हरिश्चंद्र स्वतःला विकतो

मार्कंडेय पुराणात सांगितलेली हरिश्चंद्राची कथा मी तुम्हाला सांगत आहे. मागील भागात आपण बघितलं की राजा हरिश्चंद्राला अद्यापही विश्वामित्राला दक्षिणा देता आलेली नाही.
markandeya purana harishchandra sell himself along with family
markandeya purana harishchandra sell himself along with family Sakal
Updated on

- विवेक देबरॉय

मार्कंडेय पुराणात सांगितलेली हरिश्चंद्राची कथा मी तुम्हाला सांगत आहे. मागील भागात आपण बघितलं की राजा हरिश्चंद्राला अद्यापही विश्वामित्राला दक्षिणा देता आलेली नाही. त्याच्याकडं कुठलीही संपत्ती उरलेली नसल्यानं त्याला अखेरीस पत्नी शैब्या आणि मुलगा रोहिताश्व यांना एका ब्राह्मणाला विकणं भाग पडलं आहे.

ब्राह्मणानं राजाजवळ असलेल्या काठीला धनाचं गाठोडं पक्कं बांधलं आणि राजाच्या पत्नीला केसांना धरून तो तिला ओढत नेऊ लागला. आपल्या आईला असं ओढत नेलं जात असताना पाहून रोहिताश्व रडायला लागला. आपल्या छोट्या हातांनी त्यानं तिचं कपडे पकडले.

ती म्हणाली, " हे भल्या माणसा, मला सोड, जेणेकरून मी माझ्या पुत्राला एकदा नीट पाहून घेईन. पुत्रा, यानंतर मी तुला दिसणं अत्यंत दुर्लभ आहे. तुझी आई आता मोलकरीण झाली आहे. हे राजपुत्रा ! मला स्पर्श करू नकोस." आपल्या आईला पुन्हा एकदा अत्यंत हिंसक पद्धतीने ओढून नेले जात असताना त्यानं पाहिले.

मोठ्यानं टाहो फोडत तो ''आई, आई'' असं ओरडत तिच्यामागे धावू लागला. तो पुढं आला असतानाच त्या ब्राह्मणानं चिडून त्याला जोरात लाथ मारली. तरीही तो आईला हाका मारतच राहिला आणि आईला अडवू लागला. शैब्या म्हणाली, "स्वामी, या बालकालाही विकत घ्या.

तुम्ही मला खरेदी केलं असलं, तरी त्याच्याविना तुम्हाला माझा काहीही उपयोग नाही. मी वासरू असलेल्या गाईप्रमाणे आहे. मला त्याच्यापासून वेगळं करू नका." राजाकडं बघून ब्राह्मण म्हणाला, ‘‘ हे घे धन, आणि मला हा बालक दे.’’ त्यानं हरिश्चंद्राच्या उत्तरीयाच्या टोकाला धन बांधलं आणि नंतर मायलेकरांचा ताबा घेत त्यांना एकत्र बांधलं.

मात्र त्यातून मिळालेलं धनही दक्षिणा देण्याइतपत पुरेसे नाही. ब्राह्मण त्या दोघांनाही दूर घेऊन जातो आणि इकडे हरिश्चंद्र विलाप करत बसतो. हरिश्चंद्र या स्थितीत असताना विश्वामित्र तिथं येतात. हरिश्चंद्राला जे काही धन मिळालं आहे, ते सर्व तो विश्वामित्रांना अर्पण करतो. विश्वामित्र संतप्त होतात आणि म्हणतात, " राजा, तू दिलेली ही दक्षिणा पुरेशी आहे काय?"

राजा म्हणतो, "मी तुम्हाला आणखी दक्षिणा देईन, फक्त काही काळ अजून थांबा. माझ्याकडं काही नाही आणि मी माझी पत्नी व मुलालाही विकून टाकलं आहे." विश्वामित्र म्हणाले, ‘‘ अजूनही पाव दिवस तुझ्याकडे शिल्लक आहे. मी फक्त तेवढाच काळ वाट पाहू शकतो.’’

विश्वामित्र जेव्हा तिथून निघून जातात, तेव्हा राजाचं मन दुःख आणि भीतीनं ग्रासून जाते. अशा स्थितीत आता तो स्वतःलाच विकून टाकण्याचा निश्चय करतो. ‘‘ धनाच्या मोबदल्यात कोणी मला सेवक म्हणून खरेदी करण्यास तयार आहे काय ? सूर्यास्त होत आहे, लवकर कोणीतरी पुढं या." चांडाळाचं रूप घेऊन खुद्द धर्म तिथं गुपचूपपणे प्रवेश करतो. किळसवाणं रूप असलेल्या त्याच्या शरीरातून दुर्गंधी सुटलेली असते.

दाढी वाढलेली आणि मोठाले दात असलेला तो अगदीच रानटी दिसत होता. पाहता क्षणी त्याच्याबद्दल तिरस्कार वाटत होता. तो रंगानं काळा कुळकुळीत होता आणि त्याचं पुढं आलेलं बेढब पोट कमरेखाली लोंबकळत होते.

त्याचे डोळे तांबूसलेले आणि आवाज घोगरा होता. त्याच्या हाताच्या पोलादी पकडीत माना मुरगळलेले काही पक्षी होते आणि शवाला वाहिलेलाच हार त्याने स्वतःच्या गळ्यात घातला होता. त्याच्या एका हातात कवटी होती आणि चेहरा उभट होता. त्याचं असं रूप पाहूनच अनेकांना धडकी भरत असे.

हातात भला मोठा सोटा घेतलेला असल्यानं तो खरोखरच भयानक दिसत होता. अनेक कुत्री त्याच्याभोवती घोटाळत होती. असा तो चांडाळ राजाला म्हणाला, "मला तू हवा आहेस. तुझी किंमत काय, मला पटकन सांग." राजा विचारतो, "तू कोण आहेस ?" त्याला उत्तर मिळते, "मी चांडाळ आहे.

सर्वोत्तम अशा या शहरात प्रवीर या नावाने मला ओळखले जाते. ज्यांचा मृत्यू होणं आवश्यक आहे त्यांना मारण्यासाठी मी प्रसिद्ध आहे. त्यांच्या मृत शरीरावरील वस्त्रे मी काढून घेतो." हरिश्चंद्र म्हणाला," असे तिरस्करणीय काम करणाऱ्या चांडाळाचा सेवक होण्याची माझी इच्छा नाही." तो असे बोलत असतानाच त्या ठिकाणी विश्वामित्र उपस्थित झाले.

संतापानं लालेलाल झालेल्या डोळ्यांनी ते म्हणाले, "हा चांडाळ तुला धन देण्यासाठी इथे आलेला आहे. ते स्वीकारून तू मला माझी दक्षिणा का देत नाहीस ?" हरिश्चंद्र उत्तरला, "हे विश्वात्मका, हे कौशिक ! माझा जन्म सूर्य कुळात झाला आहे, हे तुम्हाला माहिती आहे. केवळ धनाची अपेक्षा करून मी चांडाळाचा सेवक कसा बनू शकतो?"

हे ऐकून विश्वामित्र म्हणाले, "स्वतःला चांडाळाला विकून मिळू शकणारे धन तू जर मला दक्षिणा म्हणून दिले नाहीस, तर तुला दिलेली वेळ संपताच मी शाप देईल, हे निश्चित." त्यांच्या या वाक्याचा योग्य तो परिणाम झाला आणि हरिश्चंद्राने स्वतःला चांडाळाच्या स्वाधीन केलं.

या सर्व घटनाक्रमानं राजाच्या संवेदना हरपल्या होत्या. सोट्यानं मारहाण झाल्यानं, तो थरथर कापत होता. प्रिय कुटुंबापासून त्याची ताटातूट झाली होती. त्याला चांडाळाच्या घरी नेण्यात आलं. राजा हरिश्चंद्र आता एका चांडाळाच्या घरी राहू लागला. स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झालेल्या मृत शरीरांवरील कपडे चांडाळ ओरबाडून काढत असे आणि या कामात हरिश्चंद्राला त्याची मदत करावी लागत होती.

काही दिवसांनंतर चांडाळानं मृतदेहांवरील कपडे ओरबाडून काढण्याचं काम पूर्णपणानं हरिश्चंद्रावर सोपवलं. ‘‘ तू इथेच दिवस-रात्र थांब. मृतदेह येण्याची वाट पाहा. मृतदेहांच्या अंगावरून जे काही मिळेल, त्यातील एक षष्ठमांश भाग राजाला द्यावा लागतो, अर्धा भाग माझा आणि एक तृतीयांश वाटा हा तुझा मोबदला.’’

अशा प्रकारची सूचना मिळाल्यावर राजा हरिश्चंद्र मृतदेहांना जिथं जाळतात त्या ठिकाणी निघून गेला. त्या काळी ते ठिकाण वाराणसी शहराच्या दक्षिणेला होते. अत्यंत भयानक वातावरण असलेल्या त्या स्मशानभूमीत शेकडो कोल्ह्यांची कोल्हेकुई ऐकू येत असे. मृतदेहांची तुटलेली मस्तके भूमीवर अस्ताव्यस्त पडलेली असत.

सर्व वातावरण भयानक दुर्गंधी आणि धुराने भरलेले असे. भूत, पिशाच्च, वेताळ, डाकिणी आणि यक्षांचा तिथं सातत्यानं वावर होता. गिधाडे आणि कोल्ह्यांच्या झुंडीच्या झुंडी येथे कायम असत आणि मोकाट कुत्री आजूबाजूला वावरत असत. जागोजागी हाडांचे ढीग साचलेले होते आणि त्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरलेली होती. आपल्या नातेवाइकांच्या मृतदेहांवर मोठ्यानं विलाप करणाऱ्या लोकांच्या आवाजानं वातावरणात कायम नैराश्याची छाया पसरलेली असे.

मांस, चरबी आणि शरीराचा इतर भाग जळत असताना होणाऱ्या चरचर आवाजाने सर्व दिशा भरून टाकल्या होत्या. अर्धवट जळालेल्या, काळ्या पडलेल्या शवांच्या जबड्यातून दातांची रांग दिसत होती. चितेच्या प्रकाशात ते मृतदेह विकट हास्य करत असल्याचा भास होत असे. जणू ते म्हणत आहेत, की मेल्यावर शरीराची हीच स्थिती होते. वातावरणात सगळीकडे चिता जळतानाचा चरचर आणि हाडांच्या ढिगांवर बसलेल्या कावळ्यांचा आवाज भरलेला असे.

भूत, पिशाच्च, वेताळ आणि राक्षसांचे भेसूर गायन ऐकू येई. स्मशानात चहूबाजूंना मृतदेहावर अर्पण केलेल्या वस्तू, फुलांचे हार, दिवे आणि कावळ्यांसाठी ठेवलेले पिंड यांचा खच पडलेला असे. कायम कोणत्या ना कोणत्या प्रकारचे विचित्र आवाज ऐकू येत.

त्यामुळे हा भाग साक्षात नरक वाटे. काही ठिकाणी कोल्ह्यांची तोंडे जणू ज्वाळांनी भरली आहेत, अशी लालेलाल दिसत; तर कधी आपल्या भुयारांमधूनच ते अंगावर काटा आणणारा आवाज काढत. त्या भयानक स्मशानभूमीत लोकांचा प्रचंड आक्रोश ऐकून साक्षात भीतीचाही थरकाप उडावा, अशी स्थिती होती.

आपण चांडाळाच्या पातळीवर कसे येऊन पोहोचलो, याचा हरिश्चंद्र वारंवार विचार करत असे. तो देखील आता रानटी दिसत होता आणि त्याची त्वचा खडबडीत झाली होती. त्याच्या सर्वांगावर केस वाढले होते आणि त्यातून दुर्गंधी येत होती.

"मला शवाच्या अंगावरून इतके धन मिळाले आहे. त्यापैकी हा माझा वाटा, हा राजाचा वाटा आणि हा वाटा मुख्य चांडाळाचा." हरिश्चंद्राच्या जीवनाची दिशाच बदलून गेली होती. त्याच्या अंगावरचे कपडे म्हणजे चिंध्या एकमेकांना जोडून तयार केलेले कापड होते. त्याच्या चेहऱ्यावर, हातांवर, पोटावर आणि पायांवर चितेवरून उडालेली राख पसरली होती.

त्यानं पाहिलं, की त्याच्या बोटांना चरबी, तेल आणि हाडांचा चुरा चिकटलेला आहे. शवांना अर्पण केलेल्या विविध प्रकारच्या नैवेद्यावर तो समाधानी आहे. त्या शवांच्या अंगावरील फुलांचे हार त्यानं एखाद्या दागिन्यासारखे आपल्या डोक्यावर धारण केले आहेत. अशा पद्धतीने बारा महिने उलटले आणि ते त्याला शंभर वर्षांप्रमाणे भासले.

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com