आंतरराष्ट्रीय होण्याआधीची रंगीत तालीम! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Kesari Shivraj Rakshe

शेतात दावणीला एक खिलार बैलजोडी आणि प्रत्येक घरात एक तरी तगडा मल्ल सांभाळायचाच, असं ग्रामीण भागातलं सूत्र होतं. कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा व लोकप्रिय खेळ.

आंतरराष्ट्रीय होण्याआधीची रंगीत तालीम!

शेतात दावणीला एक खिलार बैलजोडी आणि प्रत्येक घरात एक तरी तगडा मल्ल सांभाळायचाच, असं ग्रामीण भागातलं सूत्र होतं. कुस्ती हा महाराष्ट्राचा रांगडा व लोकप्रिय खेळ. राजर्षी शाहूंनी कुस्तीला राजाश्रय दिला. पुढं भारतात क्रिकेट रुजलं अन् कुस्तीची लोकप्रियता घटत गेली. अलीकडच्या दशकात मात्र परत कुस्तीला चांगले दिवस येत असल्याचं वातावरण तयार झालं. मुलीचंही कुस्तीतलं प्रमाण वाढलं. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे मल्ल चमकू लागले. महाराष्ट्राच्या मल्लाला जग जिंकलं तरी ''महाराष्ट्र केसरी'' हा मानाचा किताब जिंकण्याची इर्षा मनात कायम असते. १९६१ मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धेचे महत्त्व आजही टिकून आहे. मातीत निकाली पद्धतीने रंगणारी ही कुस्ती १९८८ ला मॅटवर आली आणि आंतरराष्ट्रीय कुस्तीच्या नियमाने बांधली गेली.

या निर्णयामागे महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचा असा उद्देश होता की, महाराष्ट्राचे मल्ल आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचायचे असतील तर तांबड्या मातीतील कुस्ती मॅटवर आणल्या शिवाय पर्याय नाही. परंतू परंपरा म्हणून स्पर्धेत माती विभाग ही कायम ठेवण्यात आला व अंतिम लढत मॅटवर घेण्यास सुरुवात झाली.

अलीकडे उत्तरेतील मल्लांनी ऑलिम्पिक गाजवलं परंतू ''खाशाबा जाधव'' यांच्या नंतर महाराष्ट्राच्या मल्लांला ऑलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करता आले नाही. हे मल्ल अजूनही ''महाराष्ट्र केसरीत''च अडकून आहेत का? असा प्रश्न निर्माण होतो.

६५ वी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पुण्यात रंगली. पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यंदाच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. पुणे जिल्ह्यातला खेडचा मल्ल शिवराज राक्षेने यावेळी मानाची गदा पटकावली. परंतु या दिमाखदार कुस्ती सोहळ्यात उपांत्यपूर्व फेरीत सिकंदर शेख व महेंद्र गायकवाड यांच्या कुस्तीच्या निकालावरून वाद रंगला आणि अख्या महाराष्ट्रातल्या कुस्तीप्रेमींनी या वादात उडी घेतली. सिकंदर भारतातील आघाडीचा मल्ल असल्याने कुस्तीशौकींनाच्या नजरा त्याच्याकडे लागल्या होत्या. सिकंदरच्या लढतीत गुणदानात पंचाकडून चूक झाल्याने त्याला पराभवाचा फटका बसल्याची प्रकट भावना राज्यभर उमटली. या वादामुळे तीन दिवस ''महाराष्ट्र केसरी'' हा विषय सोशल मीडियावर ट्रेड होत राहिला. यानिमित्ताने कुस्तीतल्या बरं, वाईटाबद्दल सोशल मीडियावर बरेच मुद्दे उमटत गेले.

'महाराष्ट्र केसरी''चा किताब जिंकून कुस्तीतून निवृत्ती घेण्याचे प्रमाण जास्त आहे. हा मान मिळाला ही प्रतिष्ठा मिळते, तो मल्ल नावारुपाला येतो आणि इथेच तो आपल्या कुस्तीची समाप्ती करतो. या मूळ कारणामुळे आपले मल्ल ऑलिम्पिकपासून दूर आहेत असा एक निष्कर्ष काढला जातो. मातीचा पारंपरिक आखाडा जपायला हवा व मातीच्या कुस्तीतच आपले कसब वाढवावे लागेल या हट्टापायी अनेक मल्ल मॅटपासून अजूनही दूर राहत आहेत.

पंजाब, हरयाणा, दिल्ली, उत्तरप्रदेश मधील मल्ल, प्रशिक्षकांनी दोन दशका आधीच मॅटवरील कुस्तीला पूर्णपणे जवळ केले. या राज्यातील सरकारनेदेखील कुस्तीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व सोयीसुविधा पुरवल्या. मात्र महाराष्ट्राची स्थिती या बाबतीत वाईट आहे. ज्या सिकंदरची चर्चा देशभर सुरू आहे तो सराव करत असलेल्या कोल्हापूरच्या गंगावेश तालमीत नीटनेटक्या मॅटची सुविधा देखील उपलब्ध नाही. ही खरी आपली शोकांतिका आहे.

कुस्तीची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोल्हापुरातल्या तालमींची दुरावस्था झाली आहे. सोयीसुविधांचा अभाव, चांगल्या प्रशिक्षकांची कमी असल्याने कोल्हापूरची कुस्तीतली कामगिरी रोडावली आहे. ग्रामीण भागातल्या तालमीही ओस पडल्या आहेत. काही ठिकाणी मात्र कुस्ती प्रेमींनी पदरमोड करून आखाडे बांधले आहेत. यानिमित्ताने ग्रामीण भागात कुस्ती जपण्याचा प्रयत्न होत आहेत. परंतू सरकार दरबारी कुस्तीला चालना देण्या संदर्भात सतत उदासीनता दिसते. या दशकात महाराष्ट्राचे कुस्ती केंद्र पुण्याकडे सरकले.

पुण्यात मिळणाऱ्या प्रशिक्षणाचा दर्जा सुधारल्याने मराठवाडा, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूरच्या मल्लांनी कुस्तीच्या सरावासाठी पुण्याला पसंती दिली आहे. परंतू हे केंद्र विविध स्पर्धेच्या निवड चाचण्यात उर्वरित महाराष्ट्रातील मल्लांना योग्य संधी देत नसल्याची चर्चा कुस्ती वर्तुळात रंगत असते. कुस्तीला राजाश्रय देणाऱ्या शाहूराजांनी अगदी पाकिस्तानच्या मल्लांना देखील राजाश्रय दिला. कुस्तीत कधी कोणावर अन्याय होणार नाही याची काळजी घेतली. कुस्तीतल्या अपप्रवृत्तींबद्दल त्यांना राग होता. परंतू अलीकडे कुस्तीतल्या याच ''शाहू'' विचाराला छेद देण्याचा प्रकार पुढे येत असतो. हे महाराष्ट्रच्या कुस्ती क्षेत्रासाठी धोकादायक आहे.

जागतिक अजिंक्यपद कुस्तीच्या पटलावर महाराष्ट्रातून अलीकडे नरसिंग यादव, संदीप यादव व राहुल आवारे यांच्या व्यतिरिक्त कुणाला झेंडा रोवता आला नाही. राहुल आवारे आणि नरसिंग यादव या दोन्ही मल्लांकडून महाराष्ट्राला ऑलिम्पिकच्या अपेक्षा होत्या परंतू वेळोवेळी उत्तरेतल्या कुस्तीतल्या प्रस्थापित लॉबीने कटकारस्थानाला हे मल्ल बळी ठरले. यंदाच्या महाराष्ट्र केसरीत अनेक नवख्या मल्लांनी उत्कृष्ट कामगिरी केली. शिवराज राक्षे, महेंद्र गायकवाड, माऊली कोकाटे, गतवर्षीचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील यांनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत आपण ऑलिम्पिक, आशियाई, राष्ट्रकुल स्पर्धेत लढण्यासाठी कुठल्याही बाबतीत कमी नाही याची चुणूक दाखवली. आता या मल्लांनी महाराष्ट्र केसरी पर्यंतच आपल्याला मर्यादित न ठेवता कुस्तीचे जागतिक पटल जवळ करण्याची गरज आहे.

अलीकडे सोशल मिडीयामुळे कुस्ती घराघरात पोहचली. फक्त कुस्तीबद्दलचा मजकूर तयार करणारी बरीचशी फेसबुक पेज, युट्युब चॅनेल महाराष्ट्रात आहेत. या माध्यमातून कुस्ती यात्रा,जत्रा,उरुसात भरणाऱ्या कुस्त्यांच्या फडाचे लाईव्ह प्रक्षेपण कुस्तीशौकींनपर्यंत पोहचले जाते. कुस्तीची लोकप्रियता वाढवण्यात या माध्यमाचा महत्वाचा वाटा आहे. यंदाच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला देखील सोशल मीडियावर लोकप्रियता मिळाली.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विजेत्या मल्लाला शासकीय नोकरी देण्याची घोषणा केली. ट्रिपल महाराष्ट्र केसरी मल्लांस थेट डीवायएसपी पद देण्याची शासनाची तरतूद आहे. परंतु एक वेळा महाराष्ट्र केसरी होणाऱ्या मल्लांना थेट पीएसआय, उप महाराष्ट्र केसरी मल्लांना एएसआय व महाराष्ट्र चॅम्पियन विजेत्याला पोलीस कॉन्स्टेबल पदाची नोकरी देण्याची मागणी होत आहे. सरकारने कुस्तीसाठी इतर राज्यांच्या धर्तीवर कृती कार्यक्रम आखणे गरजेचे आहे. तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा मल्लांसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर जाण्याआधीची रंगीत तालीम म्हणता येईल.

(लेखक कुस्तीगीर असून सध्या मुक्त पत्रकार म्हणून काम करतात..)