कोंबड्या कुणी मारीयेल्या बाई! (उत्तम कांबळे)

कोंबड्या कुणी मारीयेल्या बाई! (उत्तम कांबळे)

उं  ब्रजमध्ये ‘ऋणानुबंध’ या संस्थेत गुणी उंब्रजकरांचा सत्कार २२ ऑक्‍टोबरला होता. एसटीचा संप मिटल्यामुळं आणि वीकेंडला गेलेले पुणे-मुंबईकर परतत असल्यामुळं वाहनांची प्रचंड गर्दी होती. एक्‍स्प्रेस हायवेला लो-वेचं म्हणजे एखाद्या बोळासारखं स्वरूप आलं होतं. गर्दीतून मार्ग काढतच आम्ही जेवणासाठी भोरच्या दिशेनं वळलो. रोहिदासनं हे हॉटेल शोधलेलं होतं. कोकणी पदार्थांसाठी ते प्रसिद्ध होतं. लॉनवर खुर्च्या टाकून आम्ही बसलो, तर समोरच एक रुबाबदार कोंबडा तुरा मिरवत फिरू लागला. एका कडेपासून दुसऱ्या कडेपर्यंत तो जणू काही कॅटवॉक करायला निघाल्यासारखा दिसत होता. रंगानं काळाकुट्ट, पंख काळे, तुरा काळा, पाय आणि नखं काळी, चोच काळी, डोळेपण काळे. त्याच्या संपूर्ण शरीरावर शुभ्र भाग कुठंच नव्हता. अलीकडं नॉनव्हेजच्या जगात त्याचं खूप नाव आहे. अनेक हॉटेलांसमोर त्यानं होर्डिंग्जवर जागा मिळवलीय. ...तर हा कुक्कुटक्षेत्रातला नवा बादशहा म्हणजे कडकनाथ होता. आमच्यापैकी एकानं त्याला मोबाईलच्या कॅमेऱ्यात पकडलंही.

पाच-सात वर्षांपूर्वी एक नवं ब्रीड कुणीतरी जन्माला घातलं दक्षिणेकडं. दक्षिणेनं आपला गडद सावळा रंगही त्याला दिला. त्याचा प्रचार व्हावा म्हणून अनेक दंतकथा तयार झाल्या. ‘कडकनाथाला बळी दिलं की देव-देवी हमखास प्रसन्न होते...करणी उतरावयाची असेल तरी ती किंवा तो कडकनाथ आडवा पाडायचा...गुप्त खजिना शोधण्यासाठी कडकनाथचा बळी द्यायचा...’ इत्यादी इत्यादी. आदिवासी भागातले अनेक भगत कडकनाथाचा वापर जादूटोण्यासाठी करू लागले. सुरवातीला दुर्मिळ वाटणारा कडकनाथ महाराष्ट्रात शोधण्यासाठी बुवा काय काय करायचे...अनेक प्रकारे त्याचं माहात्म्य सांगायचे ः ‘कडकनाथाचं रक्तही काळं...ते शिंपडून ‘मी मी’ म्हणणाऱ्या भूत-पिशाच्चांना सीमेवर रोखता येतं...अंगात भूत घुसलेल्या माणसाच्या शरीरावर कडकनाथाच्या रक्ताचे दोन-चार थेंब शिंपडायचे...त्याची चोच समोर नारळावर उदबत्त्यांच्या धुरात ठेवली की भुताला चटके बसतात...‘भागो-भागो’ म्हणत ते पळून जातं...’ आदिवासी भागात आणि खेड्यापाड्यांत कडकनाथपुराण लोक असं खुलवून खुलवून सांगायचे. पूर्वी जादूटोण्यासाठी काळ्या रंगाच्या आणि उलट्या पंखांच्या कोंबड्या वापरत. अर्थात, तेव्हा आणि आताही या कोंबड्या दुर्मिळच असतात. कडकनाथ आला आणि या कोंबड्यांची जादूटोण्यातून सुटका झाली. एखादी गोष्ट दुर्मिळ असली, तिची टंचाई असली किंवा तिला चित्र-विचित्र माहात्म्य जोडलं गेलं, की ग्राहक स्वतःहून ती शोधण्यासाठी जातात. कडकनाथाचंही तसंच झालं. लोक स्वतःहून कडकनाथाची डिश शोधायचे. दुर्गम भागात ढाब्यावर ती मिळायची. एका पोलिस अधिकाऱ्यानं त्र्यंबकेश्‍वर भागात कडकनाथाचं पैदासकेंद्र सुरू केलं. तिथला कडकनाथ पाहण्यासाठी अनेक जण सहल काढून जायचे. बघता बघता कडकनाथानं नॉनव्हेज भोजनात मोठं स्थान मिळवलं. पोल्ट्री आणि गावठी कोंबड्यांना त्यानं मागं टाकलं. ‘कडकनाथ म्हणजे एकदम मस्तच’, अशी जाहिरात तयार झाली. कडकनाथ असाच रुळला.

कडकनाथ समोर असा खेळत असतानाच मला चिखलवाडीची आठवण झाली. राजू नाईक आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ‘सर्वहारा परिवर्तन केंद्रा’तर्फे चिखलवाडी दत्तक घेऊन तिथं सुरू केलेल्या विकासकामांविषयी यापूर्वीच ‘फिरस्ती’त लिहिलं आहे. या गावात कधीही गेलं तरी तिथं काहीतरी नवीन घडलेलं आहे, असं दिसायला लागतं. मी अधूनमधून तिथं जातो, ते तिथं नटून उभा राहिलेला आणि कडकनाथाच्या थोबाडीत बसावी, अशा पद्धतीनं नटतच जाणारा निसर्ग पाहण्यासाठी. आदल्याच दिवशी २१ ऑक्‍टोबरलाही प्राचार्य संजय कांबळेसोबत गेलो होतो. ‘नवरा-नवरीचा डोंगर’ उतरून खाली आल्यावर आदिवासी पाड्यातल्या एका घरासमोर थांबलेल्या महिलेला विचारलं ः ‘ताई, गावठी कोंबड्यांची अंडी आहेत का?’ यावर ‘नाय बा’, असं म्हणत डोक्‍यावरचा पदराचा तुकडा गच्च लपेटून ती आत गेली. जेव्हा केव्हा आम्ही या पाड्यावर जातो तेव्हा आदिवासींनी तयार केलेले पापड, तांदूळ वगैरे गोष्टी विकत घेतो. त्यांना जागीच ग्राहक मिळावा हा एक हेतू त्यामागं असतो. अंडी खरेदी करण्यामागं हाच हेतू होता. दुसऱ्या घरात विचारलं तर हेच उत्तर मिळालं. तिसऱ्या घरात विचारलं तर तिथली एक वृद्ध स्त्री कपाळावर हात मारून घेत म्हणाली ः ‘‘बाबा, रोगानं समद्याच्या समद्या कोंबड्या खाऊन टाकल्या. समद्या पाड्यावर एक बी कोंबडी जिती राह्यली नाय. पटापटा मेल्या कोंबड्या. कुटनं आला रोग आन्‌ आमच्याच कोंबड्या कशा गिळून गेला, काय उमजत नाय. कुटं बी आत अंडी इचारू नगं. कोंबडीच राह्यली नाय तर अंडी कोन देनार? कोंबड्या व्हत्या तवा अंडी इकून, खुडूक कोंबडी इकून रोजचं तिखट-मीठ चालायचं. धडुतं घेता यायचं. आठ-धा रुपै का आसंना; पर पैसा दिसायचा. आता काय उरलं नाय बघ. बाजारात जाऊन नव्या कोंबड्या इकत घ्यायाला पैसा हाय कुनाकडं... लय कोंबड्या मेल्या, तडफडून, तडफडून...’’

आदिवासी आजीचं हे बोलणं ऐकून सुन्न व्हायला लागलं. आदिवासींच्या अर्थशास्त्राचा बराच भाग कोंबड्यांनी आणि शेळ्यांनी व्यापलाय. वर्षातून एकदाच धान्यविक्रीनंतर त्यांच्या हातात पैसा येतो. बाकीचे दिवस कोंबड्या-कुकड्यावर जगावं लागतं. रोजगार हमीची कामं यांच्यापर्यंत पोचत नाहीत. मोदीसाहेबांनी काळा पैसा बाहेर काढून प्रत्येकाच्या नावावर दहा-पंधरा लाख रुपये भरायचं जाहीर केलं होतं. अद्याप एक पैही कुणाच्या नावावर जमा झालेली नाही. आता बिचाऱ्या पंतप्रधानांचा त्यात दोष काय? ...तर आदिवासींच्या अर्थशास्त्रालाच जणू रोगाची लागण झाली. कुणी डॉक्‍टर तिथं पोचला नाही किंवा ‘इंडिया शायनिंग’ म्हणणाराही पोचला नाही.

मी एका महिलेला विचारलं ः ‘‘समज, आम्ही या पाड्यावर प्रत्येक घरात दोन दोन कोंबड्या दिल्या तर त्या सांभाळणार का?’’ यावर चंद्र फुललेला चेहरा घेऊन ती म्हणाली ः ‘‘लय उपकार व्हतील. आम्ही संभाळू कोंबड्या. हाता-तोंडाची भेट व्हईल. त्र्यंबकेश्‍वरच्या मंगळवारच्या बाजारात कोंबड्या मिळत्यात. गावठी कोंबड्याच सांभाळता येत्यात. त्या मिळाल्या तर लई बरं व्हईल.’’

महिला आशाळभूत होऊन बोलत होती. आम्ही चालता चालता विचार करू लागलो. कुठल्या शेठजीच्या किंवा सरकारच्या मागं न लागता आपणच प्रत्येकी पाचशे रुपये वर्गणी काढली आणि घरटी दोन कोंबड्या दिल्या तर? कल्पना खूपच भन्नाट वाटली. मग एकानं पाचशे रुपयांची नोट काढली. मीही काढली. हे सगळं ऐकत भोरमध्येही एकानं काढली. मग पुण्याचा एकजण, मग उंब्रजचे एक कॉम्रेड, मग नाशिकचे चार... साखळी खूपच वाढत गेली. राजू नाईक याच्याशी बोलून (मो. ८०८७९८३२४०) या सगळ्या प्रकरणाचं संयोजन करण्याचं ठरलं. ‘कुणा एकाकडं मोठी रक्कमही मागायची नाही आणि पाचशेपेक्षा जास्त रक्कमही कुणा एकाकडूनच घ्यायची नाही,’ असं ठरलं. अजून काही कल्पना येऊ लागल्या. पिल्लं जन्माला घालण्यासाठी अंडी आणि एक कोंबडी दिली तर...एक-दोन कोंबड्यांना आपल्या दृष्टीनं तसा फार अर्थ नाही; पण हरलेल्या या समाजासाठी मात्र खूप मोलाची मदत होणार होती. त्यांच्या दुःखावर उतारा शोधणारे कुणीतरी बाहेर आहेत, हे सांगता येणार होतं. हे सगळं सुरू असताना ‘माझा कोंबडा कोणी मारीयेला बाई’ ही कविता आठवत होती आणि ‘या पाड्यावरच्या कोंबड्या कोणी मारीयेल्या बाई’ अशी कवितेची एक नवी ओळ जन्माला येत होती. ठाऊक नाहीय ती घेऊन कोण कविता पूर्ण करेल...तूर्त तरी या आदिवासींसाठी अशा कविताच उपयोगी पडतात. त्यांच्या कोंबड्यांच्या मरणाची भरपाई द्यायला कुणी आलं नाही...

तुमचं अंदाजपत्रक इंडियाशी मॅच का होत नाही, हे विचारायला कुणी आलं नाही...त्यांचे नेतेही आले नाहीत...तुमच्या पाड्याचा रस्ता चोरीला का जातो, हे विचारायला कुणी आलं नाही...बाहेर काही झालं तरी भरपाईचा हिशेब... मात्र, आदिवासींची कितीही पोरं कुपोषणानं मेली तरी भरपाई नाही...कोंबड्या ही किरकोळ गोष्ट झाली...बाजूचे दोन साक्षीदार डोंगर आहेत...त्यांच्या पोटात आदिवासींच्या वेदना भरल्या असतील...उद्या कुणी कंत्राटदार डोंगर विकत घेईल...त्यावरून इंडियाला पळवेल, तेव्हा कधीतरी बुलडोझरच्या धक्‍क्‍यानं वेदना बाहेर येतील...आपण कदाचित त्या सोशल मीडियावर घेऊ...कुणीतरी पगारी ट्रोल अतिशय निर्दयपणे लिहील... अर्थात पगारासाठी लिहील ः ज्यांना जगण्याचं स्किल ठाऊक नाहीय त्यांनी जगायचं कशाला...? आणि झालंच तर ‘हे सगळे नमोविरोधक आहेत,’ अशी विखारी चोचही पडद्यावर मारून जाईल...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com