मराठी काव्यसमीक्षेचे अनाकलनीय मौन

poem
poem

कविता लिहिण्या-वाचण्याच्या संदर्भात वाचकाच्या अंगाने वर्तमानपत्रातील स्तंभलेखनाच्या चौकटीत जी प्राथमिक स्वरुपाची चर्चा करता येणे शक्य होती ती माझ्या मर्यादित वकुबाच्या परिघात ‘पोएटिक्स’ या सदराच्या माध्यमातून गेले सात-आठ महिने केली. यापुढे मूलभूत विषयाचा, काही संज्ञा-संकल्पनांचा आणि गेल्या पन्नास वर्षांत कवितेने तिच्या बदललेल्या रुपबंधामुळे आणि विशेषतः तिच्या झपाट्याने बदलत गेलेल्या आकृतिबंधामुळे जे नवीन प्रश्न मराठी कवितेच्या समीक्षेपुढे उभे केले आहेत त्या प्रश्नांचा ऊहापोह वर्तमानपत्रातील सातशे शब्दांची शब्दमर्यादा असलेल्या स्तंभातून शक्य नाही. म्हणून हा लेख धरून आणखी तीन लेख लिहून ही मालिका सप्टेंबर महिनाअखेर थांबवू.

परंतु, या तीन लेखांत तीन-चार महत्त्वाच्या मुद्द्य़ांकडे मराठी भाषेतील कवींचे आणि जाणकार व रसिक वाचकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. इतर सर्वच मुद्द्य़ांप्रमाणे या मुद्द्यांचाही सविस्तर परामर्श या लेखांचा विस्तार करताना एकूण कवितेचा तिच्या सर्जकप्रेरणा, निर्मितीप्रक्रिया, लेखनप्रक्रिया, संपादन, मांडणी, वाचन, आस्वाद, समीक्षा आणि एकूण साहित्यव्यवहारात यथासंभव व्यवस्थापन या अंगांनी विचार करावा लागेल. त्यासाठी या स्तंभात प्रकाशित झालेल्या संक्षिप्त लेखांचा संग्रह छापणे, हे अप्रामाणिकपणाचे आणि आळशीपणाचे लक्षण ठरेल.

या स्तंभाच्या माध्यमातून काही मूलभूत प्रश्नांकडे कवितेच्या क्षेत्रात कवी, प्रकाशक, समीक्षक आणि जाणकार वाचक म्हणून काम करत असलेल्या काही महत्त्वाच्या मंडळींचे प्रतिसाद आणि प्रतिक्रियांनी काही नवीन प्रश्नही उपस्थित केलेले आहे ज्यांची उत्तरे प्रस्तावित पुस्तकातून देण्याचा प्रयत्न करावा लागेल. या स्तंभाच्या माध्यमातून प्राचीन काव्यशास्त्र आणि पाश्चात्त्य काव्यशास्त्र यांच्या मदतीने ज्या कविताविषयक चर्चा समाजमाध्यमावर घडून आल्या त्या निश्चितच महत्त्वाच्या होत्या.

यानिमित्ताने जी उजळणी आणि जो अभ्यास करता आला त्यातून काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात आल्या त्या अशा -

१) मराठी काव्य समीक्षेने अजूनही लिहिल्या जाणाऱ्या छंदोबद्ध, वृत्तबद्ध कवितांचा आणि गझलांचा विचार करणे जवळजवळ का थांबविले असावे? आजही जुन्या पिढीतल्या मनमाडच्या खलील मोमीन यांच्यासारखे अनेक कवी उत्तम वृत्तबद्ध कविता लिहीत आहेत. तरुण पिढीत तर शेकड्याने मुलं-मुली चांगल्या वृत्तबद्ध कविता लिहीत आहेत. नाशकातला एका तरुण मुलाची वृत्तांवरची पकड बघून तर तोंडात बोटे घालावीशी वाटतात. मात्र, या कवींची कविता आशयाच्या अंगाने क्षीण आहे, असे गृहीत जरी धरले तरी त्या कवींना कुणी मार्गदर्शन करतानाही दिसत नाही. असे का व्हावे? गझल हा काव्यप्रकार आशय आणि तंत्र या दोन्ही अंगांनी उत्तमरीत्या हाताळणाऱ्या पन्नासेक गझलकारांच्या (ज्यांची नावेही घेता येतील पण इथे शक्य नाही) गझलांची काव्यसमीक्षेने दखल घेतली पाहिजे इतक्या त्या उत्तम आहेत पण कुणी ती घेताना दिसत नाही. दुसरीकडे ही गझलकार मंडळीही आपले एक स्वतंत्र संस्थान स्थापून त्यातच संतुष्ट आहेत की काय, असेही दिसते. हे चित्र का निर्माण झाले आणि ते बदलण्यासाठी काय करावे लागेल?

२) ज्याला सर्वसाधारणपणे दलित जाणिवेच्या किंवा आंबेडकरी जाणिवेच्या कविता म्हणता येईल त्या कवितांच्या समीक्षेबद्दल म. सु. पाटील यांचा अपवाद वगळता (दलित कविता आणि दलित साहित्याचे सौंदर्यशास्त्र, पद्मगंधा प्रकाशन) बहुतेक महत्त्वाच्या समीक्षकांनी सैद्धांतिक किंवा उपयोजित समीक्षा करणे का टाळले असावे? (या विषयावरच पुढचा संक्षिप्त लेख लिहिणार असल्याने इथे याचा अधिक विस्तार करण्याचे टाळतो.)

३) मराठी सैद्धांतिक काव्यसमीक्षेच्या जुन्या पिढीतले रा. गा. जाधव यांच्यापासून यशवंत मनोहर यांच्यापर्यंत आणि अगदी अलीकडच्या काळातील महेंद्र भवरे यांच्या काळापर्यंत सातत्याने दलित साहित्याचे स्वतंत्र सौंदर्यशास्त्र मांडण्याचे प्रयत्न झालेले दिसतात. (मनोहर
यांच्या प्रयत्नांत थोडी व्यापकता दिसते – ते साहित्याचे इहवादी सौंदर्यशास्त्र मांडताना दिसतात.) या तीनही प्रयत्नांतून निर्माण झालेल्या ग्रंथांच्या दर्जाबद्दल चांगले-वाईट काहीतरी बोलायला हवे की नाही?

४) विद्यापीठांत विद्यार्थ्यांना शिकवताना प्राचीन काव्यशास्त्राचा साहित्यशास्त्राच्या अभ्यासाच्या निमित्ताने विचार करायचा. प्रत्यक्षात समीक्षालेखन करत असताना मात्र त्या परंपरेचा फारसा वापरच करायचा नाही, असे का घडले असावे? आपल्या संस्कृतीतून, परंपरेतून आलेली ही ज्ञानगंगा आपणच लुप्त का होऊ दिली? नागपूरच्या समीक्षक डॉ. शुभांगी पातुरकर यांनी छंद्शास्त्राबद्दल केलेल्या महत्त्वाच्या लिखाणासारख्या अभ्यासाकडे आपण पूर्णपणे दुर्लक्ष का केले असावे?

५) मराठीत सैद्धांतिक समीक्षा लिहिणाऱ्या मंडळींनी पाश्चात्त्य परंपरेतील समीक्षा विचाराची जी थोडीफार ओळख आपल्या भाषेतील वाचकाला, अभ्यासकाला आणि कवीला करून दिली ती मानसशास्त्रीय समीक्षेच्या क्षेत्रातील मोडणाऱ्या आदिबंधात्मक समीक्षेच्या नंतर जणू थांबून गेल्यासारखी वाटते. जुन्या पिढीतले रा. भा. पाटणकर हे खरे तर इंग्रजी साहित्याचे प्राध्यापक व अभ्यासक पण त्यांच्यासारख्या बहुभाषक अभ्यासू, व्यासंगी आणि चिंतनशील समीक्षकांनी परिभाषेतील महत्त्वाचा समीक्षा विचार मराठीतून वाचकांना, अभ्यासकांना आणि समीक्षकांना उपलब्ध करून दिल्यामुळे मराठी वाङ्‍मयीन विश्वावर मोठे उपकारच झालेले आहेत. हे काम पुढे कुणीही सक्षमपणे पुढे नेलेले दिसत नाही. हे असे का घडले?

६) मराठीभाषक समीक्षकांनी ‘प्रयत्नपूर्वक’ त्यागलेली प्राचीन काव्यशास्त्राची परंपरा आणि केवळ ओळखीपुरती स्वीकारलेली पाश्चात्त्य काव्यशास्त्राची परंपरा यांचा तौलनिक अभ्यास करून, दोन्ही परंपरांतील त्याज्य गोष्टींचा त्याग करून, दोन्ही परंपरांतील अजूनही प्रासंगिक आणि उपयुक्त असलेल्या सैद्धांतिक उपपत्तींचे सिंथेसिस करून नव्या काळातल्या नव्या कवितांसाठी एक नवा समीक्षा विचार मांडणे शक्य आहे काय, याचा समीक्षकांनी विचार का करू नये? आज मराठी कवितेच्या समीक्षेच्या क्षेत्रात बहुतकरून ‘उपयोजित समीक्षा’, कवितासंग्रहांचा परिचय/परीक्षण, एखाद्या समकालीन कवीच्या कवितांचे आकलन (?) या स्वरूपाचे लेखन होत आहे. या ठिकाणी एकच प्रश्न विचारला पाहिजे तो हा की ‘हे उपयोजन नेमके कोणत्या समीक्षा विचाराचे किंवा व्यूहाचे आहे? यामागे नेमके कोणते सिद्धांतन उभे आहे?’

या विषयांबद्दल मराठी काव्य समीक्षेने आपले अनाकलनीय मौन तोडले पाहिजे, असे वाटते.


 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com