मतकरींचे नाट्यसंस्कार

Ratnakar Matkari
Ratnakar Matkari

आमचे घराणे नाटकाशी संबंधित असल्यामुळे रत्नाकर मतकरी यांचे नाव आमच्या कुटुंबात माझ्या लहानपणापासूनच घेतले जायचे. माझी मावशी सुधा करमरकर आणि रत्नाकर मतकरी हे बालनाट्ये करीत असत. त्यामुळे रत्नाकर मतकरींचे आमच्या घरी येणे-जाणे होते. त्यांची बालनाट्ये पाहूनच मी लहानाचा मोठा झालो. लहान असताना प्रेक्षक म्हणून निम्मा शिम्मा राक्षस, अलबत्या गलबत्या, अचाट  गावची अफाट मावशी, मारकुटे आणि मंडळी अशी काही त्यांची बालनाट्ये पाहिली आणि याच बालनाट्यांनी माझ्यावर चांगले संस्कार केले. तेव्हाच मला समजले, की रत्नाकर मतकरी नावाचे नाटककार आहेत आणि त्यांची ही नाटके आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

त्यांच्या "निम्मा शिम्मा राक्षस''मध्ये एक सीन आहे...एक दोरी इकडून तिकडे जाते आणि ही नदी आहे... हा सीन पाहिल्यानंतर माझ्या मनात एक प्रकारचा विश्वास निर्माण झाला, कारण नाटकाच्या बाबतीत आपण नेहमीच म्हणतो, की प्रेक्षकांनी समोर घडणाऱ्या गोष्टीवर विश्वामस ठेवायचा असतो आणि तो विश्वातस ठेवायला लहानपणीच शिकवले ते रत्नाकर मतकरी यांनी... तेव्हापासून त्यांची व माझी ओळख झाली.

रत्नाकर मतकरी यांची सूत्रधार नावाची संस्था होती. या संस्थेमार्फत रत्नाकर मतकरी लिखित व दिग्दर्शित राज्य नाट्य स्पर्धेत नाटके यायची. त्यांची नाटके व एकांकिका पाहण्यास मी सुरुवात केली. लोककथा ७८, आरण्यक अशी काही प्रायोगिक रंगभूमीवरील त्यांची नाटके पाहिली. समांतर व प्रायोगिक रंगभूमीवरील त्यांची नाटके लहानपणापासूनच पाहत असताना  कळत- नकळतपणे रत्नकर मतकरींशी मी जोडलो गेलो. त्यांच्या लिखाणावर मी कमालीचा प्रभावित झालो.

रत्नाकर मतकरी यांचं मी पहिलं नाटक दिग्दर्शित केलं ते विठो-रखुमाई. तेव्हा संगीत नाटक अकादमीने तरुण दिग्दर्शकांना संधी देण्याचे ठरविले आणि मला रत्नाकर मतकरींचे नाटक दिग्दर्शित करण्याची संधी मिळाली. ही गोष्ट १९८६ मधली आणि तेव्हा माझी प्रत्यक्ष त्यांच्याशी ओळख झाली. दुर्गाबाई भागवतलिखित "पैस''वर ते आधारित होते. ते दोन अंकी होते.  मग व्यावसायिक रंगभूमीवर मी त्यांचे पहिले नाटक केले ते "लफडं सोहळ्यातलं''. माऊली भगवती या संस्थेने ते आणलं होतं. त्यामध्ये रमाकांत देशपाडे व मोहन जोशी हे कलाकार होते. हेच नाटक त्यानंतर काही वर्षांनी सुधीर भट यांनी "एकदा पाहावं करून'' नावाने आणलं आणि ते खूप चाललं.

मग माऊली प्रॉडक्शनचे "कार्टी प्रेमात पडली'' हे त्यांचंच नाटक मी दिग्दर्शित केलं. त्यानंतर सुयोगची बरीचशी मतकरींनी लिहिलेली नाटके मी दिग्दर्शित केली. तेव्हापासून त्यांचा व माझा एकत्रित प्रवास सुरू झाला.

सुयोगचे सुधीर भट, गोपाळ अलगिरी, मी, रत्नाकर मतकरी आणि संगीतकार अशोक पत्की अशी आमची सगळ्यांची उत्तम केमिस्ट्री जुळलेली होती. जावई माझा भला, प्रियतमा, शूऽऽऽ कुठे बोलायचं नाही, दादाची  गर्लफ्रेण्ड अशी त्यांची नाटके केली. नाटकाच्या तालमीला ते आवर्जून यायचे आणि एक पॅड घेऊन बसायचे. त्यांच्या सूचना ते त्या पॅडवर लिहायचे. त्यांच्या सूचना लेखी असायच्या. मला वाटते ते स्वतः दिग्दर्शक असल्यामुळे लिहिताना तो प्रयोग कसा होईल हे लक्षात ठेवूनच त्याप्रमाणे ते नाटक लिहायचे. त्यांच्या सूचना नेमक्या  असायच्या  आणि त्या मी फॉलो करायचो. आमच्या नाटकावर बऱ्याच गप्पा रंगायच्या. नाटकाची संरचना ते चांगल्या पद्धतीने करीत असत. नाटकाची चांगल्या पद्धतीने रचना करण्यात त्यांचा हात कुणीच धरू शकत नाही. तो त्यांचा हातखंडा होता.

ते दररोज सकाळी १० वाजता लिहायला बसत असत. अगदी दररोजच्या घडामोडींपासून सगळ्या प्रकारचे लिखाण ते करीत असत. सातत्याने ते लिहायचे आणि त्यांचे लिखाण चौफेर असायचे. त्यांनी लेख लिहिले, कथा-कादंबऱ्या लिहिल्या. नाटके लिहिली, चित्रपट लिहिले... कोणत्याही माध्यमातून ते व्यक्त व्हायचे आणि ही बाब खूप अवघड आहे. ती सगळ्यांना जमते असं काही नाही. लहान मुलांची त्यांनी नाटके अधिक लिहिली. लहान मुलांचे भावविश्वळ त्यांना चांगले उमगले होते. लहान मुलांना सांगण्याची हातोटी त्यांना जमली होती. तशीच ती त्यांना मोठ्यांनाही सांगण्याची जमली. त्यांचे वाचन अफाट होते. दुसऱ्यांचे कामही पाहत असायचे. ते चित्रकारही होते. सामाजिक भान असलेला माणूस होते ते. मेधा पाटकरांबरोबर नर्मदा आंदोलनात ते सक्रिय सहभागी झाले होते. एका अर्थाने कला आणि साहित्यामध्ये जगलेला माणूस आणि अशी माणसे खूप कमी असतात. चांगल्या गोष्टींबद्दल नेहमीच ते आग्रही असायचे. आमच्या कामावर त्यांचे लक्ष असायचे.

ते स्वतः नाटक वाचून दाखवायचे. मी त्यांच्या घरी जायचो. ते मस्त गप्पा मारायचे व नाटक वाचून दाखवायचे आणि मला सांगायचे "हे नाटक मी दिग्दर्शित करणार आहे... तुला फक्त ऐकायला बोलावलं आहे.'' त्यांच्या बोलण्यातदेखील स्पष्टता होती. काय करायचे आहे आणि काय नाही हे त्यांना बरोबर ठाऊक होते. पुढच्या पिढीशीही त्यांचा संवाद असायचा. त्यांना  प्रेरणा व प्रोत्साहन द्यायचे. मतकरींनी बोलावले म्हणजे आमच्यासाठी तो आदेश असायचा. वेळेचे बंधन ते तंतोतंत पाळायचे. विविध विषयांवर गप्पा मारायचे. नाटक, त्यातील कलाकार मंडळी, त्यांचे काय चालले आहे... अशा सगळ्यांवर ते गप्पा मारायचे आणि आपले काय चालले आहे हेही सांगायचे. 
`गांधी अंतिम पर्व`पर्यंत तो माणूस सतत लिहीत राहिला आणि स्वतःचे म्हणणे स्पष्टपणे मांडत राहिला. मतकरी म्हणजे नाटकाची एक संस्था होती. त्यांच्या व माझ्या  वयामध्ये अंतर असले, तरी एक जवळचा मित्र गेला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com