Lionel Messi: मेस्सीची सर्वोच्च इच्छापुर्ती | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Lionel Messi

Lionel Messi: मेस्सीची सर्वोच्च इच्छापुर्ती

दिनांक : २० डिसेंबर २०१५

स्थळ : जपानमधील योकोहामा शहरातील आंतरराष्ट्रीय स्टेडियम

प्रसंग : फिफा जागतिक क्लब करंडक स्पर्धेचा अंतिम सामना

प्रतिस्पर्धी : अर्जेंटिनाचा रिव्हर प्लेट विरुद्ध (अर्जेंटिनाच्या लिओनेल मेस्सीचा ) बार्सिलोना

निकाल : रिव्हर प्लेट पराभूत विरुद्ध बार्सिलोना ०-३

मेस्सीची प्रतिक्रिया : रिव्हर प्लेटच्या संघाने इतकी मजल मारण्यासाठी किती परिश्रम घेतले होते, त्यांच्या चाहत्यांना जपानचा दौरा करण्यासाठी किती प्रयास पडले होते, ते किती आशेने आले होते आणि बार्सिलोनासारखा तगडा प्रतिस्पर्धी असला तरी ते किती रोमांचित झाले होते याची कल्पना मी करू शकतो. अशा स्थितीत मी, जो एक अर्जेंटिनाचाच नागरिक आहे, तो पहिला गोल करतो आणि त्यांच्या साऱ्या आशांवर पाणी फेरतो...गोल केल्यानंतर मी प्रत्यक्षात माफी मागत होतो का हे ठाऊक नाही, पण ती एक प्रकारची दिलगिरी होती

मेस्सीच्या या कृतीविषयी सामन्यानंतर रिव्हर प्लेट क्लबचे अध्यक्ष रोडोल्फो डीओनोफ्रीओ यांनी मेस्सीविषयी एकच विशेषण वापरले : जंटलमन!

हाच जंटलमन आता जगज्जेता बनला असताना त्याच्यावर स्तुतीसुमनांची उधळण करण्यापूर्वी आणखी एक संदर्भ जाणून घ्यावा लागेल. कारकिर्दीचा प्रारंभ नेवेल्स ओल्ड बॉईज या अर्जेंटिनातील क्लबकडून केल्यानंतर मेस्सीने रिव्हर प्लेट क्लबसाठी ‘ट्रायल’ दिली होती, मात्र त्याला नाकारण्यात आले होते. याच मेस्सीला नंतर बार्सिलोनाने करारबद्ध केले आणि...आणि मग पुढील इतिहास सर्वांच्या तोंडपाठ आहे, जो आजचा विषय नाही.

फुटबॉलचा ब्यूटीफुल गेम असा उल्लेख केला जातो, पण क्लब पातळीवरील फुटबॉलचे आर्थिक गणित पाहिल्यास गळेकापू स्पर्धा अटळ ठरते. पैसा आणि प्रसिद्धी डोक्यात जाऊन हवेत गेलेले अनेक सुपरस्टार नंतर फ्लॉपस्टार होऊन जमिनीवर कसे आपटतात याची अनेक उदाहरणे या खेळाने पाहिली आहेत. मेस्सीचेच समकालीन ख्रिस्तीयानो रोनाल्डो आणि नेमार यांचा नामोल्लेख इथे अनिवार्य ठरतो.

याच संदर्भात आजघडीचाच नव्हे तर सर्वकालीन सर्वश्रेष्ठ मेस्सी ठरावा म्हणून, अलीकडे GOAT (Greatest of All Time) असे संबोधले जाते ते बिरुद मेस्सीला मिळावे म्हणून साऱ्या जगाने देव पाण्यात ठेवले होते असे म्हणणे अतिशयोक्तीचे ठरू नये. मेस्सी ज्याचा वारसदार आहे त्या दिएगो मॅराडोनाने २५ नोव्हेंबर २०२० रोजी इहलोकाचा निरोप घेतला. तेव्हापासून मेस्सीने आपल्या दिग्गज देशबांधवाला विश्वकरंडकाच्या रूपाने आदरांजली अर्पण करावी अशी भावना दृढ होत गेली.

मेस्सीसाठी ही वाटचाल सोपी नव्हती. त्याला अपयशातून सावरण्यासाठी सत्त्वपरीक्षा द्यावी लागली. अमेरिकेतील ईस्ट रुदरफोर्ड येथील मेटलाईफ स्टेडियमवर २६ जून २०१६ रोजी कोपा अमेरिका करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चिलीविरुद्ध अर्जेंटिनाची पेनल्टीवर २-४ अशी हार झाली. पेनल्टी शूटआऊटमध्ये मेस्सीने पहिलीच संधी दवडली. त्यानंतर देश पराभूत होताच मेस्सी इतका भावविवश झाला की त्याने आकस्मिक निवृत्ती जाहीर केली. त्यामुळे जगभरातील फुटबॉलप्रेमींना धक्का बसला. मेस्सीने हा निर्णय बदलावा म्हणून तेव्हा जगाने देव पाण्यात ठेवले होते. मॅराडोनाच नव्हे तर पेले यांनी सुद्धा मेस्सीला निवृत्ती मागे घेण्याचे साकडे घातले होते.

जो पेनल्टी घेतो तोच ती दवडू शकतो. असे घडणे फुटबॉलमध्ये नॉर्मल पण निराशा करणारे असते, परंतु मेस्सीने थोडी वाट बघावी आणि हा प्रसंग विसरून जावा. याचे कारण अनेक चांगल्या खेळाडूंना सुद्धा यातून जावे लागले आहे. कोणत्या तरी टप्प्यास प्रत्येक जणच पेनल्टी दवडतो, असे पेले तेव्हा म्हणाले होते.

मेस्सी निवृत्तीबद्दल म्हणाला होता की, ड्रेसिंग रुममध्ये मला वाटले की राष्ट्रीय संघाकडून माझ्यासाठी हा शेवट झाला आहे. आता देशासाठी खेळणे ही गोष्ट माझ्यासाठी उरलेली नाही. या घडीला मला असे वाटत आहे, पुन्हा एकदा घोर निराशा झाली आहे.

हाच मेस्सी सावरला आणि अर्जेंटिनासाठी खेळण्यास पुन्हा सज्ज झाला. तेव्हा त्याचे उद्‍गार होते : आम्ही कोपा अमेरिका स्पर्धेचा अंतिम सामना गमावला तेव्हा माझ्या डोक्यात बऱ्याच विचार येऊन गेले. मी निवृत्तीचा गांभीर्याने विचार केला, पण माझे अर्जेंटिनावर आणि आमच्या जर्सीवर इतके प्रेम आहे की मी आता फुटबॉल सोडू शकत नाही....मी खेळत राहावे असे ज्या सर्वांना वाटत होते त्यांचा मी ऋणी आहे. त्यांना जल्लोष करण्याची संधी आम्ही लवकरच देऊ शकू अशी आशा आहे.

तेव्हाचा आशावादी मेस्सी पाहून तमाम फुटबॉलप्रेमींचा जीव भांड्यात पडला. १८ डिसेंबर २०२२ रोजी मेस्सीने पाचव्या प्रयत्नात विश्वकरंडक जिंकला. देशाला आणि देशबांधवांना उद्देशून तो म्हणाला : आय लव्ह यू.

मेस्सीमधील देशाभिमानी क्रीडापटू साऱ्या जगाने पाहिला. पॅरिस सेंट-जर्मेन संघातील सहकारी आणि फ्रेंच प्रतिस्पर्धी किलीयन एम्बापे याने प्रतिकार करूनही मेस्सीने जगज्जेता बनण्याची अखेरची संधी निसटू दिली नाही. मेस्सीने कारकिर्दीत जिंकलेल्या करंडकांची यादी मोठी आहे, पण विश्वकरंडक जिंकून त्याने इच्छापूर्ती केलाी आहे. विशेष म्हणजे मॅराडोनाप्रमाणे मेस्सीने विश्वकरंडक जिंकावा अशी मनिषा बाळगलेल्यांचीही अपेक्षापूर्ती झाली आहे.

त्यागाची परिसीमा आणि नेतृत्वगुणांची सिद्धता

फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज पर्मनंट अर्थात खेळात फॉर्म तात्कालिक तर दर्जा चिरंतन अशी उक्ती प्रसिद्ध आहे, मात्र खेळातील सर्वोच्च अशा झळाळत्या करंडकाशिवाय त्याची सिद्धता होत नसते. मेस्सीची जगज्जेतेपदाची प्रतिक्षा लांबत गेली तसे मोक्याच्या क्षणी त्याच्या कौशल्य नव्हे तर मनोधैर्याबाबत आणि नेतृत्वगुणांबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यातच सलामीला सौदी अरेबियासारख्या ‘अंडरडॉग्ज’ही नसलेल्या प्रतिस्पर्ध्याकडून अर्जेंटिनावर पराभवाची नामुष्की ओढविली. यानंतर मेस्सीसमोर स्वतःलाच नव्हे तर संघाची तारू सावरण्याचे आव्हान होते. पराभवानंतर मेस्सी म्हणाला की, आम्ही कोणतीही सबब पुढे करणार नाही. आम्ही संघ म्हणून पूर्वीपेक्षा आणखी एकजूट दाखवू. हा चमू भक्कम आहे आणि आम्ही तसे दाखविले आहे. अशा पराभवातून आम्हाला दीर्घ काळ जावे लागले नव्हते, पण आताच आमचा संघ किती सच्चा आहे हे आम्ही दाखवू.

संघाचे मनोधैर्य कसे आहे, या प्रश्नावर मेस्सी म्हणाला की, मृतवत...

त्याने चाहत्यांना उद्देशून सांगितले की, तुम्ही आमच्यावरील विश्वास कायम ठेवा, आम्ही तुम्हाला ताटकळत ठेवणार नाही.

याच मेस्सीने गेल्या वर्षी कोपा अमेरिका अंतिम सामन्यापूर्वी संघातील सहकाऱ्यांना प्रेरित करणारे बोल ऐकविले. ‘आपण कोण आहोत हे आपल्याला याआधीपासूनच ठाऊक आहे, ब्राझीलचा संघ काय आहे सुद्धा आपण जाणतो,’ असा प्रारंभ करून तो म्हणाला की, ‘मी याबद्दल आणखी काही भाष्य करू इच्छित नाही. ४५ दिवस तुम्ही केलेल्या मुलांनो, त्यागाबद्दल मला तुमचे आभार मानायचे आहेत. माझ्या वाढदिवसाच्या वेळी मी म्हणालो होतो की आपला चमू भन्नाट आहे, सुंदर आहे.’ अर्जेंटिनाच्या मेस्सीचे नेतृत्वगुणही जगज्जेतेपदा मुळे सप्रमाण सिद्ध झाले.

balmukund11@yahoo.com