पट्टेदार तरसांची टेहळणी आणि संवर्धन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wild Animal Taras

वरकरणी सुनसान वाटणाऱ्या समोरच्या परिसरात आम्हाला काही हालचाल दिसली. पलीकडे थोड्याच अंतरावर एक पट्टेदार तरस स्तब्ध उभं होतं. तो नर होता. त्याच्या वर्तनात भयाचा मागमूस नव्हता.

पट्टेदार तरसांची टेहळणी आणि संवर्धन

- मिहिर गोडबोले mihirgodbole@gmail.com

सन २००९ च्या डिसेंबरातील सकाळ. कडाक्याची थंडी पडली होती. लांडग्यांच्या एका कळपाच्या मागावर आम्ही पुण्याहून निघालो होतो. पुण्याहून मयूरेश्वर अभयारण्य ७२ किलोमीटरवर आहे. तिथल्या खुरट्या झाडा-झुडपांच्या शुष्क अधिवासात या लांडग्यांची आम्ही नियमित पाहणी करत होतो. सूर्योदय होण्यापूर्वीच आम्ही तिथं पोहोचलो आणि एका छोट्या टेकाडावर टेहळणीसाठी थांबलो. भोवतालच्या विशाल भूप्रदेशाचं विहंगम दृश्य तिथून पाहता येत होतं. सूर्य उगवला.

वरकरणी सुनसान वाटणाऱ्या समोरच्या परिसरात आम्हाला काही हालचाल दिसली. पलीकडे थोड्याच अंतरावर एक पट्टेदार तरस स्तब्ध उभं होतं. तो नर होता. त्याच्या वर्तनात भयाचा मागमूस नव्हता. काही क्षण आमचं निरीक्षण केल्यानंतर सावकाश पावलं टाकत ते तरस तिथून निघून गेलं.

या अचानक दर्शनलाभाचं आम्हाला आश्चर्यच वाटलं. कारण, तरस हा निशाचर प्राणी असून तो क्वचितच नजरेस पडतो. त्याचे आणखी काही भाऊबंद शोधायचेच असं ठरवून आम्ही त्यांच्यावरही बारकाईनं लक्ष ठेवायचं ठरवलं.

गवतातला वाघ

स्थानिक लोकांकडून लांडग्यांची खबरबात घेत असताना बऱ्याचदा ते आम्हाला, आपल्या गावांभोवतीच्या परिसरात वाघ पाहिल्याचं सांगत. या परिसरात वाघ नाहीतच याची खात्री असल्यानं, त्यांचे हे दावे अतिशयोक्त समजून आम्ही मोडीत काढत असू; पण हे पट्टेदार तरस दिसल्यापासून मात्र आम्ही विचारात पडलो. या तरसाच्या अंगावरचे पट्टे पाहून गावकऱ्यांना तो वाघ असल्यासारखं वाटलं असेल का?

असं जनावर दिसल्याचे निरोप येताच ते पडताळून पाहण्यासाठी आम्ही या प्रदेशात सर्वदूर फिरलो. बहुतेक सगळा भाग पायीच पालथा घातला (ही २०११-१२ मधली गोष्ट असावी). एकदा गावच्या पाळीव जनावरांच्या वहिवाटीचा वाटणारा एक रस्ता आमच्या दृष्टीस पडला. तिथं आम्हाला तरसाच्या काही खुणा दिसल्या. त्यांचा माग काढत काढत आम्ही एका नैसर्गिक पाणवठ्यापाशी आलो. याच भागावर लक्ष केंद्रित करण्याचं आम्ही ठरवलं. कामाच्या पाळ्या वाटून घेऊन दिवसांमागून दिवस त्या पाणवठ्याचं आम्ही अहोरात्र निरीक्षण करत बसलो; पण आमचं नशीब मुळीच बलवत्तर नव्हतं.

अखेरीस २०१२ च्या फेब्रुवारी महिन्यातील एका भल्या सकाळी अचानक तरसाची एक मादी पाण्यापाशी आली. तिच्या उजव्या कानाला एक छोटीशी खाच होती. पाणी पिऊन तहान भागताच, ओबडधोबड खडकांनी आणि दाट झुडपांनी भरलेल्या उंच-सखल प्रदेशातून ती दूर निघून गेली. पुढचे काही दिवस त्याच ठिकाणी आम्ही तिची टेहळणी करत बसलो. तिचा क्रम थोडाही बदलला नाही. रोजच्या रोज पटकन पाणी पिऊन ती त्या झुडपांत गडप होऊन जाई. आमचं भाग्य उदयाला आलं होतं. थोड्याच कालावधीत तरसांच्या वापरातल्या अनेक गुहांचा आम्ही छडा लावला.

चकवा देणारा राजा

यानंतर मात्र गुहेच्या परिसरातच या मादीचा माग आम्ही नियमितपणे काढत राहिलो. सूर्योदयानंतरही बराच काळ ती गुहेबाहेरच हिंडत असते असं आम्हाला आढळून आलं. मग एक दिवस आणखी एक तरस गुहेजवळ येताना आम्हाला दिसलं. ते थोडं अधिक जवळ येताच, तो एक भलामोठा नर असल्याचं आमच्या लक्षात आलं. तो नर गुहेपाशी आला. आजूबाजूला हुंगत त्यानं अंदाज घेतला आणि तो तिथंच आरामात पहुडला. थोड्याच वेळात आमची तरस-मादी तिथं आली. गुहेजवळ येण्याच्या बऱ्याच अगोदर नर त्या जागी आल्याचा सुगावा तिला लागलेला असावा. सावध पावलं टाकत ती जवळ आली आणि संघर्षाला तोंड फुटलं. बरीच तोंडातोंडी झाली. परिसर दणाणला. अखेरीस ते दोघंही शेजारशेजारच्याच; पण वेगवेगळ्या गुहेत शिरले. हा नर भलताच आडमाप अंगाचा होता. त्यामुळे आम्ही त्याचं नाव ‘राजा तरस’ असं ठेवलं.

नंतर साहजिकच या दोघांची जोडी जमायला वेळ लागला नाही. आमच्या अपेक्षेप्रमाणेच ‘आम्हाला दोन वाघ दिसले’ असे सांगावे स्थानिकांकडून येऊ लागले. उन्हाळा ‘मी’ म्हणत होता. हे दोघं त्या पाणवठ्याकडे नियमित येऊ लागले, त्यामुळे गुहेपर्यंत त्यांच्या परतीचा माग काढणं आम्हाला सोपं जाऊ लागलं.

एके दिवशी मादी नेहमीपेक्षा आमच्या जरा जास्तच जवळ आली. आम्हाला आश्चर्यच वाटलं. अर्थात्, आम्ही आजूबाजूला असल्याचं भान तिला असायचं, याची जाणीव आम्हालाही होतीच; पण नेहमी ती आमच्यापासून बरंच अंतर राखत असे. आमच्या अस्तित्वाची फारशी दखलही ती घेत नसे.

संध्याकाळी उशिरा आम्ही मुक्कामाच्या जागी आलो. दिवसभराचे फोटो पाहताना तिच्या या अस्वाभाविक वाटलेल्या वर्तनाचं कारण आमच्या निदर्शनास आलं. तिची स्तनाग्रं टपोर झाली होती. अर्थ स्पष्ट होता. ती आपल्या पिल्लांना दूध पाजत होती. पिल्लांच्या काळजीपोटीच गुहेच्या परिसरात ती अधिक सावध बनली होती. अधिक बचावात्मक पवित्रा घेत होती. मिळालेला इशारा ध्यानी घेऊन दुसऱ्या दिवसापासून आम्ही दूरवर थांबून केवळ दुर्बिणीतूनच त्यांचं निरीक्षण करू लागलो. लवकरच आनंदीआनंद झाला. ते जोडपं आपल्या तीन बछड्यांबरोबर आम्हाला दिसलं. ही त्यांची गुहा त्यांनी फारच काळजीपूर्वक निवडलेली होती. त्या प्रदेशातील अगदी दूरवरची सुरक्षित जागी ती होती. जवळपास कसलाच अडथळा किंवा धोका नसल्यानं ही नशीबवान पिल्लं अगदी सूर्योदयानंतरही गुहेबाहेर मनसोक्त बागडू शकत होती.

ही पिल्लं नोव्हेंबरपर्यंत आपल्या आई-वडिलांबरोबर राहिली. सातेक महिन्यांत ती हळूहळू आपली आपण हिंडू लागली. कधी कधी अनेक दिवस लोटले तरी त्यांचं दर्शनच घडत नसे. आम्हाला वाटे, गेले हे स्वतंत्रपणे जगायला कायमचे निघून. तेवढ्यात ती पिल्लं पुन्हा आपल्या आई-वडिलांकडे परतत. सन २०१३ च्या जानेवारीत मात्र जोडीच तेवढी उरली. पिल्लं स्वतंत्र झाली होती. त्यांनी आपापला नवा टापू शोधला होता.

इतका प्रदीर्घ काळ या प्राण्यांचं इतकं काटेकोर निरीक्षण करूनही त्यांच्या पर्यावरणीय परिस्थितीबद्दल आपल्याला फारच थोडी माहिती असल्याचं आमच्या लक्षात आलं आहे. म्हणून आता त्या प्राण्यांच्या रेडिओ टेलिमेट्री ट्रॅकिंग (प्राण्यांच्या शरीरात स्वयंचलित संदेशप्रक्षेपण यंत्रणा बसवून तीद्वारे त्यांचा माग काढणं) प्रकल्पात आमची टीम सहभागी झाली आहे. याद्वारे या प्राण्यांविषयी अधिक माहिती प्राप्त होईल. भावी काळात त्यांच्या संवर्धनासाठी योग्य ती धोरणं आखण्यासाठी ही माहिती उपयुक्त ठरेल.

या तरस-कुटुंबाचं निरीक्षण करण्याचा आमचा आनंद निर्भेळ राहिला नाही. तो संमिश्र ठरला; कारण, त्यांच्या भवितव्याची आता आम्हाला चिंता वाटू लागली.

पुणे परिसरातील या तरसांपुढं विविध स्वरूपाचे धोके उभे ठाकले आहेत. त्यांचं वसतिस्थानच न उरणं हा त्यातला सर्वात मोठा धोका होय. आज हे सारे प्राणी कृषिप्रधान टापूत जगत आहेत. खासगी शेतजमीन, वनजमीन, सरकारी मालकीची अन्य जमीन आणि पाळीव जनावरांच्या चराईसाठी राखीव कुरणं यांची सरमिसळ झालेला हा प्रदेश आहे. जलसिंचनाबरोबरच खतं, बी-बियाणं यांसारख्या अन्य आवश्यक बाबीही अत्यंत खर्चिक झाल्यानं शेती दिवसेंदिवस परवडेनाशी झाली आहे. हा सारा भाग पुणे शहराच्या जवळच आहे, त्यामुळे जमिनीला भरमसाट किंमत येत आहे. अर्थातच शेतकरी आपल्या मालकीची शेतजमीन भूविकसकांना विकू पाहत आहेत. या जमिनीचे नागरवस्त्यांत रूपांतर होत आहे. साहजिकच गवताळ प्रदेशातील सजीवांच्या नैसर्गिक वसतिस्थानाचा पुरता नाश होत आहे.

रस्त्यावरील वाहनांची धडक, रोगसंक्रमण आणि विषबाधा यांसारखे या प्राण्यांच्या अस्तित्वावर घाला घालणारे अन्य धोकेही आहेतच. त्यांचा निवास असलेल्या गवताळ आणि झुडपांच्या प्रदेशातून रस्ते काढले जातात. वेगानं जाणाऱ्या वाहनांची धडक बसून मरणाऱ्या प्राण्यांची संख्या अत्यंत चिंताजनक आहे. विशेषतः नव्या जागेकडे स्थलांतर करू पाहणाऱ्या तरसांच्या जिवाला अशा रस्त्यांवर फारच धोका असतो. विषबाधा हाही आज खरोखरच एक गंभीर धोका बनला आहे. या भागातील स्थानिक लोक जाणूनबुजून तरस मारत नसले तरी त्याही स्वरूपाच्या काही घटना आमच्या निदर्शनास आल्या आहेत.

बऱ्याचदा तरसांना मारून त्यांची कातडी वाघाची कातडी म्हणून विकली जाते. तरस काही वेळा साळिंदराच्या गुहरात पिलांना जन्म देतात. साळिंदराचं मांस हे काही भागात अत्यंत चविष्ट मानलं जातं. त्यासाठी साळिंदराच्या शोधात असलेल्या शिकाऱ्यांच्या नजरेस ही तरसाची पिल्लं पडली की तीही मारली जातात. रसायनयुक्त खाद्य दिल्या गेलेल्या पाळीव पक्ष्यांचे या प्राण्यांवर कोणकोणते दुष्परिणाम होतात हे प्रदीर्घ संशोधनानंतरच नीट कळेल. (आज माणसंही असले पक्षी खाऊन आपलं आरोग्य धोक्यात घालतच आहेत.)

देशाचं लक्ष आज सुप्रसिद्ध अरण्यांतील रुबाबदार, देखण्या आणि म्हणून लोकप्रिय प्राण्यांवर अधिक केंद्रित झालं आहे. ते योग्यही म्हणता येईल. ‘काठावर’च्या छोट्या छोट्या वनक्षेत्रांना बेदखल करण्याकडेच आपला कल असतो.

परिणामी, अशा प्रदेशातील खरंखुरं जैववैविध्य आज नाहीसं होत आहे. या वास्तवाकडे देशवासीयांचं लक्ष वेधण्यासाठी या लेखाचं काही साह्य होईल अशी आशा आम्ही बाळगतो. या प्रदेशांना थोडंफार जरी संरक्षण लाभलं तर केवळ तरसांनाच नव्हे, तर अन्य कितीतरी प्रजातींना त्याचा लाभ मिळू शकेल.

(लेखक ‘ग्रासलँड ट्रस्ट’चे संस्थापक असून पुणे जिल्ह्यातील गवताळ प्रदेशातील जैववैविध्याच्या जतनासाठी प्रयत्नरत आहेत.)

(अनुवाद : अनंत घोटगाळकर)

anant.ghotgalkar@gmail.com

टॅग्स :Wild Animalssaptarang