उघडले की-बोर्ड; की लागले बडवायला....! (विश्राम ढोले)

Article in Saptraga by Vishram Dhole
Article in Saptraga by Vishram Dhole

समाजमाध्यमांवर (सोशल मीडिया) संवादव्यवहार करताना आपल्यातला ‘संपादक’ जागा असतो का? 

‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ अशी आपल्याकडं एक जुनी म्हण आहे. त्याचा अर्थ मागचंपुढचं, खरंखोटं, भलंबुरं, शिष्ट-अशिष्ट, परिणाम वगैरेचा काही विचार न करता जे मनात आलं ते धाडकन बोलून टाकणं. अर्थात अशा बोलण्याची निंदा करण्यासाठीच ही म्हण वापरली जाते. आपल्याला जे वाटलं ते प्रत्यक्ष बोलण्यापूर्वी त्याला चांगल्या-वाईटाच्या काहीतरी चाळण्या लावल्या पाहिजेत, ही त्यामागची अपेक्षा. एका अर्थी, ‘मनात येणं ते प्रत्यक्षात बोलणं’ यादरम्यान बोलणाऱ्याच्या डोक्‍यात काहीतरी संपादकीय प्रक्रिया झाली पाहिजे, असं आपण मानतो. बोलणंच नव्हे, तर इतरही संवादव्यवहारांमध्ये आपली अशीच अपेक्षा असते. 

जे संवादव्यवहार सार्वजनिक होण्यासाठी केले जातात, तिथं तर ही नुसती अपेक्षाच नव्हे, तर गरजही असते. म्हणूनच वृत्तपत्रं, मासिकं, नभोवाणी आणि दूरचित्रवाणी या प्रसारमाध्यमांमध्ये अशा संपादकीय प्रक्रियेसाठी एक मोठी व्यवस्था निर्माण केलेली असते. काय, किती आणि कसं सांगावं हे ठरवण्यासाठी मालकापासून ते संपादकीय खात्यातल्या तळाच्या व्यक्तीपर्यंत एक मोठी उतरंड त्यासाठी काम करत असते. ते किती निःपक्षपणे, नेमकेपणे आणि कार्यक्षमतेनं काम करतात, त्यावर त्या माध्यमातल्या आशयाचा दर्जा ठरत जातो. अगदी चित्रपट आणि पुस्तकांनाही संपादकीय चाळण्या चुकत नाहीत. थोडक्‍यात काय, काही किमान संपादकीय प्रक्रियेशिवाय वैयक्तिक किंवा सार्वजनिक संवादव्यवहार करू नये, असं आपण मानतो. 

असं असेल, तर मग आज संवादव्यवहाराचं फार मोठं व्यासपीठ झालेल्या समाजमाध्यमांवरचं (सोशल मीडिया) चित्र काय दिसतं? तिथं संवादव्यवहार करताना- म्हणजे मेसेज पाठवताना, प्रतिक्रिया देताना, शेअर करताना आपल्यातला ‘संपादक’ जागा असतो का? आता या प्रश्नाचं ‘हो‘ किंवा ‘नाही’ अशी सरसकट उत्तरं देता येणार नाहीत, हे खरंच; पण ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’च्या चालीवर ‘उघडला कीबोर्ड आणि लागले बडवायला’ म्हणावं अशा प्रकारचे संवादव्यवहार समाजमाध्यमांवर खूप प्रमाणावर दिसतात, हेही नाकारता येत नाही. एरवी चारचौघांसारखं वागणारी, बोलणारी मंडळी तिथं चेकाळल्यासारखे संवाद का करतात? प्रत्यक्ष बोलण्यामध्ये शिवीगाळ न करणारे अनेक जण इंटरनेटवर प्रतिक्रिया देताना अर्वाच्च्य शब्द का वापरतात? एरवी चार प्रश्न विचारल्याशिवाय विश्वास न ठेवणाऱ्या व्यक्ती समाजमाध्यमांवरच्या फसव्या पोस्ट्‌स आणि अफवा काहीही विचार न करता कसे शेअर करतात? एरवीच्या संवादव्यवहारांमध्ये ‘आतल्या संपादकाला’ बऱ्यापैकी जागं ठेवणारी मंडळी समाजमाध्यमांवर मात्र त्याच संपादकाला बिनधास्त घोरत पडण्याची सवलत का देतात?

संदिग्धता असलेलं ‘माध्यम’
या प्रश्नांची काही उत्तरं समाजमाध्यमाच्या व्यवस्थेत दडलेली आहेत. एकतर हे माध्यम नवीन, त्यामुळं त्याच्यावरील संवादव्यवहाराचा अनुभवही नवीन. त्यामुळं अनेकदा त्याच्या वापरामध्ये नवथरपणा, उठवळपणा वा उच्छृंखलता येणं थोडंफार स्वाभाविकही आहे; पण दुसरं महत्त्वाचं कारण या माध्यमाच्या संदिग्धतेत दडलं आहे. या माध्यमांना आपण समाजमाध्यम म्हणजे ‘सोशल मीडिया’ म्हणत असलो, तरी त्यातले ‘सोशल’ आणि ‘मीडिया’ हे दोन्ही शब्द प्रत्यक्षातल्या वापराशी फार सुसंगत नाहीत. म्हणजे नावात ‘सोशल’ असलं, तरी ही माध्यमं आपण खासगी संवादव्यवहारासारखी वापरतो. तिथं पासवर्डपासून आणि सेटिंगपासून ते वापरण्याच्या पद्धतीपर्यंत बहुतेक गोष्टी आपण वैयक्तिक मर्जीनुसार ठरवतो. त्यामुळं आपल्याला ही माध्यमं अगदी खासगी अभिव्यक्तीची माध्यमं वाटतात; पण प्रत्यक्षात त्यातली अभिव्यक्ती आपल्या नकळत खासगीपणाच्या चौकटीतून बाहेर पडून सार्वजनिक होते किंवा होऊ शकते. तिथं खासगी-सार्वजनिक सीमारेषा खूपच धूसर असते. त्यामुळंच खासगी-सार्वजनिकपणाच्या गोंधळातून होणारे संवादव्यवहारांतले अपघात सोशल मीडियावर वारंवार घडतात.

हीच गोष्ट ‘मीडिया’ या शब्दाबाबत. ‘मीडिया’ म्हणजे फक्त ‘लोकांपर्यंत पोचण्याचं संवाद तंत्रज्ञान’ एवढंच नाही. तिथं या तंत्रज्ञानाच्या साह्यानं काम करणारी, सार्वजनिक कक्षेत असलेली आणि नियमांनी बांधलेली व्यक्तींची एक व्यवस्था (कंपनी, गट वगैरे) असंही अभिप्रेत असतं. व्हॉट्‌सॲप, फेसबुक, ट्विटर, यूट्युब वगैरे समाजमाध्यमं त्या अर्थानं ‘माध्यमं’ नाहीत. कारण त्या रुढार्थानं कंपन्या असल्या, संवाद तंत्रज्ञान पुरवत असल्या, तरी त्यावरचा आशय या कंपन्या निर्माण करत नाहीत. तो करतो तुम्ही-आम्ही अर्थात विखुरलेल्या लाखो व्यक्ती. तेही आपापल्या वैयक्तिक गरजा आणि रुची यांच्यानुसार. शिवाय तो प्रसारित होतो क्षणार्धात आणि शतखंडित स्वरूपात. त्यामुळं समाजमाध्यमांचं स्वरूप एरवीच्या प्रसारमाध्यमांसारखं (मास मीडिया) सुसंघटित, सुविहित असं नाही. म्हणूनच इथला ‘माध्यम’ शब्दही त्याच्या आजवरच्या अर्थाला मोठा धक्का देणारा.  

प्रचंड संवादव्यवहार
या सर्वांतून तयार होणारा संवादव्यवहारही इतका प्रचंड आणि अव्याहत असतो, की प्रसारमाध्यमांप्रमाणं त्याचं कोणा सुविहित मानवी व्यवस्थेकडून संपादन होणं जवळजवळ अशक्‍य. गलिच्छ शब्दांना फिल्टर बसवून यांत्रिक पद्धतीनं काही प्रमाणात हे संपादन शक्‍य आहे; पण अक्षरांच्या क्रमावर आधारलेल्या या फिल्टरला चकवा देत हवा तो परिणाम साधणं काही फार अवघड नसतं. शिवाय गलिच्छ शब्दांचा वापर न करताही विद्वेष, असत्य आणि अफवा पसरवणं शक्‍य आहेच. काही समाजमाध्यमांमध्ये ‘गैरवापर कळवा’ (रिपोर्ट ॲब्युज) किंवा ‘लक्ष वेधा’सारख्या (फ्लॅग) सोयी असतात. त्यांच्या साह्यानं पोस्ट आणि प्रतिक्रियांवर काहीएक मानवी नियंत्रण मिळविता येऊ शकतं; पण ती प्रक्रिया किचकट आणि संथ आहे. शिवाय निर्माण होणाऱ्या संवादव्यवहारांच्या तुलनेत ती फार तोकडी आहे. समाजमाध्यम कंपनीकडं तक्रार करून अशा बेलगाम पोस्ट वा प्रतिक्रियांवर नियंत्रण आणता येतं. त्या रद्दही करता येऊ शकतात; पण ही प्रक्रियाही तशीच संथ आणि किचकट आहे. शिवाय चांगल्या-वाईट अभिव्यक्तीसंबंधीच्या या कंपन्याच्या कल्पना आणि धोरणं या गोष्टी वेगवेगळ्या असतात. त्यांच्यावर कंपनीच्या मूळ देशातल्या सांस्कृतिक धारणांचा खोल प्रभाव असतो. अशा परिस्थितीत वेगळ्या सांस्कृतिक वातावरणातून आलेल्या तक्रारींना हाताळणं सोपं नसतं. समाजमाध्यमांवर फिरणाऱ्या संदेशांसाठी या कंपन्यांना जबाबदार धरण्यात काही कायदेशीर गुंतेही आहेत.

गेल्या सात-आठ वर्षांमध्ये त्याचा अनुभव भारतानं अनेकदा घेतला आहे. आता जर्मनी अशी काही कायदेशीर व्यवस्था करू पाहत आहे; पण या माध्यमांचं स्वरूप लक्षात घेता ती कितपत यशस्वी होईल, हे सांगणं अवघड आहे. शिवाय अभिव्यक्ती रोखणं, वा त्यावर कारवाई करणं या अतिशय संवेदनशील आणि परिस्थितीसापेक्ष गोष्टी आहेत. अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा मुद्दा त्याच्याशी जोडला असल्यानं त्याबाबत अतिशय काळजीपूर्वक निर्णय घ्यावा लागतो. म्हणून अशा प्रसिद्धीपश्‍चात कारवाईंना खूप मर्यादा आहेत. 

संवादांसाठी स्व-संपादन
संपादन ही अशी प्रसिद्धीपश्‍चात कारवाई नाही. ती प्रसिद्धीपूर्व कृती आहे. समाजमाध्यमांवरचा आपला संवाद अपरिहार्यपणे सार्वजनिक कक्षेत जाणारा आहे, असं मानून त्याला खऱ्या-खोट्याच्या, योग्य-अयोग्यतेच्या, शिष्ट-अशिष्टाच्या किमान काही चाळण्या आपण स्वतःच आपल्या संवादांना लावल्या पाहिजे. आपणच आपला संपादक झालं पाहिजे. तसं होणं फार अवघड नाही. ग्रुपमध्ये किंवा फ्रेंड्‌स लिस्टमध्ये असलेल्या आपल्या आदरणीय किंवा प्रिय व्यक्तींशी आपण प्रत्यक्षात कसं बोललो असतो, आपल्याशी कमी परिचय असलेल्या व्यक्तीशी सार्वजनिक कक्षेत कसा संवाद केला असता, असा विचार केला, तरी हे स्व-संपादनाचं काम बऱ्यापैकी होऊ शकतं. अर्थात त्यासाठी थोडी इच्छा पाहिजे आणि ‘मनात येणं ते टाइप करणं’ यादरम्यान या ‘आतल्या संपादका’ला काम करण्यासाठी थोडा वेळ देण्याचा संयम पाहिजे. 

अर्थात समाजमाध्यमांवर ठरवून धुमाकूळ घालणाऱ्या, द्वेष आणि असत्य पसरवण्याची सुपारीच घेतलेल्या जल्पकांच्या बाबतीत हे स्वसंपादन वगैरे बकवास आहे. त्यांची विखारी अभिव्यक्ती रोखण्याचा प्रभावी मार्ग सध्यातरी कुठं दिसत नाही; पण त्यांच्या विखारी अभिव्यक्तीतला डंख कमी करण्याच्या कामात मात्र आपल्या आतला हा संपादक निश्‍चितपणे आपापलं योगदान देऊ शकतो. प्रसारमाध्यमांतले संपादक जसे एखाद्या टुकार लेखाला केराची टोपली दाखवतात, तसं आपण आपल्यापर्यंत पोचणाऱ्या विखारी पोस्टला दुर्लक्षाची किंवा ‘डिलिट’ची टोपली दाखवू शकतोच. तसं करण्यासारखं नसेल, तर संयमित शब्दांत प्रतिवाद करू शकतो. यातला ‘संयमित’ हा शब्द महत्त्वाचा. कारण त्यांच्याच भाषेत प्रतिवाद केल्यानं आपण अशा जल्पकांच्या मूळ विद्वेषी हेतूला नकळत मदतच करत जातो. संयमित प्रतिवादानं प्रकरण भागत नसेल, तर ‘रिपोर्ट ॲब्युज’चा पर्याय आहेच.  जल्पकांच्या अशा टोळ्या आज समाजमाध्यमांवर खूप सक्रिय झाल्या असल्या, तरी अशांशी काही संबंध नसणाऱ्या सर्वसामान्यांची संख्या त्यांच्यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. या साऱ्यांची अगदी किमान संपादनशक्ती काम करत राहिली, तरी या टोळ्यांचा उपद्रव नियंत्रित करता येऊ शकतो. 

खरंतर जिभेला हाड नसतंच. तरीदेखील अचकटविचकट बोलणाऱ्यांना आपण संतापानं ‘तुझ्या जिभेला काही हाड?’ असं म्हणतो. आपल्या बोटांना तर ‘हाडं’ असतातच ना? मग कीबोर्डवर चालवताना त्यातून अशी स्वैर अभिव्यक्ती का होऊ द्यायची ? म्हणूनच बोटांमधून प्रकटण्यापूर्वी या अभिव्यक्तीचं किमान काही संपादन आपण करत गेलो, तर समाजमाध्यमावरील वाढती सडकी अभिव्यक्ती आणि तिचा दुर्गंध आपण रोखू शकू. अन्यथा विलक्षण शक्‍यता असलेल्या या ऐतिहासिक संवादमाध्यमांची कचराकुंडी होण्याची भीती नाकारता येत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com