शेवटच्या प्रवासातही ‘जीएसटी’ (उत्तम कांबळे)

रविवार, 29 ऑक्टोबर 2017

जगण्याचा प्रवास तसा बिकटच असतो. गरिबांचा तर जास्तच बिकट. चालता श्वास ते मृत्यू यादरम्यान माणसाला खूप काही भोगावं-सोसावं लागतं. या भोगवट्यानंतर ‘मृत्यू ते स्मशान ते चिता’ हा तरी प्रवास - अर्थात मागं उरलेल्यांसाठी - कष्टदायक, खर्चिक असू नये, ही अपेक्षा बाळगली तर ती अवाजवी ठरेल काय? नक्कीच नाही...मात्र, सध्या हा अखेरचा प्रवासही तसा महाग झाला आहे. कारण, अंत्यसंस्कारांच्या सामग्रीवरही जीएसटी लावला जात आहे. अंत्यसंस्कारांसाठीचा मूळ खर्चसुद्धा ज्या गरीब वर्गाला नीट परवडत नाही, त्याच्या या खर्चात आता भर पडली आहे ती जीएसटीची...गरीब माणूस मृत्यू पावून चितेवर जातो; पण त्याचे हयात नातलग मात्र अतिरिक्त खर्चानं होरपळून निघतात...

परवा एका मित्राच्या आईच्या अंत्यविधीसाठी नाशिकच्या ‘अमरधाम’मध्ये गेलो होतो. जोरदार पावसामुळं शववाहिका मध्येच कुठंतरी रस्त्यात थांबली असावी. ती स्मशानात पोचली तेव्हाही पाऊस असा धोधो म्हणजे मुसळधारच होता. स्मशानात आम्ही काही मोजकेच जण होतो. मित्राच्या आईच्या अंत्यसंस्कारांसाठी जे साहित्य विकत घेतलं होतं, त्याची पावती एकजण वाचत होता. पावसामुळं भिजलेली; पण लांबलचक असलेली ती पावती सुकण्यासाठी त्यानं एका फरशीवर ठेवली होती. बिलातली प्रत्येक गोष्ट आणि त्यापुढं लिहिलेल्या रकमेचा आकडा तो काळजीपूर्वक वाचत होता. मुळातच तो अकाउंट विषयातला होता. एका अर्थानं तो या बिलाचा अभ्यासच करत होता, असं आपण म्हणू या. पावतीवर टाकलेली नजर त्यानं पावतीच्या शेवटाकडं आणली आणि तो जोरातच ओरडलाच ः ‘आयला, इथंही जीएसटी लावलाय...’ मला त्याचं ते वाक्‍य ऐकून आश्‍चर्य वाटलं. मग मीही ती पावती हळुवारपणे हातात घेतली. जीएसटी आणि स्मशान, जीएसटी आणि अंत्यसंस्काराचं साहित्य असं एक नवं समीकरण तयार झालं होतं.

आश्‍चर्ययुक्त नजरेनं मी ती यादी पाहत होतो. ती खूपच लांब होती. मरताना माणूस सगळं इथल्या इथं सोडून जातो. त्याच्या शरीरावरचा धागाही कुणी तसाच ठेवत नाही. एखाद्याच्या तोंडात सोन्या-चांदीचा दात असंल तर तो घेण्यासाठी एक समूह जणू काही युद्धच करतो, याचं वर्णन अण्णा भाऊ साठे यांच्या कथांमध्ये वाचायला मिळतं. हे सगळं खरं असलं तर स्मशानात पोचेपर्यंत आणि अग्नीच्या अंथरुणावर त्याचा निर्जीव देह ठेवेपर्यंत त्याच्यासाठी काय काय आणावं लागतं, म्हणजे त्याच्या नातेवाइकांना खरेदी करावं लागतं, याची ती यादी आहे. आपल्याकडं माणसाचा आत्मा अमर असतो...आपल्याकडं पूर्वजन्म आणि पुनर्जन्म आहे. अर्थात, इतर धर्मांतही तो आहे. काय काय न्यायचं चितेपर्यंत याबाबतची प्रत्येक धर्माची यादी वेगवेगळी असते.

मरणसंस्कार किंवा अंत्यसंस्कार वेगवेगळे असतात. त्यातही विवाहित, अविवाहित, विधवा, तरुण, बालकं यांनुसार यादी बदलत जाते. मी पाहिली ती विधवामातेच्या अंत्यसंस्काराच्या वेळची यादी. वेगवेगळ्या वस्तू घेतल्या गेल्या होत्या. यादीत त्या नोंदवल्या होत्या. अंत्यसंस्कारासाठीच्या वस्तू विकणारी दुकानं आहेत. ती २४ तास सेवेसाठी उघडी असतात. मृत्यू काही शॉप ॲक्‍टचं वेळापत्रक पाहून येत नसतो म्हणून ही सोय असते. अन्यत्र जसं दराची घासाघीस करता येते, बार्गेनिंग करता येतं तसं इथं नसतं आणि दुःखात असणारे त्या फंदात पडतही नाहीत.

...तर वस्तू अशा होत्या १) दोन बांबू आणि सात कामट्या, २) सुतळी बंडल, ३) चंदनाचं लाकूड, ४) अत्तराची बाटली, ५) गुलाबपाणी, ६) कापूर, ७) अगरबत्ती, ८) छोटं मडकं, ९) मोठं मडकं, १०) खोबरं, ११) हळद-कुंकू, १२) गुलाल-बुक्का, १३) काळे तीळ, १४) पाच मीटर कापड, १५) गुलाबी शाल, १६) पंचा, १७) पत्रावळी, १८) पोवळ्याचा मणी, १९) गवत-गोवऱ्या, २०) जानवं, २१) गंधगोळी, २२) पान, २३) हार, २४) फुलं, २५) तुळस, २६) तूप, २७) कणीक, २८) पळी-ताम्हण.

शेवटच्या वस्तू बाहेरून घ्यायच्या असतात. मृत व्यक्ती महिला सुवासिनी असेल तर परव, मोळी, तीळ, मेणबत्ती, हिरवी साडी, लाह्या, ओटीभरण, नथ, जोडवी, मंगळसूत्र, मुंडावळ्या, बांगड्या वगैरे गोष्टी लागतात. मृत व्यक्ती पुरुष असेल तर काही वस्तू कमी होतात, काही वाढतात. बिलावर पुरुषाचा उल्लेख ‘माणूस’ असा करतात. म्हणजे बाई अजून माणूस नाही. 

...तर बिलातल्या वस्तूंवर जीएसटी लागला होता जवळपास साडेतीनशे रुपये. सगळं मिळून दोन हजारांच्या आसपास बिल होतं. अर्थातच गरिबाच्या अवाक्‍यापलीकडचं; पण कुणीही असो, काहीही करून हे साहित्य विकत घ्यावंच लागतं. काही जण उसनवारी करतात. काही जण कर्ज काढतात. हे सगळं झाल्यानंतर हळूहळू कळायला लागतं, की जगणं आणि मरणं यातलं स्वस्त कोणतं आणि महाग कोणतं ते. काही वेळेला मरण महाग ठरतं... सगळ्याच अर्थांनी...मोदींनी जीएसटी लागू केला तो देशातली एक ऐतिहासिक अर्थक्रांती म्हणून. पैसा आणि त्या रूपानं द्यावयाचा कर हा धर्मनिरपेक्ष असतो, असं म्हणतात. जातपात, धर्म, पंथ, वेळ असे कोणतेच भेदाभेद पैशाला किंवा कोणत्याही कराला नसतात.

जीएसटीविषयीची वाढती ओरड लक्षात घेऊन काही वस्तूंवरचा जीएसटी रद्द किंवा कमी करण्यात आला. गुजरातच्या निवडणुका तोंडावर असताना आणि तिथूनच सर्वाधिक विरोध असताना काहीतरी करावंच लागणार होतं. अर्थचाणक्‍य खूप हुशार असतात. ते पेट्रोल-डिझेलचा दर चाळीस रुपयांनी वाढवतात आणि ओरड झाली की दोन रुपयांनी कमी करतात. तसंच जीएसटीचं झालंय.

अर्थसंकल्पाच्या वेळीही तसंच असतं. अत्यावश्‍यक, जीवनावश्‍यक गोष्टींवरचा कर वाढतो. टोपी स्वस्त होते. मूर्तीसाठी वापरावयाची माती स्वस्त होते. पर्यावरणात न खेळणारी गोष्ट स्वस्त होते. बऱ्याच वेळेला दूध, पाणी महाग आणि मद्य स्वस्त होतं. मद्य तयार करणारं धान्यही महाग होतं. आता जीएसटी कमी केल्यामुळं काय काय स्वस्त होणार हेही जाहीर झालंय. अर्थात, पूर्वीच्या तुलनेनं ते महागच आहे. खाकरा, इडलीचं पीठ, वाळवलेली चिंच, आक्रोड, ड्राय मॅंगो, मानवनिर्मित सूत, कस्टर्ड पावडर इत्यादी. या सगळ्या वस्तूंचं अत्यावश्‍यक गरजांमध्ये किती स्थान आहे, यावर भाष्य करण्याची गरज नाही. पॅकबंद पाणी स्वस्त केलं असतं, अन्न-धान्य स्वस्त केलं असतं तर गोष्ट वेगळी होती.

माणसाच्या शेवटच्या प्रवासासाठी स्मशानापर्यंत लागणाऱ्या वस्तूंना ‘जीएसटी’मधून मोकळं केलं असतं तर सरकारच्या अर्थव्यवस्थेवर, त्याला लाभलेल्या पाशवी बहुमतावर किंवा त्याच्या प्रतिमेवर काही परिणाम झाला नसता; पण सरकारच्या लक्षात ही गोष्टी कशी काय आली नाही? मोठमोठ्या शहरांत अंत्यसंस्कार मोफत आहेत. मोफत याचा अर्थ लाकूड आणि रॉकेल मोफत मिळतं. मिळणारं रॉकेल आणि लाकूडही भेसळयुक्त असण्याच्या तक्रारी वाढताहेत. अनेक जण घरातूनच जादा रॉकेल घेऊन येतात. मोफत अंत्यसंस्कारापर्यंत पोचण्यासाठी बाकीच्या वस्तू घ्याव्याच लागतात.

याचा अर्थ शेवटचा प्रवास महागडा व्हायला लागतो. जीएसटीमध्ये ज्यांना सवलत मिळाली, त्यात या गोष्टी नाहीत. सामान्य माणसं दुःखाच्या वेळी या सगळ्याचा हिसाबकिताब करू शकत नाहीत आणि समजा तो केला तरी त्यांना कुणी गिनत नाही. सरकार कुणाचं आहे हा प्रश्‍न क्षणभर बाजूला ठेवू या. कारण, असं काही लिहिलं, की ‘गरिबांचं गाऱ्हाणं कशाला गाता? साठ वर्षं कोण राज्य करत होतं?’ असे कोरीव प्रश्‍न विचारणारी एक पेड टीम आपल्याकडं आहे. त्यांना यातलं काहीच भोगावं लागत नाही म्हणून ती पाठ करून घेतलेले प्रश्‍न विचारत राहते. असो. मृत्यू ते स्मशान ते चिता हा प्रवास तरी निदान सुखकर व्हावा. कारण, चालता श्‍वास ते मृत्यू हा प्रवास तसा बिकटच असतो.

Web Title: Marathi News Sakal saptranga esakal Uttam Kamble GST