Marathi play
Esakal
आशुतोष पोतदार - potdar.ashutosh@gmail.com
जगण्यातल्या या मोठ्या हालचालीलाच आपण स्थलांतर म्हणतो आणि स्थलांतराने नाटक नेहमीच घडवलं आहे, हे आपल्या रंगभूमीच्या इतिहासातही स्पष्ट दिसतं. आधुनिक मराठी रंगभूमीवर एक वेगळं नाटक अशा हालचालीतून, एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाण्यातून जन्मलं. हलणं कधी वेदनेचं असतं, कधी परमार्थाचं, कधी पोटापाण्याचं. पण ते थांबत नाही. कारण माणूस हलणारा आहे आणि जोवर माणूस हलत राहील, तोवर नाटकही घडत राहील, नवं नाटक होत राहील.
एक माणूस रिकाम्या जागेतून चालत जातो आणि दुसरा त्याच्याकडे पाहतो, इथून ‘सादरीकरण’ सुरू होतं. हलणे, हालचाल करत राहणे हा सादरीकरणातील विशेष भाग असतो. कलाकार हलतो, तो हात उंचावतो, बोलत असताना मान वळवतो. अशा हालचालींतून अर्थ उलगडतो. लिखित भाषेचा शोध लागण्यापूर्वी माणसाने आपलं म्हणणं हावभावांतून आणि हालचालींतूनच पोहोचवलं असणार. म्हणजे हालचाल ही नाटकाची आदिभाषा आहे आणि या भाषेला आपल्या मातीत एक विलक्षण आध्यात्मिक पदरही आहे. तो म्हणजे वारीचा. ‘महाराष्ट्र मंथन’ या यू-ट्यूब चॅनेलवर प्रसिद्ध विचारवंत आणि नाटककार सदानंद मोरे वारकरी संप्रदायाच्या सामुदायिक परमार्थाची चर्चा करताना सांगतात, की वारकरी फक्त चालत जात नाहीत, तर ते गात आणि नाचत-खेळत जातात. त्यांचं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं म्हणजे निव्वळ ''जाणं'' नसतं, तर गात-नाचत-खेळत जात सामुदायिक परमार्थ साधणं असतं. इथे चालणं हीच साधना आणि चालणं हेच सादरीकरण.