शुभमंगल, करिअर व प्रेग्नन्सी प्लॅनिंग

pregnancy.
pregnancy.

ऋतुरंगातील गोंधळलेलं स्थित्यंतर
शुभमंगल, प्रेग्नन्सी की करिअर
मनात अनेक प्रश्‍नांचे काहूर
करा व्यवस्थित आरोग्य तपासणी
इतर सर्व नियोजनबद्ध आखणी
मग घाला गगनाला गवसणी

आज नीलाताई (माझी जुनी पेशंट) आल्या होत्या. आल्याबरोबर त्यांनी मला हळूच सांगितले- "डॉक्‍टर, आज मी माझी दुसरी मुलगी साक्षीला आणलंय. तिचं वय आता 28 वर्षे आहे. चांगला जॉब करतेय बेंगलोरला. लग्न ठरलंय; पण इतक्‍यात करायचं नाही म्हणतेय. तिला कंपनी बाहेर देशात पाठवणार आहे. आम्हाला काळजी वाटते. बाहेर ती व तिचा भावी नवरा आले आहेत. तिलाही तुम्हाला काही विचारायचं आहे. मला आठवलं संगणकाच्या युगातील या मिलेनियल पिढीची विचारसरणीच एकदम वेगळी आहे. कारण काही दिवसांपूर्वीच माझ्या जुन्या पेशंट त्यांच्या 35 वर्षांच्या मुलीला (लग्न होऊन 7 वर्षे झाली होती) घेऊन आल्या होत्या. त्या मुलीचं म्हणणं होतं की, तिला एवढ्यात मूल नकोच आहे. तिचे आईवडील तिला समजावून थकून गेले होते. गेल्या काही वर्षांतील असे अनेक मिलेनियल पेशंट एका क्षणात माझ्या नजरेसमोरून तरळून गेले. मी त्यांना शांत करत त्या दोघांना आत पाठवण्यास सांगितले. त्यानंतर बऱ्यांच गोष्टी त्यांना समजावून सांगितल्या.
मला जाणवलं; पूर्वीच्या काळी वेगळं होतं. लग्नाचं वय वीस ते पंचवीसच्या आत होतं. कधी कधी वीस वर्षांआधीही लग्न व्हायचं. लग्न झालं की, सगळ्यांना बाळाचे वेध लागायचे. त्यामुळे ही समस्याच नसायची. आजकाल शिक्षण, करिअर, नोकरी या सगळ्यांत प्राधान्य कशाला द्यायचं? यामध्ये मनाची ओढाताण होते आणि वरचेवर ही समस्या राहणारच आहे. त्यामुळे लग्नापूर्वीच किंवा लग्न झाल्यावर लगेच जर डॉक्‍टरांचा या बाबतीत सल्ला घेतला, तर ही समस्या फार कमी प्रमाणात उद्भवेल.
आता प्रश्‍न आहे की, ऋतुरुंगाच्या या महत्त्वाच्या टप्प्यात शुभमंगल, प्रेग्नन्सी प्लॅनिंग व करिअर कसे बसवायचे? तेही आरोग्य सांभाळून! बऱ्याच मुलींना लग्न म्हणजे करिअरमध्ये अडथळा वाटतो. तसेच आईच्या भूमिकेत जाणं भीतिदायक वाटतं. त्यामुळे बऱ्यांच मुली लग्न उशिरा करतात व लग्न झाल्यावर मूल होणं लांबणीवर टाकतात. त्यांची मानसिक, भावनिक, शारीरिकदृष्ट्या तयारी नसते. तसेच पैसा, स्थैर्य याबाबतीत पण त्या खूप आग्रही असतात. कारण त्यांना वाटतं आपल्या होणाऱ्या बाळाला सगळंच उत्तम मिळालं पाहिजे. त्यात मूल झालं, तर फक्त एकच असावं; कारण एकाकडेच पूर्ण लक्ष केंद्रित करून त्याला सगळी सुखं उपलब्ध करून देणं व त्यात कुणी वाटेकरी नको, ही पण भावना वाढीस लागली आहे.
आता आपण वैद्यकीयदृष्ट्या पाहूया की, प्रेग्नन्सी कुठल्या वयात योग्य आहे.
1. जागतिक अहवालानुसार वीस वर्षांच्या आतील मुलीचे लग्न करू नये. कारण मुलगी शारीरिक व मानसिकदृष्ट्या सक्षम नसते. त्यामुळे बाळंतपण गुंतागुंतीचे होऊ शकते व होणारे बाळसुद्धा अशक्त असते. त्यामुळे दोघांचाही जीव धोक्‍यात राहू शकतो.
2. वीस ते पंचवीस वर्षांमधील कालावधी, लग्न व प्रेग्नन्सीसाठी सर्व परीने अनुकूल असतो. पण, सहसा या वयोगटातील मुलींनी शिक्षण व करिअरमध्ये स्वत:ला झोकून दिलेलं असतं.
3. पंचवीस ते तीस वयोगटांतील मुलींनी लग्नाचा विचार करायला हवा. लग्नाच्या आधी किंवा झाल्यावर लगेच डॉक्‍टरांकडे जाऊन योग्य सल्ला घ्यावा. खरे तर वैद्यकीयदृष्ट्या वयाच्या तीस वर्षांपर्यंत एक किंवा दोन मुले होऊ दिली पाहिजेत. आम्ही याला ऑबस्टेट्रिक (प्रसूतीविषयक) करिअर म्हणतो. म्हणजेच वयाच्या तिशीपर्यंत ऑबस्टट्रिक करिअर संपले पाहिजे.
4. आजकाल बऱ्यांच मुलींची लग्न तिशीच्या पुढे होत आहेत. अशा मुलींनी सगळ्यांत आधी गर्भधारणेसाठी स्वत:चे शरीर सक्षम आहे की नाही (फिटनेस) याबाबत डॉक्‍टरांचा सल्ला घेऊन लवकरात लवकर प्रेग्नन्सीची आखणी करावी. सध्याच्या काळात टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञानामुळे गर्भधारणेचं वय पस्तिशीच्या पुढे जात आहे. यामुळे ही गर्भधारणा जोखमीची होते.

प्रेग्नन्सीची आखणी तिशीच्या आत का करावी?
अ) सर्वप्रथम हे लक्षात घ्या गर्भधारणेसाठी दर महिन्याला अंडकोषातून एक स्त्रीबीज परिपक्व होत असते. ही स्त्री बीज बनण्याची क्षमता वयाच्या तिशीत 80 टक्के असते. वयाच्या पस्तीसाव्या वर्षी 50-60 टक्के व वयाच्या चाळीसाव्या वर्षी फक्त दहा टक्के असते. म्हणजेच वयाच्या तिशीनंतर स्त्रीबीज बनण्याची क्षमता कमी होणे चालू होते. तसेच स्त्रीबीजाचा दर्जापण घसरायला सुरवात होते. पुरुषांमध्ये शुक्रजंतूची क्षमता व दर्जा कमी होतो. त्यामुळे होणाऱ्या गर्भाच्या जनुकात दोष राहू शकतो व मतिमंद किंवा इतर कांही त्रास असण्याचे प्रमाण वाढते.
ब) वयाच्या तिशीनंतरच्या गर्भारपणात रक्तदाब मधुमेह असे आजार असण्याचे प्रमाण वाढते. बाळंतपणही गुंतागुंतीचे होते. त्यामुळे योग्य वयात योग्य गोष्टी झाल्याच पाहिजे.
क) या वयातील गर्भधारणा, करिअर, ताणतणाव, पोषक तत्त्वांचा अभाव (फास्टफूड संस्कृती) लट्ठपणा यामुळे जोखमीची ठरत आहे.

यासाठी मुलींनी काय करायला हवं?
1. करिअर करणाऱ्या मुलींनी लग्नाआधी स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. योग्य वयात लग्न होणे खूप जरुरी आहे.
2. करिअर, शिक्षण यामुळे मुलींचे पौष्टिक व घरगुती आहाराकडे दुर्लक्ष होत आहे. बऱ्यांच मुली निस्तेज, लट्ठ दिसतात. कांही जणी अगदीच बारीक असतात. या वयातील प्रत्येक मुलीने आहार, व्यायामाविषयी जागरूक असावे.
3. या मुलींना मी कमीत कमी हिमोग्लोबीनचे प्रमाण, रक्ताचा गट, रक्तातील साखरेचे प्रमाण व थायरॉइडची तपासणी करायला सांगते.
4. ज्या मुलींना पाळीविषयक तक्रारी असतील त्यांनी त्याचे वेळीच निराकरण केले पाहिजे.
5. जुने काही आजार असतील त्याची फाइल जपून ठेवावी. डॉक्‍टरांपासून काहीही लपवून ठेवू नये. उदा. पॉलीसिस्टिक ओव्हेरियन सिंड्रोम असणाऱ्या मुलींनी लग्नानंतर प्रेग्नन्सीचे प्लॅनिंग डॉक्‍टरी सल्ल्यानुसार लवकर करावे.
6. जर कौटुंबिक आजार (उदा. सिकलसेल) असेल, तर त्याबद्दल डॉक्‍टरांना सांगावे. भावी पतीपत्नींनी विश्‍वासाने सर्व बाबींविषयी चर्चा करावी.
7. गर्भधारणेआधी लट्ठ मुलींनी वजन आटोक्‍यात आणावे. कारण लट्ठपणातील गर्भावस्था धोक्‍याची असते. स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेऊन शरीर निरोगी असताना गर्भधारणेची आखणी करावी.
8. महत्त्वाचे म्हणजे लवकर उठणे व लवकर झोपणे हा निरोगी आरोग्याचा मंत्र अमलात आणावा. जीवनात जर उत्साह व कार्यतत्परता हवी असेल व नेहमीकरिता शरीराची साथ हवी असेल, तर व्यायामाशी मैत्री जोडली पाहिजे. आणि जर हे सर्व आचरणात आणलं नाही, तर करिअर मुलींना दुसऱ्या एका त्रासाला या संगणकाच्या युगात तोंड द्यावे लागतेय ते म्हणजे वंध्यत्व.
त्याबद्दल आपण पुढच्या लेखात

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com