जमवायचंय की मोडायचंय...?

अलीकडील काळात काही मित्रांची जमलेली लग्न त्यांनी नंतर स्वतःहून मोडलेली पाहून या विषयाच्या जरा खोलात जाऊन ही सलणारी धसुडी शोधण्याचा प्रयत्न केला.
Marriage
Marriagesakal

- प्रा. विशाल गरड, vishalgarad.18@gmail.com

अलीकडील काळात काही मित्रांची जमलेली लग्न त्यांनी नंतर स्वतःहून मोडलेली पाहून या विषयाच्या जरा खोलात जाऊन ही सलणारी धसुडी शोधण्याचा प्रयत्न केला. सध्या मुलांकडून लग्नासाठी दिल्या जाणाऱ्या व्यक्तिगत माहितीमधून अपेक्षांचा कॉलम जवळपास अदृश्य झालाय तर मुलींच्या माहितीमध्ये मात्र अपेक्षांची यादी लांबलचक होताना दिसतेय.

त्यातच मग जंगजंग पछाडून जर कुठं जमलं तर जीव भांड्यात पडल्याची भावना, मुलाकडील मंडळींची होतेय. इथूनच मग सुरू होते खरी गोष्ट. जुन्या काळात आपले आजीआजोबा सांगत असायचे, की आम्ही एकमेकांना थेट लग्न मंडपातच पाहिलं. तरी त्यांचा संसार शेवटाला गेला. आता मात्र तंत्रज्ञानाच्या युगात स्थळ आलं की ते नाव सोशल मीडियावर टाकून त्यासंबंधीची माहिती आणि फोटो पाहिले जातात.

सुपारी फुटली, की मुलानं मुलीला स्मार्टफोन देणं म्हणजे जणू नियमच झालाय. श्रीमंतांचे हे चोचले आता गरिबीत झिरपताना दिसत आहेत. लग्नाआधी एकमेकांना जाणून घेण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे, त्यात दुमत असायचं काही कारण नाही पण याच संवादातून आपण आपला स्वभाव आणि संस्कार प्रकट करीत असतो, हे ध्यानात घ्या.

माझ्या एका मित्राचीही सुपारी फुटल्यावर त्याचं होणाऱ्या बायकोशी फोनवर बोलणं सुरू झालं. हा बिचारा चांगला मोठ्या कंपनीत पाच आकडी पगारावर कामाला होता. एकदोन आठवडे फावल्या गप्पा झाल्यानंतर त्यांच्या संसाराच्या गप्पा सुरू झाल्या. अक्षदा पडायच्या आधीच होणाऱ्या बायकोच्या मागण्या ऐकून पोरगा घाबरून गेला. सुपात आहोत तोपर्यंतच माघार घेऊन जात्यात जाण्यापासून वाचू, या भावनेनं त्यानं जमलेल्या लग्नाला नकार दिला.

मी जेव्हा त्याला नकार देण्याची कारणं विचारली, तेव्हा त्यानं सांगितले, ‘‘ती बोलताना मला नेहमी सांगायची, लग्नानंतर मी तुमच्या मूळ गावी राहणार नाही. माझ्यासाठी पुण्यात फ्लॅट घ्या, मी स्वयंपाक करणार नाही, धुणंभांड्याला आणि फरशी पुसायला पण बाई लावायची.

आपली मुलं इंग्रजी शाळेतच शिकतील, तुमचे आईवडील घरात नकोत, एकत्र कुटुंबात मला राहायला जमणार नाही, मला माझी स्पेस हवी, माझा पगार माझ्या आईवडिलांना देणार, त्यात तुमच्या घरच्यांनी माझ्या पगारात वाटेकरी व्हायचं नाही, आम्ही मैत्रिणी ट्रिपला चाललोय मला पैसे पाठवा.’’ मी खूप दिवस हे सहन केलं पण मला माझं लग्नानंतरचे मरण दिसलं म्हणून पुढं काय होईल याची कसलीही तमा न बाळगता मी लग्नाला नकार दिला.

दुसरी एक माझ्या मैत्रिणीची गोष्ट. होणाऱ्या नवऱ्याशी बोलताना तिला अजिबात प्रेम जाणवलं नाही. तो मुलगा कुठंतरी दुसरीकडं गुंतला असल्याची तिला शंका आली. कालांतरानं लग्नापूर्वी झालेल्या गाठीभेटीत तो व्यसनी असल्याचंही तिला कळलं. पोरीनं मन धीट करून लग्नास नकार दिला. वरील उदाहरणात कोण बरोबर कोण चूक हा मुद्दा नाही. ज्याला त्याला निर्णयस्वातंत्र्य आहे. पण संसाराचा गाडा हाकताना थोडंफार पारतंत्र्यही सहन करावंच लागतं अन्यथा स्वतःलाच स्वतःच्या हुकूमशाहीत आयुष्य व्यतीत करावं लागतं हेही तितकंच सत्य आहे.

समाजात अशी कितीतरी जोडपी आहेत, जी फक्त समाजासाठी आणि नातेवाइकांसाठी नवरा-बायको आहेत. बाकी त्यांच्या व्यक्तिगत जीवनात त्यांचं नातं वठून गेलेलं असतं. निव्वळ लेकरांसाठी आणि संपत्तीसाठी उसन्या प्रेमानं ती चिकटून राहतात. जे समविचारानं ठरवतात ते सोडचिठ्ठी घेऊन मोकळे होतात आणि नवा जोडीदार निवडून आनंदी जीवन जगतात.

हल्लीची युवा पिढी चौकस आणि अतिविचारी झाली आहे. त्यांच्यावर टीव्हीवरील मालिका, वेबसीरिज, सोबतचे मित्रमैत्रिणी यांचा प्रभाव अधिक पडल्यानं ते स्वतःच्या आयुष्यालाही दुसऱ्यांसारखे करू पाहत आहेत. या जगात प्रत्येक व्यक्ती जसा वेगळा असतो, तसाच त्याचा संसारही असतो हे आजच्या पिढीनं ध्यानात घ्यायला हवं.

मुलींनी हे लक्षात घ्यायला हवं, की ‘संघर्ष वाट्याला आलेले पुरुषच भविष्यात चांगले पैसे कमावतात पण आयत्या पिठावर रेघोट्या मारून जगणारे पैसे संपले की नैराश्‍याच्या गर्तेत (डिप्रेशन) मध्ये जातात’ आणि मुलांनी हे लक्षात घ्यायला हवं, की ‘समाजाची आणि नातेवाइकांची तमा न बाळगता पुरुषाची सद्यपरिस्थिती स्वीकारून पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करून परिस्थिती बदलण्याची हिंमत ठेवणाऱ्या स्त्रिया सामर्थ्यशाली असतात.’

मुलामुलींनो, तुमच्या अतिरेकी अपेक्षांमुळं समाजातले कितीतरी आईबाप त्यांच्या लेकराचा सुखी संसाराला बघायला मुकले आहेत. आपण आपल्या आईवडिलांकडं पाहून मोठं होत असतो. त्यांनी त्यांच्या संसारात किती तडजोडी केल्या, मानापमान सहन केले, घर उभं करायला, आपल्याला लहानचं मोठं करायला किती टोकाचा संघर्ष केलाय. पण आज त्यांची संपत्ती आपल्या उशाशी असल्यानं आपण आपल्या अपेक्षांच्या ओझ्यात त्यांना दाबतो आहोत.

हे जर असंच चालू राहिलं तर अजून दोनतीन दशकांत लग्नसंस्थाच मोडीत निघतील याची भीती वाटतीय. स्वतःच्या वैयक्तिक आशा, अपेक्षा, स्वप्न जोडीदारावर लादू नका. सोबत राहून, दोघांच्या कष्टातून संसाराचा नवीन गड बांधा, एकमेकांच्या साथीनं स्वप्न पूर्ण करा, जबाबदाऱ्यांची ओझी वाटून घ्या, एकमेकांना जपा मग बघा मोडलेलं सुद्धा जमेल.

(लेखक हे प्रसिद्ध व्याख्याते आणि इतिहास व विविध सामाजिक घडामोडींचे अभ्यासक आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com