#MokaleVhaa : पती सतत संशय घेतोय का? मग 'हे' करुन पहा

Mokale-Vya
Mokale-Vya

मी ४५ वर्षांची विवाहिता आहे. लग्नाला २० वर्षे झालीत. मला १८ व १६ वर्षांच्या दोन मुली आहेत. मी गृहिणी आहे. माझे पती आयटीमध्ये उच्च पदावर नोकरी करतात. ते नोकरीनिमित्त बाहेरच्या देशात जातात. त्यांना घराबद्दल बिलकुल आकर्षण नाही. मुलींवरदेखील प्रेम नाही. फक्त पैसे देऊन आमच्या आर्थिक गरजा भागवणे, एवढेच ते आजपर्यंत करत आले आहेत. परंतु आता मलासुद्धा भावनिक आधाराची, प्रेमाची गरज भासते. परंतु पतीकडून प्रेम मिळत नाही. मुलींच्या भवितव्याचा विचार करून मी शांत बसते. सध्या ते मला ‘तू माझ्या घरात राहू नकोस, मला घटस्फोट दे’ म्हणू लागले आहेत. मुलींचे शिक्षण पूर्ण झालेले नाही. त्यांना उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत लागणार आहे. त्यामुळे मला खूप दडपण येते. काय करावे सुचत नाही. मुलींनाही खूप दडपण आहे. मला त्यांना घटस्फोट द्यायचा नाही. ते कोर्टात गेले तर कोर्ट त्यांना घटस्फोट देईल का? माझे पुढे काय? मुलींचे काय? 

प्रथमतः तुम्ही कोणतेही दडपण घेऊ नका. पती जरी घटस्फोट हा शब्द उच्चारत असला तरी त्यांना घटस्फोट घ्यायचाच आहे, असा अर्थ होत नाही. रागाच्या भरात, मुड ठीक नसताना व्यक्ती अशा प्रकारच्या धमक्‍या देतात. घटस्फोट घेणे ही गोष्ट चित्रपटात दाखवतात तशी नसते. त्यासाठी कायद्याच्या क्‍लिष्ट पद्धतीला सामोरे जावे लागते. तुमचा २० वर्षांचा संसार आहे. तो सहजासहजी तुटणार नाही. २० वर्षांमध्ये नातेसंबंधाची मुळे खोलवर रुजलेली असतात. ती अशी एका क्षणात उखडून फेकता येत नाहीत. एकमेकांमध्ये भावनिक, सामाजिक, आर्थिक गोष्टींची गुंतागुंत झालेली असते. परंतु मुलींचे शिक्षण, त्यांचे भवितव्य या गोष्टींवर विशेष भर देणे आवश्‍यक आहे. आपल्याला वयानुसार सध्या मानसिक, भावनिक आधाराची गरज आहे. हे आपले म्हणणे बरोबर आहे. त्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या. त्यांना विवाह समुपदेशकाकडे घेऊन जा. तेथे व्यवस्थित मार्गदर्शन केले जाईल. तुम्ही स्वतःला एखादा छंद, काम, मैत्रिणी यामध्ये गुंतवा. म्हणजे तुम्हाला आनंद मिळेल. सकारात्मक जीवनशैली बाळगा. मुलींवर लक्ष केंद्रित करा. पतीच्या बाहेरच्या स्पर्धात्मक युगात काही अडचणी असतील. (उदा. नोकरीच्या ठिकाणी) तेही समजून घ्या. या स्पर्धात्मक युगामध्ये स्वतःला सिद्ध करताना व्यक्तीची दमछाक होते. त्यातूनच चिडचिडेपण वाढतो. ते कुणाच्याही लक्षात येत नाही, त्यामुळे मनाचा समतोल राखणे आवश्‍यक असते. एकमेकांना समजून घेणे, एकमेकांच्या अडचणी, समस्या यावर दोघांनी मिळून मार्ग काढणे यालाच नातेसंबंध, सहजीवन म्हणतात. ते कसे फुलवायचे हे आपल्या हातात असते. जोडीदारासमोर थोडासा कमीपणा घेतला तर काही बिघडत नाही. त्यामुळे तुम्ही पुढाकार घ्या. एकाने विस्कटण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्याने सावरण्याचा, आवरण्याचा प्रयत्न केला तर कधीही नातेसंबंधांमध्ये दुरावा राहणार नाही. 

पती सतत संशय घेतात
मी ३५ वर्षांची विवाहिता आहे.  लग्नाला १० वर्षे झाली आहेत. मुलगा सात वर्षांचा आहे. मी व ते खासगी कंपनीमध्ये नोकरी करतो. आमचा प्रेमविवाह आहे. सुरवातीला सर्व सुरळीत होते. परंतु सध्या पती माझ्यावर संशय घेऊ लागले आहेत. सतत माझा फोन चेक करणे, ऑफिसमध्ये फोन करणे चालू असते. मी किती वेळा सांगितले तरी त्यांचा विश्‍वास बसत नाही. ऑफिसमध्ये माझे काही पुरुष सहकारी आहेत. त्यांच्याबरोबरही नावे जोडतात. माझे व्हॉट्‌सअप, फेसबुक, इन्स्ट्राग्राम ही खाती चेक करतात. त्यावरूनही संशय घेतात. ऑफिस, पार्ट्या, गेट टुगेदर याबाबतही सविस्तर माहिती मागतात. त्यामुळे मला या गोष्टी असह्य झाल्या आहेत. माझे मानसिक स्वास्थ्य हरवले आहे. पतीच्या संशयी स्वभावाला मी पूर्ण वैतागले आहे. मला त्यांच्यापासून सुटका हवी आहे. मला घटस्फोट घ्यायचा आहे. या कारणावरून घटस्फोट मिळेल का? आणि घेणे कितपत योग्य आहे. 

- मनुष्याचा स्वभाव हा नैसर्गिक आहे. त्यामध्ये विविध प्रकारांचा समावेश होतो. रागीट, स्वार्थी, संशयी वगैरे. तुमच्या पतीचा स्वभाव अत्यंत संशयी आहे हे सिद्ध होते. मनुष्याचा स्वभाव संशयी असणे हे तर असतेच. परंतु सध्या सोशल मीडियाद्वारे हा आजार जास्त बळावत, फोफावत चाललेला आहे. आपल्या कुटुंबाचे मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असल्यास या सोशल मीडियाचा वापर अत्यंत कौशल्याने, समतोल राखून करता आला पाहिजे. माझे कुटूंब प्रथम स्थानावर आणि बाकी गोष्टी दुय्यम स्थानावर हे ठरवता आले पाहिजे. प्रथमतः पतीच्या मनामध्ये संशय निर्माण का होत आहे याचा शोध घ्या. त्यांच्यासोबत या विषयावर मनमोकळेपणाने संवाद साधा. त्यांचे काय गैरसमज झाले आहेत ते अभ्यासा, चर्चा करा. बरेच प्रश्‍न सुटतील. दुसरी गोष्ट स्वभाव संशयी असल्याने तुम्हाला दैनंदिन जीवन त्यांच्याबरोबर जगणे कठीण जात आहे, या कारणावरून तुम्ही घटस्फोट मागू शकता. परंतु त्यासाठी भरभक्कम पुरावे देणे आवश्‍यक आहे. कायद्याचा वापर अंतिम पर्याय म्हणून करा. परंतु, त्यापूर्वी मुलाचे भवितव्याचा विचार करा. संसार वाचवण्याचा प्रयत्न करा. जन्माला आलेली कोणतीही व्यक्ती परिपूर्ण नसते. सकारात्मक दृष्टिकोन ठेवून संसार वाचवण्याला प्राधान्य द्या. 

लग्नापूर्वीच्या गुन्ह्याची माहिती लपवून फसवणूक
मी ३४ वर्षांची विवाहिता आहे. लग्नाला आठ वर्षे झालीत व ६ वर्षांची मुलगी आहे. माझे पती सरकारी खात्यामध्ये नोकरी करतात. ते सुरवातीला चांगले वागले. त्यानंतर छोट्या-छोट्या कारणावरून मला त्रास देऊ लागले. त्यांना दारूचे व्यसन आहे. कालांतराने मला असे समजले, त्यांच्याविरुद्ध एक गंभीर गुन्हा कोर्टामध्ये चालू आहे आणि लग्नापूर्वीचा हा गुन्हा आहे. माझ्या पतींनी यासंबंधी मला सांगितले नव्हते. यामुळे मला मानसिक त्रास झाला. माझी फसवणूक केली गेली. आजचे वागणेही बरोबर नाही. मला आणि मुलीला तुच्छतेने वागवतात. पुरेशा सुविधा देत नाहीत. प्रत्येक वेळी त्यांना पैशाची मागणी करावी लागते. कारण मला उत्पन्नाचे साधन नाही. मला त्यांच्या गुन्ह्याची माहिती कळाल्यापासून ते मला जास्तच त्रास देऊ लागले. छळवणूक व फसवणूक यामुळे मला त्यांच्यापासून घटस्फोट हवा आहे. त्यांना शिक्षा झाली तर पुढे माझ्या आणि मुलीच्या भवितव्याचा विचार करूनच मी हा निर्णय घेत आहे. 

- तुमच्या प्रश्‍नांवरून कोणत्या स्वरुपाचा गुन्हा आहे, हे स्पष्ट होत नाही. तरीदेखील आपल्या म्हणण्याप्रमाणे गंभीर गुन्हा आहे. वास्तविक ही महत्त्वपूर्ण बाब आपल्या पतींनी आपल्याला लग्न ठरविताना सांगायला हवी होती. त्यातून ते सरकारी नोकरीमध्ये आहेत. अशा नोकरीमध्ये तर अशा स्वरुपाची बाब कधीही लपून राहणार नाही. आज ना उद्या ही बाब आपल्या पत्नीला समजणार या गोष्टीचे गांभीर्य तुमच्या पतींना जाणवायला हवे होते.

त्यांनी तुम्हाला गृहित धरून ही गोष्ट तुम्हाला सांगितली नाही. विवाहसंबंध हे एकमेकांच्या विश्‍वासावर अवलंबून असतात. नात्यामध्ये नेहमी पारदर्शकता असणे आवश्‍यक आहे. तरच नाते टिकते, बहरते, फुलते. आणि या गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यास नाते तुटायला वेळ लागत नाही. या गोष्टींचा विचार तुमच्या पतींनी केला नाही. तुमचा विश्‍वासघात केला.

त्यामुळे तुम्ही या कारणांवरून घटस्फोटाचा अर्ज दाखल करू शकता. परंतु त्यापूर्वी संपूर्ण अभ्यास करून, मुलीचे, तुमचे भवितव्य लक्षात घेऊन निर्णय घ्या. योग्य तो कायदेशीर सल्ला घ्या. कायदा तुमच्या बाजूने आहे हेही लक्षात घ्या. फक्त त्याचा वापर योग्य वेळी करता येणे आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com