अभूतपूर्व प्रतिसादाची ‘सुखन’ कहाणी

काही मराठी तरुण मुलं-मुली उर्दू साहित्याच्या आवडीतून एकत्र येतात, त्यातून ‘सुखन’ ही भन्नाट मैफील आकाराला येते.
sukhan maifil
sukhan maifilsakal

काही मराठी तरुण मुलं-मुली उर्दू साहित्याच्या आवडीतून एकत्र येतात, त्यातून ‘सुखन’ ही भन्नाट मैफील आकाराला येते. तिचे प्रयोग लोकांना आवडू लागतात आणि एका क्षणी या मैफिलीची तिकिटं पाच ते दहा मिनिटांत संपतात, अशी लोकप्रियता निर्माण होते.

एखाद्या विश्वकरंडकाच्या सामन्यासाठी किंवा बड्या गायकाच्या कॉन्सर्टसाठी रंगावी, तशी चढाओढ ‘सुखन’च्या तिकिटांसाठी रंगू लागते. या लोकप्रियतेमागचं रहस्य काय? या मैफिलीत नक्की दडलंय काय? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी ‘सुखन’ची संकल्पना मांडणारे आणि त्याचे दिग्दर्शक व सादरीकरणात सहभागी ओम भुतकर यांच्याशी साधलेला संवाद.

उर्दू साहित्यावर आधारित कार्यक्रम करण्यापूर्वी मुळात याकडे कसं काय वळलात, या प्रश्नावर ओम भुतकर सांगतो, ‘उर्दू साहित्याची आवड मला कॉलेजमध्ये शिकत असतानाच लागली होती. त्यातही गझलचा रूपबंध मला खूप आवडायचा. गझल या रचनेत शायरला जे म्हणायचं आहे ते दोन ओळीत मांडलं जातं. त्यात एक शेर दुसऱ्याशी संबंधित असलाच पाहिजे, असं बंधन नसतं.

त्यामुळे इतक्या कमी ओळींमध्ये काहीतरी महत्त्वाचं किंवा काहीतरी मजेशीर बसवलं जातं. त्या दोन ओळींमध्ये खूप मोठा आशय असतो. शिवाय उर्दू भाषेचं एक स्वतःचं सौंदर्य आहे. त्यातलं नादमाधुर्य वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या भाषेतही उत्तम साहित्यनिर्मिती झाली आहे. यातून उर्दू साहित्याबद्दल आवड निर्माण झाली आणि त्यातून मी बरंच वाचायला लागलो. भाषा कळत नसल्यानं सुरुवातीला मी शब्दकोशातून अर्थ बघत, इंटरनेटचा आधार घेत वाचू लागलो.’

‘या आवडीचं रूपांतर उर्दू साहित्यावर आधारित कार्यक्रमात कसं झालं,’ असा साहजिकपणे पुढचा प्रश्न आला. त्यावर ओम सांगतो, ‘या आवडीत नुसरत फ़तेह अली ख़ान हे देखील एक महत्त्वाचं नाव होतं. त्यांची गाणी प्रचंड आवडायची. त्यांचा जन्मदिवस १३ ऑक्टोबरला असतो. त्या निमित्त काहीतरी करू या, असा विचार आला. हे वर्ष होतं २०१५. त्या वेळी मग काही उर्दूतील कविता एकत्र केल्या.

मी आणि माझा मित्र नचिकेत देवस्थळी यांनी त्या वाचायच्या, आणि गायक मित्र-मैत्रिणींनी काही रचना गायच्या, असा एक अनौपचारिक स्वरूपातील कार्यक्रम आम्ही त्या वेळी पहिल्यांदा सादर केला. घरगुती स्वरूपाची ती मैफील रंगली. हे सादरीकरण ज्यांच्याकडं झालं, त्यांनी त्यांच्या ओळखीतील काही अन्य लोकांना सांगितलं. मग त्यांनीही आम्हाला सादरीकरणासाठी बोलावलं. अशा पद्धतीनं काही प्रयोग सुरू झाले.

नचिकेतसह जयदीप वैद्य, अभिजित ढेरे, मुक्ता जोशी, केतन पवार, देवेंद्र भौमे, मंदार बगाडे अशी सगळी ओळखीतली मित्रमंडळी प्रयोगासाठी जमली. लोक सादरीकरणासाठी बोलवत आहेत म्हटल्यावर त्याला काहीतरी नाव द्यायला हवं, म्हणून आम्ही ‘ सुखन’ हे नाव त्यासाठी नक्की केलं. या शब्दाचे ‘काव्य’ आणि ‘बोलणं’ असे दोन्ही अर्थ आहेत.’

‘या सादरीकरणाला सुरुवात केल्यानंतर त्याचं काही विशिष्ट स्वरूप करावं किंवा विशिष्ट पद्धतीनं त्याचे प्रयोग करावेत, असं ठरावीक नियोजन आम्ही केलं नव्हतं. ज्यांनी बोलावलं, त्यांच्याकडे आम्ही सादरीकरण करत गेलो. त्यानंतर ‘वाइड विंग्ज मीडिया’चा कुशल खोत आम्हाला भेटला आणि त्याच्यासह मग आम्ही नाट्यगृहांमध्ये त्याचे प्रयोग करण्यास प्रारंभ केला. मात्र त्या वेळी हा प्रयोग इतका लोकप्रिय होईल, याची कोणीच कल्पना केली नव्हती,’’ असं ओम सांगतो.

आतापर्यंत याचे सुमारे १२५ हून अधिक प्रयोग झाले आहेत. पण हा प्रयोग फार सातत्यानं होत नाही. लोकप्रिय असूनही याचे प्रयोग मर्यादित का आहेत, असं विचारल्यावर ओम म्हणतो, ‘‘लोकप्रिय होतो आहे म्हणून भारंभार प्रयोग करा, नाट्यगृह सोडून मोठ्या मैदानावर प्रयोग करा, असं आम्हाला काहीही करायचं नव्हतं.

कारण यातलं नावीन्य घालवून ठेवायचं नव्हतं. दोन प्रयोगांदरम्यानच्या काळात आम्ही काहीतरी नवं वाचलं पाहिजे, नवीन काहीतरी शोधलं पाहिजे, रंगमंचावर गेल्यावर आता काय आपल्याला सगळं पाठच आहे, असं होऊ नये, त्यातील जिवंतपणा कायम राहावा, हा आमचा प्रयत्न आहे.’

आपला मुद्दा स्पष्ट करताना ओम म्हणाला, सतत प्रयोग करणं म्हणजे या प्रयोगाची ताकद काढून घेण्यासारखं आहे. प्रत्येक प्रयोगात आम्ही संहितेत काही टक्के तरी बदल करतोच. त्यामुळे हा कार्यक्रम कितीही लोकप्रिय असला तरी प्रयोग ठरावीक अंतराने करण्याचा निर्णय आम्ही ठरवून घेतला होता.’’

दिल्लीत ‘रेख्ता’ला केलेला प्रयोग, हा या प्रवासातला महत्त्वाचा टप्पा असल्याचं ओम सांगतो. ‘उर्दूसाठी काम करणारं एक सर्वांत मोठं व्यासपीठ म्हणजे ‘रेख्ता’. त्यांच्या प्रतिष्ठेच्या महोत्सवात सादरीकरण करण्याचं आमंत्रण आम्हाला आलं होतं. आम्ही प्रयोगाला सुरुवात करून केवळ एक वर्ष झालं असताना त्याच्याकडून आमंत्रण आलं होतं, याचं आजही अप्रूप वाटतं.

तिथला प्रयोग अनेकांनी वाखाणला. उर्दू जाणणाऱ्या लोकांनी दाद दिल्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. त्यानंतर भारताबाहेर कतार, अबुधाबी, अमेरिका असे परदेशातही प्रयोग केले,’ असा प्रवास ओमने उलगडला. यात ‘रेख्ता’च्या संकेतस्थळाची आम्हाला खूप मदत झाली. कारण उर्दूशी संबंधित बरंच साहित्य त्यावर उपलब्ध आहोत. त्यामुळे आम्हाला त्यांच्याविषयी अपार कृतज्ञता असल्याचं ओम आवर्जून नमूद करतो.

या मैफिलीला उत्तम प्रतिसाद मिळत होताच, मात्र गेल्या काही प्रयोगांपासून त्याची लोकप्रियता कमालीची वाढली आहे. तिकीट विक्री सुरू झाल्यावर अक्षरशः आठ ते दहा मिनिटांत तिकिटे संपत आहेत. याबद्दल आम्हालाही आश्चर्य वाटतं, असं सांगत ओम म्हणाला, ‘मागच्या वर्षी ऑगस्टमधील प्रयोगाला हे पहिल्यांदा घडलं. तिकीट विक्री सुरू झाल्यावर अवघ्या पंधरा मिनिटांत तिकिटे संपली. हे कळल्यावर आधी आम्हाला संकेतस्थळावर काहीतरी बिघाड झाला आहे, असं वाटलं. पण नंतर तपास केल्यावर खरोखरच पंधरा मिनिटांत सर्व तिकिटांची खरेदी झाल्याचं कळलं. हा सिलसिला पुढचे पाच प्रयोग सुरू होता. ’

ओम या प्रतिसादाबद्दल म्हणाला, ‘मागच्या प्रयोगाला तर अगदी आठ मिनिटांत तिकिटे संपली. अनेक लोक तिकीट न मिळाल्याने आमच्यावर रागवतात देखील. आम्हाला त्याचं वाईटही वाटतं, पण शक्य तेवढे जास्तीत जास्त तिकीट आम्ही विक्रीसाठी ठेवतो. पण लोकांच्या या प्रतिसादामुळे आम्ही खरोखरच भारावून गेलो आहोत.’

‘सुखन’च्या मैफिलीला तरुणाईची संख्या तर सर्वाधिक असतेच, ज्येष्ठ नागरिकही असतात. तसेच पुन्हा पुन्हा मैफिलीला येणारे रसिकही यात बरेच आहेत. संहितेत दरवेळी नव्याने काहीतरी असतं, हे त्यामागचं एक कारण असू शकेल. शिवाय मुळातच या साहित्यात इतकी ताकद आहे, त्यामुळे ते लोकांना आवडत असेल.

पण आम्ही या सर्व शायर लोकांचे, कवींचे आणि अर्थात नुसरत फ़तेह अली ख़ान यांचे ऋणी आहोत. या लोकप्रियतेत त्यांनी निर्माण केलेल्या साहित्याचा आणि गाण्यांचा मोठा वाटा आहे, याची आम्हाला जाणीव आहे,’ असंही ओम नमूद करतो.

‘सुखन’चा प्रयोग नुकताच मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या ग्रँड थिएटरमध्ये सादर झाला. बाराशे आसनक्षमता असलेल्या या भव्य थिएटरमध्ये सादरीकरण करण्याची संधी सहजासहजी मिळत नाही. पण ‘सुखन’ची ही अभूतपूर्व लोकप्रियता पाहून ही संधी त्यांना मिळाली. गेल्या शनिवारी (ता. ११ मे) झालेला हा प्रयोग देखील हाऊसफुल्ल गर्दीत पार पडला. ‘‘तिथं प्रयोग करण्याचा अनुभव अविस्मरणीय होता. या प्रतिसादाविषयी आम्ही खरोखरच कृतज्ञ आहोत आणि स्वतःला नशीबवान समजतो,’ अशी भावना ओम व्यक्त करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com