आश्वासनांच्या बाजाराला मूठमाती...

शनिवार, 1 सप्टेंबर 2018

निवडणुकीच्या बाजारात आश्वासनांच्या आरोळ्या हा यशाचा भक्कम आधार मानला गेला. त्याआधारे सत्तापदांची मुकुटं राजकीय पक्षांनी वर्षानुवर्षे परिधान केली. लोकांच्या भावनांवर गारूड करून सत्ता भोगण्याचा हा खेळ आता अस्ताच्या दिशेने चालला आहे. कारगिलसारख्या दुर्गम आणि फार साक्षरता नसलेल्या भागात त्याचा अनुभव आला.  लडाख हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. त्यात लोकांनी आश्वासनांचा बाजार मांडणाऱ्या पक्षाला घरचा रस्ता दाखवला आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या बाजूने कौल दिला.

निवडणुकीच्या बाजारात आश्वासनांच्या आरोळ्या हा यशाचा भक्कम आधार मानला गेला. त्याआधारे सत्तापदांची मुकुटं राजकीय पक्षांनी वर्षानुवर्षे परिधान केली. लोकांच्या भावनांवर गारूड करून सत्ता भोगण्याचा हा खेळ आता अस्ताच्या दिशेने चालला आहे. कारगिलसारख्या दुर्गम आणि फार साक्षरता नसलेल्या भागात त्याचा अनुभव आला.  लडाख हिल डेव्हलपमेंट कौन्सिलच्या निवडणुकीची मतमोजणी शुक्रवारी झाली. त्यात लोकांनी आश्वासनांचा बाजार मांडणाऱ्या पक्षाला घरचा रस्ता दाखवला आणि नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या बाजूने कौल दिला. जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या नेतृत्वाखालील पीपल्स डेमॉक्रॅटिक पार्टीला केवळ एक जागा राखता आली. ही परिषद आतापर्यंत याच पीडीपी पक्षाच्या नियंत्रणाखाली होती. पण या निवडणुकीत जनतेच्या नाराजीचा जोरदार फटका या पक्षाला बसला आहे. एकूण 26 जागांपैकी दहा जागा नॅशनल कॉन्फरन्स, तर आठ जागा काँग्रेस पक्षाने जिंकल्या आहेत. उर्वरित जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत.

पराभव का?
पीडीपीने गेल्या पाच वर्षात कोणत्याच विकासकामांना गती दिली नाही, केवळ आश्वासनांची गाजरं दाखवून लोकांच्या भावनाशी खेळण्याचे काम त्यांनी केले. त्यामुळे पुन्हा त्यांना संधी कशाला द्यायची, असा सवाल कारगिलवासीय विचारतात. शिक्षण, पाणीपुरवठा यांसह वेगवेगळ्या सरकारी आस्थापनांमध्ये कंत्राटी सेवकांची भरती करण्यात आली. त्यांना कायमसेवेत करण्याचे आश्वासन पीडीपीने दिले होते. त्याची पूर्तता केली नाही. विकास कामांसाठी जनतेकडून जमिनी घेण्यात आल्या, त्याचा योग्य मोबदला त्यांना दिला नाही. पण कुटुंबातील एकाला तरी कायम नोकरी मिळेल, या आशेवर लोक त्याची प्रतिक्षा करीत राहिले. पण त्यांचा भ्रमनिरास झाला. त्यामुळे पीडीपीच्या विरोधात एक लाट निर्माण झाली. त्यात या पक्षाची परिषदेवर वर्चस्व निर्माण करण्याचे स्वप्न वाहून गेले. मुफ्ती महंमद सईद यांना मानणाऱ्या कारगीलवासियांना त्यांच्या मुलीला मात्र नाकारले. सईद यांची सामान्य नागरिकांप्रती असलेली सहानुभूतीची भावना होती. त्यांच्या चांगल्या कामांचे अनेक दाखलेही येथील नागरिक देतात. पण मेहबूबा यांना मात्र वडिलांचा करिश्मा कायम राखता आलेला नाही. 

लोकांचा कल आता नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या बाजूने आहे. आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीतही हाच ट्रेंड दिसेल, असा अंदाज राजकीय तज्ज्ञ व्यक्त करतात. कारण 35 ए रद्द करण्याचा प्रयत्न हा काश्मीरमधील प्रत्येक नागरिकाला त्याच्या अस्तित्वावरील हल्ला वाटतो आहे. त्याविरोधात तीव्र संताप नागरिकांच्या मनात आहे. त्याचा फटका सध्याच्या सत्ताधाऱ्यांना निश्चित बसेल. काँग्रेस आणि नॅशनल कॉन्फरन्स या मुद्दाचा वापर प्रचारावेळी करून आम मतदाराच्या भावना कुरवळण्याचा प्रयत्न करील. त्यामुळे त्यांना यशही मिळण्याची शक्यता आहे. याचा ट्रेलर कारगिल कौन्सिलच्या निवडणुकीत दिसला आहे. कारगीलमधे पूर्वी भाजपचे अस्तित्व नव्हते. पण परिषदेच्या निवडणुकीत एक जागा जिंकून पक्षाने आपले खाते उघडले आहे, हेही विशेष.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The market of assurances ...