सुगंधी माती

जीवनाचं मोल जगण्याच्या लांबी-रुंदीनं ठरत नाही. माणसानं कसं आणि कशासाठी जगावं हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट मोठी मार्मिक आहे.
marathi writer Niranjan Ujgare poem Kavita Sangrah pariched
Niranjan UjgareSakal

- प्रशांत असनारे

दोन गरीब मुलं रस्त्यावरून चाललेली असतात...त्यातल्या एका मुलाला दोन रुपये सापडतात. तो मुलगा दुकानात जातो. तिथून एका रुपयाचा खाऊ आणि एका रुपयाची फुलं आणतो.

दुसरा मुलगा विचारतो : ‘अरे, एका रुपयाचा खाऊ आणि एका रुपयाची फूल कशाला आणलीस? त्यापेक्षा दोन रुपयांचा खाऊ आणला असतास तर आपली पोटं तरी भरली असती. या फुलांनी आपली पोटं थोडीच भरणार आहेत?’

त्यावर पहिला मुलगा उत्तरतो : ‘जगण्यासाठी मी एका रुपयाचा खाऊ आणला आहे आणि जगायचं कसं हे समजण्यासाठी ही फुलं आणली आहेत.’

जीवनाचं मोल जगण्याच्या लांबी-रुंदीनं ठरत नाही. माणसानं कसं आणि कशासाठी जगावं हे सांगणारी ही छोटीशी गोष्ट मोठी मार्मिक आहे.

कविवर्य निरंजन उजगरे यांच्या ‘परिच्छेद’ या कवितासंग्रहातली

‘सुगंधी माती’ ही कविता वाचताना, या कवितेविषयी लिहिताना मला ही गोष्ट आवर्जून आठवली.

कविता म्हटली की तीमधला आशय हा दृश्य किंवा अदृश्य स्वरूपात मांडलेला असतो. या कवितेत माणसाचं जगणं आणि मृत्यूनंतरचं त्याचं उरणं ही भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. एकदा का ही भावना कळली की कवितेतला अदृश्य विचार, दृश्य स्वरूपात आपोआप समोर येतो.

माणूस त्याला मिळालेलं आयुष्य जगतो. जगताना तो जास्तीत जास्त सुख, समाधान आणि आनंद मिळवण्याचा प्रयत्न करतो. माणूस त्याला मिळालेल्या आयुष्यावर प्रेम करतो. माणूस त्याला मिळालेल्या शरीरावरही प्रेम करतो; पण आज ना उद्या आपलं हे शरीर, आपला हा देह नष्ट होणार आहे...आपल्या या देहाची माती होणार आहे...याचा विचार तो करत नाही. जोपर्यंत माणूस जिवंत आहे तोपर्यंत तो भरभरून जगतो; पण मृत्यूनंतरही आठवणींच्या रूपात आपण जिवंत राहू शकतो याचं मात्र त्याला आकलन होत नाही.

आपण किती जगलो यापेक्षा कसं जगलो हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्याचं नेमकं हेच तत्त्व उजगरे यांनी ‘ सुगंधी माती’ या कवितेतून नेमक्या आणि मोजक्या शब्दांत मांडलं आहे.

जन्म आणि मृत्यू यांचा फेरा कुणालाच चुकलेला नाही; पण नुसतं जन्माला येणं आणि आयुष्य संपल्यावर निघून जाणं अशा जीवनालाही अर्थ नसतो.

माणसाजवळ दया, त्याग, नम्रता, प्रेम, सहनशीलता, ममता, वात्सल्य अशा अनेक प्रकारच्या भावना आणि संवेदना असतात. या सगळ्या भावनांचा त्यानं परोपकारी वृत्तीनं वापर केला तर तो या जगात पिढ्यान् पिढ्या जिवंत राहू शकतो. हा वास्तवदर्शी अनुभव आणि जीवनविषयक मोलाचं भाष्य उजगरे या कवितेतून मांडतात.

जीवन हे छोटं आहे; पण सुंदर आहे. याच सुंदरतेनं आपण ते जगायला पाहिजे आणि आनंदानं जगता जगता दुसऱ्यांनाही आपल्या पावसात चिंब भिजवायला पाहिजे. आपलं कर्म आणि आपलं कार्य हीच आपली ओळख असायला हवी. मानवी जीवनाचा हा सगळा विचार सांगणारी आणि मानवी अस्तित्वाचा तळशोध घेणारी उजगरे यांची ही कविता मला यादृष्टीनं खूप महत्त्वाची वाटते.

ही कविता लहान जरी असली तरी तीत लपलेला आशय खूप खोल, प्रवाही आणि सुसंवादी आहे. या कवितेत शाश्वत सत्य आणि मानवी मूल्य तर दडलेलं आहेच; पण त्यामागचं मौलिक चिंतन अथांग आणि अमर्याद आहे. या कवितेतून समोर येणारं अन्वर्थक भाष्य खूप महत्त्वाचं आहे, म्हणूनच या कवितेत वाचकाला अंतर्मुख करण्याची ताकद आहे.

या कवितेविषयी लिहिताना उजगरे यांच्या ‘प्रहर’ या कवितासंग्रहातल्या अजून काही ओळी मला आठवत आहेत...

ते म्हणतात :

फुलं असतात लक्षावधी

आणि तारका अगणित

मनाच्या पापण्यांना

पारदर्शक स्पर्श करणारा

असतो एखादाच मोगरा

आणि वादळातला दिशादर्शक

असतो एखादाच ध्रुवतारा

असं सुगंधी मोगरा असणं किंवा दिशादर्शक ध्रुवतारा होणं हे आयुष्याचं खरं गणित आहे आणि या गणिताचं उत्तर ज्याला सापडतं त्याचं पाऊसगाणं इतरांच्या मनाभोवती सतत रेंगाळत राहतं. आयुष्य जगताना आपण अनेक नाती सोबत घेऊन जगत असतो. कधी मुलगा, कधी वडील, कधी भाऊ, तर कधी मित्र...पण माणूसपणाचं नातं हे खरं नातं असतं. माणसं जेव्हा जवळ असतात तेव्हा ती आपली वाटतात; पण जेव्हा ती दूर जातात तेव्हा त्या नातेसंबंधांवर फरक पडतो. माणूस म्हटला की राग, लोभ, हेवे-दावे होणारच; पण याचा परिणाम नातेसंबंधांवर न होण्यासाठी क्षमाशीलता हा गुण फार महत्त्वाचा आहे. नात्यात कटुता निर्माण होऊ द्यायची नाही आणि झाली तरी लवकरात लवकर ती दूर कशी करता येईल यासाठी प्रयत्नशील राहायचं हेच या कवितेच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न कवी करतो आहे.

आयुष्य म्हटलं की अनेकांशी असलेली नाती जपणं हा वरवर पाहता सोपा वाटणारा विषय असला तरी तो फार गुंतागुंतीचा विषय आहे. नि:स्वार्थी भावनेतून जपलं तर, नातं कोणतंही असो, त्याची वीण अधिक घट्ट होत जाते.

काही नाती तर हृदयात कायमचं घर करतात. अशी माणसं दूर असली तरी दुरावा जाणवत नाही. नात्याचं हे गणित फार विचित्र आहे. आपलं काही तरी मागं उरणार असेल तर ते सुखद आणि आनंददायी असंच उरावं, हे मानवी अस्तित्वाचं सत्त्व या कवितेतून पुढं येतं. आपल्या जीवनाचा सर्वोत्तम भाग म्हणजे अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्याची संधी आणि ती मागं ठेवून जाण्याची पर्वणी. या कवितेला सद्विचारांचा स्पर्श झालेला असल्यामुळं आशयाला भिडणारी आणि विश्वात्मक अनुभव देणारी ही कविता वाचकांच्या काळजाचा ठाव घेते...कायम स्मरणात राहते.

‘नवे घर’, ‘दिनार’, ‘परिच्छेद’, ‘प्रहर’, ‘दिपवा’, ‘तत्कालीन’ हे उजगरे यांचे गाजलेले कवितासंग्रह. ‘काव्यपर्व’साठी भारतातल्या २१ भाषांमधल्या १७० कवींच्या कविता अनुवादित आणि संपादित करून त्यांनी मराठी कवितेमध्ये एक आगळावेगळा प्रयोग केला. उजगरे यांनी जे लेखन केलं ते फार डोळसपणे व प्रगल्भ जाणिवेनं केलं आणि ते लिहिण्यामागं एक वेगळी ऊर्मी होती. मराठी कवितेचं क्षेत्र त्यांनी स्वतःच्या कवितांनी समृद्ध तर केलंच आहे; पण त्यांनी इतर भारतीय भाषांमधल्या कवितांचा मराठीत अनुवाद करून त्या समृद्धीत फार मोलाची भर घातली आहे. अनुभवनिष्ठा आणि भाषा या दोन्ही पातळ्यांवर उत्कट प्रत्यय देणाऱ्या त्यांच्या या सगळ्या कविता आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com