या उपचाराची फी किती,’’ असा प्रश्‍न विचारला. आकडा ऐकून पोराला पुन्हा शिव्या घालू लागली.
मी विशालला विचारलं : ‘‘का रे तू लहान मुलांच्या किडक्‍या दातांचा स्पेशालिस्ट डॉक्‍टर आहेस का?’’

तो म्हणाला : ‘‘तसं नाहीय; पण लहान मुलांच्या दाढा किडण्याचं प्रमाण जास्त आहे.’’

मी : ‘‘जास्त म्हणजे किती आणि कशामुळं?’’
तो : ‘‘जास्त म्हणजे सत्तर टक्‍क्‍यांच्या आसपास तरी असेल. आता मुख्य कारण म्हणजे चॉकलेट. दातांची निगा न राखणं, नको ती बिस्किटं खाणं वगैरे अन्य कारणंही आहेतच.’’

बोलतबोलतच विशालनं मलाही आदेश दिला : ‘‘मोठ्यानं आ करा?’’

मी ‘आ’ करतच शेवटचं वाक्‍य बोललो : ‘‘मी चॉकलेट कधी खाल्लेलं नाही तरी दाढ का किडली?’’

तो : ‘‘अनेक कारणं आहेत. एज फॅक्‍टरपण आहे.’’

विशाल तपासणी करू लागला आणि मी चॉकलेटचा विचार करू लागलो. चॉकलेट आणि लहान मुलं याचं एक समीकरण कधीच तयार झालेलं आहे, चॉकलेट किंवा तत्सम पदार्थांच्या जन्मापासून. अर्थात त्याला आई-वडीलही जबाबदार असतात. ते विकत देतात म्हणून पोरं खातात. वारंवार खाल्ल्यानं सवय लागते. चॉकलेट एकदम गोड. सगळं तोंड गोड. त्याला वासही भारी. बराच वेळ ओठावर चव राहते. त्याच्यामुळं भरपूर कॅलरीज मिळतात. गोड खाऊन पोट भरल्याचा आनंद वेगळा. बरेच पालक चॉकलेटच्या रूपानं जणू काही पोरांना लाच खायला शिकवतात. ‘तू लवकर ऊठ, तू अभ्यास कर, तू काम ऐक, तू रोज शाळेला जा... तुला चॉकलेट बक्षीस मिळेल,’ असं बहुतेक पोरांना सांगितलं जातं. सुरवातीला वडिलांची आज्ञा ऐकून पोरं काम करतात. चॉकलेट मिळवतात. 
पुढं चॉकलेटचं व्यसन झालं, की ती स्वत:च दादागिरी करून ते मिळवतात. दात दुखायला लागले, दाढा किडायला लागल्या, तरी चॉकलेटपासून ते दूर राहत नाहीत. चॉकलेटचं महत्त्व आणि माहात्म्य सांगणारी गाणी रोज रेडिओवर आणि अधूनमधून टीव्हीवर लागतात. ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला, या बंगल्याला चॉकलेटचं दार, चॉकलेटची खिडकी, चॉकलेटचा सोफा, चॉकलेटची कॉल बेल...’ वगैरे बरंच काही असतं. दातांचा अख्खा बंगला चॉकलेटनं किडणार असेल, तर त्याचंच आमिष का दाखवलं जातं, हे मला तरी काही कळलेलं नाही. माझ्या पोरांनाही बराच काळ चॉकलेटनं पकडून ठेवलं होतं. तिथून सुटायला दाढा किडाव्या लागल्या. ठेच लागल्याशिवाय अक्कल येत नाही, यातला प्रकार. ‘पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ ही गोष्ट म्हणीतच राहते. विसंगत वाटाव्यात अशा अनेक गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत मोठी माणसं घडवतात.

चॉकलेट देणारे तेच, सवय लावणारे तेच आणि पोराला शिव्या देत डॉक्‍टरसमोर बसवणारे तेच. ‘रोज रोज शाळेला जा,’ असं सांगणारे तेच आणि ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडून शाळेला सुटी मिळेल काय,’ हे गाणं लिहिणारे आणि शिकवणारे तेच. गणिताची ट्युशन लावणारे तेच आणि गणिताचा तास कंटाळवाणा असतो, असं गाण्यात लिहिणारे तेच. आपली ही संस्कारपद्धती जगात भारी आहे. दातांची नैसर्गिक निगा राखायला कुणी शिकवत नाही. त्याऐवजी ‘दिवसातून चार वेळा ब्रश कर आणि पळव बॅक्‍टेरिया’, ‘पळव दुर्गंधी आणि जा पोरीच्या मिठीत’ असं सांगणारी साधनं भरून पावली आहेत. दातांची निगा राखण्यासाठी साऱ्या जाहिराती मान्य करायच्या, म्हणजे दात घासत राहण्याशिवाय दुसरं काहीच करता येणार नाही. डॉक्‍टरसमोर जाऊन तोंडही उघडता येणार नाही. मुळात अशी वेळ का येते, ती कोण आणतं याच्याशी कुणाचं देणंघेणं नसतं. आपल्याभोवती नुसती पेनकिलरची आणि रोग डम्प करणाऱ्यांची गर्दी असते. कारण ‘असावा सुंदर चॉकलेटचा बंगला’ हे गाणं सुरूच असतं आणि ‘चॉकलेट देतो, अभ्यास कर’ हे आमिषही कायम असतं.

मी माझे दात तपासून बाहेर आलो, तर आणखी दोन आया आपली दातकिडकी लेकरं घेऊन उभ्या. दात हा अवयव आता चर्वणासाठीच राहिलेला नाही, तर तो सौंदर्याचा दागिना बनलाय. जिचे दात सुंदर तिचं लग्न लवकर होणार, ज्याचे दात सुंदर तो जग जिंकणार, अशा साऱ्या भ्रामक कल्पनाही दाताला चिकटवल्या जात आहेत. त्यातून वेडेवाकडे दात सरळ करून मिळतील अशा पाट्या लागल्या. पूर्वी वेडीवाकडी वळणं होती. आता वेडेवाकडे दात. वेडे आणि वाकडे हे दोन शब्द का वापरले गेले असतील कळत नाही. जे वाकडं असतं ते वेडं असतं, की जे वेडं असतं ते वाकडं असतं? काही कळत नाही. अमृतासी पैजा जिंकणारी मराठीही मदतीला येत नाही. रडणाऱ्या पोरांनी खूपच कालवा सुरू केला, तेव्हा मीही किती जणांच्या दातांचे बंगले अजून किडत राहतील याचा विचार करतच गुपचूप बाहेर पडलो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com